आता नाव आठवत नाहीये, पण मी शाळेत असताना एकदा पेपरमध्ये बातमी वाचलेली की, कोणीतरी एक वृद्ध गृहस्थ शाळा-शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाचे मोफत वाटप करत आहेत. मुलांमध्ये मूल्यसंस्कार रुजावेत म्हणून. असे उपक्रम इतरही अनेकजण आजही नक्कीच करत असतील. इतकं भारी वाटलेलं ती बातमी वाचून. तेव्हापासून आम्ही देखील सर्वांना वाढदिवसाला किंवा सणानिमित्त ‘श्यामची आई’ भेट म्हणून द्यायला लागलेलो किंवा घरी कोणी आलं आणि ‘श्यामची आई’ दिसलं की स्वतःहून घेऊन जात असे. त्यामुळे पुस्तकाची जुनी प्रत कधी माझ्याकडे राहिलीच नाही. पण त्यातही एक आनंद असे. काहीतरी खूप मोठं चांगलं काम करतोय, ही भावना असायची त्यात.
इतके ऋण आहेत ना, या पुस्तकाचे आपल्यावर. यातील सत्यकथा आपल्या हृदयाला थेट भिडतात, त्या वाचलेल्या नुसत्या आठवल्या तरी डोळ्यांच्या कडा ओल्या होतात आणि त्यातील सुसंस्कार मनावर खोलवर रुजून जीवनाचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाल्यासारखा वाटतो.
आई-वडिलांसोबतच ‘श्यामच्या आई’ने केलेल्या संस्कारांमुळे मी तरलो/तरले असे सांगणारे अनेकजण भेटतील. मी देखील त्यातीलच एक. ‘श्यामच्या आई’ने कितीतरी पिढ्या घडवल्या पण फक्त मुलांवर मूल्यसंस्कार केले असं नाही, तर मोठ्यांमध्येही ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’, ‘सावकारी किंवा जोर-जबरदस्ती करून आलेलं धन टिकत नाही’ हे विचार घट्ट रुजवले.
आजही कधीतरी एखादं उदाहरण देताना, ‘श्यामच्या आई’त कसं सांगितलंय..’ किंवा ‘श्यामच्या आई’ने सांगितलंय ना,..’ असं म्हणून तुम्ही वाक्याची सुरुवात करत असाल तर हे पुस्तक, या कथा आणि त्यातले संस्कार तुमच्यात खोलवर रुजल्यात असं म्हणायला हरकत नाही. कारण एकदाच वाचलं तरी त्यातल्या कथा विसरता येण्यासारख्या नाहीतच. याचे श्रेय त्यातील कथांसोबत गुरुजींच्या अत्यंत साध्या, सरळ पण काळजाचा ठाव घेणारी हृदयस्पर्शी भाषेला देखील जाते.
मला सगळ्यात जास्त आवडलेल्या किंवा माझ्यावर खोलवर परिणाम करणाऱ्या कथा म्हणजे ‘रात्र अठरावी – अळणी भाजी’ आणि ‘रात्र बविसावी – आनंदाची दिवाळी.’ त्यातील ‘अळणी भाजी’ या कथेतील शेवटचा काही भाग पुढे देत आहे.
‘एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळास गेले, म्हणजे आम्ही पाटपाने घ्यावयास लागत असू. भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असू. “आई, भाऊ आले. भाऊ आले. भात उकर.” वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत, ते आम्ही घेतले, म्हणजे जेवणे सुरू होत.
त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोवळा कोवळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणावयाची, “तिखट, मीठ व तेलाची फोडणी दिली, की सारे गोड लागते आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारेच गोड लागे. जणू तिच्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती तयार करीत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे.
परंतु त्या दिवशी मजा आली. भाजी झाली होती मुळी अळणी! भाजीत मीठ घालावयाला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेले घालावयाचे. परंतु वडील बोलत ना, म्हणून आम्हीही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. जणू आस्वादव्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढावयास आणली म्हणजे म्हणावयाचे, “काय फाकडो झाली आहे भाजी!” पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही. कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते, म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो. आम्हीही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, “तुला नाही का रे आवडली भाजी? खात नाहीस रोजच्यासारखी?” मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, “तो आता इंग्रजी शिकायला लागला ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील?” मी म्हटले, “असे नाही काही. इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेन, तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता?” वडील म्हणाले, “अरे, तुला राग यावा म्हणून म्हटले हो. तू जरा रागावलास म्हणजे बरे वाटते. याला फणसाची भाजी आवडते, होय ना ग? उद्या पाटीलवाडीहून आणीन हो. जून मिळाला तर उकडगरेच करा.” आई म्हणाली, “आणावा. पुष्कळ दिवसांत फणसाची भाजी केली नाही.” बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व विष्णुसहस्त्रनाम म्हणत शतपावली करू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे, असा दंडक होता.
पसारा आटोपून आई जेवावयास बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते, तो भाजी अळणी! मीठ नाही मुळी तीत. मी जवळच होतो. आई म्हणाली, “काय, रे, श्याम! भाजीत मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोललेही नाहीत. श्याम, सांगावे की नाही रे! अळणी कशी रे भाजी खाल्लीत?” मी म्हटले, “भाऊ बोलले नाहीत, म्हणून आम्हीही बोललो नाही!”
आईला वाईट वाटले. “मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी.” ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, “तरीच तू खाल्ली नाहीस. नाही तर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तूच संपवायचा. तुला गुलामा, भाजी हवी पुष्कळ. माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते. परंतु आता काय बोलून?”
आपली मोठी चूक झाली, असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यावयाची, ती चांगली करून द्यावी. जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा. मग भाजी असो, की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे झाले नाही, असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली.
बरे, आईला वाईट वाटू नये, म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी.
मित्रांनो! दुसऱ्याचे मन दुखवू नये, म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजीही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ, का अळणी भाजी कशी हातून झाली, का, रे, तुम्ही कोणी सांगितले नाही, असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही, म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी, माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती, संयम व समाधान यांवर उभारलेली आहे; त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आईबाप मला देत होते.’
खरंच किती सुंदर विचार आहेत. या कथेमुळे लहानपणी ‘जेवण मस्त झालंय’ असं प्रत्येकवेळी सांगण्याची आणि जेवण बनवणाऱ्यास ‘थँक यु’ म्हणायची जी सवय लागली ती आजही तशीच आहे. संस्कार फक्त सांगून होत नाहीत, तर ते कृतीतून होत असतात, हे ‘श्यामची आई’ पुस्तकामुळे कळतं.
साने गुरुजींनी देखील म्हंटलेलं की, ‘ही कथा लिहिताना हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. या गोष्टी लिहीत असताना माझे डोळे शतावर ओले झाले होते. हृदय गहिवरून व उचंबळून आले होते. माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल.’
नाशिक तुरूंगात असताना साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या होत्या. आणि अजूनही त्या कित्येक पिढ्यांवर संस्कार करत आहेत, करत राहणार आहेत.
या पुस्तकातील तुमची आवडती कथा किंवा एखादी आठवण आमच्यासोबत खाली कमेंट मध्ये नक्की शेयर करा आणि पुस्तक वाचलं नसेल तर एकदा नक्की वाचा.
सोबत Kindle Edition पुस्तक विकत घेण्याची लिंक देत आहे.
साने गुरुजींची इतर पुस्तके खालील प्रमाणे
Leave a Reply