कमी बजेटमध्ये जास्त पुस्तकं कशी वाचावीत?

कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त पुस्तकं कशी वाचता येतील असा प्रश्न किंवा विचार अनेकांच्या मनात येतो. अशा वाचनप्रेमींसाठी ही माहिती.

  • सेकंड-हॅन्ड पुस्तकं

– असा विचार करा की, एखादं पुस्तक त्याच्या वाचकापेक्षा जास्त काळ जगतं. त्यामुळे एका वाचकाकडून दुसऱ्या वाचकाकडे कधीनाकधी जाण्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. त्यामुळे या पुस्तकांकडे फक्त जुनी पुस्तकं म्हणून पाहू नका.

– तुमच्या भागातील सेकंड-हॅन्ड पुस्तकं विकणाऱ्या विक्रेत्यांची माहिती काढा. मुंबईत असाल तर फोर्ट भागात असे अनेक विक्रेते आहेत.

– काही विक्रेते आधीचं पुस्तक परत दिलं की नवीन पुस्तकावर काही टक्के सूट देतात.

सेकंड हॅन्ड पुस्तकं म्हणजे पायरेटेड, डुप्लिकेट पुस्तकं नाही हे लक्षात घ्या.

  • रद्दीमधील पुस्तकं

– तुम्हाला आश्चर्य वाटेल पण रद्दीवाल्याकडे देखील अनेकांना अत्यंत दुर्मिळ असे पुस्तकांचे खजिने मिळाले आहेत.

– मला स्वतःला रद्दीमध्ये अनेक नामांकित लेखकांचे संदेश आणि स्वाक्षरी असलेली पुस्तकं मिळाली आहेत.

– याचं कारण, लेखक नितीन रिंढे सांगतात की, ‘हल्लीच्या लहान घरांमध्ये जागा नसल्याने आणि नंतरच्या पिढ्यांना वाचनाची आवड नसल्याने पुस्तकांचे खाजगी संग्रह रद्दीमध्ये दिले जातात.’

– दर्जेदार पुस्तकांचा संग्रह असलेले तुमच्या भागातील रद्दीविक्रेते शोधा आणि अधूनमधून त्यांच्याकडे चक्कर टाकत जा.

  • पुस्तक प्रदर्शन व डिस्काउंट/सेल

– ‘बुकगंगा’च्या वेबसाईटवर बहुधा सर्व पुस्तकांवर २५% डिस्काउंट असतो. इतर परदेशी वेबसाईट्सना कमिशन देण्यापेक्षा ती रक्कम ते पुस्तकं कमी किंमतीत देण्यासाठी वापरतात.

– “half price book’  या साईटवरही अनेक पुस्तकं अर्ध्या किंमतीत किंवा काही टक्के डिस्काउंट मध्ये मिळतात.

– अनेक वाचनालयं, पुस्तक विक्रेते विशेष दिनांचं औचित्य साधून पुस्तकप्रदर्शन भरवत असतात ज्यात डिस्काउंट दिला जातो.

– काही वाचनालयं दुर्दैवाने बंद होत असतील तर फार किंमतीत त्यांच्याकडील पुस्तकं विकतात.

– ही सगळी माहिती वृत्तपत्रं आणि सोशलमीडियाच्या माध्यमातून मिळत असते.

  • अजब डिस्ट्रिब्युटर्स

– अत्यंत वाजवी किंमतीत उत्तम वैचारिक व माहितीपर पुस्तकं देण्यासाठी ‘अजब डिस्ट्रिब्युटर्स’ आणि ‘रिया पब्लिकेशन’ प्रसिद्ध आहे.

– त्यांनी अनेक उत्तमोत्तम पुस्तकं ७०/- ₹ मध्ये वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत.

– त्यांच्या वेबसाईटवरून किंवा पुस्तकप्रदर्शनांमध्ये ही पुस्तकं तुम्ही घेऊ शकता.

– इतर काही विक्रेते त्यांच्या पानांच्या दर्जाबद्दल तक्रार करतात पण माझ्याकडे चांगल्या विषयांवरील अजबची गाजलेली पुस्तकं अनेक वर्षांपासून सुस्थितीत आहेत.

