baba kadam bodyguard बाबा कदम पुस्तक

बॉडीगार्ड – सत्य कथेवर आधारित बाबा कदमांची गाजलेली कादंबरी

बाबा कदम यांनी लिहिलेली बॉडीगार्ड ही रहस्यमय कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. बाबा कदम हे वकील होते आणि पोलिसांसोबत काम करत होते. सरकारी वकील म्हणून काम करताना त्यांना अशा अनेक केसेस व घटनांना सामोरं जावं लागायचं ज्यातून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिसायचे. या केसेस मधून मिळालेले अनुभव बाबा कदमांनी आपल्या खास शैलीत शब्दबद्ध केले आणि कथा, कादंबऱ्यांच्या स्वरूपात वाचकांसमोर आणले.

शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे रहस्य, पोलिसी कारनामे, प्रचंड वेगाने विविध पातळ्यांवर फिरवून आणणारी कथा, मानवी स्वभावाचे वैविध्यपूर्ण कंगोरे, आपल्यातीलच एक वाटणारी पात्रांची स्वभाववैशिष्ट्य व त्यांची भाषा, कायद्याची माहिती या अशा अनेक गोष्टींमुळे बाबा कदमांच्या कादंबऱ्यांनी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. आजही या कादंबऱ्या व कथा आवडीने वाचल्या जातात कारण काळ बदलला तरी मानवी स्वभाव तसाच राहतो. त्या कथांच्या काळातील विविध वृत्तींची माणसं आजही आपल्या सभोवती दिसतात आणि मग पुन्हा आपण या कथांमध्ये गुंतून जातो.

‘बॉडीगार्ड’ ही बाबा कदम यांची गाजलेली कादंबरी आधी कथेच्या स्वरूपात प्रकाशित झाली होती. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी या कथेचे रूपांतर कादंबरीमध्ये केले. टोकाचा भिन्न स्वभाव असलेल्या दोन भावांची व त्यांच्या कुटुंबाची, इर्षेतून व गावच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर होणारी ससेहोलपट हा या कादंबरीचा मुख्य गाभा असला तरी इतर व्यक्तिरेखांच्या वैविध्यपूर्ण प्रभावामुळे कादंबरीला अनेक ठिकाणी वेगळे वळण मिळते.

रावसाहेब व बलराम हे दोघे सख्खे भाऊ पण राजकारणात सक्रिय असलेला रावसाहेब अतिशय धूर्त आणि बलराम त्याच्या विरुद्ध टोकाचा परोपकारी. त्यांच्या वडीलांनी भावडांमध्ये वैर होऊ नये म्हणून आधीच जमिनीचे पंचांसमोर वाटे करून दिलेले असतात तरी वडिलांच्या मृत्यूनंतर लोभी रावसाहेब बलरामची अर्धीअधिक जमीन बळकावतो. त्यावरही भांडण, वाद नको म्हणून आणि वडिलांना वचन दिलेले असते म्हणून बलराम त्याविरुद्ध कुठेही तक्रार करत नाही. रावसाहेब अशा प्रकारचे अन्याय गावातल्या लोकांवरही करत असतो. याला त्रासलेले गावकरी जबरदस्तीने बलरामला गावपातळीवरील निवडणुकीमध्ये रावसाहेबाच्या विरुद्ध उभं करतात. पैसा आणि ताकदीच्या जोरावर रावसाहेबच या निवडणुकीमध्ये जिंकतो. याचं बलरामला फार काही वाटत नाही पण जेव्हा रावसाहेबाच्या विजयी निवडणुकीमध्ये दारू पिलेले त्याचे अतिउत्साही कार्यकर्ते बलरामच्या घराला आग लावतात तेव्हा मात्र बलराम खचतो. त्याचं प्रचंड नुकसान होतं. तरीदेखील तो या घटनेची कुठेही तक्रार न करता, स्वतःच्या मुलांकडून वचन घेतो की, ते कधी राजकारणात जाणार नाहीत आणि रावसाहेबाचा बदला घ्यायचा विचार करणार नाहीत.

