अवघ्या २५ व्या वर्षी ‘कोसला’ सारखी कादंबरी नेमाडेंना कशी सुचली असेल?, ना.धों. महानोरांनी ‘रानातल्या कविता’ खरंच रानात लिहिल्या असतील का?, ‘उपरा’ प्रकाशित झाल्यावर लक्ष्मण मानेंना मिळालेल्या प्रसिद्धीबद्दल काय वाटलं असेल?, रंगनाथ पठारेंनी ‘चक्रव्ह्यूह’ आणि रत्नाकर मतकरींनी ‘आरण्यक’ लिहिण्याआधी कसा अभ्यास केला असेल? असे अनेक प्रश्न मला पडायचे.
एखादं पुस्तक लिहिण्याआधी लेखकाला ते कोणत्या घटनेवरून सुचलं असेल?, कथाबीज सुचल्यावर ‘युरेका’ अशी स्थिती झाली असेल का?, लिहिताना कशी अवस्था असेल?, पुस्तक वाचकांच्या हातात देताना काय वाटलं असेल? त्या लेखकाचं स्वतःचं आवडतं पुस्तक कोणतं असेल? असे अनेक प्रश्न शोधक वाचकांना पडतातच. थोडक्यात पुस्तकासोबत लेखकाचा पुस्तकासोबतचा प्रवास जाणून घ्यायलाही वाचक अत्यंत उत्सुक असतो.
‘गोष्ट खास पुस्तकाची’ या पुस्तकातून हाच प्रवास सुंदररित्या मांडला आहे. स्वतः निर्मिलेल्या पुस्तकांबद्दल मराठीतील गाजलेले १५ साहित्यिक त्यांच्या प्रसिद्ध आणि आवडत्या १५ पुस्तकांचा प्रवास वाचकांसोबत उलगडत आहेत. लेखकांनी निवडलेल्या पुस्तकाबद्दल बोलताना, लेखक होण्याचा स्वतःचा प्रवास, त्यासाठी केलेलं वाचन, लेखन-काव्य कसं असावं याबद्दलची त्यांची मतंही विस्तृतपणे सांगितली आहेत, जी आजच्या नवोदित लेखक-कवींना अतिशय मार्गदर्शक ठरतील.
या पुस्तकात भालचंद्र नेमाडे ‘कोसला’चा, ना.धों.महानोर ‘रानातल्या कविता’, ह. मो.मराठे ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ , वसंत आबाजी डहाके ‘योगभ्रष्ट’, रत्नाकर मतकरी ‘आरण्यक’, यशवंत मनोहर ‘उत्थानगुंफा’, अनिल अवचट ‘माणसं’, लक्ष्मण माने ‘उपरा’, रंगनाथ पठारे ‘चक्रव्यूह’ तर विश्वास पाटील ‘पांगिरा’, मधू मंगेश कर्णिक ‘संधिकाल’, आशा बगे ‘ऋतूवेगळे’, अरुण साधू ‘मुखवटा’, भारत सासणे ‘दोन मित्र’ आणि सानिया ‘अशी वेळ’ या पुस्तकांचा प्रवास वाचकांसमोर उलगडतात.
या पुस्तकाचे संपादन करणारे सुहास कुलकर्णी मनोगतात लिहितात की, ‘चांगला वाचक ‘फक्त लेखकाने लिहिलेलं वाचायचं’ अशा व्यवहारी विचाराचा नसतो. तो लेखकात, त्याच्या विचारविश्वात गुंततो. त्याचं सारं म्हणणं तो आपल्यातही ओढून घेतो. बऱ्याचदा यातून तो स्वतः लेखकापेक्षाही अधिक समृद्ध बनतो. आणि या पुस्तकामुळे लेखक आपल्या भोवतालचा काय आणि कसा विचार करतो, तो जेव्हा लिहितो आहे त्या काळाकडे तो कसा पाहतो, हे कळल्यामुळे वाचक हा अधिक चांगला वाचक तयार होण्याची शक्यता वाढते.’
