मी माझा – चंद्रशेखर गोखले – चारोळीसंग्रह


मी आहेच जरा असा

एकटा एकटा राहणारा

वाळकं पान देखील गळताना

तन्मयतेने पाहणारा

एके काळी चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्यांनी तरुणांना भारावून टाकलं होतं. त्यांचा ‘मी माझा’ हा चारोळी संग्रह तर इतका लोकप्रिय झाला की, अनेकांच्या घरी तर तो असायचाच पण काही मोठ्या रिसॉर्टमध्येही त्या संग्रहातील चारोळ्यांचे मोठे बॅनर, फलक लावलेले पाहायला मिळायचे.

‘मी माझा’च्या तर ६ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या. मराठीमध्ये हा कदाचित विक्रमच असेल. या संग्रहांचं भाषांतर हिंदी, गुजराती आणि इंग्रजीमध्येही झालंय. अनेकजणं या संग्रहामुळे लिहायला लागले.

माझ्याकडील ‘मी माझा’ हे पुस्तकही माझ्या वडिलांच्या संग्रहातील आहे. ‘मी माझा’ संग्रहातील बहुतेक सगळ्याच चारोळ्या माझ्याही आवडत्या आहेत. गंमत म्हणजे शाळेत असताना त्यातील काहींनी वक्तृत्व स्पर्धेत मला टाळ्या मिळवून दिल्या आहेत. कारण त्यात फक्त प्रेम, विरह नाही तर समाजाच्या विविध भावनांचं प्रतिबिंबही उमटतं. जशी पुढील चारोळी,

‘देवळात जाऊन माणसं

दुकानात गेल्यासारखी वागतात

चार-आठ आणे टाकून

काही ना काही मागतात’

किंवा ही बघा,

‘चढाओढ या शब्दाचा अर्थ

आपण किती उलटा लावतो

कोणी वर चढताना दिसला

की लगेच खाली ओढायला धावतो’

आणि ही एक जी मी अनेक स्पर्धांमध्ये बोलायचे, त्यानंतर मिळणाऱ्या टाळ्यांचा आवाज अजून तसाच्या तसा आठवतोय,

प्रत्येक गावाबाहेर

एक महारवाडा आहे,

चौथीच्या पुस्तकात

समानतेचा धडा आहे

चारच ओळी फक्त. पण किती खोल आशय भरलाय त्यात. इतक्या कमी शब्दांमध्ये आपले विचार आणि भावना इतक्या तंतोतंत वाचकांपर्यंत पोहचवू शकणाऱ्या ‘च. गों.’ चं   अपार कौतुक वाटतं.

या चारोळ्यांमधून चगोंनी अनेकांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. प्रेम, नाती, माणसं, निसर्ग अशा सगळ्या गोष्टींवर चगोंनी हळुवारपणे लिहिलं आणि म्हणूनच ते थेटपणे वाचणाऱ्याच्या हृदयाला भिडतं. चारोळ्यांमधील लय, हळुवार आणि सहज शब्दांत मांडलेल्या भावना यामुळे त्या पटकन लक्षात राहतात, हे ही त्यांचं वैशिष्ट्य.

चंद्रशेखर गोखलेंच्या, चारोळ्या व कवितांसोबतच मनोगत, मर्म, मानिकांचंन हे कथासंग्रह आणि मोहनमाळ हा लेखसंग्रह प्रसिद्ध आहे.

त्यांच्या इतर आवडत्या चारोळ्या पुढीलप्रमाणे,

नेहमीच डोक्यानं विचार करू नये

कधी भावनांनाही वाव द्यावा

आसुसलेल्या डोळ्यांना

स्वप्नांचा गाव द्यावा

 

प्राजक्त झाडावरून ओघळला

की त्याचा आवाज होत नाही

याचा अर्थ असा नाही की

त्याला इजा होत नाही

 

पुसणार कोणी असेल

तर डोळे भरून यायला अर्थ आहे

कोणाचे डोळे भरणार नसतील तर

मरण सुद्धा व्यर्थ आहे

चंद्रशेखर गोखलेंची तुमची आवडती चारोळी कोणती? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा !

©अश्विनी सुर्वे.

पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा.


Related Posts

No Comments

Leave a Reply

Whatsapp करा
1
मदत हवी आहे?
नमस्कार! यशवंतहो.com वर आपलं स्वागत!

विविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.
Whatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.

चांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.
वाचत रहा,
धन्यवाद!