‘भाषावार प्रांतरचनेसाठी प्रदीर्घ लढा देणारे महाराष्ट्र’ अशी इतिहासात महाराष्ट्राची नोंद आहे. अंगावर काटा येतो हे वाचून. महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी आपले बलिदान केले. रस्ते रक्ताने माखले होते. लाखोंनी तुरूंगवास भोगला. बिगर महाराष्ट्रीयही या लढ्यात सहभागी होते.
मुंबईतील हुतात्मा चौकाजवळून जाता-येताना तेथील शिल्प पाहून मन आदराने आणि अभिमानाने भरून येतं पण या चळवळीबद्दल आपल्याला फार त्रोटक माहिती आहे, याची मनस्वी खंतही वाटते. या चळवळीची आणि चळवळीनंतरची महाराष्ट्राची वाटचाल याबद्दल माहिती मिळावी या दृष्टीकोनातून हे ‘संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे ‘ हे पुस्तक वाचायला घेतलं.
लोकशाही रुजविण्यासाठी भाषिक राज्याची गरज असते. ती गरज लक्षात घेऊन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी करण्यासाठी जनतेने पुढाकार घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्याचे नेतृत्व कामगार, शेतकरी व मध्यमवर्गीय करीत होते. ‘समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र’, अशी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यांची व्यापक एकजुटीची घोषणा होती.
महाराष्ट्र दिनाची विकिपीडियावर फार तोकडी माहिती उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून महाराष्ट्र दिन साजरा केला जातो असं तिथे दिलंय. तिथे फक्त त्या दिवशी काय झालं हे सांगितलंय, पण त्या घटनेचं महत्त्व समजण्यासाठी इतिहास जाणून घेणं गरजेचं असतं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी जनतेने केलेल्या बलिदानाची ही आठवण आहे.
संयुक्त महाराष्ट्राला २०१० साली पन्नास वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या पन्नास वर्षात आपण काय मिळवायला पाहिजे होतं आणि ते साध्य झालं का? महाराष्ट्रात शेतीची अवस्था काय आहे, शिक्षणाची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, कला व संस्कृतीचं काय होतय, सामाजिक न्यायाची दिशा कोणती? महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कोणती होती, त्यात सातत्य आहे काय? ते दिशांतर कसं होतय? विकासाची वाटचाल समतेच्या दिशेने होतीय का? आणि त्याला पर्याय काय? या अनुषंगाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आढावा ‘संयुक्त महाराष्ट्राची पन्नास वर्षे’ या पुस्तकात घेण्यात आलेला आहे.
किशोर बेडकिहाळ, दत्ता देसाई, डॉ. अनिल पडोशी, अरविंद वैद्य, रंगनाथ पठारे, अरुण साधू, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवर लेखकांनी आपले विचार या पुस्तकात मांडले आहेत. या सर्व लेखकांनी ‘श्रमिक प्रतिष्ठान’तर्फे आयोजित ‘अविनाश पानसरे स्मृती व्याख्यानमालेत’ दिलेली ही व्याख्याने आहेत, ज्यांचं संकलन व संपादन प्रा. विलास रणसुभे यांनी केलं आहे.
यातील ‘संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कुणासाठी व कशासाठी?’ या प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांच्या लेखामधून या चळवळीचा इतिहास आणि पुढील प्रवास आपल्यासमोर विस्तृतपणे उभा राहतो. त्यांनी त्या काळातील नेत्यांच्या भूमिका, वक्तव्य, सरकारचा आडमुठेपणा, भाषावार प्रांतरचना म्हणजे काय, त्याची गरज तसेच मुंबईसोबत विदर्भ, बेळगाव, कारवार वेगळा करण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. सयुंक्त महाराष्ट्राला कडाडून विरोध करणाऱ्या आणि शेवटी संयुक्त महाराष्ट्र घडवणारे म्हणून समोर आलेल्या नेत्यांचीही ते पोल खोलतात.
मुळात भाषेचे राज्य का असावे याबद्दल ते सांगतात की, ‘भाषेचे राज्य म्हणजे केवळ सत्ता काबीज करण्यासाठी राज्य नाही! संयुक्त महाराष्ट्राची मागणी ही फक्त सत्ताग्रहण करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर संयुक्त महाराष्ट्राचा संबंध पुनर्घटनेचा, महाराष्ट्रामधल्या एकंदर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांची पुनर्रचना व्हावी, या सर्वांना काही नवे तेज प्राप्त व्हावे, नवी गती प्राप्त व्हावी यासाठी होती.’
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र का होत नव्हता, यावर ते सांगतात की, ‘मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही एवढ्यावरच हे गाडे अडलेले होते. एकतर मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही, द्यायची झालीच तर महाराष्ट्रासकट गुजराती राज्याला एकत्रित बांधूनच द्यायची. आणि, ती द्यायची तीदेखील त्यामध्ये मराठी भाषकांची संख्या जास्त होता कामा नये. यासाठी विदर्भाचा तुकडा अलग करण्याची त्यांनी शिफारस केली आणि बेळगाव कारवारचीही लोकसंख्या त्यावेळच्या राज्यातून काढून त्यांनी कमी केली. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठी भाषकांची संख्या कमी करता येईल, याच पद्धतीने ही सारी पावले त्यांनी टाकली.’
पुस्तकात इतर लेखांमध्ये रंगनाथ पठारे यांनी आपल्या ‘अस्तित्वसंघर्षाचं संचित’, अरविंद वैद्य यांनी ‘शिक्षणाची पन्नास वर्षातील महाराष्ट्रातील वाटचाल’, अरुण साधू यांनी ‘महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा आणि सातत्य’, किशोर बेडकीहाळ यांनी ‘महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाची वाटचाल’, दत्ता देसाई यांनी ‘महाराष्ट्राच्या पन्नास वर्षाच्या विकासाची दिशा आणि पर्याय’, डॉ. अनिल पडोशी यांनी ‘महाराष्ट्रातील शेतीक्षेत्र’ या विषयांवर प्रकाश टाकला आहे.
पुस्तक वाचताना जसा इतिहास समजतो तसाच आता महाराष्ट्रासमोर उभ्या असलेल्या अनेक प्रश्नांची मालिकाही नजरेसमोर येते. गरिबांचे वाढते प्रमाण, असंघटित कामगारांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न आणि मराठी भाषेचे अस्तित्व अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना सक्षम पर्याय शोधावे लागतील असेही हे लेखक सांगतात.
तुम्ही हेच पुस्तक वाचा असं आम्ही बिलकुल नाही सांगत आहोत. पण ‘१ मे’ला महाराष्ट्र दिनाची सार्वजनिक सुट्टी साजरी करताना, थोडं खोलवर जाऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तळमळीने कार्य केलेल्या कार्यकर्त्यांना आणि बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली म्हणून त्यांचं कार्य जाणून घेणं, इतकं तर आपण नक्कीच करू शकतो ना?
– अश्विनी सुर्वे.
पुस्तक विकत घेण्याची लिंक सोबत देत आहे.
प्रकाशक – लोक वाङमय प्रकाशन – 85, Sayani Rd, Lokmanya Nagar, Dighe Nagar, Prabhadevi, Mumbai, Maharashtra 400025 – संपर्क 075885 18185
Leave a Reply