घरात सगळ्यांचा फेव्हरेट.
तसं, पोरांना नाही एवढं कौतुक,
पण माझ्या आठवणीतला मोठा हिस्सा.
मुंबईत शिकायला आलो,
तेव्हा कित्येक रात्री वडापाव वरच गेल्या.
लहानपणीसुद्धा.
दर बुधवारी वाट बघायचो.
आई आठवड्याच्या बाजाराला जायची.
घेवडा, उडीद, लसूण विकायला.
तेवढेच चार पैसे जास्तीचे संसाराला.
येताना हमखास वडापाव आणायची.
लिंबाएवढा.
पेपरात गुंडाळलेला.
2 रुपयाचा.
प्रत्येकाला एक.
चार भावंड.
आमचं खाऊन झालं की, आईकडे बघायचो.
ती पण हसायची,
स्वतःच्या वाट्यातला काढून द्यायची.
चौघांना, थोडाथोडा.
आईला कुठे आवडतो वडापाव?
आमची समजूत.
असं बाहेरून काही आणलं,
की हिस्से व्हायचे.
मी नेहमी आईच्या गटात.
मलाच अर्ध्यापेक्षा जास्त मिळणार.
खात्रीच असायची.
आईला चालतं.
तसंही, असलं काही तिला आवडतचं नाही.
आम्हीच आमचं ठरवलेलं.
मागच्या आठवड्यात पोरीनं विचारलं,
‘आज्जी, तुझी फेव्हरेट डिश कोणती?’
वाटलं पूरणपोळीच असणार.
नक्की माहीत नव्हतंच.
आपण कधी विचारलंच नाही.
मी पण कान टवकारले.
“वडापाव”, आईनं लाजतच सांगितलं.
‘कायss! आज्जीला वडापाव आवडतो?’
आज्जी-नात खळखळून हसल्या.
मी मात्र शांत झालो.
सगळं आठवायला लागलं.
गृहीतच धरलं आईला.
ती पण मन मारतच राहिली.
आमची हौस, मौज पुरवताना,
स्वतःची विसरली.
तिला नाही आवडत असले पदार्थ.
का..? कसं ठरवलं आम्ही?
खाऊच्या डिश बाहेर नेताना,
‘तुला राहिलंय का?’
कधी विचारलंच नाही.
‘बायांना कसली आलीय हौसमौज!
पोरांतच त्यांची आवड.’
गावातल्या मोठ्या आज्या बोलायच्या.
आम्ही तेच मानलं.
‘आज्जी, तुला काय आवडतं?’
असं त्यांनाही नाही विचारलं.
काल ऑफिसबाहेर चहाला जमलेलो.
सदया बऱ्याच दिवसांनी भेटला.
महिन्याभरापूर्वी वडील गेले त्याचे.
आठवणीत रमलेला.
कसं वाढवलं, कसं शिकवलं.
भरभरून बोलत होता.
कटिंग दिली तर नको म्हणाला,
‘वडलांना आवडायचा चहा, सोडलाय त्यांच्यासाठी.’
हातातच राहिला ग्लास.
रात्री विचारातच घरी आलो.
नंतर सोडून काय उपयोग?
अजून आपल्या हातात वेळ आहे.
आज गरमागरम बटाटेवड्यांचा बेत.
मीच बनवलेत.
माझ्या आईसाठी.
पाव नाही जमणार एवढयात.
बाहेरचे नको आता तिला या वयात.
म्हणून फक्त बटाटेवडे.
आज माझ्यातल्या जास्तीचा हिस्सा तिला देईन.
लहानपणी ती मला द्यायची तसाच.
पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.
वाचकांच्या विनंतीवरून मी पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहे त्याची लिंक येथे देत आहे. Click Here.
For Other Products by the same brand Click here
वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य मी वेळो वेळी तुम्हाला सांगत जाईनच.
अश्विनी सुर्वे
अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!
Leave a Reply