काही दिवसांपूर्वी एका उपाहारगृहावरील नावाच्या पाटीवर ‘एकविरा उपकार गूह’ असं लिहिलेलं दिसलं. सहज म्हणून त्यांना सांगावंसं वाटलं की, ते चुकीचं लिहिलं आहे. तर त्यांनी सांगितलं की, ‘ते चुकून झालंय. दुसरी पाटी आहे.’ मी हुश्श! करत दुसरी पाटी पहिली, तर त्यावर लिहिलेलं ‘एकविरा उपहारगृह’. ते ‘उपहार’ नाही ‘उपाहारगृह’ असतं एवढंच सांगून मी निघाले. पण ते एकच दुकान नाही, तर अशा बऱ्याच दुकानांवर चुकीच्या मराठीतील पाट्या वर्षानुवर्षे लिहिलेल्या असतात.
आणि फक्त दुकानांवरील नावांच्या पाट्याच का? इतरवेळीही आपण मराठी भाषा किती जागरूकतेने वापरतो किंवा बोलतो? बातम्यांतील चुकीचे मथळे, रस्ते विद्रुप करणारे छोट्या छोट्या कारणांसाठीचे फ्लेक्स, फॉरवर्ड होणारे मेसेजेस, लिहिण्या-बोलण्यात चुकीच्या अर्थाने वापरले जाणारे शब्द, विनोद निर्मिती करतात पण त्याबद्दल खंत जास्त वाटते.
आता २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जाईल. तसं आता एखादा दिवस साजरा करणं खूप सोप्पं झालंय पण खरोखर आपली भाषा टिकावी, तिचा प्रचार व्हावा म्हणून आपण मुळापासून प्रयत्न करतो का? आपल्या रोजच्या संवादातील, वापरातील किती शब्द बरोबर असतात? त्यांचे मूळ अर्थ आपल्याला माहीत असतात का? मराठीमध्ये लिहिलेल्या पाट्यांवरील भाषेच्या चुका तर नेहमीच्याच झाल्या आहेत. जास्त वाईट याचं वाटतं की मराठी माध्यमातून शिकलेल्या आजच्या कित्येक विद्यार्थ्यांना साधे सोप्पे शब्दही योग्यरित्या लिहिता येत नाहीत. अनावधानाने होणाऱ्या चुका सुधारता येतात पण शोध न घेता चुकीच्या शब्दालाच ठामपणे बरोबर मानण्याची वृत्ती मराठी भाषेसाठी हानिकारक आहे.
खरंतर मराठी भाषेचं सौंदर्य इतकं मनमोहक आणि व्यापक आहे, की ते फक्त समजून घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी या समृद्ध भाषेमध्ये हरवून जायला होईल.
‘कहाणी शब्दांची’ या पुस्तकातून लेखक सदानंद कदम हे मराठी भाषेचं सौंदर्य इतक्या अलवारपणे आणि मजेशीररित्या आपल्यासमोर उलगडतात की, शब्दांची आणि त्यांचा योग्य वापर न केल्याने आपण घालत असलेला गोंधळ सांगणारी ही ‘शब्दांची कहाणी’ वाचताना इतक्या गमती-जमती समजतात आणि हसून हसून पुरेवाट होते. मला तर इथे अशा सगळ्याच शब्दांबद्दल लिहावंसं वाटतंय.
सुरुवातीला लिहिलंय तसं ‘उपहार’ आणि ‘उपाहारगृह’ हे दोन वेगळे शब्द आहेत. उपहार म्हणणे नजराणा,भेट. हा शब्द हिंदीमधून मराठीत आला. आणि ‘उप व आहार’ यांची संधी होऊन आलेला ‘उपाहार’ हा संस्कृतमधून मराठीत आलेला शब्द. आजकाल वाढदिवस किंवा तत्सम कारणांनी जे मोठमोठे फ्लेक्स लावतात त्यात ‘शुभेच्छुक’ म्हणून ढीगभर नावं असतात. पण शुभेच्छुक म्हणजे शुभेच्छा मिळावी ही इच्छा असणारे. खरं तर तिथं हवं शुभचिंतक. ‘आव्हान’ आणि ‘आवाहन’ मध्येही अशीच गफलत होते. आव्हान म्हणजे वादास किंवा युद्धास निमंत्रण तर आवाहन म्हणजे निमंत्रण, विनंती. आच्छादन हा शब्दही अच्छादन असा चुकीचा लिहिला जातो. ‘आच्छादन’चा अर्थ होतो सर्व बाजुंनी, दृष्टींनी परिपूर्ण तर ‘अच्छादन’ म्हणजे न झाकलेला.
असे भाषेचे आणि एखादा शब्द किंवा काना-मात्रा चुकण्याचे आणि शब्दाचा अर्थच बदलण्याचे घोळ आपण सर्रास करतो. जसं की ‘शिला’ आणि ‘शीला’. ‘शिला’ म्हणजे दगड तर ‘शीला’ म्हणजे चरित्रवाण स्त्री. (पण माय नेम इज शीला या गाण्यात तर या नावाचा पूर्ण अर्थच बिघडवून ठेवलाय!) ‘आमंत्रण’ आणि ‘निमंत्रण’ या दोन शब्दांतही बऱ्याचदा गल्लत होते. आमंत्रण हे आग्रहपूर्वक दिलं जातं तर निमंत्रण मध्ये कार्यक्रमाला यावं असं सूचित केलेलं असतं पण आग्रह नसतो. तसंच ‘आदरांजली’ आणि ‘श्रद्धांजली’. ज्यांच्याबद्दल आदर वाटतो त्यांना द्यायची ती आदरांजली, तर दिवंगत व्यक्तींना वाहायची असते ती श्रद्धांजली. आणि अजून एक. श्रद्धांजली ही श्रद्धेनं अर्पण करतात त्यामुळे त्याआधी भावपूर्ण लिहायची गरज नसते. ते पिवळा पितांबर सारखं होतं. ‘आमरण’ व ‘बेमुदत’ उपोषणा बाबत माहिती देताना कित्येक वृत्तपत्र आणि वाहिन्या ‘आमरण’ हा चुकीचा शब्द लिहितात. खरं ते असायला हवं बेमुदत. कारण बेमुदत म्हणजे मुदत दिलेली नसलेलं तर आमरण म्हणजे मरेपर्यंत. आणि तसं उपोषण कोणाचं नसतंच.
तुम्हाला हे वाचूनही मजा वाटेल की ‘झक मारणे’ ही शिवी नाही आणि ‘कळवळा’ या शब्दाचा अर्थ दया, कीव असा नाही किंवा ‘डांबरट’ हे ‘यू डॅम्ड रॅट’चं मराठीकरण आहे. ‘सुमार’ या शब्दाचा अर्थ होतो निश्चित, नेमकी संख्या पण आपण मात्र तो एखादी वस्तू किती प्रमाणात आहे हे नेमक्या संख्येत सांगता येत नाही तेव्हा ‘सुमारे’ हा शब्द वापरतो.
अनेक शब्दांची उत्पत्ती कशी झाली, ते कोणत्या भाषेतून आलेत किंवा त्यांचे ग्रामीण भाषेतील रूपांतर, मराठीच्या पन्नासावर बोलीभाषा आणि त्यांतील गमतीदार म्हणी, वाक्प्रचार, या म्हणी तयार कशा झाल्या यांबरोबरच त्या बोली बोलणाऱ्या आदिवासींच्या चालीरीती, पाटील, देशमुख, पोतनीस, हडप, काशिद, शिकलगार, कुलकर्णी ही आडनावं, हंबीरराव सारखी नावं, कोकण, खालसा सारखी गावांची नावं, आबा, आप्पा अशी उपनावं का आणि कशी पडली असतील? याला काही ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ आहेत का? असल्यास ते कोणते? याचं कुतूहल शमवणारं हे पुस्तक. अनेक उदाहरणं, म्हणी, गाणी आणि कवितांचा दाखला देऊन ही शब्दांची कहाणी अधिकच रंगतदार केली आहे.
आजच्या मराठी वापरात असलेले इतर भाषांतील शब्द गतकाळात कुणी आणि कसे वापरले होते आणि त्या शब्दांचं रूप लीळाचरित्रापासून आधुनिक मराठीपर्यंतच्या प्रवासात कसं काय पालटत गेलं हे सांगणारं ‘सुंदर मराठी, संपन्न मराठी’ या नावाचं सदर लेखक सदानंद कदम ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या सांगली आवृत्तीत लिहीत होते. ‘कहाणी शब्दांची’ हे या सदराचं पुस्तकरूप.
लेखक मनोगतात लिहितात, “ऐसी मराठीचिये कपाटे। नाना शब्दांची लल्लाटे। ना समजली तरी गोटे नदीतील।।’ माउलींचे हे उद्गार सार्थ ठरवण्याची घाई आपणा सर्वांनाच झाली असल्याचे भोवतालचे वातावरण पाहून वाटते. शिक्षणखात्यातील माणसांनाही प्रमाण मराठी लिहिता येत नाही किंवा ‘माझ्या लिहिण्यात एकही चूक नसेल’ असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. गेली तीस वर्षे शिक्षणखात्यात काम करताना हा अनुभव पदोपदी आला. कोणताही शब्द कोणत्याही अर्थाने वापरण्याची घाई सर्वानाच. मराठीच्या जडणघडणीत इतर भाषांचा वाटा खूप मोठा. फारसीचा थोडा जास्तच. तत्कालीन राज्यकत्यामुळे जे फारसी शब्द मराठीत घुसले ते कायमचे स्थिरावले. त्यांनाच मराठी वळण देऊन आजही आपण ते वापरत असतो; अगदी राजरोसपणे. तेही मराठी म्हणूनच. आजच्या दैनंदिन वापरातला कुठला शब्द प्राकृत आणि कुठला संस्कृत है जस लक्षात येत नाही, तसंच कुठला फारसी आणि कुठला पोर्तुगीज हेही समजत नाही. म्हणूनच आजच्या बोलीभाषेतील आणि मुद्रित मराठीतील शब्द हे मूळ कोणत्या भाषेतील, ते तिथून इकडे आले तरी कसे आणि केव्हा, याबरोबरच ते मराठीत रुळताना त्यांच्या रूपांत काही बदल झाला का… आणि झाला असेल तर तो कसा याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.”
मला स्वतःला काही काही मराठी शब्द वापरात/बोलण्यात कसे आले असतील, काही बोली भाषेतील शब्दांचे अर्थ काय असतील याचे फार कुतूहल वाटते. या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक शब्दांची उकल मला झाली, बरेच शब्द नव्याने कळाले. तसं तर कधीतरी भाषेच्या, व्याकरणाच्या चुका होणं साहजिक आहे. पण त्या चुका जाणून घेऊन योग्य शब्दांची निवड करणं म्हणजेच आपल्या ‘मायमराठी’ची पूजा करण्यासारखं नाही का?
तळटीप – मला माझ्या नावाचा अर्थ तसा आधीपासूनच माहीत होता पण या पुस्तकाच्या निमित्ताने त्यावर शिक्कामोर्तब झालंय. काय माहीत, तुम्हालाही असा काही आनंद देणारा हटके शोध लागू शकतो. त्यासाठी पुस्तक नक्की वाचा.
पुस्तक विकत घेण्याची लिंक सोबत देत आहे.
पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.
वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.
For Other Products by the same brand Click here
वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.
अश्विनी सुर्वे
अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!
ता.क.१. – तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.
ता.क.२– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.
तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.
Leave a Reply