कालच एक बातमी वाचली, ‘ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब घेण्याची घरच्यांची परिस्थिती नसल्याने मुलाची आत्महत्या’… खूप सारे विचार, प्रश्न मनात येऊ लागले. आता या बातमीचा अँगल खरा की बनवलेला! ऑनलाइन शिक्षण चांगले की गरिबांवर अन्याय करणारे असे अनेक अभ्यासाचे आणि वादाचे मुद्दे होऊ शकतात, पण मला सर्वात आधी महानगरपालिकेच्या शाळेत नववीत शिकणारा ‘गणेश’ आठवला.
मागच्या वर्षी करियरविषयक समुपदेशन करायला मी त्यांच्या शाळेत गेले होते. आधीच्या विद्यार्थ्याला त्याचे करियर चॉइसेस समजावून सांगून मी पुढचा रिपोर्ट हातात घेतला आणि आवाज दिला, ‘गणेश पाखरेss!’
मुलांचा आवाज वाढला… ‘एss ड्रायव्हर’, ‘अय पाखरेsss’, ‘काळ्या तुझा नंबर आला बघ’.. अशा गोंधळातून एक बारीक चणीचा, मध्यम उंचीचा मुलगा पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावरचा शांत, संयमी भाव लक्ष वेधणारा होता.
मुलांना शांत करून गणेशसोबत बोलायला सुरुवात केली.
‘हॅलो गणेश! कसा आहेस? अभ्यास कसा सुरू आहे?’
त्याने फक्त मान डोलावली.
‘Okay! बरं, तुला ‘करियर अवेअर’च्या प्रोग्रॅमबद्दल काही आठवतंय का? इंटरेस्ट, योग्यता, रिऍलिटी???… करियर निवडीच्या तीन पायऱ्या?’
‘…..’
‘तू करियरचे कोणते पर्याय निवडले होतेस? काय आवडतं तुला? कोण आलेलं शिकवायला?’
‘…..’
काहीच बोलत नव्हता तो. बरीच मुलं अनोळखी लोकांसमोर बोलायला सुरुवातीला घाबरतात, त्यांना पटकन मोकळेपणाने बोलता येत नाही म्हणून अशा मुलांना कम्फर्टेबल करून त्यांना बोलतं करेपर्यंत मी प्रयत्न करतच राहते. आत्ताही बरेच प्रयत्न करून त्याला बोलतं करायचा प्रयत्न करतच होते.
“मॅडम, तो असाच आहे, वर्गात पण काहीच बोलत नाही.” पहिल्या बेंचवर बसलेल्या मॉनिटरने ओरडून सांगितलं. त्यावर इतर विद्यार्थ्यांच्या हसण्याची सोबत.
तिला ‘बरं!’ म्हणत मी माझा मोर्चा परत गणेशकडे वळवला.
‘हा, गणेश…, तू प्रश्न छान सोडवले आहेस! यंत्र आणि अवजारे कशी काम करतात, हे तुला सहज समजते, निरीक्षण आणि विश्लेषण करायला तुला आवडते आणि लॉजिकल, गणिती समस्या सोडवण्यात तू जास्त रमतोस… इम्प्रेसिव्ह! स्वतःच सोडवलेलेस ना प्रश्न? कॉपी नव्हती केलीस ना?’
हा पर्याय बरोबर लागू पडला. एवढ्या वेळानंतर पहिल्यांदाच तो हसला.
‘नाही मॅडम, मी स्वतःच लिहिलंय. मला आवडतं यंत्रांसोबत काम करायला.’
‘छान! बघ, मग आता तुझ्याकडे इंजिनियरिंग, मेडिकल टेक्निशियन हे करियर चॉइसेस आहेत. तुला कोणत्या पर्यायाला प्राधान्य द्यायला आवडेल?
‘….’
पुन्हा शांत.. माझ्याकडे कमी वेळ होता, मी पुन्हा विचारलं, ‘दहावी नंतर तुझ्यासाठी योग्य असलेल्या क्षेत्रात जाण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत, हे तुला जाणून घ्यायला आवडेल का, गणेश?’
एक – अर्धा मिनिट काहीच बोलला नाही. हातातली पेन्सिल उगीच बेंचवर खरडवत खाली बघत राहिला. मग एकदम जणू निर्धाराने बोलत असल्यासारखा बोलला, ‘तुम्हाला खरं खरं एक सांगू का मॅडम?’
‘हं… बोल.’
‘मला ना खरंतर पुढे शिकायचंच नाहीये.’
विद्यार्थ्यांनी कमीत कमीत 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत शिक्षण घ्यायला हवं, या शासनाच्या योजनेबद्दल जागरूकता निर्माण करायला आमच्या संस्थेमार्फत मी काम करतेय, आणि हा मुलगा मला सांगतोय की त्याला शिकायचंच नाहीये…?
‘का…?’
