त्याला बघताच तिच्या कपाळावर आठ्या उमटायच्या. रोज कामावर आली, की पहिलं दर्शन त्याचंच व्हायचं. कधी कधी राणी सोबत असली, की कुजकट हसून तिला चिडवायची पण, “बघ, त्याने तुझ्यासाठी फुलांचा गालिचा अंथरलाय.” ते बघून तर तिचा पारा अजूनच चढायचा. त्यामुळेच तर तिचं काम अजून वाढत होतं.
हे असं कधीपासून सुरू होतं ते तिला आठवतही नव्हतं; कदाचित ती कामावर रुजू झाल्यापासूनच असेल. कोणाकडे तक्रार पण करता यायची नाही. हे असलं सांगितलं तर नोकरीच जायची.
पण तो नेहमी असायचा तिथे. जणू काय तिच्यासाठीच थांबलाय. त्याने खरं तर तिला कधी त्रास दिला नाही. नुसता आपली फुलं सांभाळत तिच्याकडे बघून हसत राहायचा.
कधी कधी तिला प्रश्न पण पडायचा, ‘नेहमी कसा प्रसन्न वाटतो हा? काय स्वतःची, जगाची चिंता आहे की नाही?’
त्याच्याकडे बघून थोडावेळ स्वतःचं दुःख विसरायलाही व्हायचं तिला, पण लगेच पुढची कामं आठवायची..
दोन दिवस आजारी होती म्हणून सुट्टी घेतलेली तिने. आज पण जरा उशिराच पोहचली. पहिलं दर्शन त्याचंच होणार या विचारातच पुढे आली तर तो नव्हता आज तिथे.
‘असं कसं!’
तिच्या मनात धस्स झालं..
‘असा कसा कुठे जाईल तो?
काय झालं असेल?
एरवी त्याला बघून चिडणारी मी आज त्यालाच का शोधतेय?’
तिला काही कळत नव्हतं..
कोणाला तरी विचारावं, म्हणून काळजीने तिने आजूबाजूला बघितलं.
गाडी धुणारा वॉचमन त्याच्या मित्राला विचारत होता, “कब हुआ?”
“परसोही… सोसायटीवाले बोले, बारीशमें मच्छर ज्यादा हो जाते है, पेड को काट डालो…”
एक दोन मिनिटं सुन्न होऊन थांबली ती..
पुन्हा तिचा झाडू त्याच्या सुकलेल्या फुलांच्या गालिच्यावरून फिरू लागला.
आता ह्या वृक्षतोडी(वजा हत्ये)नंतर सोसायटीवाल्यांची ‘मच्छर समस्या’ दूर झाली होती आणि तिचं काम सुद्धा कमी झालं होतं.
अश्विनी सुर्वे
अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!
Leave a Reply