कॉर्पोरेट वाढदिवस, मेदू वड्याचा प्लान आणि माझा डाएट सर्व एकत्र जुळून आलं आणि आम्ही सर्व जण कॅन्टीनमध्ये जायला निघालो. उशिरा पोहचल्यावर पडणाऱ्या शिव्या टाळण्यासाठी पळत कॅन्टीन मध्ये आलो. नेहमी प्रमाणे संतोष परब टेबल पकडून बसलेला. बाकीची मंडळी अजून आली नव्हती म्हणून आमच्या नेहमीच्या गप्पा सुरु झाल्या.
परब हा नेहमी अप टू डेट राहणारा पण आज काही तरी वेगळं होतं. त्याच्या हातात नेहमीच घड्याळ नव्हतं. मी सहज बोललो, ‘भाई नवीन घड्याळ!!’ त्यावर संतोष बोलला, ‘नाही रे वडिलांचं आहे.’ तेव्हा माझं कुतूहल थोडं वाढलं. मी घड्याळ जरा निरखून पाहिलं, तर ते रिकोचं ‘मेड इन जपान’ घड्याळ होतं. साठ-सत्तरच्या दशकातलं हे घड्याळ संतोष अचानक का घालून आला म्हणून मनात दुसरा प्रश्न निर्माण झाला. मी त्याला प्रश्न विचारणार हे त्याच्या बाजूला बसलेल्या दिशांकने ओळखलं आणि न राहवून मी संतोषला विचारलंच, ‘मधेच काय सुचलं तुला हे घड्याळ घालायचं.’ ‘सहज रे!’ तो एवढं बोलला, पण त्याच्या मनातलं उत्तर वेगळं होतं.
आतला माझ्यातला लेखक मला स्वस्त बसू देत नव्हता. मी पुन्हा विचारलं, ‘अरे पण मधेच काय?’
त्यावर हा काही गप्प बसणार नाही म्हणून त्याने सांगितल की, ‘अरे काल सफाई करताना सापडलं, बंद पडलेलं. घड्याळवाल्याकडे जाऊन दुरुस्त करून आणलं. दुरुस्त झालंच आहे, म्हणून आलो सहज घालून.’ त्याचं हे प्रॅक्टिकल उत्तर ऐकून मी पुन्हा काही विचारलं नाही. तसा संतोष हा मॅनेजर पदावर आहे पण प्रत्येकाला बांधून ठेवण्याच्या त्याच्या गुणामुळे त्याची फॅन फॉलोइंग जरा जास्त आहे. सहसा आपली हळवी बाजू लपवणारं असं हे व्यक्तिमत्व मला त्या घड्याळा मागची हळवी बाजू सांगणार नव्हतं. म्हणून मग मी राऊंड द विकेट जाऊन त्याला विचारू लागलो. ‘अरे! ह्या घड्याळाचं वैशिष्ट्य काय?’
तेव्हा तो बोलला की, ‘अरे हे घड्याळ माणसाच्या नाडीवर चालतं, जेवढा वेळ तुझ्या मनगटावर आहे तेवढं ते आपोआप चार्ज होतं आणि चालू राहतं.’ मी त्या मागचं सत्य पडताळन्यात न जाता, त्याची ती हळवी बाजू शोधत होतो. मी म्हटलं, ‘भारी रे, आता अशी घड्याळं मिळत नाहीत.’ त्यावर पॉज घेऊन तो बोलला, ‘हो रे!! बाबांची आठवण आली म्हणून घातलं!’
तब्बल दीड वर्षाने ह्या माणसाने आपली हळवी बाजू माझ्या समोर दाखवली. त्याने ते घड्याळ का घातलं हे मी केव्हांच ओळखलं होतं, पण आपण सर्वच जण एक वेगळं कातडं घालून घरा बाहेर वावरत असतो. अर्थात त्यात काही चुकीचं नाही. पण हळवं असणं हा पुरुषी अहंकाराच्या दृष्टीने कमजोर असल्याचं लक्षण आहे हे कुठे तरी बदलायला हवं असं मला वाटतं.
संतोषचं ते नाडीवर चालणारं घड्याळ मी पुन्हा एकदा पाहिलं, आणि त्याला बोललो, ‘अरे घालत जा रे अधून मधून; भारी वाटतं.’ त्यावर तो फक्त हसला. घड्याळाच्या नाडीचं तर माहिती नाही पण त्याची नाडी मात्र मी अचूक ओळखली होती.
त्याचा स्वभाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, त्याचे शब्द वाचले किंवा ऐकले तरी शेखर समजतो.
Leave a Reply