वडील निवृत्त होतात तेव्हा मुलं मोठी झालेली असतात. निवृत्तीआधी ते १०-१२ तास नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. तेव्हा बायकोचे,मुलांचे व घरातील इतर सदस्यांचे एक वेळापत्रक किंवा काम ठरलेले असते. वडील नोकरी करत असताना घरी आले की, मुलं मोठी झाली असतील तरी, ‘बाबा आलात का?’ इतकं तरी विचारतात, पत्नी वाट पहात असते, नाश्ता, जेवण इतर तयारी हसतखेळत किंवा मोकळ्या वातावरणात होत असते.
पण तेच निवृत्तीनंतर जेव्हा वडील दिवसभर घरी असतात तेव्हा पत्नी वाट पाहत नाहीये, मुलेही विचारपूस करत नाहीयेत किंवा नेहमीप्रमाणे एकमेकांशी मोकळेपणाने बोलत नाहीयेत, असं त्यांना जाणवतं आणि आपण घरी असल्यामुळे हे असं तणावग्रस्त वातावरण तयार झालंय किंवा निवृत्त झाल्यामुळे घरातल्यांना आपली गरज नाहीये असं वाटायला लागतं आणि मग घरातलं वातावरण थोडंसं कोंदटच होऊन जातं.
खरंतर यात कोणाचीही चूक नसते. फक्त निवृत्तीनंतरचं आपलं नीट प्लॅनिंग नसल्याने आणि मुलांना किंवा घरातल्यांना या नवीन परिस्थितीशी जुळवून घेता न आल्याने व निवृत्त किंवा वृद्ध लोकांच्या भावना समजून घेण्यास कमी पडल्याने काही समस्या निर्माण होतात व घरातील व नात्यांतील अंतर वाढते.
जेष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांच्या ‘सेवानिवृत्त झालात! पुढे काय?’ या पुस्तकात निवृत्तीनंतर घरातील वातावरण सैल, मोकळे, हसते-खेळते कसे ठेवायचे आणि निवृत्तीनंतर मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचे उत्तर खूप सोप्या साध्या शब्दांत आणि विविध उदाहरणांसोबत सांगितलय जी आत्ताच्या घडीलाही पूरक आहेत आणि यात देव-देव करणं, यात्रा करणं असे नेहमी ऐकायला मिळणारे सल्ले बिलकुल नाहीत. सेवानिवृत्त होणाऱ्या आई-वडिलांसोबतच तरुणांना देखील हे पुस्तक फार मार्गदर्शक ठरेल असं आहे.
माझे वडीलांना निवृत्त होण्याच्या काही वर्ष आधी हे पुस्तक लेखकाकडूनच त्यांना भेट म्हणून मिळालेलं. तेव्हाही हे पुस्तक वाचायची उत्सुकता होती, पण ‘आपल्या काय उपयोगाचं!’ म्हणून वाचलं नव्हतं. आत्ता काही दिवसांपूर्वी पुस्तकांचं कपाट आवरताना हे पुस्तक पुन्हा दिसलं आणि वाचावंसं वाटलं.
तरुणांनीही हे पुस्तक वाचण्याचे दोन मुख्य फायदे आहेत.
१. सध्या बरेच जण फ्युचर प्लॅन करून ठेवतातच पण हे पुस्तक त्या प्लॅनिंगला योग्य दिशा देईल.
२. आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे या निवृत्तीनंतरच्या काळात आपले आई-वडील कोणत्या स्थित्यंतरातून जात आहेत, त्यांच्या भावना, त्यांना होणारे त्रास आणि त्यांच्या भावनिक-मानसिक व शारीरिक गरजांबद्दल जाणून घेता येईल.
निवृत्तीनंतर आपला आता लोकांना उपयोग नाही, त्यांच्या कामात आपली लुडबुड होतेय, असं वाटून मानसिक त्रास होत असतो. यामुळे आपोआप स्वभाव चिडचिडा, हट्टी किंवा आत्मविश्वास कमी होणे, नकारत्मक विचार येणे अशा गोष्टी घडतात. खरंतर, नोकरीमुळे इतकी वर्षे घरात वेळ देता आला नाही म्हणून निवृत्तीनंतर आपण घरातल्यांना वेळ द्यायला खूप उत्सुक असतो पण कदाचित काहीवेळा ही लुडबुड वाटू शकते आणि मग ‘तुम्ही आता बाहेरच्या खोलीत गप्प बसा व जेवणाची वेळ झाल्यावर बोलावले की आत या’, ‘थोडावेळ देवळात जाऊन या’, ‘मुलांना सांभाळा!’, ‘सारखा चहा घ्यायला ऑफिसात आहात का?’, ‘आता काय, तुम्हाला वेळच वेळ आहे’, इत्यादी संवाद ऐकायला येतात.
या पुस्तकातील मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, इतक्या बाजूंचा विचार करून विस्तृतपणे लिहिलंय, की या गोष्टी आपल्या इतर वेळी लक्षातदेखील आल्या नसत्या.
नार्वेकर सरांनी विविध समस्यांना स्पर्श करून त्याचे सांगोपांग विवेचन करून त्यावर उपायही सुचवले आहेत. म्हणजे अगदी निवृत्तीनंतरचे आरोग्य, दिनचर्या व वेळापत्रक, कुटुंबाचे महत्व, वाढते वय आणि कामजीवन, इच्छामरण, महिलांच्या समस्या, सासू-सुनेच्या नात्याचे अनेक पैलू, पती-पत्नीमधील नातेसंबंध, निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन, परदेशात गेलेल्या भारतीय वृद्धांच्या समस्या, आजार व व्याधी, त्यावरील उपाय, व्यायाम, आहार, स्वतःचे छंद जोपासणे, त्यातून कमाईचे पर्याय, इत्यादी विषयांवर वेगवेगळ्या भागात अगदी तपशीलवार लिहिलं आहे आणि शेवटी विविध भागांतील वृद्धाश्रम आणि नेत्रपेढ्यांबद्दल देखील माहिती दिली आहे.
एकट्या राहणाऱ्या वृद्धांचे मानसिक आजार, कौटुंबिक, आर्थिक, शारीरिक समस्या, यांसोबतच वाढ झालेले गुन्हेगारी हल्ले, राष्ट्रसंपत्ती असलेली पण नियोजनाअभावी वाया जात असलेली जेष्ठांची शक्ती-अनुभव, तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारांच्या स्वेच्छानिवृत्ती, अतिरिक्त कामगार कमी करणे, औद्योगिक कलह कायद्यातील दुरुस्ती आदी योजनांमधील त्रुटींबाबतही अभ्यासपूर्ण रीतीने लिहिलं आहे.
आणि हे सगळं त्यांनी १०-१२ वर्षांच्या काळात अनेक जेष्ठ नागरिक व सेवानिवृतांच्या भेटीगाठी घेऊन, त्यांच्या समस्या, प्रश्न, अनुभव यांवर चर्चा करून लिहिलंय. यातूनच या पुस्तकात किती खोलवर आणि विविध बाजुंनी लिहिलं असेल, याची कल्पना करता येईल.
मधु मंगेश कर्णिक यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे आणि यात त्यांनी नार्वेकर सरांच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे आणि हे खरंच खूप महत्त्वाचे आहे. पुस्तकातील भाषा व दृष्टिकोनही खूप सरल आणि सकारात्मक आहे त्यामुळे वाचताना कुठेही कंटाळा किंवा नकारत्मक भावना मनात येत नाही.
पुस्तक वाचायला सुरुवात करताना प्रस्तावना वाचा असं मी आवर्जून सांगेन कारण त्यात हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा नार्वेकर सरांना कुठे मिळाली याची उदाहरणं आहेत, जी वाचून आपल्यालाही या विषयाचं गांभीर्य समजतं. पुस्तक वाचल्यावर जेष्ठांकडे बघण्याचा सर्वांचा आणि त्यांचा स्वतःचाही दृष्टिकोन फक्त जबाबदारी म्हणून नाही, तर राष्ट्रीय संपत्ती म्हणून असेल, हे नक्की.
शेवटी नार्वेकर सर लिहितात, की ‘हे जग निसर्गाने आधीच आपल्यासाठी नखशिखांत सुंदर करून ठेवले आहे. ते अधिक सुंदर आणि बहुपयोगी बनविण्याची जबाबदारी आपण माणसांनीच सदासर्वकाळ पार पाडली पाहिजे. वृद्धापकाळही याला अपवाद नाही. वयाच्या या वळणावरील शरद ऋतूत स्वतःच्या क्षमतेनुसार वृद्धांनीही हे जग अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न कायम ठेवला पाहिजे. आपण आनंदित रहाणे आणि दुसऱ्यांना आनंद देणे यासारखा आनंद दुसरा कशातच नाही…’ पटतंय ना!
– अश्विनी सुर्वे.
पुस्तक ऑनलाइन कुठे विकत मिळेल याबद्दल साशंक आहे. म्हणून सोबत पुस्तकाची महत्वाची माहिती सुद्धा देत आहे.
लेखक – राधाकृष्ण नार्वेकर, प्रभादेवी, मुंबई.
प्रकाशक – सिध्दार्थ प्रकाशन, परळ, मुंबई, दूरध्वनी – ४१५ ५३ ८२.
प्रथम आवृत्ती – २ जून २००२.
मुखपृष्ठ – अभिजित प्रधान, ओरिजीन स्टुडियो, परळ, मुंबई – ४०० ०१२.
Leave a Reply