‘आज पण चार चपात्या!
चंदूअण्णा, तुम्हाला नको बोललो ना!
मी बनवतो की काहीतरी!
कशाला उगाच वैनीला त्रास!’
‘आरं, गप की बाबा!
कसला तरास त्यात!
ते काय जास्त हाय व्हय!
चार चपात्या अन इतकुशी भाजी.
तिला काय जड नाय जात!’
‘आव्हो पण…’
‘आरं बाबा, तिला नाय कसला तरास!
ती सोताच मनापासनं दिती डबा.
खा आता पटदिशी.
कामं राहिल्यात!’
हे आता रोजचंच झालंय.
२ महिने झाले.
चंदू न चुकता डब्बा आणतो.
परश्यासाठी.
चंदू अन त्याची बायको.
खूप प्रेमानं डबा देतात.
पण परश्याला अवघडल्यासारखं होतं.
म्हणतो, ‘कशाला उगाच त्यांना ओझं?’
चंदूअण्णा नुसता हसतो मग.
चंदू अन परश्या.
एकाच गावातले.
वाडीत जवळजवळ घरं.
पक्की मैत्री दोघांत.
तसं वयात बरंच अंतर.
अण्णा १०-१२ वर्ष तरी मोठा.
पण गावात बरीच वर्षे एकत्र.
जुळतात त्यांचे सूर चांगले.
परश्याचे आई-वडील.
अण्णाचे दैवत.
त्यांच्यामुळे तर तो जगला.
मुंबईला आला.
कामधंद्याला लागला.
एक वर्ष झालं असेल.
परश्याचे आई-वडील गेले.
एका पाठोपाठ.
आजारी होते.
बरंच कर्ज झालं दवाखान्यात.
त्यांच्यामागे हे दोघं भाऊ.
आणि दोन बहिणी.
बहिणी सासरी सुखात.
थोरल्याचा पण संसार गावी.
त्याने सांगितलं परश्याला.
‘आता तुझं तू बघ.
मला फार काई नाय जमणार.’
बरोबरच आहे की.
त्याचं कुटुंब, तीन मुलं.
आधीच कर्ज.
कुठवर पोसणार परश्याला?
तेव्हा अण्णा त्याला घेऊन आला.
इकडेच. मुंबईत.
राहण्याची सोय केली.
आमच्या इथे लावला कामाला.
टेम्पररीच आहे.
पण परश्या शिकायला हुशार.
परीक्षा देतोय.
अभ्यास करतोय.
मोठा होईल कोणीतरी.
चार मित्र राहतात एकत्र.
१० बाय १० ची खोली.
सगळेच कष्टकरी.
मेस लावलेली.
कोरोनात बंद झाली.
बाहेर खायचं तर जरा भीती वाटते.
पोरं करतात काही तरी मॅनेज.
पिठलं, भात.
कधीतरी भाकरी, भाजी.
आता भाकरी बनवणारा गावी गेला.
परश्या कुठं जाणार?
तो पुन्हा भातावर.
वाळायला लागलेला पोरगा.
अण्णाला बघवेना.
तो लागला आणायला डबा.
मोठ्या प्रेमानं.
परश्याला कसंतरी वाटतं.
जरा लाजल्यासारखं.
अण्णा म्हणतो,
‘आरं बाबा, तू नको लावू जीवाला!
उपकार न्हाईत हे!
तुझ्या आई-बापानंच करून ठेवलंय.
त्या माऊलीनं जेवाय दिलं.
तुमच्या बाजूला बसवून ताट वाढलं.
तुमच्यातलीच भाकरी दिली.
म्हणून तर जगलो.
नाहीतर नसताच आता आन्ना!
हा डब्बा काय नाय रं त्याच्यापुढं.’
भरून येतं असं काही ऐकलं की.
खरंतर,
“एकवेळ भाऊ मित्रासारखा नसला तरी चालेल.
पण मित्र भावासारखा पाहिजेच.”
काय म्हणता?
आणि तुमचा ‘भाऊ’च तुमचा मित्र असेल,
तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच.
पटतंय का?
या जेवायला!
– अश्विनी सुर्वे
पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.
वाचकांच्या विनंतीवरून मी पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहे त्याची लिंक येथे देत आहे. Click Here.
For Other Products by the same brand Click here
वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य मी वेळो वेळी तुम्हाला सांगत जाईनच.
अश्विनी सुर्वे
अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!
Leave a Reply