Kahani Londonchya Aajibaichi pustak olakh

कहाणी लंडनच्या आजीबाईंची – सरोजिनी वैद्य

 

विद्या बालनच्या ‘शकुंतलादेवी’ सिनेमामध्ये शकुंतलादेवी जेव्हा पहिल्यांदा लंडनला जातात तेव्हा त्या तेथील एका गेस्ट-हाऊस/लॉजिंग-बोर्डिंग मध्ये काही दिवस राहिलेल्या दाखवलंय. त्या बोर्डिंगच्या मालक एक नऊवारी नेसलेल्या मध्यमवयीन महाराष्ट्रीय महिला आहेत, हे बघून मला खुप आश्चर्य वाटलेलं. म्हणजे लंडनसारख्या शहरात इतक्या जुन्या काळात एका मराठी महिलेच्या मालकीचं लॉजिंग-बोर्डिंग असणं आश्चर्य वाटण्यासारखंच आहे ना! एका दृश्यात नऊवारीवर फॉरेनर्ससारखा मोठा कोट घालून त्या घराबाहेर पडतात ते खूपच सही वाटलेलं आणि तो सिनेमा पाहिल्यापासून मी त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात होते.

या आजीबाई लंडनला का गेल्या असतील? कशा पोहचल्या असतील? हा व्यवसाय कसा सुरू केला असेल? तिथली भाषा त्यांना येत असेल का? असे अनेक कुतूहलमिश्रित प्रश्न होते. लंडनमधल्या आजीबाईंच्या २५ हूप लेनमधल्या घरी येणारे अनेक पाहुणेदेखील आजीबाईंना असेच प्रश्न विचारायचे.

त्यांना उत्तर देताना आजीबाई म्हणायच्या, ‘अवोs, माणूस काय करतो? देवाच्या मनात असंल तसं होतं सगळं.’ कधी म्हणायच्या, ‘अरे बाबा, केलं म्हणजे सगळं होतं बरं, सsगsळंs होतं. मला लिवता आलं असतं ना तर एक मोsठं बुक, मोठंss बुक लिवलं असतं बघा! पण लिवता कुठं येतंय?

निरक्षर असण्याची खंत पण कधी अडलं नाही

आपल्याला लिहिता-वाचता येत नाही, आपण निरक्षर आहोत त्यामुळे अनेकदा आपली जवळची लोकंच आपला गैरफायदा घेतात, फसवतात यांची आजीबाईंना नेहमीच खंत वाटत राहिली. आजीबाईंना फक्त १ ते १० आकडे मोजता यायचे आणि तेवढ्यावरच दोन हातांची बोटं, गव्हाचे दहा दाणे ,पेन्सिलीने ओढलेल्या आणि खोडलेल्या रेघा अशा रीती वापरून हजारो पौंडांच्या इस्टेटीचा हिशोब त्यांनी नेमकेपणाने बसवलेला असायचा.

भाजी आणायला जेव्हा त्या लंडनमधल्या ट्यूब रेल्वेने जेव्हा जायच्या तेव्हा उतरण्याचं स्टेशन कितवं आहे हे बघायच्या आणि रेल्वेमध्ये बसल्यावर एक स्टेशन गेलं की जवळच्या कागदावर पेन्सिलने रेघ ओढायच्या आणि आपलं स्टेशन जवळ आलं की बोचकं घेऊन दाराशी उभ्या राहायच्या. तिथल्या दुकानदारांसोबतही त्यांचे इतके चांगले संबंध झालेले की एकदा एक दुकानदार आजीबाईंच्या मुलीला म्हंटलेला, ‘I wish I had a mother like you.’

तशी त्यांना भाषेचीही फार कधी अडचण नाही आली. त्यांच्या निरीक्षणशक्ती आणि स्मरणशक्तीच्या जोरावर त्या वऱ्हाडी, खानदेशी, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि नवीन नवीन ऐकलेल्या शब्दांची सरमिसळ करायच्या आणि त्यांची वेगळीच भाषा तयार व्हायची. ही भाषा त्यांच्या भागातील ज्यू आणि इंग्रज दुकानदारांना मात्र नेमकी कळायची.

कष्टावर अपार विश्वास

आजीबाईंचा कष्टावर फार विश्वास होता. त्या त्यांच्या मुलींना नेहमी सांगायच्या की, ‘कष्टानं कुssणी मरत नसतं! माणसाने खूप कष्ट करून, खूप सोसून, स्वतःला गरिबीतून सोडवलं पाहिजे.’

आजीबाईंच्या वृत्तीनं आणि व्यक्तीमत्वानं त्यांच्या व्यवसायाला व्रताचं वेगळं रूप दिलं, वेगळी उंची दिली. कष्टाच्या जोरावर त्यांनी खूप संपत्ती कमावली आणि खर्चही केली. त्यांच्या लंडनमधल्या घरी कितीतरी मोठमोठ्या लोकांनी, लेखकांनी, गायकांनी, चित्रपट कलाकारांनी, राजकारण्यांनी, साधूपुरुषांनी, भारत व लंडनमधल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रेमाने,कौतुकाने भेट दिली आणि आजीबाईंसोबत, त्या घरासोबत त्यांचे ऋणानुबंध कायमचे जोडले गेले. ते घर त्यांना त्यांच्या हक्काचं वाटायचं. लंडनच्या स्टेशनवर उतरून कोणीही ‘आजीबाई बनारसे’ एवढ्याच पत्यावर बरोबर आजीबाईंच्या घरी पोहोचायचं.

युरोप मधील पहिलं देऊळ

आजीबाईंनी लंडनमध्ये आणि स्वतःच्या गावासाठी जेवढं काम केलं, जे घडवलं तेवढं त्या काळात परदेशात येऊन श्रीमंत झालेल्या कदाचित कोणीच केलं नसेल. लंडनसारख्या महागड्या ठिकाणी भारतीयांसाठी आजीबाईंनी जे सांस्कृतिक व शैक्षणिक सहाय्य केलं त्याचा सर्वांनीच गौरव केला.

फक्त लंडनमधलंचं नाही तर युरोपमधलं पहिलं देऊळ आजीबाईंनी स्थापन केलं. या साईबाबांच्या मंदिराला आणि आजीबाईंच्या घरातील गणेशोत्सवाला भेट द्यायला भारत व लंडनमधील अनेक प्रसिद्ध व्यक्ती आवर्जून हजेरी लावायच्या. त्या लंडनच्या ‘महाराष्ट्र मंडळा’च्या काही काळ अध्यक्ष होत्या आणि त्यांनी इतक्या उत्साहाने कार्यक्रम केले की भारतातील व लंडनमधील वर्तमानपत्रातही त्यावर कौतुकाने लिहिलं जायचं. काहीकाळाने तर ‘जिथे आजी तिथे मंडळ’, असं लोकं बोलायला लागलेले.

सरोजिनी वैद्यांचं ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ हे पुस्तक मी सोशल मीडियावर पाहिलेलं; आणि ‘शकुंतलादेवी’ सिनेमातील आजीबाई याच असतील असं वाटत होतं पण सिनेमात त्या मालकीणबाईंचं नाव ताराबाई दाखवलंय त्यामुळे या पुस्तकातील आज्जी नेमक्या त्याच आहेत का, हे कळत नव्हतं. लॉकडाऊनमुळे खूप प्रयत्न करूनही 2 महिने पुस्तकंही कुठेचं मिळत नव्हतं पण नुकतंच ‘मॅजेस्टिक’ मध्ये हे पुस्तक मिळालं आणि अधाशासारखं वाचून काढलं.

या निरक्षर पण कष्टांच्या जोरावर शून्यातुन जग निर्माण करणाऱ्या, स्वबळावर परदेशात अनेक घरं घेणाऱ्या, तिथली एक प्रसिद्ध आणि महत्वाची व्यक्ती होणाऱ्या, परदेशात आपल्या संस्कृतीचं जतन करणाऱ्या, कित्येकांचे संसार बसवणाऱ्या, अनेकांची आई-आज्जी होणाऱ्या, लंडनच्या मऱ्हाटमोळ्या आजीबाईंची ही कहाणी प्रचंड प्रेरणादायी आणि अवाक् करणारी आहे.

आजीबाईंचा सुरुवातीचा काळ

खरंतर आजीबाईंचं नाव राधाबाई. पण लंडनला गेल्यावर त्या आजीबाई बनारसे म्हणून ओळखल्या गेल्या आणि त्याच नावाने सर्वांच्या ओळखीच्या, जिव्हाळ्याचा झाल्या. स्वतः आजीबाईदेखील त्यांच्या मूळ नावाचा इतका विसर पडत गेला, की टेलिफोनला उत्तर देताना त्या ‘हांsम्या आजी बोलून राह्यलेय’ असंच म्हणायच्या.

विदर्भातील चौंडी या छोट्याशा खेडेगावात १९१० साली राधाबाईंचा जन्म झाला. पाच भावंडांमध्ये त्या दुसऱ्या. १० वर्षांच्या असतानाच प्लेगच्या साथीमध्ये त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आणि राधाबाईंचा बालपणीचा सुखाचा काळ संपला. पण खूप कष्ट करत, आत्या आणि 2 वर्ष मोठा असलेल्या भावाच्या मदतीने राधाबाईंनी इतक्या लहान वयातच एखाद्या मोठ्या बाईसारखी घराची जबाबदारी लिलया पेलली. राधाबाईंना भावंडांना सांभाळायचं होतं, लग्न करायचं नव्हतं पण त्यावेळच्या काळानुसार १३-१४ वर्ष म्हणजे खूप थोराड मानलं जायचं. यवतमाळच्या ३० वर्ष वयाच्या आणि हे चौथ लग्न असलेल्या तुळशीराम डेहेणकरांशी त्यांचं लग्न झालं. कष्टाने इथेही त्यांची पाठ सोडली नाहीच उलट त्यात सासूच्या त्रासाची अजून भरच पडली. पाचही मुलीच झाल्यामुळे होणारी अवहेलना, नवऱ्याच्या आजारपणामुळे आणि नंतर मृत्यूमुळे राधाबाई आणि त्यांच्या मुलींना खायलाही मिळत नाही, हक्काचं घर नाही अशी अवस्था झाली. त्याही परिस्थितीत त्यांनी ३ मुलींची लग्न लावून दिली व छोटी छोटी कामं करत दोन मुलींसोबत घर चालवत होत्या. पण परिस्थितीमुळे पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी राधाबाईंना मूळच्या अमरावतीच्या व वारकरी असलेल्या आबाजी बनारसे यांच्यासोबत दुसरे लग्न करावे लागले. त्यावेळी त्या ३५ वर्षांच्या होत्या.

आजीबाई लंडनला पोहोचल्या

आणि याच आबाजी बनारसेंसोबत राधाबाई लंडनला गेल्या. इथेही त्यांची फसवणूकचं झाली आणि कष्टाने पाठ सोडलेली नव्हतीच. मुलांसोबत परदेशात स्थायिक झालेले आबाजी पंढरपूरचं दर्शन करायला म्हणून भारतभेटीवर आले पण त्यांचा खरा उद्देश दुसरं लग्न करण्याचा होता. त्यांचं मन मुलांच्या संसारात रमत नव्हतं. आयुष्याच्या शेवटी काळजी घ्यायला त्यांना बायको हवी होती आणि त्यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलांना न कळवता राधाबाईंसोबत लग्न केलं. त्यांच्या दोन लहान मुलींची जबाबदारी घेऊन त्यांना लंडनला नेण्याचं आबाजींनी कबूल केलं खरं, पण कधीच ते प्रत्यक्षात आणलं नाही. काही काळ या मुलींच्या संगोपनासाठी त्यांनी पैसा पुरवला, मात्र ते सुद्धा नंतर बंद केलं. राधाबाईंनी मात्र ‘लंडनला आल्यामुळेच इतकी प्रगती करू शकले, परिस्थिती बदलू शकले’ याची जाण ठेवली आणि त्या शेवटपर्यंत आबाजींच्या ऋणी राहिल्या.