  • सोशल मीडिया

– ‘The Street Library’ किंवा ‘तुला ग्रंथ वितरण’ असे काही पुस्तक विक्रेते सोशलमीडियाच्या माध्यमातून सवलतीच्या दरात पुस्तकं उपलब्ध करून देतात. ही पुस्तकं नवीन, जुनी किंवा दुर्मिळ असू शकतात. पुस्तकांची लिस्ट ते फेसबुक, इंस्टावर शेयर करतात, तिथून तुम्ही पुस्तकं मागवू शकता.

– फेसबुकवरील वाचकांच्या ग्रुपवर अनेक वाचक त्यांची पुस्तकं एकदा वाचून झाली की इतरांना कमी किंमतीत विकतात कारण अनेकांना पुस्तकं जमवायला आवडत नाहीत किंवा अशा प्रकारे नवीन पुस्तकं घेता येतात.

– ‘the book explorers’ या इंस्टाहँडल वरही सर्व वाचकांना परवडतील अशा उत्तम आशयघन पुस्तकांची ओळख करून दिली जाते.

  • नवीन पुस्तक प्रकाशित होताना

– अनेक प्रकाशक, लेखक त्यांची पुस्तकं प्रकाशित होण्याआधी ‘प्री ऑर्डर’ घेतात ज्यामध्ये मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत पुस्तक उपलब्ध केली जातात.

– बहुधा सर्व प्रकाशक नवीन पुस्तकांवर डिस्काउंट देतात, ज्याविषयी अधिक माहिती त्यांच्या साईटवर पाहता येईल.

– पुस्तकाची प्रथम आवृत्ती, डिस्काउंट आणि क्वचित कधी आवडत्या लेखकाची स्वाक्षरीही सोबत मिळाली तर दुग्धशर्करा योगच ठरेल.

  • ऑनलाईन व इतर पर्याय

– किंडल, पॉडकास्ट, स्टोरीटेल यांच्या माध्यमातूनही तुम्ही कमी किंमतीत अनेक पुस्तकं वाचू, ऐकू शकता.

– ‘ईसाहित्य प्रतिष्ठान’ च्या माध्यमातूनही पुस्तकांचा खजिना मोफत उपलब्ध आहे. डिजिटल स्वरूपात ही पुस्तकं तुमच्यासोबत राहतील.

– त्याचसोबत वाचनालयांचे सभासद व्हा. यातून पुस्तकं साठवायला नाही मिळाली तरी वाचायला मिळतील आणि माहितीचा प्रचंड मोठा साठा उपलब्ध होईल.

पण कृपया पायरेटेड आणि अवैद्य pdf वाचू नका. यामुळे पुस्तकं आणि वाचनसंस्कृतीचा ऱ्हास होतो. लेखकाचं, प्रकाशकांचं व पुस्तकव्यवसायाचं अतोनात नुकसान होतं. नवोदित लेखक पुस्तकं लिहिणं आणि प्रकाशित करणं टाळतात.

तुम्हाला असे अजून पर्याय माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मुद्दे पटले असतील किंवा नसतील तरी प्रतिक्रिया द्या. इतर वाचकप्रेमींसोबत शेयर करा. आणि अशा प्रकारची माहिती वाचण्यासाठी YashwantHo.com ला सबस्क्राईब करा.

ता.क.  – ‘४९/- चा रिचार्ज करू की १४९/- चा?’ असा विचार करणारी मुलं २००-३०० चं पुस्तक घेताना मात्र मागे-पुढे बघत नाहीत, हा लेख त्यांच्यासाठी आहे. महिन्यातून ४ वेळा फास्ट-फुडवर ५००-१००० पेक्षा जास्त खर्च करून ‘पुस्तकं महाग असतात’ असं बोलणाऱ्यांसाठी नाही.

पुस्तक वाचनाची आवड कशी वाढवावी, याच्या टिप्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

वाचतराहा! यशवंतव्हा!


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile

Comments

2 responses to “कमी बजेटमध्ये जास्त पुस्तकं कशी वाचावीत?”

  1. Pratik Avatar
    Pratik

    अतिशय सुंदर आणि उपयोगी ब्लॉग..🙌🙌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *