स्वामी विवेकानंद एका ग्रंथालयातून रोज एक पुस्तक आणत आणि रोज ते परत करत. एक दिवस ग्रंथालयातील कर्मचाऱ्याने विचारले, ‘तुम्ही पुस्तक वाचण्यासाठी घेऊन जाता की बघण्यासाठी?’ यावर विवेकानंदांनी उत्तर दिले, की ‘वाचण्यासाठी. तुम्ही मला त्या पुस्तकातलं काहीही विचारा.’ कर्मचाऱ्याने एक पान उघडले आणि त्याचा क्रमांक सांगून विचारले, ‘सांग, त्यावर काय लिहिले आहे?’ आणि विवेकानंदांनी न बघता त्या पानावरील माहिती जशीच्या तशी सांगितली.
स्वामी विवेकानंदांना हे जमायचं ते त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे आणि एकाग्रतेच्या शक्तीमुळे. रवींद्रनाथ टागोर त्यांच्याबद्दल म्हणायचे, ‘जर तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही विवेकानंदांना वाचा. त्यांच्यात तुम्हाला सकारात्मकता मिळेल, नकारात्मक काहीही नसेल.’
रवींद्रनाथ टागोर स्वतः देखील इतके प्रतिभाशाली होते, की वयाच्या ७ व्या वर्षीच त्यांची पहिली कविता ‘अभिलाषा’ प्रसिद्ध नियतकालीक ‘तत्वाबोधिनी’मध्ये प्रकाशित झाली होती आणि अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी ‘क्षुधितपाषाण’ ही कथा लिहिली, जी आजही आवडीने वाचली जाते.
आणि अजून एक वेगळीच माहिती.. थोर भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ ‘आर्यभट्ट’ हे ग्रंथात आकडेमोड करत; पण मजकूर मात्र काव्यमय व यमकात करत असत. मग ‘संख्या’ पद्यात बसविण्यासाठी त्या अक्षराने लिहिल्या की, अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची युक्ती त्यांनी शोधून काढली. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते. मला ही माहिती समजली तेव्हा फार आश्चर्य वाटलेलं.
किंवा मोबाईल फोनचे जनक डॉ. मार्टिन कूपर यांना सेलफोन बनविण्याची प्रेरणा टीव्हीवरच्या एका सीरियलवरून मिळाली, ज्यात हातात एक डिव्हाईस पकडून बोलत असल्याचे दृश्य दाखविले होते.
रेबीजची लस बनविणारे प्रसिद्ध वैज्ञानिक लुई पाश्चर यांनी त्यांच्या लहानपणी गावातल्या ८ जणांना पिसाटलेल्या लांडग्यांना मारताना बघितले होते आणि त्या लांडग्यांच्या व्हिवळण्याचा आवाज ते पुढे कधीच विसरू शकले नाहीत. या घटनेने तरुणपणी देखील त्यांना खूप बैचेन केले आणि याच घटनेने त्यांना या विषयावर संशोधन करण्याची प्रेरणा दिली.
‘१११ जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वं’ हे ‘अनुजा जोशी-लिमये’ लिखित व ‘रिया पब्लिकेशन’ने प्रकाशित केलेले पुस्तक वाचताना या अशा अनेक महान जगप्रसिद्ध व्यक्तीमत्वांचे अनेक नवीन पैलू समजतात, जुन्या माहितीची उजळणी होते तर अनेक नवीन शोध आणि त्यांच्या निर्मात्यांची नव्याने ओळख होते.
जगभरातील नावाजलेले साहित्यिक, चित्रकार, खेळाडू, गणितज्ञ, संशोधक, वैज्ञानिक, गणितज्ञ, राजकारणी, नेते, खगोलशास्त्रज्ञ, अंतराळवीर, इंजिनिअर, डॉक्टर, कॉम्प्युटर वैज्ञानिक, आदी अनेक प्रेरणादायी व्यक्तींचा या पुस्तकात समावेश आहे.
यात आर्य चाणक्य, आर्यभट्ट, गौतम बुद्ध, कालिदास, रामकृष्ण परमहंस, राजा रवी वर्मा, जगदीशचंद्र बसू, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, श्रीनिवास रामानुजन, चंद्रशेखर वेंकट रामन, होमी भाभा,मदर टेरेसा, आर.के.लक्ष्मण, डॉ. अमर्त्य सेन, राजेंद्रसिंग चौहान,विश्वनाथन आनंद यांच्यासोबतच थॉमस अल्वा एडिसन, दलाई लामा, टेड टर्नर, हेन्री फोर्ड, अब्राहम लिंकन, चार्ली चॅप्लिन, हेलन केलर, स्टीव्ह जॉब्स, लॅरी पेज, वॉल्ट डिझनी, राईट बंधू, बेंजामिन फ्रँकलिन, जॉन एफ केनेडी, मायकेल फ्लेप्स, फ्लोरेन्स नाईटिंगेल, विल्यम शेक्सपिअर, मेरी क्युरी, अल्बर्ट आईन्स्टाईन, कार्ल मार्क्स, नेल्सन मंडेला अशा एकूण १११ प्रेरणादायी व्यक्तींच्या कार्याची माहिती दिलेली आहे.
या १११ नावांमध्ये अनेक नावं आलेली नाहीत, जी यायला हवी होती; किंवा काही धार्मिक व्यक्तींबद्दल दिलेली माहिती पुराणकथांवर आधारलेली आहे, असे पुस्तक वाचताना वाटू शकते, (मला स्वतःला वाटले) पण इतर १११ महान व्यक्तींबद्दलच्या माहितीचे संकलन करण्याचा लेखिकेचा प्रयत्न खरंच फार स्तुत्य आहे.
पुस्तकातील अनेक व्यक्तीमत्वांबद्दल आपण फार काही कधी वाचलेलं आठवत नाही तर काहींची नावंही पहिल्यांदाच वाचतोय असं वाटतं. त्यामुळे लहान मुलांना, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्यक्तींची माहिती मिळविण्यासाठी व निबंध व वक्तृत्व स्पर्धेची तयारी करण्यासाठी तर हे पुस्तक अतिशय उत्तम ठरेल.
पुस्तकाची मांडणी फार सुटसुटीत आहे, ही महत्वाची गोष्ट. यामुळे लहान मुलांनाही वाचताना नीट समजेल व गोंधळ होणार नाही. अगदी २-३ पानांमध्ये या जगप्रसिद्ध व्यक्तीमत्वांची माहिती दिली आहे. त्यात त्या व्यक्तींची थोडक्यात वैयक्तिक माहिती, त्यांच्या कामाविषयी महत्वाच्या घटना व मुद्दे, त्यांच्या आयुष्यातील एखादी महत्वाची घटना किंवा अनुभव आणि त्यांच्याकडून प्रेरणा किंवा शिकता येण्यासारख्या काही गोष्टी अशी पुस्तकाची मांडणी.
यातली बरीच माहिती कदाचित तुम्हाला नेटवर मिळेलही, पण पटकन कोणतंही पान उघडून आपल्याला हवं ते वाचण्याची मजा इंटरनेटवर नाही. त्यात मराठीमध्ये माहिती शोधायला देखील बराच वेळ जातो. आणि मुलांना किंवा विद्यार्थ्यांना मोबाईल किंवा संगणकापेक्षा पुस्तकांच्या संगतीमध्ये अशा महान व्यक्तींची ओळख होत असेल, तर चांगलंच आहे, नाही!
– अश्विनी सुर्वे.
पुस्तक विकत घेण्याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इथे click करा!
Leave a Reply