रत्नाकर मतकरींची गाजलेली बालनाट्य- बालनाटयांच्या आठवणी

‘रत्नाकर मतकरीं’च्या वैविध्यपूर्ण साहित्य योगदानात त्यांनी बालरंगभूमीसाठी केलेले कार्य विशेष दखल घेण्याजोगे आहे. महाराष्ट्रात मतकरींनी बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वतः पदरमोड करून सुमारे तीस वर्षे बालनाट्यांची निर्मिती केली.

बालनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देतानाच त्यांच्यावर मूल्यसंस्कार रुजवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यातीलच एक आहे, ‘वंचितांचा रंगमंच’. या प्रकल्पातून त्यांनी अनाथ तसेच गरीब घरातल्या मुलांना नाटकाचं प्रशिक्षण दिलं आणि किशोरवयीन मुलांना नाट्यकलेची गोडी लागावी म्हणून विशेष प्रयत्न केले.

रत्नाकर मतकरींनी बालनाट्य फक्त पाहण्यावर नाही तर वाचण्यावरही भर दिला. त्यांनी अनेक बालनाट्य लिहिली ज्यातील काही मासिकांमध्ये किंवा पुस्तकरूपाने देखील प्रसिद्ध झाली. ‘अलबत्या गलबत्या’, ‘निम्मा-शिम्मा राक्षस’, ‘सरदार फाकडोजी वाकडे’, ‘अदृश्य माणूस’, ‘गाणारी मैना’, ‘धडपडे, बडबडे, मारकुटे’, ‘अचाट गावची अफाट मावशी’ ही त्यांची काही गाजलेली बालनाट्य.

अलबत्या गलबत्या

‘अलबत्या गलबत्या’ हे सत्तरच्या दशकापासून गाजलेलं नाटक. यामध्ये चेटकीणीची भूमिका आधी ‘दिलीप प्रभावळकर’ करत आणि आत्ता ‘वैभव मांगलेकर’ ही भूमिका गाजवत आहेत. एक चक्रम राजा, त्याचे तसेच प्रधान, सेनापती आणि एका ज्योतिषाने राज्याच्या राजकुमारीच्या लग्नाविषयी केलेली भविष्यवाणी. ती भविष्यवाणी खरी होऊ नये म्हणून चक्रम राजा राजकन्येलाच तुरुंगात टाकतो. मग नाटकात येते ‘चिंची’ चेटकीण आणि ‘अलबत्या गलबत्या’ हा सामान्य माणूस. मतकरींच्या लेखणीची जादू म्हणजे या नाटकाने लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही खळखळून हसायला लावलं.

निम्मा शिम्मा राक्षस

मासे विकणाऱ्या अब्दुल्लाला एक जादुई बाटली सापडते आणि त्या बाटलीतून त्याला निम्मा शिम्मा राक्षस भेटतो. या राक्षसाकडे काहीही मागितलं की तो अर्धचं देतो. म्हणजे अब्दुल्लाने घर मागितलं की तो त्याला अर्धच घर देतो. मग त्याच्याकडून काम करून घ्यायला त्याला दुप्पट गोष्टी सांगाव्या लागतात. मग त्यातून पुढे काय गमती घडतात यावर हे नाटक आधारित आहे. मयुरेश पेम, अंकुश वाढवे आणि गायत्री दातार या कलाकारांनी या नाटकात भन्नाट काम केलंय. ‘अलबत्या खलबत्या’ नंतर हे नाटक बालरंगभूमी गाजवत आहे. या दोन्ही नाटकांची पुस्तकं सध्या उपलब्ध नाही आहेत.

सरदार फाकडोजी वाकडे

‘फाकडोजी’ या सरदाराचं आडनाव जरी वाकडे असलं तरी तो मात्र कमालीचा सरळ, प्रामाणिक असतो आणि म्हणूनच राजाचा आवडता असतो. याच गुणांमुळे मात्र इतर सरदार त्याचा द्वेष करत असतात. मग ते त्याला फसवून एका दूरच्या बेटावरच्या क्रूर सुभेदाराचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवतात. या दुष्ट सुभेदाराकडे असतो त्याचा कपटी मित्र ‘कळीकाळ’, ‘मायावी चेटकीण’, तिची कावळी आणि एक ब्रह्मराक्षस. सरदार फाकडोजी एकटाच या दुष्टांचा सर्वनाश करू शकतो का? त्यात त्याला कोण कोण मदत करतं हे हसत खेळत दाखवत हे नाटक पुढे सुरू राहतं. नाटकातील सगळ्या व्यक्तिरेखा काहीतरी मूल्यशिक्षण देत धमाल उडवून लावतात.

रत्नाकर मतकरी सांगायचे की,

नाटके ही पाहण्याची गोष्ट आहे, वाचण्याची नव्हे असा एक गैरसमज आपल्या काही प्रकाशकांनी कधीतरी करून घेतला आहे. पूर्वी मराठीत कितीतरी प्रौढ व बाल नाटके, एकांकिका सातत्याने छापली जात. नाटकांमधून मुलांवर मनोरंजन करत, हसत खेळत चांगले संस्कार करता येतात.

त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात,

कुठेही केले तरी नाटक हे नाटकच असते! कुठेही म्हणजे, शाळेच्या वर्गात, शाळेच्या हॉलमध्ये, बागेत, घराच्या गच्चीवर, कॉलनीच्या हॉलमध्ये… कुठेही! ते रंगतदार व्हावे, यासाठी फक्त तीनच गोष्टी लागतात. एक, एखादी सांगण्यासारखी (बहुधा नाटकरूपाने लिहिलेली) गोष्ट, ती करून दाखवणारी गुणी नटमंडळी आणि ती प्रेक्षकांच्या मनाला भिडावी, यासाठी नेमके काय करावे, हे समजू शकणारा डोकेबाज ‘दिग्दर्शक’! एवढे असल्यानंतर आणखी काय हवे? (प्रेक्षक! ते आहेत, असे गृहीतच धरले आहे!)

रत्नाकर मतकरींच्या बालसाहित्याने कित्येकांचं बालपण समृद्ध केलं. या प्रतिभावान साहित्यिकाला स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन! रत्नाकर मतकरी लिखित नाटकं रंगभूमीवर आणणाऱ्या चिन्मय मांडलेकर आणि त्यांच्या टीमचंही कौतुक वाटतं. या नाटकांनीच पुन्हा एकदा बालरंगभूमीला नवी झळाळी दिली आहे.

– अश्विनी सुर्वे

अलबत्या गलबत्या हे नाटक ई-बुक रूपात येथे उपलब्ध आहे. 

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *