संदीप खरे – मी अन् माझा आवाज


 

दादरचं रवींद्र नाट्यमंदिर. ‘संदीप खरे’ आणि ‘वैभव जोशीं’चा, ‘इर्षाद’ हा कार्यक्रम भन्नाट रंगलेला. टाळ्यांच्या गजरात, हास्याच्या गडगडाटात, दिलखुलास दाद देत प्रेक्षक अगदी भावमग्न झालेले आणि संदीप खरेंनी त्यांच्या एका ‘जिवलग’ मित्राबद्दल सांगायला सुरुवात केली. म्हणाले,

“एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी
‘जिवलग’ होतो दोघे…
मी अन् माझा आवाज !
आता मी एका घरात राहतो…
तो दुसऱ्या घरात…”

पूर्ण नाट्यगृह स्तब्ध झाल्यासारखं वाटत होतं. कदाचित प्रत्येकजण या कवितेतून आपल्याही ‘त्या’ जिवलग मित्राला शोधू पाहत होतं. असं नाही की संदीप खरेंच्या इतर कवितांनी आपल्याला कधी भावूक किंवा विचारमग्न केलेलं नाही, पण ही कविता इतकी भिडणारी यासाठी होती कारण; तो खूप आतून आलेला आवाज होता. संदीप खरेंच्या ‘मी अन् माझा आवाज’ या काव्यसंग्रहातील ही पुस्तकाच्या नावाचीच कविता.

मला ही कविता प्रचंड भावलीये. ज्या लयीत आणि तीव्रतेने संदीप खरेंनी ती सादर केली तो प्रत्यक्ष अनुभव तर  निव्वळ कल्पनेपलीकडचा होता. काही रचना, कविता अशा रुतून बसतात ना मनात! वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भावनांना वाट मोकळी करून देणाऱ्या खरेंच्या कविता कायम सोबतीला होत्याच. मग त्यात सर्वात पहिली ऐकलेली आणि आठवणींचा अविभाज्य भाग झालेली ‘लागते अनाम ओढ श्वासांना’ आहे. त्यानंतर ‘मी मोर्चा नेला नाही’, ‘अताशा असे हे’,‘अग्गोबाई ढग्गोबाई’, ‘आयुष्यावर बोलू काही’, ‘नसतेस घरी तू जेव्हा’, ‘हे भलते अवघड असते’, ‘मन तळ्यात मळ्यात’, ‘कसे सरतील सये’, ‘मी हजार चिंतानी हे’ आणि सर्वांच्या मनात घर करून बसलेली ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ आहेच.

पण ‘मी अन् माझा आवाज’ या काव्यसंग्रहातील कविता वेगळ्या धाटणीच्या आणि ‘कविता’ या विषयाचा विविध अंगाने वेध घेणाऱ्या आहेत. म्हणजे अगदी कवितेची ओळ सुचण्यापासून, चंचल प्रतिभा ते प्रतिभा हरवलेला कलाकार, पाट्या टाकणारे चुकार लोक ते बाथरूम सिंगर आणि गावोगावी दौरे करणाऱ्या कलावंतापासून, कविता न सुचणारा कवी आणि मनाच्या तळाशी जाऊन बसलेला एका कवीचा आवाज. तुम्ही कवी असाल तर हा काव्यसंग्रह आवर्जून वाचा. काव्यलेखन शिकण्यासोबतच एक आरसा या पुस्तकात तुम्हाला दिसेल. जशी ही निर्मितीच्या मागे असलेल्या ‘प्रतिभे’चे मनोगत सांगणारी कविता,

“माझा नाही काही भरवसा… रमले तिकडे रमले गं
वाटेवरती घोस फुलांचे… टिपले तितके टिपले गं”

एखादी कल्पना सुचली तरी ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत मन किती दिशांमध्ये भरकटून येतं, त्या स्थितीचं किती चपखल वर्णन केलंय.  आता या दुसऱ्या कवितेच्या एका कडव्यात कविताच कवीला काय सांगतेय बघा ,

“शहाण्यासारखं जगावं आणि वेड्यासारखं लिहावं
येणारं येतं… जाणारं जातं..
त्याची कुंडली मांडू नये
अन् शब्दांची जबाबदारी तर बिलकुल घेऊ नये
स्वतःवर आशा लावू नये
आणि कवी असल्याचं तर मुळीच कुणाला सांगू नये.”

आता ‘कविताच’ असं का सांगतेय हे समजून घ्यायला ही कविता आणि पुस्तक पूर्ण वाचायला हवं. पुस्तकातील इतर कविताही कधी थेट तर कधी रुपकांच्या माध्यमातून मांडल्या आहेत. ‘समजूत’, ‘चंद्र पाहिलेला माणूस’, ‘कॉन्शन्स’, ‘दौरा’, ‘प्रलय’, ‘तो अन् मी’, ‘म्युझिअम’ आणि ‘मी अन् माझा आवाज’ या मला आवडलेल्या काही कविता. या पाऊसरावांच्या कवितेत वर्णन कसं केलंय बघा..

“उशिराबद्दल सॉरीबिरी म्हणणे जरा राहून गेले
पाऊसराव आले तेव्हा पुन्हा ऐटीमध्येच आले!!
ढगरंगाची फेल्ट हॅट … अंगात तोच हिरवा सूट
म्हटले- “कसला दुष्काळ-बिष्काळ.. गर्मी-बिर्मी .. सारे झुठ!”

किती मजेशीर वर्णन आहे! वाचता वाचताच पाऊसरावांचं रूप डोळ्यांसमोर उभं राहतं. पुस्तकातील अशा निसर्गावरील कविता लक्ष वेधून घेतातच पण मानवी स्वभावाचे पैलू दाखवणाऱ्या कविताही एकदम स्तिमित करतात. आता ही अजून एक, ‘उघड दिसणाऱ्या आणि आत वावरणाऱ्या ‘मी’ ची कविता’,

“तो अन् मी दोघेही जाणतो
की कातडे काही खरे नाही …
पण चारचौघांत हे बोलणेही बरे नाही..
मग हसू दाबावे लागते .. गंभीर राहावे लागते
कोण.. कुठला.. काय नाव ,गाव,पत्ता.. सारे आठवावे लागते.”

तर अशा मनातल्या प्रत्येक विचाराला, भावनेला आणि शब्दरूप देत ‘मौनाची भाषांतरे’ करणाऱ्या या सृजनशील कवीला वाढदिवसाच्या ढगाएवढ्या शुभेच्छा !

नुकतीच संदीप खरेंनी त्यांच्या श्रोत्यांसाठी वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून एक गजल पोस्ट केलीये.

“गूढ दिवसरात्रीचे उकलण्यात वय गेले…
उमगले न काहि हेच उमगण्यात वय गेले…!!”

 

 ©अश्विनी सुर्वे

पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे. 


Related Posts

No Comments

Leave a Reply

Whatsapp करा
1
मदत हवी आहे?
नमस्कार! यशवंतहो.com वर आपलं स्वागत!

विविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.
Whatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.

चांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.
वाचत रहा,
धन्यवाद!