या आबाजींना ३ मुले होती. त्यातील मोठा मुलगा विठ्ठल राधाबाईंपेक्षा काही वर्षेच लहान होता. आबाजींना नातवंड होती आणि ती राधाबाईंना आज्जी म्हणत त्यामुळे तिकडे सगळे लहान-थोर त्यांना आजीबाई म्हणूनच ओळखायला लागले आणि तेच नाव कायम झालं.

सावत्र मुलगा विठ्ठलची कहाणी

खरंतर, या विठ्ठलनेही शून्यातुन जग निर्माण केलं. लंडनला येणारा बनारसे कुटुंबातील तो पहिलाच व्यक्ती. तिथे स्वतःच बस्तान बसवल्यावर त्याने आपल्या भावांना, वडिलांना आणि अनेक नातेवाईकांना बोलवून घेतलं आणि सर्वांना स्वतंत्रपणे किंवा स्वतःकडेच छोटे मोठे उद्योग, नोकऱ्या करायला मदत केली. विठ्ठलने स्वतःभोवती एक स्वजातीय समाजच निर्माण केला होता. त्याने आणि त्याच्या भावांनी कितीतरी उद्योगधंदे सुरू केले आणि इतका पैसा कमावला की तो चक्क त्यांना कपाटात कोंबून ठेवायला लागत असे आणि मोजायलाही वेळ नसे. या विठ्ठलचा प्रवास देखील पुस्तकात खूप सुंदररित्या मांडलाय आणि तोदेखील खूप प्रेरणादायी आहे. पण विठ्ठल शिकलेला होता आणि यशस्वी व्हायचं, पैसा कमवायचा असं  उद्दिष्ट ठरवून तो लंडनला आलेला.

लंडन देश आहे की गाव?

आजीबाई मात्र इच्छेविरुद्ध लंडनला आलेल्या. आपण इंग्लडला जातोय की लंडनला, लंडन देशाचं नाव आहे की गावाचं, सातासमुद्रापार म्हणजे काय, आपण नक्की किती दूर आलोय हे असलं काहीही त्यांना माहीत नव्हतं. त्या देशाचा राजा आपल्यावर राज्य करतो मग त्या देशात पोटाची खळगी भरायला का जायचं?, तिकडे आपलं धर्मांतर केलं तर?, त्यांची भाषा आपल्याला येत नाही मग बोलायचं कोणासोबत असे अनेक प्रश्न त्यांना पडायचे. पण मुलींच्या भवितव्यासाठी, त्यांना चांगलं खायला मिळावं, डोक्यावर हक्काचं घर असावं म्हणून त्या आबाजींसोबत लंडनला गेल्या.

लंडनमधील कष्ट

आबाजींनी राधाबाईंशी केलेले लग्न त्यांच्या मुलांना मान्य नव्हतेच पण घरकामाला मदत होईल म्हणून त्यांनी राधाबाईंना ठेवून घेतले आणि अगदी मोलकरणीसारख्याच त्या पुढची चार वर्ष आपल्या सावत्र मुलांकडे राहिल्या. आबाजींच्या सुनांनीदेखील भारतातून येणाऱ्या लोकांसाठी जेवण्या-राहण्याची सोय करण्याचा व्यवसाय सुरू केलेला. या मेसमध्ये आजीबाई पडेल ते काम करू लागल्या. आपल्या मुलींना आबाजी लंडनला आणतील, त्या शिकतील, त्यांची प्रगती होईल या आशेवर त्या होत्या. त्या मेसमध्ये फक्त आजीबाईंमुळे येणारे अनेकजण होते. यातील काहींनीच आजीबाईंना पुढे स्वतःचं गेस्टहाऊस सुरू करायला मदत केली. खरंतर आजीबाईंच्या स्वभावामुळे कोणाला ते गेस्ट हाऊस वाटायचंच नाही. स्वतःच्या घरासारखंच हे ‘आजीबाईंचं घर’ सर्वांना वाटायचं.

लंडनला पोहोचल्यावर 3 वर्षातच आबाजींचा आजारपणामुळे मृत्यू झाला आणि त्यांच्या मुलांनी आजीबाईंना फसवून आबाजींनी सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली आणि आजीबाईंना परत भारतात पाठविण्याची तयारी सुरू केली. खरंतर आबाजींच्या संपत्तीवर आजीबाईंना स्वतःचा हक्क वाटत नव्हता पण इथेच राहून मुलींची व आपली प्रगती होऊ शकते हे त्यांना उमगलेलं. म्हणून त्यांनी आपल्या सुनांना आर्जव करून आपल्या मुलींना लंडनला आणण्याची विनंती केली.

स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात

आजीबाईंच्या २ मुली लंडनला आल्यावर आजीबाई सावत्र मुलांकडेच पडेल ते काम करत राहत होत्या. पण पुढे जाऊन या मुलींच्या लग्नाची जबाबदारी भाऊ म्हणून आपल्यावर येईल असा विचार करून पुन्हा आजीबाईंच्या मुलांनी त्यांना भारतात पाठवण्याची तयारी सुरू केली.

यावेळी मात्र आजीबाईंनी ठामपणे स्वतःच्या बळावर स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि त्यातूनच ‘२५ हूप लेन’मधल्या जेवणा-राहण्याची सोय होणाऱ्या लॉजिंग-बोर्डिंगच्या व्यवसायाची सुरुवात झाली.

एका निरक्षर अडाणी बाईला एका परक्या देशात, ज्या देशाची भाषाही तिला येत नाही तिथे स्वतःचा व्यवसाय करणं सोप्प गेलं असेल का? नक्कीच नाही. पण हा पुढचा प्रवास पुस्तकातूनच वाचणंच एक प्रेरणादायी आणि अविस्मरणीय अनुभव ठरेल.

सरोजिनी वैद्यांनी आजीबाईंचा हा प्रवास इतका रंजकतेने उतरवला आहे, की वाचताना तो अगदी चित्ररुपात समोर उभा राहतो.

मागचे दिवस उकरून काढून झाल्या गेल्याबद्दल दुःख करायचं हा आजीबाईंचा स्वभाव नव्हता. त्या नेहमी म्हणायच्या, की ‘आपण अपेक्षा ठेवून काही केलं नाही तर दुःखही होत नाही.’

आज्जीबाईंची ही कहाणी एखाद्या सिनेमाला साजेल अशीच आहे. त्यांच्या प्रवासातले अनेक अनुभव आपल्यालाही फार शिकवणारे आहेत. त्या काळातील भारतातील खेड्यांची स्थिती, लंडनमधील दुसऱ्या महायुद्धादरम्यानची स्थिती अशा अनेक गोष्टींबद्दलही पुस्तकात बरीच माहिती मिळते.

शेवटी मलाही माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं. शकुंतलादेवी १४-१५ वर्षांच्या असताना लंडनला गेल्या तेव्हा आजीबाईंनी त्यांची स्वतःच्या मुलीसारखी काळजी घेतली. त्यांना आजूबाजूच्या चारजणांची मदत मिळवून दिली. त्या आजीबाईंना ‘मदर’ म्हणायच्या. लेखाच्या शेवटी शकुंतला देवी चित्रपटाचा ट्रेलर दिलाय, त्यात या आजीबाईंची व्यक्तिरेखेची झलक पाहता येईल. 

आजीबाई अशाच अनेकांची मदर, आई, मावशी, बहीण आणि आज्जी झाल्या. रात्री अपरात्री देखील कोणी पाहुणा थंडीने कुडकुडत, बॅगांचं ओझं घेऊन त्यांच्या दरवाजावर आला तर थकून झोपलेल्या आजीबाई तितक्या अवेळी सुद्धा त्याला घरात घेत, गरम जेवण बनवून देत आणि आस्थेने चौकशी करत. पोटासाठी, शिक्षणासाठी पहिल्यांदाच घरापासून, मायदेशापासून दूर आलेल्या अनेकांसाठी आजीबाई आणि त्यांचं घर एक हक्काचं, मायेचं ठिकाण व्हायचं आणि त्या परक्या शहरात पुढची झेप घ्यायला सक्षम करायचं.

या कर्तबगार आजीबाईंच्या कहाणीवर एखादा सिनेमा यावा आणि आजच्या पिढीलाही त्यांची माहिती व्हावी, असं खूप मनापासून वाटतंय. सहजरित्या निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या आजच्या तरुणाईला, स्वबळावर, कष्टाच्या जोरावर शून्यातून कसं जग निर्माण करता येतं याचं उदाहरण आजीबाईंच्या या कहाणीमधून मिळेल, हे नक्की!  साकारणाऱ्या

-अश्विनी सुर्वे. 

सोबत पुस्तक विकत घेण्याची लिंक देत आहे. तुमच्या संपर्कातील कामसू स्त्रियांनी हे वाचावं असं तुम्हाला वाटत असेल तर हे एक खूप छान आणि त्यांच्या आयुष्याला विचारांना आकार देणारं गिफ्ट होऊ शकतं.

सरोजिनी वैद्य यांची इतर पुस्तकं खालील प्रमाणे.

 

Comments

13 responses to “कहाणी लंडनच्या आजीबाईंची – सरोजिनी वैद्य”

  1. […] माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  कहाणी लंडनच्या आजीबाईंची – सरोजिनी वैद्य या निरक्षर पण […]

  2. Rupali Magdum Avatar

    चित्रपट पाहिल्यावर मनात आलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. तसेच पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली.

    1. admin Avatar
      admin

      dhanywad 🙂

  3. राकेश वाणी Avatar

    खूप सुंदर लेखन केले आहे आपण आणि आजी ची कथा खूपच प्रेरणादायी आहे. नक्की यावर चित्रपट होऊ शकतो.

    1. admin Avatar
      admin

      Dhanyawad 🙂

  4. Sona lengre Avatar

    Chan mahiti dhilit
    Khup chan

    1. admin Avatar
      admin

      Dhanyawad 🙂

  5. Krishna Jadhav Avatar

    छान शब्दांकन. आपले कौतुक व वाचायला चांगले पुस्तक सुचवल्याबद्दल आभार.

    1. admin Avatar
      admin

      Dhanyawad 🙂

  6. Yugandhara Patil Avatar

    छान पुस्तक आहे आणि तुमचं विवेचन पण खूप सुंदर. बनारसे आजीबाईंचा प्रेरणादायी प्रवास तर आपल्याला ही प्रेरणा देतो.

    1. admin Avatar
      admin

      Dhanyawad 🙂

  7. शीतल निकम Avatar

    खुप सुंदर पुस्तक… तुम्ही अगदी छान विवेचन केले आहे👌👌लंडनच्या आजीबाईंची कहाणी खरंच चित्रपटाला साजेशी आहे.

    1. admin Avatar
      admin

      Dhanyawad 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *