डॉ. जयंत नारळीकरांचं ‘यक्षांची देणगी’ हे एक एव्हरग्रीन पुस्तक आहे. तुम्ही आधी कितीही वेळा ते वाचलं असेल, तरी एकदा हातात घेतलं की पुन्हा पुन्हा वाचावं वाटेल असा या पुस्तकाचा चार्म आहे.
सातवीत असताना पहिल्यांदा ‘यक्षांची देणगी’ हे पुस्तक वाचलेलं आणि तो अनुभव मी आजही विसरू शकत नाही. मराठीत वाचलेलं हे माझं पहिलंच विज्ञानकथांच पुस्तक होतं आणि अजूनही हे माझ्या सगळ्यात आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. तेव्हा विज्ञान म्हणजे आमच्यासाठी फक्त पुस्तकातले प्रयोग होते पण नारळीकर सरांनी आम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून एकदम अंतराळातच नेलं.
सरांनी इतक्या ओघवत्या सुंदर शैलीत लिहिलंय ना हे पुस्तक, की वाचताना ती दृश्य अक्षरशः डोळ्यांसमोर उभी राहतात. शाळेत असताना आणि आत्ताही या कथांमधील परग्रहवासी, परग्रहांवरील जीवसृष्टी, त्यांचं मिशन, टाईम मशीनने भविष्य व भुतकाळात जाणं, कृष्णविवरामुळे वय आहे तितकंच राहणं, दुसऱ्या सृष्टींमधील स्थित्यंतर यावर तासंतास चर्चा होऊ शकतात.
या कथासंग्रहाच्या प्रवासाची कथादेखील खूप रंजक आहे. खगोलशास्त्रावरच्या एका परिसंवादात एका वक्त्याचे कंटाळावाणे भाषण ऐकताना डॉ. जयंत नारळीकरांनी त्यांची ‘कृष्णविवर’ ही पहिली कथा लिहायला घेतली. या कथेचे कथानक त्यांच्या मनात होतेच, आणि ती कथा काही दिवसांत लिहूनही झाली. (ही माझी सर्वात जास्त आवडती कथा आहे.) तर कथा लिहून झाली तेव्हा मराठी विज्ञान परिषदेने विज्ञानरंजक कथास्पर्धेचे आयोजन केलेले. फक्त गंमत म्हणून सरांनी ही कथा वेगळ्या नावाने स्पर्धेसाठी पाठवली होती. आणि जेव्हा त्या कथेला पहिले पारितोषिक जाहीर झाले तेव्हा सरांनी पत्र पाठवून खऱ्या नावाचा उलगडा केला.
मुलांच्या कल्पनाशक्तीला खतपाणी घालायचं असेल, तर हे पुस्तक ‘वाचलंच पाहिजे’ च्या यादीत टॉप ला असावं असं आहे. सरांनी साधारण ७०-८० च्या दशकात लिहिलेल्या या कथा आहेत पण त्या काळाच्या पुढे जाऊन लिहिलेल्या आहेत असं वाटतं. त्या कथांमधील अनेक सामाजिक-राजकीय संदर्भ आजही परिस्थिती तशीच आहे, हे दर्शवतात. तंत्रज्ञानावर अति अवलंबून राहिल्यामुळे होत असलेला निसर्गाचा आणि मनुष्याचा ऱ्हास, धूमकेतू, ग्रहण याबद्दलची भीती, मुलगाच हवा हा अट्टहास, सभा-समारंभामध्ये व्यासपीठावर होणारी गर्दी हे चित्र आजही तसेच आहे. आणि काही प्रमाणात पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी खरंच अस्तित्वात येताना देखील दिसतात.
पुस्तकातील कृष्णविवर, पुनरागमन, उजव्या सोंडेचा गणपती, धूमकेतू, धोंडू, गंगाधरपंतांचे पानिपत या कथा मला खूप जास्त आवडतात. आणि या सर्व फक्त फिक्शन कथा नाहीत, तर या कथांमधून खगोलशास्त्रातील, विज्ञानातील क्लिष्ट कल्पना अगदी साध्या सोप्प्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.
या सर्व कथांना शास्त्रीय आधार आहे. विविध शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनातून, पुस्तकांमधून मांडलेल्या शोधांना, विचारांना आपल्या कल्पकतेने सहजसोप्पे करून डॉ. नारळीकरांनी आपल्यासमोर मांडले आहे.
आणि हाच या विज्ञान कथासंग्रहाचा मूळ उद्देश होता. विज्ञानकथा का लिहावीशी वाटली याचं उत्तर सरांनी प्रास्ताविक मध्ये दिलेलं आहे, आणि ते नक्की वाचावं. विज्ञानकथा कशी लिहावी याचं मार्गदर्शन तर यातून मिळेलच पण ती का लिहावी याचा उद्देशही स्पष्ट होईल. आणि यातून कदाचित अजून नवे विज्ञान कथाकार पुढे येतील.
वैज्ञानिक जगतात लागणारे शोध मानवाला कुठे नेत आहेत, हे सर्वसामान्यांना समजायला हवेतच. याबाबत सांगताना सर लिहितात,
“नीट तपासणी करून मगच एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे, हा दृष्टिकोन संशोधनाच्या मुळाशी असतो. पण फक्त वैज्ञानिकच नव्हे तर प्रत्येक विचारवंताला हा दृष्टिकोन वापरण्याचा अधिकार आहे. विज्ञानाचा जागरूकपणे वापर करताना हा दृष्टिकोन मानवसमाजाला अनिवार्य आहे आणि हा दृष्टिकोन सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम वैज्ञानिक, विचारवंत या सर्वांचे आहे आणि या कामासाठी विज्ञानकथा या तंत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो.”
विज्ञानकथा कोणत्या उद्देशाने लिहाव्यात, याबद्दलही सरांनी सुंदर माहिती दिली आहे. ते लिहितात,
“विज्ञानाची गोळी जर कडू लागत असेल तर त्याला साखरेचे ‘कोटिंग’ म्हणजे कथेचे रूप देणे योग्य ठरेल. मी तरी निदान याच उद्देशाने लिहितो आहे.”
खरंच! डॉ. जयंत नारळीकरांनी ‘यक्षांची देणगी’ मधून या अशाच पद्धतीने विज्ञानाच्या गोळ्या साखरेचे कोटिंग लावून आपल्याला दिल्या आणि त्यांच्यामुळे एक वेगळं, कल्पनेच्या बाहेरील विश्व आपल्यासमोर उलगडलं गेलं. यासाठी अनेक पिढ्या त्यांच्या ऋणी असतील, हे नक्की.
– अश्विनी सुर्वे.
सोबत पुस्तक विकत घेण्याची लिंक देत आहे.
जयंत नारळीकरांनी लिहिलेली इतर पुस्तकं खालील प्रमाणे:-
Leave a Reply