घर जळाल्यावर बलराम दूर माळरानात आयुष्याची नव्याने सुरुवात करतो. रावसाहेबासोबत पुन्हा कसलाही संबंध होऊ नये हीच त्याची इच्छा असते पण रावसाहेब मात्र बलराम व त्याच्या मुलांचा सदैव मत्सर करत असतो. याला अनेक कारणं असतात. एकतर बलरामचा लहान मुलगा ‘उदय’ शिकून वकील होण्याच्या मार्गावर असतो, ज्याच्यामुळे भविष्यात आपल्याला व आपल्या मुलांना त्रास होईल, असं रावसाहेबांना वाटत असतं. दुसरं म्हणजे बलरामच्या मोठा मुलाचं, ‘उमाजीचं’ लग्नं, त्यांच्या चांगुलपणामुळे तालुक्यातील प्रभावशाली प्रस्थ असलेल्या संस्थानिक सर्जेराव मानेंच्या मुलीसोबत होतं. या सर्जेराव मानेंच्या मुलीसोबत खरंतर रावसाहेबाला स्वतःच्या मुलाचं लग्न करून देऊन संबंध जोडायचे असतात जेणेकरून राजकारणात त्याची बाजू अधिक पॉवरफूल होईल. पण सर्जेराव प्रामाणिक आणि तत्ववादी असतात, त्यांना रावसाहेबाचा इतिहास माहीत असतो. ते उलट बलरामच्या मुलांना प्रगती करण्यास, सुरक्षित राहण्यास मदत करतात. रावसाहेबाने बलराम आणि त्याच्या मुलांचा मत्सर करण्यास आणखी एक महत्वाचे कारण असते, ते म्हणजे बलरामच्या मोठ्या मुलाला सर्जेरावांनी दिलेला बॉडीगार्ड शिवराम आणि त्याची तमाशातील बायको शायनी.

या सर्व व्यक्तिरेखांच्या आयुष्यातील वैयक्तिक घडामोडी मांडत कादंबरी पुढे जात असताना अचानक उमाजीचा खून होतो. त्याचा बॉडीगार्ड असतानाही. हा खून करणाऱ्या मारेकऱ्यांना उदयने पाहिलेले असते, तशी त्याने पोलिस तक्रारही केलेली असते पण कोर्टात मात्र तो आपली साक्ष फिरवतो आणि त्यामुळे उमाजीचे मारेकरी मोकळे सुटतात. उदय असं का करतो?, उमाजीचा खून कोण व कशासाठी करतात?, उमाजीचा बॉडीगार्ड आणि त्याच्या बायकोचा यामध्ये काय संबंध? अशा प्रश्नांची उकल करत ही कादंबरी पुढे सरकते.

कथेमध्ये काही पात्रं फार थोड्यावेळासाठी येतात. त्यातील काहींचा कथा पुढे नेण्यास उपयोग होतो तर काही त्या काळातील समाजव्यवस्था, तरुणांची बदलत जाणारी मानसिकता दाखवतात. कथेत उल्लेख झालेल्या काळाचे, शहरांचे व भागांचे वर्णनही बाबा कदमांनी खुमासदार रीतीने केले आहे.

बाबा कदमांचं खरं नाव वीरसेन आनंदराव कदम. त्यांचं जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. त्यांच्या कादंबऱ्या व कथांमध्ये संस्थानिक, त्यांचे वाडे, त्यांच्या पद्धती अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असते कारण त्यांचं बालपण संस्थानी वातावरणातच गेलं. मेहनतीच्या जोरावर आणि सदैव कार्यमग्न राहत ते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आले. त्यांच्या पहिल्याच ‘प्रलय’ या कादंबरीवर ‘देवाशप्पथ खरं सांगेन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

बाबा कदम सांगायचे की, ‘मी कुठेही असलो तरी माझ्यासोबत माझी लिखाणाची वही असते. एकदा हातात घेतलेली कादंबरी पूर्ण न करता खाली ठेवायला मला नको वाटते. निसर्ग जसा आहे तसा चितारण्याचा माझा प्रयत्न असतो.’

त्यांनी जवळपास ८० पेक्षा अधिक कथा, कादंबऱ्या व व्यक्तिचित्रणपर पुस्तकं लिहिली आहेत. त्याकाळात ग्रंथलयांमध्ये बाबा कदमांच्या पुस्तकांच्या कितीही प्रती ठेवल्या तरी कमी पडायच्या. अनेक वैविध्यपूर्ण विषयांवर लिहिणाऱ्या आणि लिहिताना स्वतःच्या मनातील कलाकार जिवंत ठेवणाऱ्या, अनेक वर्ष रसिक वाचकांची क्षुधा तृप्त करणाऱ्या बाबा कदमांना विनम्र अभिवादन.

– अश्विनी सुर्वे

पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक पुढे देत आहे.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *