“मी जर केवळ शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले तर, ते पन्नास वर्षांचे होईल, संभाजी महाराज लिहिले तर ३२ वर्षांचे होईल, राजाराम महाराजांचे चरित्र लिहिले तर त्यांचा कार्यकाळ हा ११ वर्षांचा आहे. परंतु ह्या सगळ्यांचा कार्यकाळ बघणारा औरंगजेब सगळ्यांच्या चरित्रांचे चित्रण करण्यासाठी मला सोपा वाटला, म्हणून लिखाणासाठी हे पात्र निवडावंसं वाटलं. बाकी चरित्र जरी औरंगजेबाचं असलं तरी, त्याच्या उत्तरायणात मराठ्यांचा पराक्रमच पानापानावर, शब्दाशब्दांत तुम्हाला वाचायला मिळेल, ह्याची मी ग्वाही देतो.” – लेखक स्वप्निल रामदास कोलते.
‘मुकद्दर’ या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी खरं तर प्रस्तावनेमधील हा एकच परिच्छेद पुरेसा आहे. पण ‘ऐतिहासिक कादंबरी‘ हा साहित्यप्रकार नीट समजून न घेतल्याने आणि पुस्तक इतपासून अथपर्यंत न वाचता प्रतिक्रिया देण्याच्या वृत्तीमुळे ऐतिहासिक विषयांवरील कादंबऱ्यावरून अनेकदा वाद निर्माण झालेले दिसतातच. त्याला हे पुस्तकंही अपवाद ठरलं नाही.
चार लक्ष जनावरं आणि पाच लक्ष माणसं, एवढी मोठी फौज घेऊन औरंगजेब मराठ्यांचं राज्य गिळायला आला. एका वर्षात ही मोहीम फत्ते होईल असा समज असलेल्या औरंगजेबाला २६ वर्ष मराठ्यांनी खेळवत ठेवले. डोंगरदर्यात चपळ चित्याप्रमाणे वावरणाऱ्या मराठ्यांनी औरंगजेबाला कसे नामोहरम केले, त्याला आणि त्याच्या सरदारांना मूर्ख ठरवत त्याचे परतीचे मार्ग कसे बंद केले, ज्या तख्तासाठी तो निम्मी ह्यात झुंजला, ते तख्त त्याच्या दृष्टीपासून कसे अदृश्य केले, याची ही गाथा आहे.
सुरुवात ‘वागिणगेरा’ किल्ल्याच्या बाहेर चारही बाजुंनी पसरलेल्या अवाढव्य छावणीच्या वर्णनाने आणि घरदार सोडून २५ वर्ष छावणीसोबत भटकणाऱ्या हताश सैनिकांच्या संवादाने होते. त्यानंतर आखरी जंग, बारिश और मरहट्टे, मुल्क-ए-दख्खन, तख्त-ए-ताउस, बगावत, नूर, मुकद्दर या प्रकरणांमधून ही कादंबरी पुढे सरकत राहते.
सुरुवातीच्या भागात औरंगजेबाच्या आयुष्यातील काही घटना, सत्तेसाठी त्याच्या क्रूरतेने गाठलेला तळ, मराठ्यांचे किल्ले जिंकण्याची त्याची ईर्षा, त्यापोटी झालेलं नुकसान आणि फजिती याबद्दल निवेदक व औरंगजेबाच्या नजरेतून घटनाक्रम उलगडत जातो आणि पुढे औरंगजेब त्याची आवडती मुलगी झीनतउन्नीसाच्या, ‘इतर शत्रू सोडून या पहाडांमध्ये मराठ्यांसोबत लढण्यासाठी इतकी वर्षे का घालवली’, या प्रश्नाला उत्तर देताना फ्लॅशबॅकमध्ये जात छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथाच सांगतो.
मराठ्यांचे शूर सरसेनापती ‘संताजी घोरपडे’ यांच्या भीतीने अर्ध्या रात्री घाबरून उठणारा औरंगजेब, धनाजी जाधव व इतर शूर मावळ्यांचे साहस व स्वराज्य आणि राजाप्रती असलेली निष्ठा, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे पराक्रम, राणी ताराबाई व राजाराम महाराज यांचे प्रभावी कार्य, राणी येसूबाई व थोरले शाहू महाराज यांनी स्वराज्यासाठी केलेला त्याग त्यासोबत आपल्या बुलंद किल्ल्यांचे वर्णन वाचताना उर अभिमानाने भरून येतो. माझा स्वतःचा इतिहासाचा फार अभ्यास नसल्यामुळे जिथे पुस्तकातील काही मुद्द्यांबाबत गोंधळ झाला तिथे ते पडताळून पाहिल्याने नवीन माहितीही मिळत गेली.
लेखक स्वप्निल कोलतेंची लेखनशैलीही मला खूप आवडली आहे. प्रस्तावनेत त्यांनी लिहिलंय की,
‘मी इतिहासाकडे वाचक म्हणूनच बघत आहे. या कादंबरीलाही मी शोधच म्हणेन. कारण अभ्यास आणि संशोधन फार पुढच्या पायऱ्या आहेत, आणि हे समजायला ह्यातीतला बराच काळ निघून जातो.’
जर लेखकाला अधिक वेळ मिळाला असता तर नक्कीच ते असंच अभ्यासपूर्ण लेखन करत राहिले असते. असो!
ही कादंबरी वाचावी की नाही हे ठरवणं वाचकांचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त इतकंच लक्षात घ्यायला हवं की, एखादं पुस्तक आपल्या आवडी-निवडी नुसार आवडणं आणि न आवडणं हा एक भाग होतो आणि आपल्याला न पटणारी किंवा परिघाच्या बाहेरची माहिती आहे म्हणून ती न स्वीकारणं आणि पुस्तकच चुकीचं ठरवणं हा वेगळा भाग आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे चरित्रात्मक लेखन आणि ऐतिहासिक कादंबरीमधील फरकही लक्षात घ्यायला हवा.
माझ्यासाठी तरी, ‘डोन्ट जज अ बुक बाय इट्स कव्हर’ या उक्तीनुसार मी हे पुस्तक निवडलं याचा मला आनंद आहे.
वाचत रहा! यशवंत व्हा!
@अश्विनी सुर्वे-दिडवाघ.
Leave a Reply