ti phularani pustak olakh Yashwant ho blog

ती फुलराणी

पुलंच्या ‘ती फुलराणी’ या नाटकाचा किंवा पुस्तकाचा विषय निघाला, आणि तुम्ही ते नाटक पाहिलं असेल-नसेल, पुस्तक वाचलं असेल-नसेल तरी मंजुळेचं पुढील स्वगत तुम्ही एकदातरी नक्कीच ऐकलं असेल.

 

‘असं काय मास्तरसाहेब? गधडी काय? नालायक, हरामजादी? थांब….
थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा!
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर
तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वांडात घालीन शान
तुजा क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा!
तुला शिकवीन चांगलाच धडा! ‘

पुलंनी हे इतकं अफलातून लिहिलंय ना, की अगदी मंजुळेसारखं ते त्याच ठसक्यात बोलावसं वाटतं. पूर्ण फुलराणीचं नाटक तर अनेक महाविद्यालयांमध्ये अजूनही बसवलं जातंच पण फक्त या एका मोनोलॉगचे कितीतरी शाळा, महाविद्यालयांमध्ये अनेक प्रयोग झाले असतील. मी शाळेमध्ये असताना हे पुस्तक वाचलं होतं आणि या मोनोलॉगमुळे ते प्रचंड आवडलं होतं. तेव्हा पुस्तकातील इतर कोणत्या गोष्टींवर फारसं लक्ष दिलं नव्हतं. फक्त एका नाटकाची कथा एवढाच विचार करून वाचलेलं.

पण आता लॉकडाऊनमध्ये पुलंचा ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ हा सिनेमा पाहिला आणि त्यातील ‘ती फुलराणी’च्या उल्लेखामुळे हे पुस्तक पुन्हा वाचावंसं वाटलं. आता नव्याने वाचताना यातल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी, भाषेविषयीचे बारकावे यांनी लक्ष वेधून घेतलं.

एका गरीब साध्या फुलं विकणाऱ्या आणि अशुद्ध बोलणाऱ्या फुटपाथवरच्या फुलवालीला भाषेच्या जोरावर राजघराण्यातील फुलराणी बनवू शकेन अशी पैज भाषाशास्त्र आणि उच्चारशास्त्र यांचा अभ्यास करणारे प्रो. अशोक जहागीरदार घेतात आणि मंजुळेची मंजू बनवतात असा या नाटकाचा प्रवास.

यामधून दिसणारं पुलंचं भाषाशास्त्राविषयीचं ज्ञान खरंच अचंबित करणारं आहे. पहिल्या अंकात प्रो. अशोक जहागीरदार आपल्या वहीत बस स्टॉप वरील लोकांच्या संवादाचे टिपण घेत असतात आणि ते नक्की काय लिहीत आहेत, असे इतर लोकं विचारतात. तेव्हा प्रो. अशोक त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून कोण मालवणचा, कोण कऱ्हाडचा, कोण धारवाडचा, कोण अगदी पुण्यातल्या सदाशिव किंवा नारायण पेठेचा किंवा ‘असं झालंय’ मधल्या लांबवलेल्या ‘असं’ वरून मुक्काम आंग्रेवाडी, शिक्षण सेंट कोलंबिया युनिव्हर्सिटी असं ठामपणे सांगतात, तेव्हा आपणच आश्चर्यचकित होतो. आणि ज्या पद्धतीने ते ओळखलं आहे, त्याची मांडणी तसेच पाण्याला ‘पाणी’ म्हणणारा माणूस ‘पानी’ म्हणणाऱ्या माणसापेक्षा स्वतःला वरचा समजतो यांसारख्या संवादातून व ‘विश्वाच्या अंगणात मुक्तमनाने विहरत| होते स्वर बारा ‘ या नांदीमधून आपलाही भाषावैविध्याचा थोडाफार अभ्यास होतो.

बोलण्याची भाषा, शब्दांचे उच्चार, त्यांतले हेलकावे, लकबी, विविध भागांतील लोकांच्या भाषेमध्ये आढळून येणारी जातीय, प्रांतीय, ग्रामीण,नागरी वैशिष्ट्ये टिपत राहणे या छंदामुळे जॉर्ज बर्नार्ड शॉचे ‘पिग्मॅलिअन’ वाचत असताना त्यातल्या पात्रांच्या संवादाची मराठी रूपे पुलंना दिसायला लागली आणि हे नाटक मराठीत आणावे असे त्यांना वाटत होते. पुलंनी स्वतः जरी ‘ती फुलराणी’ला ‘पिग्मॅलिअन’चे रूपांतर म्हंटले असले तरी ते फक्त रूपांतर वाटत नाही.

‘ती फुलराणी’ मध्ये मूळ कथानक जरी शॉचे वाटत असले तरी पुलंनी टिपलेले बारकावे आणि सादरीकरणामुळे हे कथानक मूळचे मराठी मातीतूनच आल्यासारखे वाटते आणि आपण पुलंच्या प्रतिभेने भारावून जातो. ती फुलराणी हे फक्त भाषेचे वैविध्य दाखवणारे नाटक नाही तर एखाद्यासोबत फक्त त्याच्या भाषेप्रमाणे नाही, तर व्यक्ती म्हणून आदर देत माणुसकीने वागायला हवे हे सांगणारं नाटक आहे.

मंजुळा जेव्हा विसूभाऊंना बोलते, की ‘माझं खरं शिक्षण तेव्हा सुरू झालं जेव्हा माझ्यासारख्या फूटपायरीवरच्या बाईला तुम्ही ‘मंजुळाबाई’ म्हणालात. त्या घटकेला मला पहिल्यांदा कळलं, की मीसुद्धा कुणीतरी आहे. एखादी अडाणीबाई आणि बाईसाहेब, यांच्यातला फरक, ती बाई वागते कशी, यापेक्षा आपण तिला वागवतो कसं ह्यात आहे.’ यावेळी आपल्याला जाणवतं की शब्दांच्या शुद्ध-अशुद्ध उच्चारांवर कोणी मोठा किंवा लहान ठरत नाही.

सुरुवातीलाच नांदी मध्ये पुलंनी सांगितलंय की वाणीची उपासना करा… जो वाणीला ब्रह्म समजून उपासना करतो, तो वाणीच्या साम्राज्यात स्वतंत्र होतो… पण जो फक्त वाणीलाच ब्रह्म समजतो तो एखाद्या वेळी ब्रह्मघोटाळ्यातही सापडतो. अशा एका ब्रह्मघोटाळ्यात सापडलेल्या एक भाषापंडिताबद्दलचं ‘ती फुलराणी’ हे नाटक. खूप सुंदर आहे. जमलं तर नक्की वाचा.

-अश्विनी सुर्वे. 

पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.

 

पु. ल. देशपांडे यांची इतर पुस्तक खालील प्रमाणे

 

 

 

Comments

One response to “ती फुलराणी”

  1. Shweta Avatar
    Shweta

    Massth ch lihla ahe👌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *