‘प्राजक्ता माळी’चा ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह अनपेक्षित धक्का होता पण पुस्तक हातात आल्यावर आणि वाचल्यावर तो सुखद आहे, हे ठामपणे सांगता येतं. ‘अभिनेत्री, निवेदिका, शास्त्रीय नृत्यांगना आणि लॉकडाउनमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आयुष्य भरभरून जगणारी व्यक्ती’ म्हणून नव्याने भेटलेली प्राजक्ता माळी’, या तिच्या सर्व ओळखी या कवितांमधून अगदी मोकळेपणाने भेटतात आणि मनाला भिडतातही.
पुस्तकातल्या कित्येक कविता वाचताना काहीवेळेस ‘आईशप्पथ! काय भारी लिहिलंय! म्हणत अगदी आतून दाद येते तर काही शब्दांमागचे वेगवेगळे अर्थ उलगडून अंतर्मुख व्हायला होतं, आणि आपली कवयित्री मनोगतात लिहीते की,
“मी कवयित्री नाही
होण्याचा मानस-मोहही नाही
काही सांगू पाहणाऱ्यांच्या मांदियाळीतलं
मी पहिलं, शेवटचं अथवा सुवर्णपान नाही
जे सुचलं, स्फुरलं, तरळलं, कळलं, समजलं, झिरपलं
ते कवितारुपानं प्रकटलं, सामोरी आलं
सगळ्यांना ते आवडलंच पाहिजे
असा माझा अट्टहास नाही
मी कवयित्री नाही…”
खरंतर ‘उत्तम कलाकारासोबतच एक संवेदनशील, प्रगल्भ आणि मनस्वी कवयित्री ही प्राजक्ताची नवीन ओळख या कवितांमधून भेटते. ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ३८ पानांच्या या छोटेखानी पुस्तकात ३२ रचना आहेत. प्रेम आणि विरहातील विविध भावना, संन्यस्त जीवन, स्वत्वाची जाणीव, कलाकाराचे आयुष्य, कला आणि कलाक्षेत्रातील मोह-माया, शिव, प्रेक्षक, विद्यार्थी, गुरु अशा विविध विषयांवर प्राजक्ता व्यक्त झालीये किंवा तिच्या भाषेत सांगायचं तर तिच्या मनातल्या भावनांचं तिने पांढऱ्यावर काळं केलंय आणि ते सगळं तुम्हाला आवडेलंच असं नाही पण कुठेतरी मनाला स्पर्शून नक्कीच जाईल.
‘फकीर’, ‘सत्य दिसू दे’, ‘मायावी दुनिया’, ‘बरं झालं तू गेलास’, ‘कला’, ‘I had enough of you’, ‘प्राजक्तप्रभा’, ‘कितना अच्छा होता’, ‘जोगन’ या काही मला आवडलेल्या रचना. या काव्यसंग्रहातील काही कवितांना दिलेली प्रस्तावना अतिशय सुंदर आहे आणि ती वाचताना वाटतं की, कवितेसोबतच त्या प्रस्तावना विस्तृत लेखांच्या स्वरूपात वाचायलाही आवडले असते. या कवितांमधील शब्दसंग्रह आणि भाषेवरील प्रभुत्वही कौतुकास्पद आहे.
मुळात या पुस्तकाबद्दल मला फार उत्सुकता आणि काही प्रश्नही होते. त्यांची उत्तरं प्रवीण दवणे सरांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये मिळाली. ते लिहितात, ‘रंगभूषा, प्रकाशझोत, संहिता, रसिकांचे प्रेम या जत्रेपलीकडेही कलावंताला मन असते; अंतर्मन असते; त्या मौनाची अक्षरे होत कविता प्रकट होते. या काव्यसंग्रहातून व्यक्त झालेली ‘कवयित्री’ ही भूमिकाही सच्ची, म्हणूनच स्वागर्ताह आहे.’
पुस्तकाला धनंजय गांगल सरांनी दिलेली प्रस्तावनादेखील आवर्जून वाचावी अशी आहे. प्रस्तावनेत त्यांनी कवयित्रीच्या कवितांचे परीक्षण तर सुंदररित्या केलेच आहे, पण ‘काव्यशास्त्र’ आणि कविता म्हणजे नक्की काय हे उदाहरणं देऊन स्पष्ट केलं आहे. आणि त्यांनीच लिहिलंय तसं, तिच्या गुणांचं योग्य कोंदण व्हावं आणि ही ‘प्राजक्तप्रभा’ अधिक बहरावी या शुभेच्छा!
© अश्विनी सुर्वे.
काव्यसंग्रह – प्राजक्तप्रभा
कवयित्री – प्राजक्ता माळी
प्रकाशन – ग्रंथाली प्रकाशन
किंमत – १०० रु. /-
पुस्तक विकत घेण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त झालेल्या झालेल्या कार्यक्रमात प्राजक्ता माळीने सांगितलेल्या तिच्या लेखन प्रवासाचा व्हिडियो खाली पाहू शकता.
Leave a Reply