mandeshi mansa by vyankatesh madagulkar

‘माणदेशी माणसां’ची अस्सल मराठी शब्दचित्रं

माणदेशी माणसं हा व्यंकटेश माडगूळकरांचा सर्वात पहिला कथासंग्रह. माणदेशातल्या साध्या, सरळ आणि कष्टकरी माणसांची ही शब्दचित्र इतकी हुबेहूब आणि सुंदररित्या रंगवली आहेत, की वाचताना ती आपल्यासमोर उभी राहतात. अगदी आजही.

मला आवडलेला ‘झेल्या’ बघा.

‘बटन नसलेल्या कुडत्याला एक हातानं गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच. वयानंही फारसा नसावा. तेरा-चौदा एवढा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी. अंगात कसले कसले डाग पडलेलं, मळलेलं, बाहीवर ठिगळ लावलेलं हातमागाच्या कापडाचं कुडतं; त्याला शोभेलशीच तांबड्या रंगाची चौकडी असलेली गादीपाटाची चड्डी! तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले. त्यांत बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात.’

आधीच्या मारकुट्या मास्तरांनी हिरवेनिळे वळ उटेपर्यंत मारल्यामुळे शाळेकडे न फिरकणारा व नवीन मास्तरांच्या प्रेमळ वागणुकीवर खुश होऊन नियमित शाळेत येणारा आणि त्यांना जीव लावणारा झेल्या किती सुंदर रेखाटला आहे.

माडगूळकरांनी फक्त मानवी स्वभाव नाहीतर त्याकाळची सामाजिक परिस्थिती देखील उत्तम प्रकारे रेखाटली आहे. ती वाचताना कधी हसायला येतं, कधी राग येतो; तर कधी अजूनही परिस्थिती बदलली पण प्रवृत्ती तशीच आहे, याचं वाईटंही वाटतं.

या माणदेशी माणसांची भाषा, राहणीमान, परिस्थितीचा बाऊ न करता तिला सामोरं जाणं, प्रामाणिकपणे कष्ट करणं आणि जगण्याची उमेद कायम ठेवणं अशा कितीतरी गोष्टींमुळे या व्यक्तिरेखा इतक्या वर्षानंतरही आपल्याला आकर्षित करतात.

शनिवार रविवार घरी जाऊन आठवड्याभरासाठी भाकरी घेऊन येणाऱ्या ‘नामा’ मास्तराबद्दल लेखक लिहितात, की “खाण्यापिण्याचे हाल होतात म्हणून कुरकुरायला नामा पांढरपेशा थोडीच होता! जेवणाचे जास्त चोचले करायचे त्याला माहित नसावं.”

किंवा एकटीच राहणारी, कुंकू-दातवण विकून जगणारी, कधी पडले तर तांब्याभर पाणी द्यायला कोणी नाही असं सांगणारी  तांबोळ्याची ‘खाला’ ही म्हातारी लेखकाला सांगते की, “अरे गोडीगुलाबिने राहावं. चार माणसं आपली करावीत. भलेपणा मिळवावा. दुसरं काय मिळवायचं हतं?”

परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडून गेलेल्या बायकोबद्दल, “मी न्हाई केली वासपूस! आपल्याजवळ ऱ्हान्याची तिची जर विच्छा न्हाई, तर कशाला जोरा करायचा? जाऊदेल म्हणालो, कुटंबी सुकात असली म्हंजे झालं!” असं बोलणारा आणि शिक्षण नसल्याने आपली ही स्थिती आहे हे जाणून भाच्याला खूप शिकवण्यासाठी कष्ट करणारा रामा मैलकुली.

आपल्या पुतण्याला नवीन कोट, खाऊ देण्यासाठी, त्याला एकदा बघण्यासाठी; साठ ते पासष्ट मैलांचे अंतर पायी तुडवून आलेले आणि भेट झाल्यावर पुन्हा आले तसे परत चालत नोकरीवर रुजू होण्यासाठी गेलेल्या बिटाकाकांचं प्रेम पाहून खरंच आश्चर्य वाटतं.

तालुक्यात देवीची साथ आल्यामुळे मुलाला लस टोचण्याचा पत्र पाठवून आग्रह करणारे देशपांडे मास्तर आणि त्यांना ‘मी, माझा बाप, माझा आजा कोणीही टोचून घेतले नाही तरी आमच्यापैकी कुणीही साथीच्या रोगाने मेले नाही. सबब, माझा मुलगाही मरणार नाही. मी त्याचा बाप तो जास्त कसा जगेल हे बघीन. तुम्ही फक्त त्याला चार अक्षरे शिकवण्याचे करा.” असं सांगणारे वडील. या दोघांमध्ये शाळा सुटेल या भीतीने अडकलेला मुलगा आणि “शाळा शिकायची, तर सगळं सोसलं पाहिजे बाबा. मास्तर म्हणतात ते केलं पाहिजे.” असं म्हणत लस टोचायला नेणारी अशिक्षित आई.

वरवर पाहता या व्यक्तिरेखा गरिबीने वेढलेल्या आणि दारिद्र्याने पिचलेल्या वाटतात पण जगण्याचं साधं सोप्प तत्वज्ञान आपल्याला शिकवतात आणि जगण्याची उमेद देतात.

१९४९ साली या पुस्तकाची प्रथम आवृत्ती निघाली. स्वातंत्र्यानंतर मराठी साहित्यात जे अक्षर-ग्रंथ निर्माण झाले, त्यात ‘माणदेशी माणसं’चा समावेश होतो. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. मला तर हे वाचून आश्चर्य वाटलेलं, की हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा माडगूळकर फक्त २१-२२ वर्षांचे होते. तसं कल्पकतेला वयाचं बंधन नसतंच पण व्यंकटेश माडगूळकरांच फारसं शिक्षण नसतानाही त्या वयातील प्रतिभा, कल्पनाशक्ती , निरीक्षणशक्ती खरंच अवाक् करणारीच आहे. आणि या प्रतिभेतूनच आकाराला आलेल्या या १६ व्यक्तिरेखा. एकदातरी नक्की वाचा त्यांना. त्यांच्या दुःखामुळे थोडंस अस्वस्थ व्हाल. पण कधी निराश असताना त्यातील कोणीतरी एक आठवेल, तुमच्या चांगल्या परिस्थितीची जाण करून देईल आणि पुढे जायला प्रेरणा देईल.

अश्विनी सुर्वे. 

पुस्तकाची लिंक इथे देत आहे. नक्की वाचा!

व्यंकटेश माडगूळकर यांची इतर पुस्तकं खालील प्रमाणे

 

Comments

9 responses to “‘माणदेशी माणसां’ची अस्सल मराठी शब्दचित्रं”

  1. Nikhil Alka Kulkarni Avatar

    उत्तम लेखन आता परत वाचायला घ्यावं वाटतंय😊

  2. Charusheela Agashe Avatar

    परीक्षण छानच , जरुर वाचेन , कथासंग्रह आहे ना

    1. admin Avatar
      admin

      धन्नयवाद
      नक्कीच …
      होय व्यक्तिचित्र आहेत ही..

  3. Atul Chitte Avatar

    मी माडगूळकरांनीच लिहीलेली बनगरवाडी ही कादंबरी वाचली होती , आणि त्यांची इतर पुस्तके वाचायची इच्छा होती , आहे पण त्यांची इतर पुस्तके बनगरवाडी सारखीच ग्रामीण जीवनावर आहेत की नाही याबद्दल शंका होती ,
    आपण पोस्ट केलेले पुस्तक मी पाहिले होते ,पण ते कसे आहे हे माहीत नव्हते …!

    पण आपण वरील पुस्तकाचे इतके सुंदर वर्णन केले की , आता हे पुस्तक मी वाचायलाच नव्हे माझ्या संग्रहीसुध्दा असायला हवे असे वाटतंय …….!

    म्हणून आपण असेच उत्कृष्टपणे पुस्तकांचे वर्णन( समीक्षण ) करून , आम्हाला माहिती देत रहावी …….!

    आपणास शुभेच्छा आणि धन्यवाद !

    1. admin Avatar
      admin

      धन्यवाद अतुल
      या लेखाचा तुम्हाला फायदा होत आहे त्या बद्दल आनंदच आहे..
      आम्हीअसे लेख इथे वेळोवेळी पोस्ट करत राहू.
      कुठल्या पुस्तकाबद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला तुम्ही whatsapp क्रमांकावर संपर्क करू शकता.
      लोभ असावा 🙂

  4. Anuradha kulkarni Avatar

    सुंदर लिहिलंय. माणदेशी माणसं, गावाकडच्या गोष्टी, बाजार, वारी असे सर्वच कथासंग्रह बेष्ट आहेत

    1. admin Avatar
      admin

      धन्यवाद 🙂

  5. Anuradha Shinde Avatar

    सुंदर लिहिलंय. माणदेशी माणसं, गावाकडच्या गोष्टी, बाजार, वारी असे सर्वच कथासंग्रह बेष्ट आहेत

    1. admin Avatar
      admin

      Dhanyawad 🙏😇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *