आपण नेहमी स्वतःला प्रश्न विचारत असतो,की ‘माझ्या जीवनाचा उद्देश काय? फक्त जास्त वर्ष जगणं हेच ध्येय आहे की जीवनाचा या पलीकडेही आणि यापेक्षाही मोठा काहीतरी उद्देश आहे?’
काही लोकांना त्यांना काय पाहिजे आहे, काय मिळवायचं आहे हे पक्कं ठाऊक असतं आणि ते त्या ध्येयाने वेडे होऊन जगत असतात तर काहींपुढे जगण्याचं काहीच ध्येय किंवा उद्दिष्ट नसल्याने ते रडतखडत जगत असतात. असं का होतं?
खरंतर प्रत्येकाच्या आतमध्ये एक प्रेरणा असते. प्रत्येकाकडे काहीतरी विशेष कौशल्य असतं आणि जे तुम्हाला तुमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रेरित ठेवतं आणि हेच असतं तुमचं ‘इकिगाई’.
तुमचा इकिगाई शोधण्यासाठी मुख्यतः चार गोष्टी जाणून घेणं फार महत्वाचं असतं. त्यासाठी मार्क विन यांच्या चार वर्तुळांच्या आकृतीची मदत घेतली जाते. विद्यार्थ्यांसाठी करियरविषयक योग्यता चाचणी करतानादेखील याच वर्तुळांच्या आकृतीची मदत घेतली जाते.
१. पहिलं वर्तुळ – तुम्हाला काय आवडतं? अशी कोणती गोष्ट आहे,जी तुम्हाला मनापासून करायला आवडते? (What You Like to do?)
२. दुसरं वर्तुळ – त्या गोष्टीत तुम्ही पारंगत आहात का? किंवा जी गोष्ट तुम्हाला आवडते ती करण्यासाठी आवश्यक कौशल्ये तुमच्याकडे आहेत का? (What are you good at?)
३. तिसरं वर्तुळ – तुम्हाला जे आवडतं त्याची जगाला गरज आहे का? (What world needs)
४. चौथं वर्तुळ – तुम्हाला त्या गोष्टीमधून किंवा कामामधून मोबदला मिळू शकतो का? (Will you get paid for that work?)
या चार गोष्टी जेव्हा एकत्र एखाद्या कामामध्ये जुळून येतील, तेव्हा तो तुमच्या जीवनाचा इकिगाई बनतो. तुम्हाला अशी गोष्ट शोधायची आहे, जी तुम्हाला मनापासून आनंदाने करायला आवडते, तुम्ही त्यात पारंगत आहात, जगाला त्या गोष्टीची गरज आहे आणि ती गोष्ट करण्याचे तुम्हाला चांगले पैसे किंवा उत्पन्न देखील मिळू शकतं.
प्रत्येकाचा इकिगाई वेगळा असू शकतो. काही लोकांसाठी इतरांना मदत करणे हा इकिगाई असू शकतो, काहींसाठी त्यांना आवडत असलेल्या गोष्टीमध्ये अधिकाअधिक प्राविण्य मिळविणे हा इकिगाई असू शकतो.
जपानी लोकांच्या मते प्रत्येकाच्या जीवनाचा एक इकिगाई असतोच. आपल्याला तो फक्त मनन चिंतन करून शोधून काढायचा आहे.
ढोबळमानाने इकिगाई म्हणजे ‘सतत व्यस्त राहण्यामध्ये असलेला आनंद’.
रोज सकाळी तुम्हाला का उठावेसे वाटते, याचे जे कारण आहे ते म्हणजे इकिगाई. काही देशांमध्ये याला जगण्यामागचा उद्देश तर इतर देशांमध्ये लोकं त्याला अजून कोणत्या वेगळ्या नावाने संबोधत असतील.
तुम्हाला माहितीये, बहुतांश जपानी लोक निवृत्त होतच नाहीत. त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश इतका महत्वाचा वाटतो, की त्यांच्या संस्कृतीमध्ये निवृत्त होण्याची संकल्पनाच अस्तित्वात नाही.
या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना हेक्टर गार्सीया व फ्रान्सिस मिरेलस या दोन लेखकांनी शंभरहुन अधिक शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं आणि तेच त्यांनी या पुस्तकामधून उदाहरणांसहित आपल्यासमोर मांडलं आहे. लोकांना त्यांचा इकिगाई शोधायला मदत करणं, हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. कारण ज्या ज्या लोकांना ‘इकिगाई’ सापडला ते लोक आनंदी, समाधानी आणि दीर्घायुषी आयुष्य जगले.
पण म्हणून फक्त दीर्घायुषी होणे म्हणजेच इकिगाई नाही परंतु जर तुम्हाला तुमचा इकिगाई गवसला असेल, तर आनंदात तणावरहित आयुष्य जगण्याची कला तुम्हाला गवसली आहे, असं म्हणावं लागेल.
पुस्तकामध्ये विविध अभ्यासकांच्या थेरपी सांगितल्या आहेत, ज्यात ‘मॅन्स सर्च फॉर मिनिंग'(अर्थाच्या शोधात)चे लेखक व्हिक्टर फ्रँकल यांच्या लोगोथेरपीचा समावेश आहे. जर्मन छळछावण्यांमधील भयानक, क्रूर आणि अस्थिर वातावरणातही फ्रँकल यांच्यात जगण्याची उमेद निर्माण झाली ती या लोगोथेरपीमुळेच. लोगोथेरपी नुसार जेव्हा स्वतःच्या अस्तित्वासंबंधी एक प्रकारची निराशा जाणवते, तेव्हा खरंतर तिला निराशा मानू नये. उलट, ही एक सकारात्मक भावना आहे, ज्यातून नवनिर्माणाची संभावना तयार होते ज्यायोगे लोकं स्वतःहून किंवा दुसऱ्यांच्या मदतीने त्यांच्या जीवनाचं अंतिम ध्येय गाठू शकतात.
हे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक गोष्टी जश्या की, मेंदूला प्रशिक्षण कसं द्यायचं, तणावरहित राहण्यासाठी काय करायचं, एकाग्रतेने काम करणे व एकाच वेळी अनेक ध्येय ठेवून काम करण्यातील फायदे-तोटे, कार्यमग्न म्हणजे प्रवाही कसं राहायचं, जपानी खाद्यसंस्कृती, ‘हारा हाची बु’ ही संकल्पना, लयबद्ध व्यायाम प्रकार, व्यायामाचे फायदे, लोगोथेरपी, मोरिता थेरपी याबद्दल पुस्तकात एकदम साध्या सहज सोप्प्या भाषेत लिहिलं आहे.
लेखकांनी घेतलेल्या वयस्कर लोकांच्या मुलाखतींमध्ये इतर लोकांनी सांगितलेले त्यांचे इकिगाई व त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य देखील प्रेरणा देणारे आहे.
“मी माझा भाजीपाला स्वतःच पिकवते आणि स्वतःच जेवण बनवते. हेच माझं इकिगाई आहे.”
“म्हातारपणी तल्लख बुद्धी ठेवण्याचं रहस्य तुमच्या बोटांमध्ये असतं. जर तुम्ही तुमचे हात चालू ठेवलेत म्हणजे कामात राहिलात तर तुम्ही शंभरी नक्कीच गाठाल.”
“मी काड्यांपासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो. तो माझा इकिगाईच आहे.”
“रोज कित्येक वेगवेगळ्या गोष्टी करणं. कामात व्यस्त राहणं पण एकावेळी एकच काम करणं व कोणतंही काम डोईजड न होऊ देणं हे माझं इकिगाई आहे.”
सध्याच्या स्पर्धात्मक युगात तणावाचे प्रमाण खूप वाढते आहे. एखाद्याला काय करणं चांगलं आहे आणि त्याला काय करावसं वाटतं यामध्ये कायम एक द्विधा मनःस्थिती असते, ज्यामुळे तणाव निर्माण होतो. आणि जितका जास्त तणाव तितका जास्त आपल्या पेशींवर नकारात्मक परिणाम होत असतो.
ही शृंखला तोडायची असेल, तर कायम कार्यरत राहा पण घाई-गडबड, दगदग करू नका. नवीन ज्ञान घेत राहा. प्रगती करणं, दुसऱ्यांना उपयोगी पडतील अशा गोष्टी निर्माण करणं, मदत करणं आणि आपल्या निवृत्तीच्या वयानंतरही जगामध्ये काहीतरी भरीव काम करणं चालूच ठेवा. जर तुम्हाला तुमचा इकिगाई अजून समजला नसेल तर व्हिक्टर फ्रँकल सांगतात त्याप्रमाणे तुमचं ध्येय इकिगाई शोधण्याचं ठेवा. तुम्हाला आनंदी आणि उद्देश्यपूर्ण जीवन लाभो या शुभेच्छा!
सोबत पुस्तक विकत घेण्याची लिंक देत आहे.
प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पद्धत वाचायची असल्यास हे खालील पुस्तक सुद्धा जरूर वाचा.
दोन्ही पुस्तक एकसाथ मागवा खालील लिंक वर click करून
Leave a Reply