काय वाचावं? कसं वाचावं? विद्यार्थी आणि नवोदित वाचकांसाठी मार्गदर्शन


नवोदित वाचकांना पडणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे नक्की काय वाचायला हवं? कारण जर सुरुवातीलाच योग्य पुस्तक वाचनात नाही आलं तर स्वतःला वाचन आवडत नाही किंवा पुस्तकंच बोरिंग असतात असा गैरसमज होतो. कोणी ‘काय वाचू’ विचारल्यावर, “वाचत रहा! तुम्हाला जे सहज उपलब्ध होईल ते वाचा आणि मग तुम्हाला काय वाचायला आवडतं हे ठरवा” हे विधान एका अर्थी बरोबर आहे, पण लहान मुलांना, विद्यार्थ्यांना आणि अगदी नव्याने वाचन सुरू करणाऱ्या कोणालाही, ‘जे हातात येईल ते वाचत रहा’ असे सांगणे पूर्णतः योग्य नाही. कारण कधी चुकीची माहिती वाचण्यात येऊ शकते, वेळ तर जातोच पण कधी परस्परविरोधी माहितीमुळे वैचारिक गोंधळ होऊ शकतो.

म्हणून नवोदित वाचकांसाठी, ‘काय वाचावं आणि कसं वाचावं’ याबद्दल माहिती देणारे  काही मुद्दे शेयर करतोय! 

या टिप्स मुख्यतः विद्यार्थ्यांसाठी व नव्याने वाचनास सुरुवात करणाऱ्यांसाठी असल्याने काहींसाठी त्या फार बेसिक(बाळबोध) असतील. तुमच्याकडे अधिक  उपयुक्त माहिती असल्यास नक्की शेयर करावी.

चौसष्ट कलांमध्ये वाचनाच्या कलेचा अंतर्भाव होतो. ही वाचनकला आवडीने जोपासण्याचा एक छंद आहे त्यामुळे वाचनाची आवड हवी, व्यसन नाही! कारण आवड असेल तर चिकित्सकपणे योग्य तेच वाचलं जातं आणि सकारात्मक दृष्टी विकसित होते.

१. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीनुसार प्रत्येकाची वाचनाची आवड वेगवेगळी असणं साहजिक आहे(म्हणून इतरांच्या वाचन-निवडीला लगेच नावं ठेवू नये!), हे लक्षात घेऊन स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचून आपली आवड ओळखणं महत्वाचं असतं.

२. त्यासाठी विविध साहित्य प्रकारांची माहिती करून घ्यावी. कथा, कादंबऱ्या, काव्य, ललित, वैचारिक, प्रेरणादायी, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, सेल्फ हेल्प, माहितीपर साहित्य, ग्रामीण साहित्य, समीक्षण, मनोरंजक, विनोदी, रहस्यमय, गूढ, इ., असे साहित्याचे विविध प्रकार आहे. त्यांची माहिती घेऊन ललित म्हणजे नक्की काय, कथा आणि कादंबऱ्यांमधील मधील फरक जाणून घ्यावा. अनेक पुस्तकांच्या शेवटच्या पानावर ते पुस्तक कोणत्या प्रकारातील आहे, याची माहिती दिलेली असते.)

३. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर म्हणजे विज्ञान, इतिहास, भूगोल, पर्यावरण, शेतीविषयक, क्रीडाजगत यांवर मूलभूत माहिती देणारं साहित्य वाचलं पाहिजे.

४. प्रेरणादायी व्यक्तींची चरित्रे, इतिहासातील महान व्यक्ती, त्यांनी समाजासाठी केलेलं कार्य, भौगोलिक बदल, पर्यावरणविषयक समस्या, त्याचे भविष्यातील परिणाम व त्यासाठीचे उपक्रम, शेतीविषयक समस्या व तंत्रज्ञान, दुष्काळग्रस्तांच्या समस्या, धार्मिक ग्रंथ, आरोग्यविषयक आदी विषयांवर मूलभूत व स्वतःचे मत व्यक्त करण्याइतपत तरी माहिती असणे आवश्यक आहे. त्यातील जो विषय अथवा साहित्यप्रकार तुम्हाला आवडेल त्याच्या वाचनावर तुम्ही भर देऊ शकता.

५. प्रेरणादायी व्यक्तींनी वाचलेली, सुचवलेली पुस्तकं वाचायचा प्रयत्न करा. ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम’ यांचं ‘द वंडरफुल वर्ल्ड ऑफ बुक्स’ नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे ज्यात त्यांनी त्यांचा वाचनप्रवास व आवडती पुस्तके यांबद्दल लिहिले आहे. जेष्ठ कवी व लेखक ‘सतीश काळसेकर’ यांचे ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकदेखील या विषयावर अत्यंत योग्य मार्गदर्शन करणारं आहे.

६. तुमच्या क्षेत्रासंबंधित माहिती देणारी पुस्तकं वाचा. त्यातील मूलभूत माहिती, नवीन तंत्रज्ञान याबद्दल अपडेटेड राहा. पुस्तकं नेहमी आपल्याला आपल्या क्षेत्रात प्रगती करायला उपयुक्त ठरतील अशीच निवडावीत.  तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी पुस्तकं कशी निवडावीत याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

७. एखाद्या विषयावर अनेक लेखकांनी लिहिलेली पुस्तकं असतात. प्रत्येक लेखक/लेखिका प्रत्येक वाचकाला प्रत्येकवेळी खुश करेल, आवडेलच असं साहित्य लिहू शकत नाही. तुमच्या आवडीच्या लेखकाचंही प्रत्येक साहित्य तुम्हाला आवडेलच किंवा आवडायला हवंच असं नाही. त्यामुळे लेखकांवर, साहित्यावर किंवा इतरांच्या वाचननिवडीवर टीका करण्यापेक्षा स्वतःला काय आवडतं याचा शोध घेणं आणि त्यासाठी विविध प्रकारच्या साहित्याचं वाचन वाढवणं म्हणजे थोडक्यात पुस्तकं एक्सप्लोर करणे उत्तम.

८. सध्या तर इंटरनेटमुळे अनेक वेबसाइट्सवर, ब्लॉग्सवर, ग्रुप्सवर वाचकांनी पुस्तकांबद्दल दिलेल्या अभिप्रायामुळे, माहितीमुळे एखाद्या पुस्तकात काय दिलं आहे, हे जाणून घेणं अतिशय सोप्प झालंय. त्या माहितीच्या आधारे हे पुस्तक तुमच्या आवडीच्या कक्षेत येतं की नाही हे तुम्ही ठरवू शकता(इथे पुन्हा, इतरांना आवडलेलं पुस्तक तुम्हाला आवडायला हवंच असं काही नाही, त्यामुळे विरोधी मतप्रदर्शन जोरकसपणे करणे टाळले तर योग्य!).

याचसोबत पुस्तकं कशी वाचावी हे जाणून घेणं देखील आवश्यक आहे.

१.पुस्तक वाचताना लक्षात घ्यायची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, एखाद पुस्तक फक्त इतरांनी नावाजलेलं, बेस्ट सेलर आहे म्हणून वाचू नका. कारण जर असं पुस्तक तुम्ही वाचायला घेतलं आणि तो विषय तुमच्या आवडीचा नसेल तर पुस्तकवाचनाविषयी तिटकारा निर्माण होऊ शकतो.

२. एखादं पुस्तक तुम्ही वाचायला सुरुवात केली पण ते तुम्हाला आवडलं नाही किंवा उपयोगी वाटलं नाही तर ते बाजूला ठेवा आणि नवीन पुस्तक निवडा.

३. पुस्तक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी मुखपृष्ठ, मलपृष्ठावरील ब्लर्ब, प्रस्तावना, मनोगत, अभिप्राय, अनुक्रमणिका वाचत जा.

३. प्रवास करताना वेळ असेल तर किंवा स्क्रीन टाईम (मोबाइल,टीव्ही,सोशल मीडिया)कमी करून तसेच सकाळी लवकर उठून किंवा रात्री झोपण्याआधी निदान १० मिनिटं, अशाप्रकारे तुम्ही पुस्तक वाचनाला प्राधान्य देत सुरुवात करू शकता. पुस्तक वाचनाला तुमच्या सवडीनुसार एक ठराविक वेळ देऊ शकलात तर अतिउत्तम.

४. तुम्ही वाचलेल्या पुस्तकांबद्दल जमलं तर इतरांना माहिती द्या, त्यावर सकारात्मक चर्चा करा. त्यामुळे तो विषय तुमच्या लक्षात राहण्यास मदत होईल.

५. आणि हो, एकावेळी एकच पुस्तक वाचायचं की एकापेक्षा अधिक, एकाच विषयाची पुस्तकं एकापाठोपाठ वाचायची की वेगवेगळे साहित्यप्रकार हाताळायचे, इंग्रजीत वाचायची की मराठीत अनुवादित केलेली अशा सर्व गोष्टी सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते ठरवायला हवं.

आणि वाचत रहा! यशवंत व्हा!


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile


Related Posts

No Comments

Leave a Reply

Whatsapp करा
1
मदत हवी आहे?
नमस्कार! यशवंतहो.com वर आपलं स्वागत!

विविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.
Whatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.

चांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.
वाचत रहा,
धन्यवाद!