हे पुस्तक वाचण्याची एकच अट आहे. – ती म्हणजे वास्तवाने जखडलेले मन मोकळं करायचं, असं कधी असतं का? हा विचार जरावेळ बाजूला ठेवायचा आणि मग वाचायला घ्यायचं.
एखादा डांबरी रस्ता हा मुळात एखादी कच्ची मातीची पायवाट असतो. आता विचार करा की, एखादी मळकी, कच्ची, धुळीनं भरलेली मातीची पायवाट ही आत्ताच्या एखाद्या नवीन डांबरी रस्त्याची आई आहे आणि ती त्या डांबरी रस्त्याच्या खोल खोल आत, एखाद्या कप्प्यात अजूनही जिवंत आहे; आणि हे सगळं तुम्हाला स्वतः एक डांबरी रस्ताच सांगतोय. कसली भन्नाट कल्पना आहे ना?
किंवा असा विचार करा की, लाऊडस्पीकरवरच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाला कंटाळून देव स्वतः निवडणुकीत उतरलेत. आणि हे पाहून घाबरलेले राजकारणी देवांदेवांमध्ये, ‘तुम्ही भूमिपुत्र आहात, ते =मागाहून आलेत, त्यांची मंदिरं बघा कशी आहेत, तुम्हाला चांदीचा मखर, त्यांना सोन्याचा’, असं सांगत भांडण लावायचा प्रयत्न करत आहेत. किंवा हनुमानाला बोलतायत की, तू कसा ताटकळत उभा आणि तो गरुड बघ, आरामात बसलाय, वैगरे. पण या सगळ्या फुटपाडी राजकारणाचा सर्व देवांवर काहीही परिणाम होत नाही आणि ते सगळे देव-उमेदवार तुडुंब मतांनी निवडून येतात. मग ते भ्रष्टाचार हद्दपार करतात, उत्सवांचे स्वरूप बदलवतात, शाळा, दवाखाने सुरू करतात, सरकारी काम झटपट व्हायला लागतात आणि असा सकारात्मक बदल घडवून आपली सत्ता माणसातल्या देवमाणसांना देऊन सगळे देव परत देवळात निघून जातात.
विचार करूनच किती छान वाटतं ना! खरंच असं झालं तर किती सही होईल! खरंतर या सगळ्या प्रश्नांपेक्षा या अशा वेगळ्या कल्पना (मग त्या प्रत्यक्षात येवो न येवो!) मनात/डोक्यात येणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण, ही तुम्ही सृजनशील असण्याची खूण असते.
अनिल अवचट यांच्या ‘सरल तरल’ या पुस्तकात अशाच लहान मुलांच्या (आणि मोठ्यांच्याही) कल्पनाशक्तीला, सृजनशीलतेला वाव देणाऱ्या गोष्टींचा खजिना तुम्हाला सापडेल.
लहान मुलं फार सृजनशील असतात, त्यांना वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात, प्रश्न पडत असतात आणि ते आपल्या परीने त्याची उत्तरं देखील शोधतात. खरंतर हे खूप गरजेचं असतं. ही कल्पनाशक्ती त्यांच्या मानसिक विकासासाठी अतिशय गरजेची असते. त्यातूनच ते पुढील आयुष्यात भावनिक आणि मानसिक समस्यांना खंबीरपणे सामोरे जाऊ शकतात, त्यांची आकलनशक्ती, आत्मविश्वास यात कमालीची वाढ होते आणि ते नवनवीन कल्पना पटकन आत्मसात करून त्यावर काम करू शकतात.
या पुस्तकातील अशा कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या गोष्टी वाचून लहान मुलांना भेट म्हणून द्यायला हे पुस्तक घेतलं, पण मलपृष्ठावर लिहिलंय त्याप्रमाणे हे पुस्तक फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही आहे. ज्याचे मन सरल आहे, आणि प्रसंगी तरल होऊ शकते, त्या सगळ्यांसाठी आहे हे पुस्तक.
अवचट सरांनी २-३ पानांच्या या छोट्या छोट्या सोप्प्या साध्या शब्दांत मांडलेल्या गोष्टींमधून कल्पनेतले आणि कल्पनेपल्याडचे विश्व अतिशय सुंदररित्या उभे केले आहे. या कल्पनेतल्या गोष्टी जरी असल्या तरी त्यांना सद्यस्थितीची जोड आहे. आत्ताच्या काळात घडणाऱ्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेतून कल्पकतेने बघितलं गेलं आहे. त्यांच्या चुकीच्या वृत्तीवर भाष्य केलं आहे. या गोष्टींमधल्या विश्वात भांडण आणि मारामाऱ्या यांपेक्षा मैत्री, आदर प्रेम यांसारख्या भावनांचं महत्व सांगितलंय. ते वाचता वाचता आपल्यालाही अशा सुंदर, स्पर्धा नसलेल्या जगाचा भाग व्हावंसं वाटतं आणि काय माहीत, कदाचित हे पुस्तक वाचता वाचता, आपल्या आचरणाने आपण तसं जग स्वतःच्या आजूबाजूला निर्माण ही करू शकतो.
लहान मुलांना तर हे पुस्तक वाचताना वाचनाची आवड निर्माण होईलच पण तुम्हीदेखील या गोष्टी वाचताना, त्यात हरवून जाताना तुमचे रोजचे प्रश्न, तुमच्या काळज्या, समस्या थोड्या वेळासाठी का होईना नक्कीच विसरून जाल.
खरंतर मोठ्यांनाही प्रश्न पडतात,कल्पना सुचतात, पण ते, ‘चल! असं थोडीच होतं!’, असं स्वतःलाच समजावत ती कल्पना बाजूला सारतात आणि मग एका साच्यामध्ये अडकून जात स्वतःतील लहानपणीची सृजनशीलता हरवून टाकतात.
काहींना कदाचित या फक्त साध्या गोष्टी वाटतील लहान मुलांसाठी लिहिलेल्या. पण मोठ्यांनाही गोष्टींची भुरळ पडतेच की. त्यांनाही कधीतरी आपल्या उत्सुकतेचा मागोवा घेत असं झालं तर?, तसं असेल तर? असा विचार करायला आवडतोच ना!
तुम्हाला कधी असं वाटत असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचा.
पुढच्या वेळी कधी लहान मुलांना आणि सरल तरल मनाच्या मोठ्यांनाही, कोणतं पुस्तक भेट म्हणून द्यावं असा प्रश्न पडला तर अवचट सरांचं ‘सरल तरल’ हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
-अश्विनी सुर्वे.
पुस्तक विकत घेण्याची लिंक इथे देत आहे.
अनिल अवचट सरांची इतर पुस्तकं खालील प्रमाणे
Leave a Reply