भालचंद्र नेमाडे स्वतःचा वाचनाचा प्रवास आणि ‘कोसला’चे थक्क करणारे अनेक अनुभव सांगून म्हणतात, ‘कोसला’मुळे माझी दुसरी कितीएक क्षेत्रातली जीव लावून केलेली महत्त्वाची कामं सगळीच दुय्यम तिय्यम आणि काही तर किरकोळ समजली गेली… कविता, अध्यापन, संशोधन, संपादन, प्रकाशन, भाषांतर, शैक्षणिक आणि सामाजिक वगैरे उद्योग…. मलाच ही सांगावी लागताहेत, हे त्याहून वाईट. कोसलाचं हेही मला डाचतं. एवढी शिरजोरी ?
‘रानातल्या कविता’ पुस्तकाविषयी ना.धों.महानोर लिहितात की, या संग्रहांसाठी मला पुरस्कार झाल्याची बातमी वर्तमानपत्रांत छापून आली व आमच्या परिसरात त्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हतं. माझ्याकडे मुंबईला पुरस्कार घ्यायला जायलाही पैसे नव्हते. चंद्रकांत पाटील १००-२०० घेऊन आला मग आम्ही दोघं मुंबईला गेलो. पण मला वाटतं, आपल्या गावाकडच्या जगण्यात कितीही अडचणी असल्या तरी इथल्या मातीशी, जगण्याशी एकनिष्ठ राहून आपण लिहीत राहिलो तर साहित्यात नक्कीच काही तरी चांगलं योगदान देऊ शकतो, हा आत्मविश्वास या माझ्या पहिल्याच पुस्तकाने मला दिला.’
आणि हो, या कविता त्यांनी रानातच लिहिल्या आहेत पण त्या कोणत्या वेळी कशा सुचल्या हे पुस्तकातच वाचायला मजा येईल.
‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीबद्दल ह.मो. मराठे लिहितात की, महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील हजारो तरुणांनी ‘निष्पर्ण’ ‘वाचली. या वाचकांपर्यंत लिखाणातील मन:स्थिती पोचलेली असते. ही मन:स्थिती मूळची माझी. मी ती लिहिण्याचा प्रक्रियेतून वाचकांपर्यंत पोहोचवली. जे हे लिखाण वाचतात त्यांच्या ठायी कादंबरीतील मनःस्थिती जणू पुन्हा निर्माण होत असली पाहिजे. म्हणून मला वाटतं की लेखक बाजूला झाला तरी वाचक ती प्रक्रिया स्वतःपुरती सुरू करतो. आणि ही मनःस्थितीच्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्याची शक्ती जोवर लिखाणात आहे, तोवर हे लिखाण जिवंत राहील.’
वसंत आबाजी डहाके आपल्या ‘योगभ्रष्ट’ काव्यसंग्रहाबद्दल लिहितात, ‘मानवी संबंधांचे मी चार प्रकार करतो. १. मी, २. मी आणि तू, ३. मी आणि ते, ४. आपण. या संग्रहातल्या दीर्घ कवितांमध्ये पहिले तीन संदर्भ आहेत. या कवितेत वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांची सरमिसळ झालेली दिसत आहे. संवेदना, भावना, जाणिवा, विचार यांचीही. बरीच प्रत्यक्षातली दृश्यं आहेत. त्यातही वास्तव अतिवास्तव अशी सरमिसळ आहे. मला ती दृश्यं कशी दिसली, जाणवली तशी ती आहेत- इंप्रेशनिस्ट, एक्स्प्रेशनिस्ट चित्रांप्रमाणे आहेत असं म्हणता येईल.’
‘आरण्यक’ या नाटकाबद्दल रत्नाकर मतकरी लिहितात की, ‘विषय असा कधी कधी आपल्याभोवती घोंघावायला लागतो. चांगल्या नाटकाचे त्यात आश्वासन असते, पण ते आकाराला कसे येणार हा प्रश्नच असतो. कवडश्याच्या आधाराने उंचावरच्या खिडकीपर्यंत जाण्यासारखे ते असते. अशा वेळी काहीच करायचे नसते. फक्त हा कवडसा मनामध्ये जपून ठेवायचा असतो. मग कधीतरी जाणवते की आता लिहावे, हे आपोआप लिहून होईल. मात्र त्याला स्वतःची गती सापडायला हवी. आणि ती गती शोधण्यासाठी प्रामाणिकपणा हवा.’
ते असेही लिहितात की, ‘त्या वेळी मी नोकरी करत होतो. सलग वेळ मिळत नसे. तरीही वेळ मिळेल तेव्हा थोडा थोडा भाग मी लिहीत गेलो. प्रसंग किती तरी सुचत होते. शक्यतो महाभारतातलेच प्रसंग घ्यायचे, कल्पनेची कुरघोडी करायची नाही, असे मी ठरवले होते. ‘आरण्यक’मध्ये एक प्रसंग अगदी आजच्या सांकेतिक कौटुंबिक नाटकात शोभेल असा आहे. पैसे नसल्यामुळे मुलांची श्राद्धे करू न शकणारा धृतराष्ट्र आणि कुंतीच्या सांगण्यावरून पैशांची सोय करणारा धर्म, दोघंही आजच्या नाटकातले वाटतात. पण आश्चर्य म्हणजे हा प्रसंग मूळ महाभारतातलाच आहे.’
‘उत्थानगुंफा’ बद्दल यशवंत मनोहर लिहितात की, ”उत्थानगुंफे’त माझी तरुण तडफड आहे. ज्याच्या एका डोळ्यात आसवं आहेत आणि दुसऱ्या डोळ्यात अंगार आहे. जगण्या-मरणाच्या जळत्या रेषेवरून चालणं वाट्याला आलेल्या अस्तित्वाचं आक्रंदन ‘उत्थानगुंफेत आहे. माझं होरपळणारं भावनिक जीवन आणि पहाडी बौद्धिक जीवन यांचं एकमेकांना सावरणं आहे, त्यांचं निखाऱ्यांचा वादळी पाऊस होणं आहे आणि विषमतेच्या शिल्पकारांच्या बेशरम साम्राज्यावर मुसळधार कोसळणं आहे. माझ्यातला कवी आणि माझ्यातला माणूस हे दोघंही विषमतेच्या भीषण आगीत एकरूप होऊनच पेटत आहेत. ही आग सामाजिक विषमतेचीही आहे आणि आर्थिक विषमतेचीही.’
ते पुढे असंही लिहितात की,
‘मी खेड्याच्या अंधारात झुडुपलेला नगण्य जीव. जातीने जाळलेला आणि गरिबीने तळलेला. मी जीवनात आणि साहित्यात कोणीच नव्हतो. कवी म्हणजे काय, कविता म्हणजे काय, काहीही माहीत नव्हतं. उजेडासकट या सर्व गोष्टी माझ्यासाठी नव्हत्याच. पण उत्थानगुंफेने मला कवी केलं. कवी हा जात, धर्म आणि वर्गविहीन असा माझा नवा जन्म होता. एकसंध जन्म. येथील नियतीवादी आणि विषमताग्रस्त संस्कृतीचा पराभव करणारा हा जन्म होता. तो ‘एक घाव दोन तुकडे करणाऱ्या विद्रोहाचा ज्वलंत जन्म होता. हा जन्म माझ्या पुनर्रचनेचा पुरावा आहे.’
अनिल अवचट त्यांच्या ‘माणसं’ या पुस्तकाबद्दल लिहितात,
खरोखर लेखनाचा समाजजीवनावर परिणाम होतो का? ‘माणसं मधल्या लेखांपैकी हमाल, तंबाखू कामगार यांच्यावर परिणाम झालेला दिसतो. पण तो नुसत्या लेखाचा झाला असता का? पुण्यात बाबा आढावांची, निपाणीत सुभाष जोशींची संघटना होती, चळवळ होती म्हणून त्यांनी लेखांचा उपयोग करून चळवळ पुढे नेली. पण ही चळवळ नसती तर? मग जिथे चळवळ नसते तिथे लेखनाचं काय प्रयोजन ? लिहिणाऱ्याने आपल्या मर्यादा आणि ताकद लक्षात घ्यायला हवी. लेखन हे दृष्टी देण्याचं काम करतं. काही वेळा प्रत्यक्ष उपयोग दिसत नसला तरी बीजं पेरली जात असतात. ती विखरून पडतात. कुठे तरी रुजतात. नाही तरी वनस्पती एवढ्या बिया जमिनीवर टाकतात, त्यातल्या किती थोड्या रुजतात! बाकीच्या मरतात. पण त्या वाया जातात का? नाही. जमिनीला त्या वेगळ्या प्रकारे समृद्ध करतातच की!’
लक्ष्मण माने ‘उपरा’ बद्दल लिहितात,
‘माणसं स्वतःच्या दुःखाने जेवढी दुःखी होत नाहीत तेवढी ती इतरांच्या सुखाने दुःखी होतात आणि माझ्यासारख्या गावकुसाबाहेर, हागणदारीत राहणाऱ्या माणसाला यश मिळालं तर त्या दुःखाचं परिवर्तन अपार द्वेषात होतं, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. अपार प्रेम करणारे आणि अपार द्वेष करणारे माझ्या वाट्याला आले ते ‘उपरा’ या माझ्या स्व-कथनाने. काही स्थानिक कारस्थानी मंडळींनी भल्याबुऱ्याचा कसलाही विचार न करता षड्यंत्र सुरू केली. त्या सर्वांना मी पुरून उरलो होतो. त्यात आणखी एक गोष्ट घडली. ध्यानीमनी नसताना मला ‘पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आणि विरोधकांच्या पोटात कळा आल्या. संस्थेतल्या काही सेवकांच्या असंतोषाला हवा देऊन चेतवलं गेलं आणि माझी ‘पद्मश्री’ ची हौस तुरुंगाची हवा खाऊन फिटली. या सगळ्यात ‘उपरा’च्या निमित्ताने सुरू झालेल्या चळवळीला गती गमवावी लागली याचं दुःख आहे.’
रंगनाथ पठारे ‘चक्रव्यूह’ बद्दल लिहितात की,
‘या प्रकारची कादंबरी याच्याआधी मराठीत लिहिली गेलेली नाहीय. नंतरसुद्धा लिहिली गेल्याचं माझ्या पाहण्यात नाहीय. विशेषतः फिजिक्स, त्यातलं संशोधन अशी पार्श्वभूमी घेऊन. (अर्थात ही काही मला फार अभिमानाची गोष्ट वाटते अस मात्र नाही.) मला ते सोपं गेलं. कारण जे जगलो तेच वातावरण माझ्या हाताशी होतं. माझी फिजिक्सची पार्श्वभूमी आणि मी कादंबरी लिहिणारा असणं असा योग जुळून आला.’
‘पांगिरा’ बद्दल विश्वास पाटील सांगतात,
‘जेव्हा पांगिरा मनामध्ये रुजली होती तेव्हाच्या त्या लेखनकळा आणि नंतरच्या प्रसववेदना आजही ठळकपणे आठवतात. या कादंबरीचा लेखनप्रपंच मांडतांनाच वेगळं काहीतरी लिहून जावं, या जिद्दीनेच मी लेखनकामाठीला हात घातला होता. तोपर्यंत लेखक म्हणून फारशी कुठे ओळखही निर्माण झालेली नव्हती.. त्यामुळे मान्यतेचा तर प्रश्नच नव्हता. मात्र, गाठीला अनेक वेगळे अनुभव आणि फणीश्वरनाथ रेणूंची ‘मैला आँचल’, प्रेमचंदांची ‘गोदान’, राही मासूम रझांच ‘आधा गाँव’ आणि पर्ल बकची ‘द गुड अर्थ’ तसंच ‘ग्रेप्स ऑफ राथ’ अशा उत्तम वाचनाची चांगली शिदोरी माझ्याजवळ जरूर होती.’
मधु मंगेश कर्णिक लिहितात,
‘माझ्यासारखे, माझ्या आप्तेष्टांसारखे हजारो मध्यमवर्गीय जे जगत होते त्यांची पार्श्वभूमी मला कादंबरीसाठी हवी होती. तीच मी निवडली. आणि एके दिवशी लिहायला बसलो. माझ्याभोवतीच्या मध्यमवर्गाला समाजामध्ये, राजकारणामध्ये नेतृत्व नव्हतं. तो जातीपातींमध्ये जखड-बंद झाला होता. मूल्यं जपायची म्हणून मूल्यांपासून वेगाने दूर जात होता. महत्वाकांक्षा होती पण कुठे जायचं माहीत नव्हतं. सबंध विसावं शतक हा माझ्या कादंबरीचा कालपट मी आधीच ठरवलेला असला, तरी प्रथम मी त्याचा उत्तरार्ध रेखाटणं महत्त्वाचं मानलं व एकविसाव्या शतकाच्या प्रारंभकाळामागील ‘संधिकाल’ हे शीर्षक मनाशी निश्चित केलं. दोन शतकांच्या दरम्यानचा ‘संधिकाल’.’
आशा बगे लिहितात, ”ऋतुवेगळे’तल्या कथा वरवर पाहता स्त्रीबद्दल आहेत असं वाटतं. पण त्या एकूण माणसांच्याच आहेत. साधं-सरळ जगतानाही त्यांना काही वेगळं सापडून जातं, त्याच्या कथा. या कथासंग्रहाचे विविध भारतीय, इंग्रजी तसेच फ्रेंच भाषांमधून अनुवाद होत आहेत. यामुळे अगदी माझी एकटीचीच असलेली ही वाट इतर कुणाचीही असू शकते हे कळतं नि बरं वाटतं.’
‘मुखवटा’ बद्दल अरुण साधू लिहितात, ‘प्रत्येक घरातील वैशिष्ट्यपूर्ण कुलसंस्कृती, मूल्यव्यवस्था, कुलधर्म, आचारधर्म आणि पाकसंस्कृती- देखील डोळ्यात तेल घालून जतन करतात आणि त्यात भर घालून अधिक समृद्ध करतात त्या परक्या घरांतून आलेल्या स्त्रियाच, कुलधर्माचा टेंभा मिरविणारे भटके पुरुष नव्हे. पृथ्वीवरील कोणत्याही प्रजातीचे आदिम मूळ हे मादी, असे शास्त्रज्ञ सांगतात. स्त्रीजातीच्या श्रेष्ठत्वाचे हे तत्त्व कोणालाही अंत:प्रेरणेने कळू शकते. हे सत्य बहुतेक पुरुषांना मनोमन ठाऊक असते पण त्यांना कबूल करवत नाही. या विषयाच्या मनःपूर्वक ओढीने घरीदारी नकळत होणाऱ्या निरीक्षणांवर काही टिपणे घेत राहिलो. नंतर लक्षात आले, की हा तर भव्य कादंबरीचा ऐवज. मग टिपणांचे वळण त्या दिशेने जाऊ लागले.’
भारत सासणे ‘दोन मित्र’ या कादंबरीबद्दल लिहितात की,
‘समाजाला आज ना उद्या पक्व चेहरा मिळेल, चांगले सोनेरी दिवस येतील अशी आशा ‘दोन मित्र’ ही कादंबरी करते. भाबडेपणाचा दोष स्वीकारून. भालचंद्र नेमाडेंनी कादंबरी आवडल्याचं सांगितलं पण त्यांना शेवटाबद्दल शंका होती. पण कादंबरीचा शेवट जसा कादंबरीत केला आहे तसा करणं ही लेखक म्हणून माझी अनिवार्यता होती. आज ना उद्या समाज पक्व होईल आणि जात-वर्ग इत्यादी बंधन नष्ट होऊन परस्परांबद्दल मित्रभाव निर्माण होईल, अशा प्रकारचं स्वप्न जपणं लेखक या नात्याने मला आवश्यक वाटलं.’
पुस्तकातील सर्वच लेखकांचे अनुभव वाचण्यासारखे आणि त्यातून खूप शिकण्यासारखे आहेत. शेवटी सुहास कुलकर्णी सर म्हणतात तसं, ‘कलाकृती वाचकांपर्यंत पोहोचून काही वर्ष लोटल्यानंतर स्वतः लेखक आपल्या स्वतःच्या लेखनाकडे तटस्थपणे पाहतो तेव्हा त्याच्या मनात काय भावना असतात, किंवा पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरच्या काळात लेखनावर आलेल्या (उलटसुलट) प्रतिक्रियांकडे तो कसं पाहतो हेही आपल्याकडे फार अपवादाने शेअर केलं जातं. या पुस्तकामुळे पंधरा लेखकांच्या किमान पंधरा निवडक पुस्तकांपुरतं का होईना, पण लेखनप्रक्रियेबद्दल वाचकांना कळणार आहे.
गोष्ट खास पुस्तकाची
किंमत – २००/-₹
समकालीन प्रकाशन
पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील चित्रावर क्लिक करा.
Leave a Reply