dupani - durga bhagvat

दुपानी- दुर्गाबाई भागवत – एक करारी व्यक्तिमत्व

दुर्गाबाई भागवत म्हणजे एक अत्यंत अभ्यासू, परिपक्व आणि करारी व्यक्तिमत्व. अनेक विषयांमधला त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्या मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांना अनेक देशी-परदेशी भाषा तसेच आदिवासींच्या बोलीभाषा देखील अवगत होत्या. आपल्या लेखनातून त्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक प्रश्नांवर व्यक्त झाल्याच पण त्याचसोबत कलात्मक आणि दैनंदिन जीवनातील अनेक विषयांवरची आपली तर्कशुद्ध मतं त्यांनी अगदी ठामपणे, आत्मविश्वासाने मांडली. त्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या टिकेचीही पर्वा त्यांनी केली नाही. आणीबाणीला सर्वप्रथम जाहीरपणे विरोध करणाऱ्या दुर्गाबाई भागवत एकट्याच होत्या. एखादी गोष्ट पटली नाही की जशा त्या आपलं मत मांडायच्या तसंच एखादी गोष्ट पटली की त्या विरोधकांचं कौतुकही करायच्या. प्रत्येक विषयातील त्यांची मतं इतकी वैशिष्ट्यपूर्ण, विचारपूर्वक, संशोधन करून आणि प्रामाणिकपणे मांडलेली असायची की ते प्रत्येक लिखाण अभ्यासाचा वेगळा विषय होईल. त्यांची लेखनशैलीही तरल, नादमय, अर्थ सहज समजेल अशीच असायची. ललित निबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक मानदंड निर्माण केला आहे.

‘दुपानी’ या पुस्तकात दुर्गा भागवत यांनी आणीबाणीच्या राजकीय पार्श्वभूमीवर दैनंदिन जीवनामध्ये मनात आलेले  वेगवेगळ्या तऱ्हेचे विचार, कल्पना आणि अनुभव मांडलेले आहेत. यात त्यांनी कोणतेही राजकारण किंवा त्यावरील थेट भाषण केलेले नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य. मध्यम आकाराच्या पुस्तकाची समोरासमोर असलेली दोन पाने भरतील असं लेखनाच्या दृष्टीने साचेबंद पण विषयांचे वैविध्य जपणारे हे लेख आहेत. त्यांचा व्यासंग आणि दूरदृष्टी मनोगतातही दिसते. मनोगतात दुर्गाबाईंनी लिहिलंय की,

‘हे माझे हृदगत आहे; म्हणजे ते जे मनातल्या मनात करू न करू अशा स्वरूपात होते, त्याचे हे प्रकट भावन आहे. हा प्रयोग मी १९७४ पासून सुरू केला. आजच्या परिस्थितीला मिनी-लेखनाची पाऊलवाट म्हणून कुणाला ‘दुपानी’ उपयोगी पडली तर माझं प्रयोग सफल झाल्याचे समाधान मिळेल.’

दुपानी या छोट्याश्या पुस्तकातही विषयांचं इतकं वैविध्य आहे. यात दुर्गाबाईंना पुस्तकांमधून आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात भेटलेल्या व्यक्तींची व्यक्तिचित्रणं आहेत. निसर्गाबद्दल कोमल दृष्टिकोण आहे. वास्तव्य केलेल्या, भेट दिलेल्या भागांचे वर्णन आहे. मराठी भाषेबद्दलची तळमळ, स्त्री-मुक्ती चळवळ, बॉम्बस्फोट, हुतात्मा स्मारक, आणीबाणी यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संवेदनशील मनात उमटलेले सडेतोड विचार आणि आजच्या काळातील घटनांशी साधर्म्य दाखवणाऱ्या लोककथा, श्लोक, अभंग यांची माहिती अशा अनेक आठवणी आहेत. या पुस्तकातून दुर्गाबाई अनेक भूमिकांमधून आपल्यासोबत संवाद साधत आहेत असं सारखं वाटत राहतं. या पुस्तकातील काही लेख काही मासिकं व वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेले आहेत तर काही अप्रकाशित आहेत.

दुर्गाबाई म्हणायच्या की,

“जीवनातल्या प्रत्येक प्रश्नासंबंधी माणसाने भूमिका घेतली पाहिजे. विशेषतः कलावंत साहित्यिकांना आपली भूमिका असली पाहिजे आणि वेळप्रसंगी ती त्यांनी ठासून मांडली पाहिजे.”

या भूमिकेनुसार जगणाऱ्या दुर्गाबाईंचे वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात प्रचंड मोठे योगदान आहे. त्यांनी कथा,चरित्र, बालसाहित्य, लोकसाहित्य, वैचारिक, समीक्षात्मक, संशोधनपर, बौद्धसाहित्य, ललित असे विपुल लेखन केले. त्यांचं काही साहित्य त्यांच्या मृत्युनंतर प्रकाशित झालं. ऋतुचक्र, डूब, पैस, भावमुद्रा, व्यासपर्व, रूपरंग ही त्यांची गाजलेली पुस्तकं. ठाम भूमिका घेतली पाहिजे असं सांगणाऱ्या दुर्गाबाई आज हव्या होत्या असं प्रकर्षाने वाटतं. काळाच्या पुढे असणाऱ्या त्या एक विद्वान विदुषी होत्या. त्यांचे विचार पुस्तकांच्या माध्यमातून का होईना आपल्याला मार्गदर्शन करायला आहेत, हेही नसे थोडके!

पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक देत आहोत.

 


 पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *