पुलंचं ‘गाठोडं’ हे पुस्तक वाचलंय?
नसेल वाचलं तर एकदातरी नक्की वाचा असं मी सुरुवातीलाच सांगेन. पुस्तकातील ‘पुलं’नी सर्वांगाने मांडलेले विचार, त्यांचा हजरजबाबीपणा, भाषणाचा ओघ, भाषेवरील प्रभुत्व आणि त्यांची निरीक्षण शक्ती विस्मयचकित करणारी आहे.
साहित्यासोबतच आयुष्यातील विविध विषयांवर पुलंनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अगदी मार्मिक भाषेत लिहिलेल्या लेखांचं, पत्रांचं आणि काही भाषणांचं, ‘भाऊ मराठे’ यांनी केलेलं संकलन म्हणजे हे भलं मोठं ‘गाठोडं’. यातील अनेक लेख दुर्मिळ गटात येतील असेही आहेत.
पुस्तकाच्या सुरुवातीला पुलंनी लिहिलंय की, ‘इतक्या प्रस्तावना लिहीलिही लिहिल्यानंतर व्याख्यानांना अध्यक्ष नसावा, साहित्यसंमेलनांना उदघाटक नसावा, ह्या चालीवर – पुस्तकाला प्रस्तावना नसावी असं माझं मत झालं आहे. वाचक आणि लेखक यांची जी काय दोस्ती व्हायची ते थेट व्हावी.’
आणि खरंच, पुलंच्या अनुभवाचं, विचारांचं, विविध पैलूंचं आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या वर्णनाने, पुलंनी त्यांना केलेल्या कौतुकपर व मार्गदर्शनपर उपदेशाने भरलेलं हे भलं मोठं गाठोडं आपल्याला अवाक् करतं, हसवतं, रडवतं कधी कधी आपल्या अंतर्मनात जाऊन विचार करायला भाग पाडतं आणि खूप मोठी पुंजी देतं. आपल्या आवडत्या लेखकाचे असे इतर पैलू समजुन घेता येणं ही पर्वणीच म्हणायला हवी. मला स्वतःला, या पुस्तकातून ‘पुलं’ अधिक जवळून भेटले किंवा पुलंची नव्याने ओळख झाली, असं बऱ्याचदा वाटलं.
आपल्या पायलट मेव्हण्याच्या एका पत्राला उत्तर देताना पुलंनी जीवनाला अर्थ कसा आणावा याबद्दल उत्तम मार्गदर्शन केलंय. ते लिहितात, ”तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न महान आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो. आपलं मन जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं, तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पाय सोडूनच एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणानं भूगोल पहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो. पण हा विचार करताना आपल्याला त्याचं उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानी जर विचार सुरू झाला, तर उत्तर कधीच सापडत नाही. त्यासोबतच जगात कुणी कुणाला दुःख का द्यावं ह्या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद का द्यावा हा प्रश्न देखील विचारता येण्यासारखा आहे. पण याचं उत्तर कुणी विचारू नये आणि ते कुणाला सापडलेलं देखील नाही. यात आपल्याला स्वतः अर्थ निर्माण करायचा आहे. नाहीतर फुल म्हणजे काय असतं? मऊमऊ तुकड्यांचा एक पुंजका एवढंच! पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वतःच्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून देण्यात आहे.’
किती गहन सूत्र सहज सोप्या शब्दांत उलगडलंय पुलंनी. त्यांच्या या प्रतिभेसमोर खरंच नतमस्तक व्हायला होतं.
लेखनाबद्दल साहित्य अकादमीच्या एका समारंभात केलेल्या भाषणात पुलं बोलले होते, ‘मला विनोदकार म्हंटलेलं आवडत नाही, मी विनोदाचा कारखाना उघडलेला नाही. मला जसं लिहायला आवडतं, तसं मी लिहितो. वाचक हसले म्हणजे मला आनंद होतो. परंतु त्यांना विनोदातील कारुण्याचं दर्शन घडतं, तेव्हा मला खरं समाधान मिळतं. तुम्ही लिहिता म्हणजे काय करता, तर जो तुमच्याशी मनःसंवाद साधू शकेल, तुमच्यासोबत हसू शकेल, रडू शकेल अशा वाचकांच्या शोधात तुम्ही असता.’
लेखकांच्या स्वातंत्र्याबद्दल पुलं बोललेत, ‘निर्मितीक्षम लेखक पाण्यावर तरंगणाऱ्या बर्फाच्या तुकड्यासारखा असतो. त्या बर्फाच्या खड्याचं अस्तित्व जसं पाण्यावर अवलंबून असतं तसंच लेखकाचंही अस्तित्व समाजावर पोसलेलं असतं, परंतु नीट निरखता यावं यासाठी जरा उंचीवर जगणं त्याला भाग असतं आणि हेच स्वातंत्र्य, निर्भयता कलात्मक सर्जनाची मोठी शक्ती आहे.’
लेखनाबद्दल आणि लेखकांबद्दल पुलंनी मांडलेले विचार प्रत्येक नवोदित लेखकाने वाचायलाच हवेत, असं वाटलं कारण लेखकाचं स्वातंत्र्य सांगताना त्यासोबत आवश्यक असलेली विनित वृत्तीचं महत्वही त्यांनी सांगितलं आहे.
पुलंनी आपल्या साठीनिमित्त मित्रांना लिहिलेलं पत्र, बाबुराव आडारकर ह्यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त दिलेला यशस्वी संसाराचा मंत्र, नवीन वर्षाच्या निमित्त लिहिलेले लेख, रसिकतेचा महापूर या लेखातील मजेशीर किस्से आणि ‘वाऱ्यावरील वरात’ या त्यांच्या नाटकातील कलाकारांवर लिहिलेल्या विनोदी कविता खळखळून हसायला लावतात.
यासोबतच ‘मार्मिक’च्या चौथ्या वाढदिवसानिमित्त पुलंनी बाळासाहेब ठाकरे यांना पाठविलेला पत्ररुपी आशिर्वाद, कालनिर्णय मधील बालगंधर्वांवरील लेख, वपु काळे यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या पुस्तकासाठी पाठविलेलं पत्र तसेच गदिमांच्या आठवणी, गुळाचा गणपती या सामाजिक नाटकाचे लेखक बापूराव माने यांच्याबद्दल लिहिलेला लेख, नाट्य निकेतन व पुलंचं आजोळ असलेल्या कारवारच्या आठवणी, पुण्याबद्दलचं मुक्तचिंतन अतिशय सुंदर आहेत.
अशा विविधांगी अनुभवांनी भरलेलं हे ‘गाठोडं’ एकदातरी उलघडून पहा कारण त्यातून प्रत्येकाला खूप काही घेण्यासारखं आहे, हे नक्की.
-अश्विनी सुर्वे
सोबत पुस्तक विकत घेण्याची लिंक देत आहोत.
पुलंची इतर पुस्तकं पुढील प्रमाणे :-
Leave a Reply