सकाळची वेळ आणि साडे दहा वाजताची दारावरची डोर बेल हे गणित आता मला नित्यनियमाचं झालं होतं. दरवाजा उघडताच शक्य तेवढ्या दातांचे दर्शन देत एक स्मित (तशी पद्धत आहे म्हणून स्मित) हास्य आमच्या घरात शिरतं. साधारण साठी ओलांडलेलं; सतत टाळी मागणारं आणि आवाजाच्या पट्टीला सतत वरचा सा असलेलं हे व्यक्तिमत्त्व.
‘राणे आजी अहो! बेल वाजवून सोडून देत जा हो!! बेल दाबून धरली म्हणजेच आतल्याला आवाज जातो, असं काही नाही’, अर्थात माझं हे गाऱ्हाणं ऐकण्यासाठी राणे आजी थांबल्या नाहीत. त्यांनी सरळ किचन घाठलं होतं. आईच्या आणि तिच्या गप्पा आटोपून त्या आज वाटीत साखर घेऊन बाहेर आल्या. मी माझ्या मोबाईल मध्ये मान घालून बसलो होतो. दणsss.. करून पाठीत धपाटा बसला आणि मी मान वर करत, पाठ चोळत बोललो..
‘आताच हातात घेतलेला मोबाईल!!..’
‘मेल्या आल्यापासून बघतेय डोकं मोबाईल मध्ये खुपसून बसलास ते! तुम्ही आजकालची पोरं…’ आणि त्यानंतरची 10 मिनीटं मला सवयीची वाक्य कानांवर पडत होती आणि मी निमूटपणे ते ऐकत होतो. माझी ही अवस्था बघून आईला ही स्फुरण आलं!
‘तुम्हीच सांगा राणे आजी, आम्ही कितीही सांगितलं तरी उलट्या घड्यावर पाणी!!’
माझी अवस्था त्या हरणाच्या पिल्ला सारखी झाली होती जे सिहिणींच्या कळपात एकट सापडलं होतं.
मी सरळ शरणागती पत्करली, ‘OKKK!! परत नाही करणार’, म्हणून मी तिथून पळता पाय काढला.
राणे आजींचा मोबाईल हॉल मधेच वाजत होता आणि त्या सोसायटी च्या सर्व अपडेट आईला सांगण्यात बिझी होत्या. ‘फोन कोकलतोय राणे आजी! उचला आधी तो!!’.
पळतच येऊन त्यांनी मोबाईल उचलला, ‘अग बाई! रोहन का ह्या वेळी फोन करतोय?’
रोहन हा त्यांचा एकुलता एक मुलगा जो त्याच्या वडिलांच्या निधनानंतर 2 वर्षांनी कॅनडा ला जाऊन स्थायिक झाला. तुमच्या डोक्यात रोहनची इमेज व्हिलन व्हायच्या आत सांगतो, राणे आजी is Cool about it, की त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना सोडून परदेशी राहतो. ह्या वयात त्यांना एकटेपणा काय असतो हे माहित सुद्धा नाही. असं हे खमकी व्यक्तीमत्व. फोन वर बोलत बोलत राणे आजी बाहेर गेल्या. माझी नजर साखरेच्या वाटीवर गेली, ‘आई!! राणे आजी साखरेची वाटी इथेच विसरल्या.’
‘अरे! मग जावुन दे..’, मी उठलो आणि वाटी उचलून त्यातले साखरेचे दोन दाणे तोंडात टाकत राणे आजींच्या मागावर गेलो. बघतो तर काय, अगदी गंभीर चेहरा करत राणे आजी अजून फोनवरच बोलत होत्या. म्हणून सहज कुतूहल म्हणून मी कान देऊन त्यांच संभाषण चोरून ऐकू लागलो. त्यांनी सुद्धा माझी फोन वरची संभाषणं बऱ्याचदा चोरून ऐकली होती आणि त्याचा उपयोग माझी जमेल तेव्हा खेचण्यात केला होता. मी सुद्धा अशी काही संधी मिळतेय का म्हणून कान देऊन ऐकत होतो.
‘मला जमणार नाही!!’, राणे आजी जवळजवळ ओरडल्याच. ‘तुझी नौकरी, तुझी स्वप्नं!! आता काय तर मुलगी पण तिथलीच बघितलीस. सर्व आनंद आहे. माझा आशीर्वाद आहे पण तो इथून. अजिबात जमणार नाही मला तिथे येऊन राहायला.’
रोहन बहुदा तिला तिथे येऊन राहायला सांगत होता. काळजीपोटी की सोय म्हणून ठाऊक नाही पण राणे आजी रोहन च्या या बोलण्याने बिलकुल नाराज वाटत नव्हत्या. फक्त त्यांचा तिथे जाऊन राहायला विरोध होता.
‘अरे माझा काही सुद्धा विरोध नाही. तू तुझी प्रगती करतोय, स्वतःचे निर्णय स्वतः घेतोय, मला खरंच आनंद आहे आणि हे मी तुला रागवून किंवा मनात काही ठेवून सांगत नाहीये. मन मोकळे पणाने सांगतेय!! माझी अजिबात चिंता करू नको आपण व्हिडीओ चाट वर बोलूच की, सगळं सोपं झालंय आजकाल!!’
त्या दोघांचं संभाषण ऐकून मी स्तब्ध उभा होतो. इतकी मानसिक तयारी तर माझी सुद्धा नसती झाली आणि राणे आजी इतक्या सहज बोलत होत्या. ‘बरं ठेवू.. आणि हो! माझ्या सुनेचा फोटो व्हाट्सएप कर मला. चल बाय!!’ आणि त्या मागे वळल्या, मी कोपऱ्यापासून हात जोडले आणि साष्टांग नमस्कार घालण्यासाठी वाकलो.
‘अरे पाया कसला पडतोय, ही बातमी मला आधी जाऊन सर्वाना सांगू दे.. की मला फॉरेन ची सून येतेय म्हणून!!’ एवढं बोलून त्या भरभर निघून सुद्धा गेल्या आणि त्यांना द्यायला आणलेली साखरेची वाटी माझ्याच हातात राहिली. दोन साखरेचे दाणे पुन्हा तोंडात टाकले, पण चव वेगळीच लागली. कदाचित तिने सुद्धा आपला मूळ गुणधर्म बदलला वाटतं…
त्याचा स्वभाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, त्याचे शब्द वाचले किंवा ऐकले तरी शेखर समजतो.
Leave a Reply