गेल्या काही वर्षांपासून श्रीमती ही श्रीकांत देशपांडे यांची अत्यंत कार्यक्षम अशी पर्सनल सेक्रेटरी बनलेली होती. भारतातील आणि भारताबाहेरील कॉर्पोरेट जगतात श्रीकांतचे नाव सर्वतोमुखी झालेलं होतं. ऑफिसात त्याची प्रिया नावाची सेक्रेटरी होतीच, पण त्याला घरातही एका स्मार्ट, विश्वासू आणि मूलभूत जबाबदाऱ्या पेलू शकणाऱ्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बुद्धिमान व आज्ञाधारक अशा सेक्रेटरीची गरज होती. श्रीमती बुद्धिमान होती, ती मदतीला सतत तयार असे. तिची समज व बुद्धीची झेप अनन्यसाधारण होती. त्यामुळेच श्रीकांतच्या पाठीशी तिचा भक्कम आधार होता. श्रीकांतच्या कामाचा आवाका व त्याची कठोर परिश्रम करण्याची क्षमता याविषयी तिला नितांत आदर होता. त्याला मदत करणं, ही तिला आपली नैतिक जबाबदारी वाटायची. आता तिच्यावर श्रीकांतचे ऑफिशियल पाहुणे आणि मित्रपरिवार यांच्या आगतस्वागत करण्याची आणखी एक मोठी जबाबदारी येऊन पडली होती. त्याचप्रमाणे त्याचा सर्व ऑफिशियल पत्रव्यवहार तीच सांभाळत असे. सगळ्या पत्रांमधून मजकूर तिनेच लिहिलेला असे. श्रीकांत फक्त नंतर त्यावर एक नजर टाकून स्वाक्षरी करत असे.
श्रीकांतला श्रीमतीपेक्षा चांगली असिस्टंट मिळणं शक्यच नव्हतं. कारण हे असलं काम इतक्या विचारपूर्वक, इतक्या काटेकोरपणे कुणीच केलं नसतं. श्रीमती ते करायची ते काही पैशाच्या आशेने नाही तर केवळ श्रीकांत वरच्या प्रेमापोटी.
पण श्रीमती श्रीकांतची फक्त असिस्टंट नव्हती. त्याआधी ती त्याची बायको, प्रेयसी, मैत्रीण होती. श्रीमती श्रीकांत देशपांडे.
श्रीकांत आणि ती पहिल्या इयत्तेपासून एकाच वर्गात होते, एकमेकांचे शेजारी होते. पण दोन्ही कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या वैर चालत असल्यामुळे लहानपणापासूनच इतर लोकं श्रीमती आणि श्रीकांतकडे ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत, अशाच दृष्टीने बघत असत. पण नेमकी हीच गोष्ट श्रीमतीला रुचत नसे. तिचं म्हणणं असे की, ‘श्रीकांतला हरविण्यासाठी मला पहिला क्रमांक नकोय. मी अभ्यास करते तो ज्ञान प्राप्त करण्यासाठी.’
दहावीच्या बोर्डावेळी त्यांच्या मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना त्यांच्या दहावीच्या निकालाची, पहिलं कोण येणार याची उत्सुकता होती. श्रीकांतची आई आणि श्रीमतीची आज्जी, ज्यांनी या दोन घराण्यांचं वैर जपलं होतं त्या तर एकमेकींना कमीपणा दाखवायला एकदम उत्सुक होत्या.
तसा श्रीकांत देखील बुद्धिमान आणि अभ्यासात फार हुशार होता पण दोघांचा स्वभाव मात्र एकदम वेगवेगळा होता. तो पुष्कळ बोलका होता, महत्वाकांक्षी होता आणि त्याच्या ठायी आत्मविश्वास ही जबरदस्त होता. याउलट, श्रीमती फार हळवी होती. ती स्वभावाने मितभाषी, काहीशी संकोची होती. अवघ्या पंधराव्या वर्षीही तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या संन्यासिनीला शोभेल असा होता. तिला कधीही कोणत्याही गोष्टीचा बडेजाव करणं आवडायचं नाही. सुखाचाही नाही आणि दुःखाचाही नाही. श्रीकांतचं याच्या बरोबर उलटं होतं. त्यामुळेच दहावीच्या बोर्डात तो दुसरा आला याच्या आनंदापेक्षा श्रीमती बोर्डात पहिली आली यामुळे तो जास्त निराश झालेला. श्रीमती मात्र एकदम शांत होती. आपलं यश तिने मोठ्या सहजतेने स्वीकारलेलं.
या अशा परिस्थितीत आणि त्यांच्या घराण्याच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दुष्मनीमध्येही श्रीकांत श्रीमतीची मैत्री, प्रेमकहाणी फुलली. तीदेखील त्या दोन घरांच्या मध्ये असलेल्या बकुळीच्या झाडाच्या साक्षीने.
खरंतर ते दोघं एकमेकांशी फार बोलत नसत. पण दोघांच्याही मनात एकमेकांविषयी एक अनामिक ओढ जागृत झाली होती. कदाचित हा दोघांच्या वयाचा परिणाम होता किंवा मित्र-मैत्रिणींच्या चिडवण्याचा. पण एका प्रवासात झालेल्या अनपेक्षित भेटीमध्ये, साधे, सरळ पण ठाम विचार असलेली, वागण्यात कोणताही कुत्रिमपणा नसलेली, हृदयापासून बोलणारी श्रीमती आपल्यापेक्षा खरोखरच हुशार आहे, असं श्रीकांतला मनापासून वाटलं आणि तिची अधिक ओळख करून घेण्याची त्याला मनापासून ओढ वाटली. श्रीमतीलाही श्रीकांतच्या एकलक्षी, मेहनती असण्याचं फार कौतुक वाटायचं. तिला खात्री होती की, त्याच्या याच गुणांमुळे तो अगदी थोड्याच दिवसात त्याला काय पाहिजे ते प्राप्त करू शकेल.
आणि झालंही तसंच. श्रीकांतच्या निर्धारानुसार त्याला मुंबईच्या आय.आय.टी.त प्रवेश मिळाला आणि धारवाडची वेस ओलांडून तो पहिल्यांदाच ५ वर्षांसाठी मुंबईला गेला. श्रीमतीचे मात्र असे कोणतेही मोठे बेत नव्हते. ती इतिहासाची विद्यार्थिनी होती. तिला साहित्याची आवड होती. इतिहास, संस्कृत, इंग्रजी हे तिचे आवडीचे विषय होते. ‘आपल्याला जी गोष्ट मनापासून आवडते, तीच केली पाहिजे’ हे तिचं तत्व होतं आणि आयुष्यात शिक्षण आणि लग्न या दोन गोष्टींबाबत स्वतः निर्णय घ्यायला हवेत, असं तिचं ठाम मत होतं. म्हणून अगदी ठरवून तिने आर्ट्स शाखेत प्रवेश घेतला. ‘बोर्डात पहिली येऊनसुद्धा ती आर्ट्सला आली’, असं जेव्हा इतर विद्यार्थी तिच्याकडे बोट दाखवून बोलायचे तेव्हा तिला गंमत वाटायची.
श्रीकांत मुंबईला गेला म्हणून त्यांच्यातलं अंतर वाढलं नाही. आधी जशा त्यांच्या बकुळाच्या झाडाजवळ सर्वांच्या नकळत भेटीगाठी व्हायच्या तसाच आता त्यांचा पत्ररूपी संवाद होऊ लागला. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तो तिला पत्र पाठवायचा आणि पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात ती त्याला.
ती आपल्या प्रत्येक पत्राच्या घडीत एक नाजूक असं बकुळीचं फुल आठवणीने पाठवायची. त्याने ते प्रत्येक फुल जपून ठेवलं होतं. तिचं प्रत्येक पत्र त्याच्याकरता एक उमेद घेऊन यायचं. या बकुळीच्या फुलांची साथसंगत आपल्याला जन्मभर असणार आहे, ही उमेद.
सुधा मूर्तींच्या ‘बकुळा’ या पुस्तकाची कथा खरंतर श्रीकांत श्रीमती एकत्र येतात की नाही, यावर नाहीये. त्यांच्या एकत्र येण्याचा प्रवास तर सुधा मूर्तींनी खूप सुंदर रेखाटला आहे. पण त्यापुढील प्रवास फार अस्वस्थ करणारा, काळजाला घरं पाडणारा आहे.
सुधा मूर्तींच्या इतर कथांप्रमाणेच ही कथाही खूप उत्कंठा वाढवणारी, छोटीशी, पात्र ठळकपणे रंगवलेली आणि पूर्ण वाचून होईपर्यंत पुस्तक खाली ठेववणार नाही, अशीच आहे. सुधा मूर्तींच्या ‘And Gently Falls The Bakula’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे. मूर्तींच्या लेखनकौशल्यामुळे आणि लीना सोहोनींच्या सुंदर अनुवादामुळे कथेतील पात्र आणि प्रसंग अगदी डोळ्यांसमोर उभे राहतात.
धारवाड, हुबळीचा इतिहास, मध्ये-मध्ये आलेले इतिहासकालीन संदर्भ व देशविदेशातील ऐतिहासिक स्थळांची माहिती तर इतकी सुंदररित्या मांडलीये की सुधा मूर्तींच्या इतिहासाच्या ज्ञानाचं फार कौतुक वाटतं. त्याचसोबत कॉर्पोरेट क्षेत्राची सफरही पुस्तकाच्या माध्यमातून होते. कॉर्पोरेट क्षेत्रातील मानसिक ताण-तणाव, स्पर्धा, सत्तेची नशा यांचं पुस्तकातील चित्रण फार अस्वस्थ करणारं आहे.
सुरुवातीला माणसं पैशासाठी काम करतात. पण हळूहळू पैशाचं स्थान दुय्यम होत जाऊन माणूस सत्तेसाठी काम करू लागतो. सत्ता, पद, प्रतिष्ठा याची त्याला नशा चढते. कोणत्याही महत्त्वाकांक्षी व्यक्तीला या सर्व गोष्टींची जणू चटक लागते. तो त्यांच्या आहारी जातो, माणूस जितका जास्त काम करतो, तेवढी जास्त सत्ता त्याच्या हाती येत जाते. अशा माणसाला आपल्या कामाव्यतिरिक्त बाहेरच्या जगातील कोणत्याही गोष्टीविषयी काहीही रस राहत नाही. एक यश:प्राप्तीचं पान वगळता त्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाची राहिलेली सगळीच पानं कोरी असतात.
दिवसातला जास्तीत जास्त वेळ श्रीमती सोबत व्यतीत करावा असं वाटणारा श्रीकांत ते आपल्यावाचून कंपनीचं पान हलणार नाही, असं स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा, यशाच्या प्राप्तीसाठी काळावेळाचं, कुटुंबाचं बंधन न पाळणारा, सांसारिक गोष्टींची दखल न घेणारा, “जगानुसार बदलायला हवं, हृदयाने नाहीतर मेंदूने विचार करायला हवा” या विचारांचा श्रीकांत आणि इतिहासातील घटना आठवून भावविवश होणारी, परदेशातील डॉक्टरेट करण्याची संधी श्रीकांतसाठी डावलणारी, “जेव्हा मेंदूपेक्षा हृदय वरचढ होऊन बसतं, तेव्हा माणसाचं मन व्यवस्थित काम करत नाही” तसेच “आयुष्यात सौंदर्य, सत्ता, पैसा, स्वास्थ्य, तारुण्य या गोष्टी चिरस्थायी नसतात. खरी टिकणारी श्रीमंती ही ज्ञानाची श्रीमंती असते. आपण ही श्रीमंती जेवढी दुसऱ्यांमध्ये लुटतो, तेवढी ती वृद्धिंगत होत जाते” या विचारांवर कायम ठाम असणारी श्रीमती आणि त्या दोघांच्या नात्यांचा प्रवास म्हणजे ही कथा.
या प्रवासातून सुधा मूर्तींनी फार सुंदर संदेश दिलाय. संसाराच्या दोन चाकांमधील एक चाक जेव्हा दुसऱ्याचा विचार न करता, मागे वळून न बघता पुढे धावत राहतं, तेव्हा काय होतं, हे सांगणारी ही कथा.
पुस्तकात लिहिलंय तसं, ‘कुणावर माया करण्यासाठी सौंदर्य किंवा बुद्धिमत्तेची गरज नसते. परस्परांवरचं प्रेम आणि गाढ विश्वासाची तिथे गरज असते. कोणत्याही नातेसंबंधात परस्परांविषयीचा जो दृढ विश्वास निर्माण होतो, तो असा या मायेतून, प्रेमातूनच निर्माण होतो.’ खरंय ना?
–अश्विनी सुर्वे
पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा
Leave a Reply