ज्यांच्या ओघवत्या व ओजस्वी वकृत्वाने अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले, ज्यांना वक्ता दशसहस्त्रेषु म्हंटले गेले, ज्यांनी ५ दशकाहून अधिक काळ आपल्या व्याख्यानमालेतून जनजागृती केली असे व्यासंगी आणि विद्यार्थीप्रिय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा आज स्मृतीदिन. प्रा.शिवाजीराव अनंतराव भोसले (जुलै १५, १९२७ – जून २९, २०१०) यांची लेखक, उत्कृष्ट वक्ते यासोबतच विद्यार्थीप्रिय प्राचार्य ही एक महत्वाची ओळख. फलटणच्या मुधोजी कॉलेजमध्ये ते सुमारे २५ वर्ष प्राचार्यपदी कार्यरत होते. तत्वज्ञान, तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र हे कठीण विषय सोप्पे करून शिकवणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. १९८८ ते १९९१ या कालावधीमध्ये त्यांनी औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळले. प्राचार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, भारतीय समाजसुधारक, मराठी संत, तर्कशास्त्र, साहित्य, मानसशास्त्र, भारतीय तत्वज्ञान आदि विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यानं देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. देश-विदेशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले त्यांचे विद्यार्थी प्राचार्यांचे विचार आणि शिकवणुकीच्या मार्गाचे अनुकरण करत आहेत याचे प्राचार्यांना फार कौतुक वाटायचे.
‘कथा वकृत्वाची’ या पुस्तकात ‘वकृत्वमीमांसा’ ही संकल्पना मनामध्ये ठेवून प्रा. शिवाजीराव भोसले यांनी वैखरी, वकृत्व आणि व्याख्यानांचा लेखांच्या माध्यमातून विविध अंगाने परिचय करून दिला आहे. वकृत्व-कौशल्याचे महत्व सांगतानाच हे कौशल्य प्राप्त कसे करावे, त्यासाठीची पूर्वतयारी, सरांच्या जडण-घडणीची कथा आणि पूर्वीच्या काळातील मोठमोठ्या सभा आपल्या वकृत्वाने गाजवलेल्या वक्त्यांचे अनुभव या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करतात. सर नेहमी म्हणायचे की,
‘मनुष्यप्राणी हा एकच असा सजीव आहे की, ज्याच्याकडे बोलण्याची कला आहे. त्यामुळे हे बोलणे अर्थपूर्ण असायला हवे.’
‘अभ्यासे प्रकट व्हावे! नाहीतर झाकोनी असावे!’ हे समर्थांचे वचन मी आदेश म्हणून स्वीकारले,’ असे सांगताना प्राचार्य वाचनाचे, अभ्यासाचे, वाचलेले लिहून मांडण्याचे आणि विषयाची पूर्ण माहिती घेऊन अर्थपूर्ण बोलण्याचे महत्व सांगतात. ते लिहितात,
’ज्याला ज्ञानाचा आधार नाही असे वरपांगी बोलणे क्षणजीवी असते. ज्याने हाती लेखनी कधीच धरली नाही, तो वक्ता वाचाळ होण्याची मोठी शक्यता असते. वकृत्व हे विचारांचे भरते असते. ते आतून स्फुरते आणि मग सभास्थानी प्रकट होते. ही स्फुरणप्रक्रिया भाषण आणि लेखन या दोन्ही माध्यमांतून अभिव्यक्त होते. लेखनामुळे तिला अचूकता प्राप्त होते; विशुद्धता प्राप्त होते; सुंदरता प्राप्त होते.
या पुस्तकामध्ये प्राचार्यांनी त्यांच्या बालवयापासून ऐकलेल्या आणि त्यांना भारावून टाकलेल्या वक्त्यांच्या वकृत्वगुणांबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये प्रा. श्री. म. माटे, आचार्य भागवत, व्याकरणकार श्री. मो. रा. वाळंबे, स. ज. भागवत, प्रा. ना. सी. फडके, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, पंडित जवाहरलाल नेहरू, श्यामाप्रसाद मुखर्जी, भाई डांगे, बॅरिस्टर जयकर, जे. कृष्णमूर्ती सी.व्ही. रामन, गार्डीनर मर्फी, एम. एन. रॉय, गोपळकृष्ण गोखले, बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, आदि अनेक उत्तमोत्तम वक्त्यांबद्दल, त्यांच्या भाषणांबद्दल वाचताना आपलाही अभ्यास होतो आणि अनेक गोष्टी नव्याने कळतात.
ही वाट वैखरीची, अभ्यासे प्रकट व्हावे, बोलणे कशासाठी, वकृत्वाचे अंग आणि रंग, जाणत्यांचे अंतरंग, उकल भाषणांची, शब्दांचा मोहोर, वकृत्वाची तीर्थक्षेत्रे, बुद्धी, व्यासंग आणि वकृत्व, संस्कृतीचे शिलालेख, वेलू वकृत्वाचा अशा २५ लेखांमधून प्राचार्य या वैखरीच्या उपासनेचा मार्ग वाचकांसमोर उलगडतात.
शिक्षकपेशा निवडण्याबद्दल सर लिहितात की, चांगला शिक्षक उत्तम बोलू शकतो आणि उत्तम बोलणारा चांगला शिक्षक होऊ शकतो अशी माझी खात्री उत्तम वक्ते असणाऱ्या शिक्षकांना पाहून/ऐकून झाली आणि
‘वैखरीच्या सहाय्याने केलेले सरस्वती पूजन म्हणजे अध्यापन’
ही माझी ठाम समजूत कायम राहिली.
त्या काळातील पुण्याचे आणि सभांचे वर्णन वाचताना, प्रत्यक्षात त्या काळाचा अनुभव घेता यायला हवा होता असे सारखे वाटते. आपल्या मधाळ शैलीत प्राचार्य लिहितात. ‘त्या काळच्या पुणेकरांचा चालण्यावर भर होता. सायकल व्यतिरिक्त वाहन क्वचितच नजरेस पडे. जो तो आपल्या पायावर उभा होता. तेव्हा पुण्यात दिवसाआड एखादी सभा होत असे. आठवड्यातून एखादे उत्तम व्याख्यान ऐकायला मिळत असे. वसंत व्याख्यानमाला, बॅरिस्टर जयकरांची इंग्लिशमधून होणारी व्याख्याने, बाळशास्त्री हरदासांचा वाग्यज्ञ पर्वणीसमान असायची. एखादी सभा सुटल्यानंतर श्रोते ऐकलेल्या व्याख्यानाची समीक्षा करत चालत परतीची वाट धरायचे.’ चालणे हा प्रचार्यांचा छंद आणि सवयदेखील होती. चालता चालता बरेच काही सुचते, आठवते हा त्यांचा ४० वर्षांचा अनुभव होता.
प्राचार्यांनी उदंड भाषणे ऐकली, अभ्यासली आणि अखंड व्याख्याने दिली. ते लिहितात,
त्यांचे जीवन हे वैखरीची वाट आहे. ‘वाढत्या वयाबरोबर वकृत्वाची अनेक रम्य आणि रौद्र, भव्य, दिव्य आणि आकर्षक रुपे मी पाहिली. वकृत्व या शक्तीचे दर्शन मला या सभांमधून झाले आणि नकळत मी या शक्तीचा उपासक झालो.’
‘मनाच्या मळ्यात, विचारांची रुजवण’ या लेखात प्राचार्यांनी भाषा वेगवेगळ्या असल्या तरी वकृत्व ही प्रक्रिया तत्वत: एकच कशी आहे हे सांगितले आहे. बोलणे कशासाठी या लेखात वक्ता आणि श्रोत्यांमधील नातं सांगितलं आहे. ते लिहितात, ‘खरे वकृत्व हा एक प्रकारचा मानसिक संवाद असतो. ते कधी एकतर्फी नसते. वक्ता वैखरीने बोलत असतो. श्रोता मुक मनाने दाद देत असतो. हे एक मुक संवेदन असते. वकृत्वदिन या पुस्तकात वकृत्वकला जोपासण्यासाठी काय करायला हवे यावर भाष्य केले आहे. उकल भाषणांची या लेखात प्रभावी वकृत्वासाठी आवश्यक गुण आणि गोष्टींबद्दल माहिती दिली आहे.
‘कथा वकृत्वाची’ हे पुस्तक प्राचार्यांच्या वैखरीच्या प्रवासाची कथा सांगत असले तरी त्याचा मुख्य उद्देश उगवत्या पिढीच्या उत्कर्षाचा आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी मराठी वकृत्वाचा अभिमान बाळगून शब्दशक्तीला बहुमान देत रहावं यासाठी आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना अभिप्रेत असलेला हा वकृत्वाचा वेलू गगनात जावा आणि आपल्याकडूनही या वैखरीची उपासना व्हावी यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे –
कथा वकृत्वाची
लेखक – प्रा. शिवाजीराव भोसले
प्रकाशक- अक्षरब्रह्म प्रकाशन
छापील मूल्य – १२५/- रु.
Leave a Reply