स्वामित्व हक्क म्हणजे काय?
कॉपीराईट कायदा काय सांगतो?
लेखक, कवी, गीतकार, चित्रकार, संगीतकार यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून केलेल्या कलेच्या निर्मितीवर त्यांचा काही काळापुरता ‘बौद्धिक संपदा हक्क’ किंवा ‘स्वामित्व हक्क’ म्हणजेच ‘कॉपीराईट’ असतो. यात निर्मात्याच्या परवानगी शिवाय त्या रचनेचा किंवा निर्मितीचा इतर कोणीही कोणत्याही प्रकारे वापर करू शकत नाही.
लेख, कथा, स्क्रिप्ट, कविता, गीत, गाणी, चित्र, फोटो, कॅलिग्राफी, साउंड रेकॉर्डिंग, छायांकन यावर ‘कॉपीराईट’ असतो तर शीर्षक किंवा नाव व लोगो, टॅगलाईन यासाठी ‘ट्रेडमार्क’ हा वेगळा कायदा आहे. पुस्तकं, मासिक अशा छापील निर्मितीवर कॉपीराईट कायद्याअंतर्गत रजिस्ट्रेशन करता येते. लेखक प्रकाशक यांमध्येही कॉपीराईट अंतर्गत लेखनकरार करणे गरजेचे असते. तसेच दर पाच वर्षांनी त्या कराराचे नूतनीकरणही करावे लागते.
कॉपीराईट कायदा
भारतात ‘इंडियन कॉपीराईट ॲक्ट 1914’ यामध्ये सुधारणा होऊन ‘द कॉपीराईट ॲक्ट 1957’ अस्तित्वात आला आणि १९५८ पासून त्याचा वापर सुरू झाला. त्यानंतरही त्यात सुधारणा होत सर्वात नजीकच्या काळातील म्हणजे ‘कॉपीराईट अमेंडमेंट ॲक्ट 2012’ हा कायदा अस्तित्वात आला. आपली कलाकृती कायदेशीररित्या संरक्षित करण्यासाठी कॉपीराईट ऑफिसमध्ये किंवा ऑनलाइन आपल्या कलाकृतीची प्रत व नोंदणी शुल्क सबमिट करून रजिस्ट्रेशन करू शकता.
लेखकाच्या मृत्यूनंतर ६० वर्षांनी त्याच्या रचना किंवा लिखाण कॉपीराईट मुक्त होते म्हणजे इतरांना ते छापण्यासाठी उपलब्ध असते. पण यामध्येही काही वेळेस प्रकाशकांची परवानगी घेणे बंधनकारक असते. तसेच पुनर्मुद्रित करताना केलेल्या सुधारणा, बदलांवर त्या नवीन व्यक्तीचा स्वामित्व हक्क असतो. पण जर हे नवीन बदल चुकीचे असतील किंवा त्यामुळे मूळ लेखकाच्या प्रतिमेला धक्का लागत असेल तर त्या लेखकाचे नातेवाईक कायदेशीर कारवाई करू शकतात.
पुस्तक ओळख देताना लक्षात घ्यायच्या गोष्टी
पुस्तक ओळख किंवा पुस्तक समीक्षा देतानाही काही नियम असतात. यामध्येही लिखित, ईबुक किंवा ऑडियो- व्हिडियोच्या स्वरुपात कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होत असेल तर ते बेकायदेशीर ठरते. अनुवाद करतानाही लेखकाची/प्रकाशकांची परवानगी घ्यावी लागते. पीएचडी किंवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी परवानगी असते मात्र व्यावसायिक उपयोगासाठी किंवा प्रबंध पुस्तकरुपात प्रकाशित करताना त्यावर कॉपीराईट लागतो. कोणत्याही स्वरूपातील पायरेटेड पुस्तकं बेकायदेशीरच आहेत.
सोशल मीडियावरील साहित्यचोरीचे प्रकार उघडकीस येतात तेव्हा मूळ लेखकाला, कलाकृती निर्माण करणाऱ्या कलाकाराला प्रचंड मनस्ताप होतो. अशावेळी तिथल्या तिथे चोरी करणाऱ्याला सुनावणे किंवा स्क्रीनशॉट घेऊन शेयर करणे असे उपाय केले जातात परंतू यापुढे जाऊन सोशल मीडियावरील वाङमय चोरीचीही कॉपीराईट व आयटी कायद्याच्या अंतर्गत रीतसर तक्रार केली जाऊ शकते.
सोशल मीडियावरील फोटोग्राफर्सच्या कलाकृतींनाही कॉपीराईट ॲक्ट च्या सेक्शन 25 नुसार फोटो पब्लिश केल्यानंतर ६० वर्षांपर्यंत सरंक्षण मिळू शकते. त्यामुळे असे फोटो सर्रास वापरण्याआधी परवानगी घ्या किंवा ‘फ्री इमेज’ उपलब्ध करून देणाऱ्या pixabay, pexels, freeimage अशा साईट्सवरून फोटो घेऊ शकता. पण तिथेही मूळ कर्त्याला क्रेडिट देणं गरजेचं आहे.
इतरांचं साहित्य विकत न घेता वापरताना नेहमी मूळ कर्त्याला क्रेडिट देणं आवश्यक आहेच आणि जरी परवानगी घेतली तरी स्वतःच्या नावाने ते साहित्य वापरू शकता, असं नाही. त्यासाठीही मूळ क्रेडिट द्यावेच लागते. कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्यास व गुन्हा सिद्ध झाल्यास कमीत कमी ६ महिने तुरुंगवास व ५० हजार दंड ते ३ वर्ष तुरुंगवास व २ लाख रुपये पर्यंत दंड होऊ शकतो.
कॉपीराईट कायद्याबद्दल अधिक माहिती देणारं ‘सोशल मीडियासाठी कॉपीराईट वेबिनार’ आपण आयोजित करत आहोत. हे वेबिनार मोफत आहे. यासाठी तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकता.
update : हे वेबिनार २६ जुलै रोजी संपन्न झालेले आहे. पुढील वेबिनार, कार्यशाळा व इतर उपक्रमांबाबत माहिती घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
© अश्विनी सुर्वे-दिडवाघ.
Leave a Reply