‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक इतकं प्रेरणादायी का वाटतं, याबद्दल उत्तर देताना एकदा ‘वीणा गवाणकर’ मॅडम बोलल्या होत्या की, “आपल्याला धाडस आवडतं. मला मुलांना हेच सांगायचं होतं, की धाडस किती प्रकारचं असतं? केवळ बलदंड असणं, गोळी मारणं, एखाद्याला हाणून पाडणं म्हणजे फक्त धाडस नाही. धाडस, परिस्थितीवर मात करणं असतं.
आपण जो एक निर्णय घेतलाय, त्यावर ठाम राहणं किंवा अपयश पचवायला शिकणं हे सुध्दा धाडस आहे.
आपल्याला हवी ती गोष्ट करताना, कोणतीही तडजोड न करता जगणं, हे सुध्दा एक धाडस आहे. कार्व्हरच्या आयुष्यातून हे धाडसच आपल्याला दिसतं आणि आपल्यातील प्रत्येकाला प्रेरणा देतं.”
मी एकदा एका नेचरट्रेलला गेलेले. तिथे आम्हाला जंगलाबद्दल, विविध प्रकारच्या झाडांबद्दल, वनस्पतींबद्दल माहिती सांगणारे जे सर होते, त्यांच्या ज्ञानामुळे, माहिती सांगण्याच्या पद्धतीमुळे आम्ही अक्षरशः भारावून गेलो होतो. त्या सरांनी तेव्हा सांगितलं होतं, की ‘वनस्पती शास्त्रज्ञ होण्याचं मी ठरवलं, ते ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक वाचल्यामुळे.’ त्या पुस्तकाविषयी ते फार भरभरून बोलले होते. मी दुसऱ्याच दिवशी शाळेच्या लायब्ररीमधून ‘एक होता कार्व्हर’ घेऊन वाचलं.
सतत कार्यमग्न राहण्याची आणि नैराश्यातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळवायची असेल तर ‘एक होता कार्व्हर’ वाचाच. माझी खात्री आहे, की तुम्हाला या पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच इतकी एनर्जी आणि सकारात्मकता मिळेल, की कधी पुस्तक पूर्ण वाचून होतंय आणि मी काहीतरी प्रॉडक्टिव्ह करतोय/करतेय याची ओढ तुम्हाला लागेल. (हा माझा अनुभव. तुम्हालाही असाच अनुभव आला असेल, तर कंमेंटमध्ये नक्की सांगा.)
एक साधा सामान्य लाजाळू दुबळा निग्रो मुलगा, ज्याला धड नीट बोलता येत नाही तो कष्टाने, स्वकर्तुत्वाच्या बळावर आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपली कमालीची उत्सुकता शमवत वेगवेगळ्या कलांमध्ये, क्षेत्रांमध्ये पारंगत होतो. आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात रमलेला असताना, सगळं सुस्थितीत असताना फक्त एका पत्रामुळे आपल्या वैयक्तिक विकासाचा मार्ग एका क्षणात सोडून देत, ‘माझ्या बांधवांना माझी गरज आहे’, म्हणत एका ओसाड माळरानावर नाविन्याची निर्मित करण्यासाठी जातो आणि बघता बघता त्यात यशस्वी होत, ‘१९४० सालचा महामानव’ म्हणून ओळखला जातो…. जॉर्ज डब्ल्यू कार्व्हर यांचा हा प्रवास इतका भन्नाट आणि प्रेरणादायी आहे की तो वाचल्याशिवाय अनुभवता येणारच नाही.
प्रा. कार्व्हर यांच्या हाताखाली शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आपली पात्रता बाहेरच्या जगात सिद्ध करून दाखवली. त्यांना आपल्या विद्यार्थ्यांचं नेहमीच कौतुक वाटे. ते म्हणायचे,
“तुम्ही कोणाला काही नवीन शिकवू शकत नाही. मुळातच त्यांच्यात जे काही आहे, त्याचाच विकास करू शकता.”
आपल्या विद्यार्थ्यांतील ‘चांगलं’ शोधून त्याचा विकास करण्याचं काम प्रा. कार्व्हर मोठ्या आत्मीयतेने करत होते.
वीणा गवाणकर यांचं ‘एक होता कार्व्हर’ हे प्रा. कार्व्हर यांचं चरित्र वाचून प्रभावित झालेले अनेकजण कृषीनिगडित क्षेत्राकडे वळलेले दिसतात. तुमच्या ओळखीमध्ये देखील असे काही जण असतील, जे या पुस्तकामुळे, डॉ. कार्व्हर यांच्या प्रतिभेमुळे प्रेरित होऊन ‘कृषी’ क्षेत्रातील अभ्यासक्रमाला गेले असतील.
लहानपणी कार्व्हरचं पालनपोषण केलेल्या सुझनबाईंनी कार्व्हरच्या हातचं कसब टिपलं होतं आणि पुढे अनेकांनी त्या लांबसडक बोटांतील जादूवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्या जादूची कितीतरी उदाहरणं पुस्तकात वाचायला मिळतात. त्यात अगदी मरायला आलेली बाग किंवा झाडं फुलवणं, चित्रकला, विणकाम, पियानो वादन, जेवण बनवणं, खेळाडूंच्या वेदना पळवून लावणं, मातीतुन रंग निर्माण करणं, शेंगदाणे, रताळी आदींपासून अनेक पदार्थ तयार करणं, आणि असं खूप काही आहे. आपल्यालाही असं काहीतरी करता यायला हवं असं कायम वाटत राहतं.
प्रा. कार्व्हर चित्रकार किंवा संगीतकार होऊ शकले असते पण ते झाले एक दक्षिणी शेतकरी. एका छोट्या पण धडपडणाऱ्या शाळेचे शिक्षक, मुळ्यांचे डॉक्टर! आणि रंगारीही! एका उजाड, ओसाड माळरानाला त्यांनी नवजीवन दिलं होतं, फुलवलं होतं, लोकांच्या डोळ्यांवरच्या डॉलर्सच्या पट्ट्या काढून त्यांना ‘बघायला’ शिकवलं होतं. आणि ते लोकंही आता डॉक्टर कार्व्हरांप्रमाणे चिखलात, मुळ्यांत, पाना-फुलांत ‘देव’ शोधायला शिकले होते. निसर्गाच्या रहस्यांचा मागोवा घेऊ लागले होते. सद्य स्थितीला आपल्यालाही निसर्गाशी आपली नाळ जोडून देऊ शकणाऱ्या डॉ. कार्व्हर यांची नितांत गरज आहे. बरोबर?
तर हे पुस्तक नक्की वाचा!
पुस्तक विकत घेण्यासाठी पुढे लिंक देत आहे –
वीणा गवाणकरांची इतर पुस्तकं खालील प्रमाणे
Leave a Reply