माणूस जीवनाचा शोध घेण्यासाठी सतत धडपडत असतो. परंतु त्याला माहीत नसतं, की ज्या जीवनाचा तो शोध घेण्याचा प्रयत्न करतो ते जीवन त्याच्यातच असते. – खलील जिब्रान, द प्रॉफेट.
खलील जिब्रान या जगप्रसिद्ध लेबनॉनी-अमेरिकन लेखक आणि कवीचे ‘द प्रॉफेट’ हे एक छोटंसं पण आयुष्याचं तत्वज्ञान तरल काव्यात्मक रुपात मांडणार अतिशय सुंदर पुस्तक. या पुस्तकाचं जगभरात २० पेक्षा जास्त भाषांत भाषांतर झालंय. प्रॉफेट म्हणजे प्रेषित, संदेश देणारा. ‘द प्रॉफेट’ मध्ये माणसांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध व जीवन आणि मृत्यूच्या मधील अनेक विषयांवर तात्त्विक विवेचन आहे.
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची पुस्तकं वाचताना बऱ्याचदा खलील जिब्रानच्या प्रॉफेट या पुस्तकाचा, त्यातील विचारांचा उल्लेख येत होता, त्यामुळेच मी ‘द प्रॉफेट’ वाचायला घेतलं. आणि आयुष्याबद्दल, मनुष्य स्वभाव आणि मानवी भाव-भावनांबद्दलची उत्तरं इतक्या साध्या सोप्प्या सरल शब्दांत वाचताना अवाक् झाले.
अल्मुस्तफा नावाचा एक मुसाफिर आपला देश सोडून ऑरफलेज नावाच्या दुसऱ्या देशातील शहरात जातो आणि तेथे राहतो. 12 वर्षांनंतर त्याला परत त्याच्या देशात नेण्यासाठी एक जहाज येतं. पण या १२ वर्षांच्या काळात त्याच्या मनात ऑर्रफलेज मधील रहिवाशांविषयी प्रेम निर्माण झालेलं असतं आणि त्यांना सोडून जाताना दुःख होत असतं. तेथील लोकं त्याला जीवनाचं तत्वज्ञान सांगण्याची विनंती करतात आणि मग अल्मुस्तफा, ऑरफलेजच्या लोकांना प्रेम, जन्म, परमेश्वर, विवाह, दु:ख, कायदा, आत्मज्ञान, मैत्री, सौंदर्य, अपत्य, शिक्षा, मृत्यू अशा अनेक विषयांवर तत्त्वज्ञान सांगतो.
जेव्हा एक श्रीमंत माणूस त्याला दातृत्वाबद्दल विचारतो तेव्हा तो सांगतो की,
‘तुम्ही जेव्हा धनदान करता तेव्हा तुम्ही काहीच देत नाही. पण जेव्हा तुम्ही मनापासून प्रेमानं देता, तेव्हा तुम्ही सर्व दान केलेलं असतं.’
प्रेमाबद्दल जिब्रान सांगतो,
‘प्रेम कशाचीही मालकी मागत नाही आणि त्यावरही कुणी मालकी सांगू शकत नाही. कारण प्रेम हे स्वतःमध्येच परिपूर्ण आहे.’
बुद्धी आणि विकार यांबद्दल सांगताना तो लिहितो, ‘तुमचा आत्मा हे एक रणांगण आहे. या रणांगणावर तुमची बुद्धी आणि तुमची निर्णयशक्ती यांचं तुमच्या विकाराशी आणि भुकेशी सतत युद्ध चालू असतं. म्हणून तुमची निर्णयशक्ती आणि भूक या दोन्ही वृत्तींना तुम्ही तुमच्या पाहुण्याप्रमाणं तुमच्या घरी वागवावं. तुम्ही तुमच्या दोन पाहुण्यांमध्ये भेदभाव करणार नाही, कारण एकावर तुम्ही जास्त प्रेम केलं तर, दोघांच्याही प्रेमास तुम्ही वंचित होणार.’
किती सहज सुंदररित्या मांडलंय, नाही! जिब्रानला हे पुस्तक परिपूर्णरित्या लिहायला ११ पेक्षा अधिक वर्ष लागली. जिब्रानला तत्त्ववेत्ता, बंडखोर, धार्मिक, पाखंडी, गूढ, प्रसन्न अशा विविध विशेषणानं ओळ्खलं जाई. काहींनी जिब्रानची पुस्तकं जाळली तर काहींनी त्याच्या पुस्तकांचं खूप कौतुक देखील केलं. पण आजपर्यंत लिहिल्या गेलेल्या उत्कृष्ट आध्यात्मिक पुस्तकांपैकी ‘द प्रॉफेट’ एक मानलं जातं.
जे. के. जाधव आणि भारती पांडे या लेखकांनी केलेले ‘द प्रॉफेट’ चे मराठी अनुवाद मी वाचले आणि जाधव यांनी केलेला अनुवाद मला जास्त आवडला किंवा अचूकपणे माझ्यापर्यंत पोहोचला.
खलील जिब्रानचे मला आवडलेले काही विचार पुढे देतेय.
‘तुमचं जे दु:ख आहे त्यातील जास्तीत जास्त दु:ख हे तुम्ही स्वत: निवडलेलं आहे.’
‘तुमच्या हृदयात जे अर्धवट निद्रिस्त अवस्थेत पहुडलेलं आहे त्याला जागं करण्यापेक्षा इतर काही तुम्हाला कुणी शिकवू शकत नाही.’
‘सत्य हे आहे, की एक जीवन हे दुसऱ्या जीवनाला दान करत असतं, आणि तुला वाटतं की, तूच दान करत आहेस तर तू दाता नाहीस, पण तू फक्त एक साक्षीदार आहेस.’
‘तुमच्या मुलांना तुमच्यासारखं करण्याचा खटाटोप करू नका. जीवनाचा प्रवाह हा कधी मागे वळत नसतो; किंवा भूतकाळाकडं बघतसुद्धा नसतो.’
‘वाईट हे दुसरं काही नसून जे चांगलं आहे त्याचा भुकेनं आणि तृष्णेनं घेतलेला बळी होय.’
जे स्वत:ला पापभीरू आणि सत्यवादी म्हणवतात त्यांच्याच साक्षीनं या जगात दुष्टकृत्ये घडत असतात.
‘जरा तुम्हाला खरोखरच मृत्यूविषयी सत्य जाणून घ्यायचं असेल तर जीवनाच्या प्रवाहात तुमचं हृदय उघडं करा. कारण जीवन आणि मृत्यू एकच आहे, नदी आणि समुद्र एकच असतो त्याप्रमाणं.’
जे. के. जाधव यांचं मराठी अनुवादित ‘द प्रॉफेट’ पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा
Leave a Reply