मराठी रहस्य कथा-हाकामारी-हृषीकेश गुप्ते

रहस्यकथा वाचताना एकतर आधीच आपण त्यात एकदम गुंतून गेलेलो असतो.  पुढे काय? पुढे काय होणार? ही उत्सुकता कायम मनावर असते, अशावेळी जर लेखकाने आपल्याला अशा एखाद्या वळणावर आणून सोडलं की जिथून आत्ता तुम्हालाच शोध पूर्ण करायचा आहे तर? मग पुढचे चार-पाच दिवस किंवा त्याहूनही जास्त ते कोडं सोडवण्यातच किंवा फक्त त्याचा विचार करण्यातच जातात. हृषीकेश गुप्ते सरांची ‘हाकामारी’ ही कथा वाचताना मला असाच अनुभव आला.

कथेला सुरुवात होते, जिथे तीन मित्र आपापली स्वप्नं, भविष्य एकमेकांना सांगत असतात. त्या तीन मित्रांमधील संध्याला वाटत असतं की, ती मोठेपणी अनाथ होणार आहे. कांताला वाटत असतं की, त्याचा प्रेमभंग होणार आहे. आणि आपल्या कथेचा निवेदक म्हणजे प्रसाद सांगतो की, ‘मी मोठेपणी डिटेक्टिव्ह होणार.’ एका वाड्यात राहणारे हे तीन मित्र, त्यांचं बालपण, मोठं होत असताना त्यांच्या बदलत जाणाऱ्या जाणिवा, त्यांचं कुटुंब, त्यांचा भलामोठा वाडा आणि कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडत जाणाऱ्या काही नैसर्गिक आणि अनैसर्गिक घटना, प्रसादच्या नजरेतून या लघुकादंबरीला पुढे नेत राहतात.

प्रसादच्या आजोबांच्या मालकीच्या असलेल्या वाड्यामध्ये संध्या आणि कांता भाडेकरू म्हणून राहायला आलेले असतात. या वाड्याचं वर्णनही लेखकाने इतकं सुंदर केलंय, की नक्की कोणत्या दिशेला काय आहे, हे स्पष्टपणे कळणारा वाडा आपल्या नजरेसमोर उभा राहतो. वाड्यातील इतर मुलांपेक्षा संध्या आणि प्रसादची जवळची मैत्री होते, ती त्याच्यापेक्षा काही वर्षांनी मोठी असूनही.

खरंतर प्रथम भेटीत प्रसादला संध्याची भीती वाटलेली. प्रामुख्याने त्याची दोन कारणं होती. एक म्हणजे तिचं बावनकशी सौंदर्य आणि दुसरं म्हणजे तिचे निळसर झाक असलेले घारे डोळे. त्याकाळी ‘काळी विद्या’ नावाचं एक पुस्तक प्रकाशने वाचलं होतं आणि त्यात सांगितलं होतं की, निळे डोळे असलेल्या मुलीचा ना राग परवडला, नाही लोभ. या संध्यानेच पहिल्यांदा प्रसाद आणि कांताला सांगितलं की, ‘गोठण्यात हाकामारी आलीये आणि रोज रात्री आपल्या वाड्यातही येते ती.’ या हाकामारीची दंतकथा पुढे त्यांच्या गावात इतकी जास्त गडद होत गेली की, रात्रीचे लोकं घराबाहेर पडायला घाबरू लागले. हाकामारीच्या वेगवेगळ्या कथा, कहाण्या लोकं एकमेकांना सांगायला लागले. त्यात शाळेतील त्यांचे एक शिक्षक सांगतात की, ‘मरताना ज्या बाईने कंठाच्या तळापासून मारलेली हाकही कुणाच्या कानावर पडत नाही ती बाई हाकामारी होते. अशी बाई मेल्यानंतर गावांमध्ये जाऊन लोकांच्या नावाने हाक मारत आर्त स्वरात मदतीची याचना करत फिरते. एकदा जर का तुम्ही तिच्या हाकेला ‘ओ’ दिलीत की तुम्ही संपलात.

पण काही दिवसांनी या हाकामारीची भीती जरा कमी होते, कारण त्याहून खूप मोठं संकट त्यांच्या गावात येतं. महापुराचं संकट. त्यावर्षी आलेला आकाळविक्राळ पाऊस गावाचा नकाशाच बदलून टाकतो. मनुष्यहानी झाली नाही तरी मालमत्तेचं प्रचंड नुकसान होतं. तुरळक डोकी वगळता गावही ओसाड होतं. पुर ओसरल्यावर गावात चोरीचं प्रमाण वाढतं. थोड्याकाळाने वातावरण पूर्वपदावर येतं आणि पुन्हा हाकामारीच्या घटनांबद्दल गावकरी चर्चा करायला लागतात. आता तर कांताही सांगतो की, त्याला हाकामारीचा आवाज ऐकायला आलेला असतो.

या सगळ्या घडामोडींमध्ये प्रसादला  जाणवतं की, संध्या बदलली आहे. हसरी-खेळती संध्या शांत झालीये आणि सतत शून्यात नजर रोखून कसलातरी विचार करतेय. तो विचार हाकामारीचाच आहे, याचा पुरावाही त्याला काही दिवसांतच मिळतो पण एक डिटेक्टिव्ह म्हणून तो पुरावा वेळेवर ओळखण्यात तो अपयशी ठरतो. जे त्याने ओळखायला हवं असतं ते शोधून काढण्याचं काम संध्या सुरू करते पण ते पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी प्रसाद घेतो किंबहुना त्याला ती घ्यावीच लागते. सगळ्या घटनांचा क्रम लावत नक्की काय झालं असेल, हे तो काही वर्षांनी शोधतो पण खात्री करून घेण्यासाठी वाचकही या शोधात पुन्हा गुरफटतो हे लेखकाच्या लेखनशैलीचं यश.

पुस्तकात लेखक लिहितात की,

‘प्रश्नांचं उत्तर शोधताना जेव्हा रुबीक क्युबच्या सर्व बाजू एकरंगी बनतात त्या क्षणी सर्व प्रश्नांची उत्तरं सापडून प्रश्नमालिका सुटलेली असते. पण जेव्हा हे कोडं सुटतं तेव्हा प्रत्येक वेळी मनात आनंदाची कारंजीच उडायला लागतात असं नाही. कधी कधी कोडं सुटल्यावर मेंदुतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्यागत सर्वव्यापी वेदना शरीरभर पसरतात.’

आणि याच कारणाने ही कथा वाचून पूर्ण झाल्यावरही मनात घर करून राहते. गूढ रहस्याच्या परिघाभोवती कौर्य आणि करुणेचे अस्तर ल्यालेली, अंताला सार्वकालीक सामाजिक आशयाच्या वेगळ्या उंचीला पोहोचणारी ही लघुकादंबरी. याआधी ही कथा ‘एक अनाथ, एक डिटेक्टिव्ह आणि काही प्रेमभंग’  या नावाने ‘मौज’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली आहे. कोकणात आलेला महापूर, त्यावेळेसचं वातावरण याची माहितीही कथेच्या ओघात मिळते. रहस्यमयी कथा वाचायला आवडत असतील तर नक्की वाचा आणि नसेलही आवडत तर एक अनुभव म्हणून वाचा.

पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक 

हाकामारी

हृषीकेश गुप्तेंची इतर पुस्तकं –
      

 


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *