आजकाल सोशल मीडियावर बऱ्याच जणांच्या पोस्ट, स्टेटस आणि स्टोरीला वपुंचे कोट्स दिसत असतात. त्यातल्या कितीतरी जणांनी ती ‘वाक्यं’ असलेली कथा वाचलेली नसते आणि अनेकांना या ‘कोट्स’ मुळेच वपु माहीत होतात. पण त्या एका वाक्यानेही वाचक म्हणून वपुंसोबत नाळ जुळते हे महत्वाचे.
गुगलवर ‘वपु काळे’ म्हणून सर्च केलं की सगळ्यात पहिला पर्याय ‘वपु विचार’ हा येतो. वपु म्हंटल की सर्वात आधी आठवतात ते वपुंच्या कथांमधली ‘वाक्यं’, त्यांचे विचार किंवा ‘कोट्स’. वपुंच्या कथांपेक्षाही वपुंचे ‘कोट्स’ म्हणजे त्यांच्या कथांमधील त्यांची ‘वाक्यं’ जास्त लोकप्रिय आहेत असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
एखाद्या पुस्तकातील एखादी कथा आणि त्या कथेतील एक-दोन ओळींचंच वाक्य. पण ते एकच वाक्य असं भिडतं ना मनाला की त्या वाक्यावर अजून एखादी कथा किंवा पानभरून लिहिलं जाऊ शकतं असं वाटतं. आता हे वाचताना देखील तुम्हाला तुमची आवडती वपुंची वाक्य नक्कीच आठवली असतील. नेहमी प्रश्न पडतो की, हे असं ‘आपल्याच मनातलं लिहिलंय’ असं वाटावं एवढं कसं सुचलं असेल वपुंना? त्यासाठी त्यांच्या निरीक्षणशक्तीला आणि सौंदर्यदृष्टीला दाद द्यायलाच हवी!
‘वपुर्झा‘ मध्ये तर अशा थेट हृदयाला भिडणाऱ्या, खोलवर विचार करायला लावणाऱ्या अनेक उत्तम विचारांचा एकत्र संग्रह केला आहे, जो वाचताना अगदी अलिबाबाची गुहाच उघडल्यासारखे वाटते. वपुंच्या इतर पुस्तकांतील कथांमधील काही वेधक वाक्यं, विचार देखील ‘वपुर्झा’ मध्ये वाचायला मिळतात.
जसं ‘आपण सारे अर्जुन‘ मधील हे माझं आवडतं वाक्य ‘वपुर्झा‘ मध्ये आहे –
‘माणूस बिघडला ह्याचा थोडक्यात अर्थ तो मी म्हणतो तसं वागत नाही हाच आहे.’
किती सुंदर लिहिलंय ना! या अशा विचारांच्या संग्रहांमुळेच ‘वपुर्झा’ वाचताना ‘कोणतंही पान उघडा आणि वाचा!’ असं सांगितलं जातं. म्हणूनच या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काहीही दिलेलं नाहीये.
‘वपुर्झा’ हे वपुंचं आत्मचरित्र नव्हे. खरंतर वपुंबद्दल फार माहिती इंटरनेटवर देखील उपलब्ध नाही. ‘कथाकथनाची कथा‘, ‘सांगे वडिलांची कीर्ती’ आणि ‘आपण सारे अर्जुन‘ या पुस्तकांमध्ये आणि त्यांच्या सुरुवातीच्या काही पुस्तकांमधील प्रस्तावनेतून, मनोगतातून काही प्रमाणात वपुंच्या आयुष्यातील किस्से वाचायला मिळतात.
वपुंच्या ‘नवरा म्हणावा आपुला‘ या पुस्तकाची प्रस्तावना त्यांच्या वडिलांनी म्हणजे नेपथ्यकार पुरुषोत्तम काळे यांनी लिहिली आहे. त्यात वपुंच्या लेखन प्रवासाबद्दल ते सांगतात की, ‘वसंताची लेखनकलेची पहिली पाऊलवाट पांगुळगाड्याच्या आधारित गतीने चालू झाली, त्या दोन्ही-तिन्ही गोष्टीत कथावाङमयातील पाऊलवाट नवथर, अस्पष्ट अशीच होती. ती रहदारीच्या हमरस्त्यात थोड्याच वळणात जाऊन मिळेल याची मात्र कल्पना नव्हती, पण स्वतंत्र अशा गोष्टी एकामागून एक जेव्हा तो लिहू लागला आणि त्या प्रसिद्धी होऊ लागल्या तेव्हा मात्र कौतुकाची जागा आश्चर्याने पटकावली आणि मग धन्यताही वाटू लागली. हळूहळू त्याच्या लघुकथांची संख्या वाढू लागली आणि एक, दोन, तीन या आकड्याच्या सांकेतिक बोलाच्या अल्पावधीत त्याच्या लघुकथांचे तीन संग्रहही प्रसिद्ध झाले. अर्थात या गोष्टीचा अभिमान वाटतो. त्याने लिहिलेल्या गोष्टी पाहिल्या म्हणजे लघुकथाकारास असावी लागणारी मार्मिक दृष्टी, प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीकडे -घटनेकडे सूक्ष्म दृष्टीने पाहण्याची सवय, निरनिराळ्या व्यक्तींच्या स्वभावचित्रांचे अवलोकन, गोष्टीच्या तंत्रात आणि रंजकतेस लागणाऱ्या तपशिलाकडे आवर्जून पुरविलेले लक्ष आणि चटकदार भाषाशैली वगैरे गुण प्रामुख्याने त्याच्या कथेत दिसून येतात. कथेचा शेवट होईपर्यंत वाचकांची उत्सुकता वाढती ठेवण्याचे आणि त्यांच्या अपेक्षेस थोड़ा धक्का देऊन कथेचा शेवट करण्याचे चातुर्यही त्याच्यात दिसून येते. कथेतील ज्या पात्राबद्दल लेखकास लिहावयाचे आहे, त्या व्यक्तीभोवती विणले जाणारे जाळे, अधिकाधिक गुंतागुंतीचे विणण्याची कुशलता आणि मग त्या व्यक्तीची त्यातून सुटका करण्याचे कसबही त्याच्या लेखनातून दिसून येते. शांत जलाशयात एखादा बारीक खडा टाकला असता त्याभोवतीची वर्तुळे जशी मोठमोठी होत जातात आणि मग शेवटी तो जलाशय जसा पूर्ववत शांत होतो तशा प्रकारच्या कथारचनेचे तत्रं त्याने अवलंबिलेले दिसून येते. ‘साध्याही विषयात आशय कधी मोठा असा आढळे’ या काव्यपंक्तीतील आशय त्याच्या लेखनात आढळून येतो. सामान्य घटनेतून काहीतरी विशेष शोधून काढणे किंवा सामान्यात असामान्य असे काहीतरी असते, हे सामान्यांना भासविणे, सुद्धा एक कलाच म्हटली पाहिजे!’ किती समर्पक लिहिलंय हे.
‘वपुंच्या कथा वाचताय म्हणजे अगदीच नवीन वाचक आहात’, किंवा ‘वपु फार सामान्य लिहितात’ असा आक्षेप काहीजणं घेतात पण मुळात हा दृष्टिकोनच चुकीचा वाटतो.
कारण वपु सामान्य माणसाच्या मनात असलेलं लिहीत असले तरी प्रत्येकाला ते वपुंसारखं सहजरित्या व्यक्त करणं जमतंच असं नाही. ते कौशल्य आणि शब्दसामर्थ्य वपुंचच. आणि असं आपल्या मनातलं किंवा आपल्यावरच लिहिणारा लेखक म्हणून वपु जास्त जवळचे वाटतात. वपुंच्या लेखनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ४०-५० वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथा देखील आजच्या परिस्थितीशी इतक्या मिळत्या-जुळत्या असतात की वाटावं, त्या आजच्या काळात लिहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या रुपकांच्या माध्यमातून एखादा विचार किंवा भावना अशा तरल पद्धतीने वपु मांडतात, की, वाचणाऱ्याने अवाक् होऊन अंतर्मनाशी संवाद साधलाच पाहिजे. माझा स्वतःचा स्वतःसोबतच असा संवाद वपु त्यांच्या कथांमधून घडवतात म्हणून कदाचित वपु माझे आवडते लेखक आहेत. २५ मार्च १९३२ हा वपुंचा जन्मदिवस. मराठी मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या या शब्दांच्या अवलियाला जयंतीनिमित्त नम्र अभिवादन.
वपुंची काही आवडलेली वाक्यं पुढे देतेय. तुम्हीही तुमचं आवडता ‘वपु विचार’ कमेंटमध्ये नक्की सांगा.
– ‘नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात. म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरतं चिरंजीव होतं.’
– ‘एखादी वस्तू, मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते, तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी. ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल.’
– ‘आपल्याला न आवडणारे विचारही आपल्यावर हुकूमत गाजवून जातात.’
– ‘अगदी तसंच म्हणायचं झालं तर प्रॉब्लेम नसतात कुणाला? ते शेवटपर्यंत असणारच. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं! या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो.’
व. पु. काळे यांच्या काही पुस्तकांची लिंक खाली देत आहे.
– अश्विनी सुर्वे.
Leave a Reply