‘कारण, मॅडम.. मला मेकॅनिक व्हायचंय! साधा-सुधा नाही खूप मोठा…! मला स्वतःच गॅरेज सुरू करायचंय. मी शाळेनंतर आमच्या घराजवळच्या गॅरेजमध्ये शिकायला जातो. तुम्ही म्हणालात ना, माझ्या रिपोर्टमध्ये, मला यंत्रांसोबत काम करायला आवडतं, असं लिहिलंय; मला खरंच खूप आवडतं यंत्रांसोबत. शाळेत असताना पण माझं लक्ष गॅरेजकडेच असतं. आमच्या गॅरेजचा रहीम भाई पण सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टी खूप भारी समजावतो…’
‘अरे, पण… तुझं शिक्षण?’
“ते पण तर शिक्षणच आहे ना मॅडम? रहीम भाई मला बालमजूरा सारखा नाही वागवत. उलट त्यालाच भीती वाटत असते, एनजीओच्या लोकांची. सुरुवातीला तर तो मला येऊ नको म्हणून परत पाठवायचा. पण मला खूप आवडतं हे काम. आणि तसंही, तुमचा इंटरेस्ट असलेलं, त्यात तुमची योग्यता असणारं आणि त्या कामाचे तुम्हाला पैसे मिळू शकतील, असंच काम करियर म्हणून निवडायचं असतं ना..?”
‘अरे हो! पण… तुझं शिक्षण…?’ माझा पुन्हा तोच मुद्दा. ‘निदान दहावी-बारावी तरी नको का करायला?’
‘ हो,दहावी पर्यंत शिकणार आहेच मी; पण शाळेत जाऊन नाही. बाहेरून फॉर्म भरून.’
मी अवाक्! याला निदान 12 वी पर्यंत शिकणं आणि त्यांनतर डिग्री किंवा कोणताही कोर्स करून ज्ञान घेणं कसं महत्वाचं आहे, हे समजवायला मी आलेय आणि हा माझीच बोलती बंद करतोय. पण त्याचं ठामपणे बोलणं माझी उत्सुकता वाढवत होतं आणि विचार करायलाही भाग पाडत होतं.
‘मॅडम, तुम्हाला आवडेल की नाही माहीत नाही. पण आत्ताच मला आणि माझ्या भावंडांना शिकवायला माझे आई-वडील खूप कष्ट करतात. वडील माथाडी कामगार आहेत आणि आई घरकाम करते. आम्ही शिकून मोठ्ठा जॉब करावा अशी त्यांची इच्छा! पण मला शाळेतला अभ्यास शिकायचाच नाहीये. मला मेकॅनिक व्हायचंय! त्याचा कोर्स मी करेन नंतर वाटलं तर. पण सध्या मी रहीम भाईच्या हाताखाली खूप काही शिकतोय. नुसत्या आवाजावरून काय फॉल्ट असेल हे आत्ताआत्ता समजायला लागलंय मला. आणि मला आवडतं माझं काम खूप… ही पोरं हसतात मला; पण मला नाही फरक पडत. इथे शाळेत मला आवडतंच नाही तर जास्त मार्क कसे पडणार ना मॅडम..?’
आता शांत रहायची वेळ माझी होती. तो बोलतच होता…
‘वडिलांना पण आवडत नाही मी गॅरेजमध्ये जातो ते. अपमान वाटतो त्यांना. त्यांना वाटतंय, त्यांच्या इच्छेविरुद्ध मी गॅरेजला जातोय आणि मला, माझ्या इच्छेविरुद्ध शाळा शिकवायला ते घेत असलेले कष्ट पटत नाहीय. त्यांना कळतच नाहीये, की अशाने दोघांच्याही इच्छा पूर्ण नाही होणार…’
त्याच्या चेहऱ्यावरच्या शांत, संयमी भावनांचा आता मला उलगडा होत होता…
‘मॅडम, आता तुम्ही या रिपोर्टवर, मी इंजिनियर बनू शकतो, असं लिहिलंत तर वडील अजून खूप कष्ट करायला लागतील, अजून 2 ठिकाणी जास्त कामं करायला घेतील पण शेवटी त्याचा काहीच उपयोग नसेल. मी कॉलेजमध्ये शिकून इंजिनियर नाही होऊ शकत…’
‘..’
‘मी गॅरेजमध्येच खूप कष्ट करेन, खूप शिकेन, प्रॅक्टिकल अनुभव घेईन आणि माझं स्वतःच गॅरेज उघडेन. बघाच तुम्ही! कोणतंही काम छोटं नसतंच ना, मॅडम..?’
‘अं…? हो..!’
‘प्लीज तुम्ही रिपोर्टवर, “याला इंजिनियर करा” असं नका लिहू ना! प्लीज!’
सेशन पूर्ण व्हायची वेळ होत आलेली. मुलांचा आवाज वाढला होता. तो शांतपणे त्याच्या जागेवर जाऊन बसला. मी माझं सामान आवरलं, गैरहजर विद्यार्थ्यांचे रिपोर्ट्स प्रिन्सिपलकडे द्यायला वेगळे ठेवले आणि विद्यार्थ्यांचा निरोप घेऊन निघाले.
जाता जाता दरवाजाजवळ थांबले, पाठी फिरले आणि गणेशकडे बघितलं… ‘गणेssश… ऑल द बेस्ट!’
अश्विनी सुर्वे
अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!
Leave a Reply