आज नेहमी पेक्षा थोडं लवकर निघालो ऑफिस ला. स्टेशन वर नेहमी प्रमाणे वर्दळ ही नव्हती. 7.15 ची अंधेरी लोकल पकडली आणि ठरलेला डबा पकडला.
जागा असूनही म्हंटलं आज उभे राहूनच जावं. ट्रेन सुरू होताच माझं लक्ष ऐका आजी कडे गेलं. ती खालीच बसली होती. तिचं एकंदरीत रूप पाहता अंधपणामुळे तिची अवस्था फार काही बरी नव्हती. पण ती भीक ही मागत नव्हती. तशा बऱ्याचशा अंध व्यक्ती आपण ट्रेन मध्ये पाहतो, त्यांचं ठरलेलं गाणं आणि भीक मागायची पद्धत ही आपल्या सवयीची झालेली असते. पण अजून तरी ह्या आजीने भीक मागितली नव्हती.
सकाळची वेळ, मोबाईलची बॅटरी नेहमी प्रमाणे लो असल्यामुळे बॅटरी सेवर ऑन ठेवून तो मी खिशात ठेवून दिला होता. तेव्हा माझं लक्ष पुनः त्या आजीकडे गेलं. ती सतत काहीतरी पुटपुटत होती, हातवारे करत होती आणि अधून मधून नेहमीच्या गाण्याच्या काही ओळीही गात होती.
माझं निरक्षण चालूच होतं. तिने बराच वेळ खाली केलेली मान वर केली आणि थेट माझ्याकडे पाहिलं. दिसत नसेलही तिला पण तेव्हा मी थोडा चपापलो. ह्या अंध लोकांचा सिक्सथ सेन्स बराच कमालचा असतो म्हणे, इतका वेळ माझं चाललेलं निरक्षण हिला बहुदा कळलं असावं. मग मी काही वेळ ट्रेन च्या बाहेर पाहू लागलो.
‘साहेब कोणतं स्टेशन आलंय!!’, असं विचारताच मी न ऐकल्याचा अविर्भाव आणत ‘काय!’ विचारलं.
तिने पुनः संथ आवाजात विचारलं ‘कोणतं स्टेशन आलंय साहेब!’ मी कुर्ला बोलताच, तिची लगबग सुरू झाली, तिने आपली मळकट अशी पिशवी अवरली, प्लास्टिकच्या डब्याचं झाकण घट्ट लागलय का पुन्हा तपासून पाहिलं. माझी थोडी उत्सुकता वाढली, आता ती आजी थोडी थोडी करून ट्रेनच्या दरवाज्याकडे सरकू लागली. हे सर्व चालू असताना वडाळा स्टेशन जवळ येऊ लागले. तिने पुन्हा प्रश्न केला, ‘साहेब कोणतं…’ तिचा प्रश्न पूर्ण न होऊ देताच मी ‘वडाळा आलं आजी!’ असं सांगून टाकलं.
मग तिने मघाशी घट्ट केलेला डबा पुन्हा तपासला. गाडी प्लॅटफॉर्मला लागली आणि ती अंदाज घेऊ लागली. उतरणारी लोक ही फार नव्हती त्यामुळे माझ्या निरक्षणात जास्त व्यत्यय येत नव्हता. गाडी थांबताच, एक पंचविशीतला तरुण दरवाजा जवळ आला. आजीने, ‘रफिक’ म्हणून हाक मारली, तशी त्याने डोक्यावरची टोपी सरळ करत, ‘हा आक्के!! चल दे जलदी!!’ म्हणत इतका वेळ त्या आजीने सांभाळून ठेवलेला डब्बा घेतला.
‘देख रफिक मेरा शिफ्ट बदल दे, वो कदम बहोत मचांड करता हे.’
‘देखता हु!!’ रफिक तिच्याकडे न पाहताच बोलला.
त्याच सर्व लक्ष त्या डब्यात जमलेल्या पैश्याकडे होतं. डब्यातल्या पैश्याचा आवाज आजीच्या कानावर पडला तशी ती बोलली, ‘एकसो साठ हे.. तु सुना मै क्या बोल रही हु, नहि तो स्टेशन बदल दे.’ त्या आजीने मघाशी राहिलेली तक्रार पुन्हा सुरू केली.
‘बोलाना देखता हु!!’ अशा त्रासलेल्या आवाजात खेकसत तो निघून गेला.
गाडी प्लॅटफॉर्म ला थांबल्या पासून ती निघे पर्यंत 20-25 सेकंदाचा वेळ असतो. ह्या एवढ्या वेळात त्या दोघांचं संभाषण ऐकून मी काही वेळासाठी मनातून निःशब्द झालो. तीन ठळक गोष्टी माझ्या मेंदू ने रजिस्टर केल्या होत्या. एक म्हणजे इतका वेळ हातवारे आणि बडबड करणारी आजी अचानक वडाळा स्टेशन वर प्रोफेशनल झाली. दोन “कदम बहोत मचांड करता हे” हे वाक्य म्हणजे कदम नावाची व्यक्ती जी ह्या आजीला त्रास देत असावी आणि ज्या अर्थी आजीने तक्रार केली त्या अर्थी रफिक आणि त्याचं काहीतरी साटलोटं असावं. तीन आणि सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे “भीक मागणारी लोक शिफ्ट मधे कामं करतात”.
ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत मी अंधेरी स्टेशन वर उतरलो. आणि ऑफिसच्या दिशेने भराभर चालायला लागलो कारण त्या आजीची शिफ्ट जरी संपली असली तरी माझी शिफ्ट मात्र सुरू होणार होती…
त्याचा स्वभाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, त्याचे शब्द वाचले किंवा ऐकले तरी शेखर समजतो.
Leave a Reply