दिवान म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर अगदी सुरुवातीलाच गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या शब्दांत सांगायचं तर ते असं,
उर्दू ग़ज़लच्या चारशे वर्षाच्या काळात हजारो गज़ल संग्रह प्रकाशित झाले. त्यांनाही दिवानच म्हटलं जातं. काही शायरांनी मात्र उर्दू मुळाक्षरं नजरेपुढे ठेवून त्यातले प्रत्येक अक्षर ‘अलिफ’ पासून ‘ये’ पर्यंत काफिया व रदीफच्या स्वरुपात घेऊन त्यावर गजल रचना केल्या. आजवर असे एकशे चार दिवान उर्दू भाषेत आले आहेत. आपल्या मराठीतही ज्येष्ठ ग़ज़लकार शेखसाहेबांनी ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंतची मुळाक्षरं घेऊन दोनशेच्या वर गज़ला रचल्या व ‘अमृताची पालखी’ हा पहिला दिवान मराठी भाषेला दिला.
या दिवान मध्ये प्रत्येक गजलसोबत तिचा छंद, लगावली, मात्रासंख्या सगळं अगदी व्यवस्थित दिलं आहे. लगावलीसाठी ‘गा ल’ ऐवजी ‘ना र’ अशी अक्षरे दिली आहेत. याआधी तुम्ही ‘गझल ए के गझल’ पुस्तकाबद्दल वाचलं असेल तर तुम्हाला याची कल्पना आली असेलच. ‘गा ल गा गा’ किंवा ‘ना र ना ना’ या दोन्ही पद्धतीचे चलन गजलविश्वात आहे.
मी कधीकधी मुद्दाम गझल वाचत नाही, कारण मग खूप वेळ कवितेकडे (आपल्या पहिल्या प्रेमाकडे) जाऊच वाटत नाही. ए. के. शेख सरांना भेटणं किंवा त्यांची पुस्तकं वाचणं मुद्दाम दोन आठवडे तरी थांबवावं लागतं, नाहीतर कवितेपासून कायमचा दूर जाईन की काय अशी भीती वाटते.
कवितेची गोडी खरंतर वैभव जोशी, ना. धों. महानोर, दासू वैद्य आणि अशा बऱ्याच नावाजलेल्या कवी-लेखकांमुळे लागली. इथे तिथे धडपडणारी माझी कविता त्यांच्यामुळे रांगता-रांगता चालू लागली. पण गझल लेखन प्रवासात अगदी सुरुवातीलाच मला गुरु म्हणून ए. के. शेख सर भेटले हे मी माझं भाग्य समजतो. त्यांचा मोलाचा सल्ला हा ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येकाला मिळावा, त्यांच्या काव्यप्रवासाची माहिती नव्याने लिहू पाहणाऱ्या प्रत्येक नवकवीला मिळावी या प्रेमळ भावनेने मी माझे विचार इथे लिहित आहे.
या दिवानमध्ये चाळीसएक वृत्तांचा समावेश असून, १२ मात्रांच्या आनंद, कादंबरी अशा वृत्तापासून क्रीडा या ४२ मात्रांच्या वृत्तापर्यंतच्या ग़ज़ल यात आहेत. त्यातील सोपी वृत्ते म्हणजे आनंदकंद, देवप्रिया, मंजुघोषा, मेनका, वियद्गंगा, या वृत्तांमधील ग़ज़ल यात आहेत.
गजलेबद्दल सांगताना शेख सर म्हणतात,
गज़लांमधून वाङ्मय कृतीचे आंतर संदर्भ नव्याने उलगडतात, आस्वादाला अंकूर फुटतात. कवीची जीवनाकडे, समाजाकडे पाहण्याची दृष्टी कळते. आपल्या ग़ज़लेत तो आपला जीवनरस ओतत असतो. नवीन पिढीची ग़ज़ल अधिक अंतर्मुख होऊ लागली आहे. आत्मप्रत्यय हा तिचा पाया आहे. काहींच्या रचना तर अगदी प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे दरवळत असतात.
ह्या संग्रहाचं नाव ज्या गजलेवरून दिलं गेलं आहे ती वाचताना ‘गझल’ या काव्यप्रकाराचं सरांच्या मनातील स्थान लक्षात येतं. लगावली- नारनाना३ नारना ( वृत्त- देवप्रिया । मात्रा २६) असलेल्या ‘अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी’ या गझलेत सर लिहितात-
अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी
ग़ज़ल म्हणजे गच्च ओल्या भावनांची पालखी
ताजसम पृथ्वीवरी या आठवे आश्चर्य ती
ग़ज़ल म्हणजे तर अलौकिक वेदनांची पालखी
हीर रांझा कृष्ण राधा मजनु लैला तर कधी
ग़ज़ल मीरेच्या मनातिल यातनांची पालखी
वेद रामायण महाभारत महाकाव्यातली
ग़ज़ल शांतीची सुखाची चेतनांची पालखी
श्रावणाचा मास वासंतिक बहर वर्षा ऋतू
ग़ज़ल ‘एके’ उत्सवांची अन् सणांची पालखी
‘अमृताची पालखी’ वाचताना एक लक्षात आलं, की एखादी गझल किंवा शेर वाचायला, ऐकायला, त्यातला अर्थ मुरवायला आपल्या मनाची जमीन तयार हवी. ती तशी नसेल तर आपण ते वाचायला न घेणच बरं. मला खूप आवडलेल्या गझल/कविता मी अनुक्रमणिकेत खूण करून ठेवतो. गझल दिवान वाचून पूर्ण झाला आणि मी सहजच एक गझल उघडली.
प्रीय प्रियकर लाडकेही खोडतो मी
पत्र लिहिताना कितीदा फाडतो मी
प्रश्न एखादाच तू पुसतेस मजला
अन् असा उध्वस्त होतो मोडतो मी
मला ती इतकी आवडली की ती पुन्हा पुन्हा वाचली. अनुक्रमणिका चेक केली तर चक्क मी तिला खूण केलेली नव्हती! म्हणजे याआधी ती वाचताना माझ्या मनाची जमीन तशी तयार नव्हती तर. ए. के. शेख सरांच्या लिखाणात मी कायम हरवून गेलो आहे. ते त्यांचं एक वेगळं जग निर्माण करतात. ज्यात आपण पुस्तक मिटलं तरी फिरत राहतो. आता तर एखादी गझल समजली नाही की मी तिथल्या तिथेच थांबतो. एकाच बैठकीत गझलसंग्रह वाचणं माझ्याच्याने तरी होत नाही. त्यात हा गझल दिवान म्हणजे अजूनच मोठा! प्रत्येक गझलेचं वेगळं जग आणि तितकंच मोठं सुद्धा, त्यात थोडा वेळ तर राहावं लागतंच. घाईघाईत त्याचा पूर्ण आस्वाद घेणं शक्य नाही, अगदी एखाद्या स्वीट-डिश सारखं. छोट्या-छोट्या चमच्याने निवांत खात राहावी अशी गोष्ट आहे ही.
कदाचित म्हणूनच सर म्हणतात की,
सहजपणे जुळलेले यमक, अंतर्गत नादसाम्य, यमकांचा योजनाबंध अनुप्रास, एखाद्या शब्दाची सलग पुनरुक्ती अशा रूपबंधामुळे ती कानाला गोड लागते. ग़ज़ल ओळीओळीतून उमलत असते. पाकळी पाकळीतून फूल फुलत जावं तसं शब्दाशब्दातून, मिसऱ्यातून आणि शेराशेरातून ती काळजात दरवळत जाते. तिच्या गतीनं जाण्यातच औचित्य. धसमुसळेपणा किंवा गडबड, धांदल कराल तर इथं सारं विस्कटून जाईल.
खरंतर सरांनी गझलेत लिहिलेला, गझलेची थोरवी-माधुर्य-उत्कटता दर्शवताना लिहिलेला प्रत्येक शब्द मला इथे लिहू वाटतोय. पण हे सर्व साहित्य इतकं विशाल आहे की या ब्लॉगमध्ये सर्व लिहिणं अशक्यच! शिवाय त्यांच्या पुस्तकातून हे सारं वाचण्याची मजा काही औरच आहे.
पुस्तक विकत घेण्यासाठी तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर WhatsApp करू शकता किंवा इथे संपर्क साधू शकता.
©यशवंत दिडवाघ
Leave a Reply