सुधा मूर्तींनी, एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, की माझी पुस्तकं वाचताना, लोकांना डिक्शनरी घेऊन बसावं लागू नये असं मला वाटतं; मग ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना माझे अनुभव आरामात वाचता यायला हवेत.
आणि तेव्हा मला जाणवलं की खरंच, जेव्हा मी इंग्रजी पुस्तकांकडे वळले तेव्हा सुधा मूर्तींच्या सोप्प्या, सुंदर आणि ओघवत्या लिखाणशैली मुळेच त्यांच्या पुस्तकांनी मला जास्त आकर्षित केलं. आजही जर कुणाला इंग्रजीवर प्रभूत्व मिळविण्यासाठी पुस्तकं वाचायची असतील तर मी त्यांना सुधा मूर्तींची पुस्तकं भेट देते. (पण सुधा मूर्तींची मराठी भाषांतरीत पुस्तकं वाचायला जास्त मजा येते, हे देखील खरं! तुम्हाला काय वाटतं?)
त्यांचं ‘वाईज अँड अदरवाईज’ हे मी वाचलेलं पहिलं पुस्तक जे मला सगळ्यात जास्त आवडतं. या पुस्तकातली ‘सह्याद्रीच्या कुशीत विनयशीलता भेटते तेव्हा’ ही कथा तर मला प्रचंड आवडते.
सह्याद्रीच्या जंगलात राहणाऱ्या, शाळा न शिकलेल्या आदिवासी म्हाताऱ्याने, सुधा मूर्तींना, ‘घेण्यात सुद्धा मोठेपणा असतो’ हे शिकवले. तिथल्या शाळेला मदत करण्यासाठी गेलेल्या मूर्तींना त्या लोकांच्या प्रमुखाने त्यांच वैशिष्ट्य असलेलं एक आयुर्वेदिक पेय परतफेड म्हणून दिलं. इतक्या गरीब लोकांकडून मी भेट कशी स्वीकारू असा विचार करत मूर्तींनी नम्रपणे नकार देताच, तो ९० वर्षांहूनही अधिक वय असलेला वृद्ध गंभीरपणे म्हणाला, ‘तसं असेल, तर अम्मा, आम्ही पण तुमची भेट स्वीकारू शकत नाही. आमचे पूर्वज पिढ्या न पिढ्या या रानात राहिले. त्यांनी त्यांच्या पद्धती आम्हाला शिकवल्या. तुमची आम्हांला काहीतरी देण्याची इच्छा आहे ना… तर आम्ही ते घेऊ. पण त्याचबरोबर आम्ही जे देऊ, ते तुम्हीसुद्धा घ्यायला पाहिजे. तुम्ही आमची भेट जर स्वीकारणार नसाल, तर आम्हीसुद्धा तुम्ही आणलेल्या या गोष्टी घेऊ शकत नाही’.
एखादी मदत केल्यावर कृतज्ञता व्यक्त करणं तर दूरच पण जे करायचं राहिलं असेल त्याविषयी तक्रार करणारी लोकं भेटलेली असताना; या आदिवासी ‘मुख्या’चा अनुभव, सुधा मूर्तींसाठी धक्काच होता. त्या वृद्ध आदीवासीने,
‘जेव्हा तुम्ही घेऊ शकाल तेव्हाच द्या… काहीतरी दिल्याशिवाय घेऊ नका ‘
हे जीवनाचं एवढं मोठं तत्वज्ञान स्वतः जगत कृतीतुन दाखवून दिलं. इतक्या सुंदर पद्धतीने पुस्तकातून आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या या कथा कायम लक्षात राहतात.
त्याचसोबत ‘विशीत आदर्शवाद, चाळीशीत वास्तववाद’ या कथेतील शाळेनंतर 20 वर्षांनी भेटलेल्या मैत्रिणींचे भविष्याबद्दलचे चुकलेले ठोकताळे, हुंडाबळीवर आधारित ‘खरंच स्टोव्ह भडकला का?’, दैनंदिन जीवनातील समस्यांवर लिहिलेल्या ‘कोणे एके काळी’, ‘परिवर्तनशील जगणं’ तसेच वेगवेगळ्या समाजातील ‘कुमारी माता’ , ‘माझा निर्णय मी नाही घेतला तर मी शिकणार कधी’ असं विचारणारी ‘यल्लमा’ अशा अनेक गोष्टी वाचनीय आहेत.
‘वाईज अँड अदरवाईज’ या पुस्तकातील 2-3 पानांच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून मूर्तींनी जीवनाचं सार सांगितलं आहे असं वाटतं आणि हेच त्यांच्या इतर पुस्तकांचंही वैशिष्ट्य आहे आणि कदाचित यामुळेच लोकं सुधा मूर्तींच्या पुस्तकांकडे आकर्षित होतात. खरंतर, पुस्तक लिखाणाची सुरुवात देखील सुधा मूर्तींनी, आपले अनुभव कोणासोबत तरी शेयर करता यावेत म्हणूनच केली होती.
इन्फोसिसच्या सामाजिक कार्याच्या निमित्ताने भारतातील खेड्यापाड्यात फिरताना, हिंडताना मूर्तींना आपला देश नीट उमगला असं त्या म्हणतात. विविध राज्यांतील अंतर्भागात, कधी पायी,कधी बसने तर कधी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या या प्रवासामध्ये आणि कार्यामध्ये त्यांना आलेले हे खरे आणि प्रत्यक्ष अनुभवलेले अनुभव त्यांनी त्यांच्या पुस्तकांतून मांडले आहेत.
या पुस्तकात, एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका या दोन्ही नात्यांनी त्यांना जे विलक्षण अनुभव आले ते त्यांनी आपल्यापुढे त्यांच्या विनोदी, मनमोकळ्या लेखनशैलीतुन मांडले आहेत; जे वाचताना सुधा मूर्ती यांचं कार्य आणि त्यांचं जीवनविषयक तत्वज्ञान यांचं व्यापक दर्शन आपल्याला घडतं आणि आपलं अनुभवविश्व समृद्ध करतं.
–अश्विनी सुर्वे.
या पुस्तकाची लिंक पुढे देत आहे
सुधा मूर्तींची तुम्हाला आवडलेली कथा किंवा पुस्तकं कोणती आहेत, ते आम्हाला नक्की कळवा. त्यांची आम्हाला माहित असलेली पुस्तकं खालील प्रमाणे :-
Leave a Reply