आयुष्यात मनाची दोलायमान स्थिती अनेकदा होते. त्यात तुम्ही खूप जास्त विचार करणारे असाल तर मग अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही (पण ज्या तुम्हाला फार मोठ्या आणि महत्वाच्या वाटत असतात) ‘हे करू की ते करू’ अशी अवस्था होते.
मोठं होत असताना तर आपल्या निर्णयांची जबाबदारीही पूर्णतः आपल्यावर येते. आणि जेवढी मोठी जबाबदारी तेवढा मोठा मनावर ताण आणि त्याचे दुष्परिणाम.
काही निर्णय असे असतात ज्यामुळे आपल्या स्वतःच्या कामावर, प्रगतीवर, आयुष्यावर किंवा कुटुंबावर परिणाम होणार असतात तर काही निर्णयांमुळे आपल्या किंवा इतरांच्या आयुष्याला वेगळी कलाटणीच मिळते. अशावेळी निर्णय घेणाऱ्याची कसोटीच लागत असते.
अनुभवांना मोकळेपणाने स्वीकारण्याने निर्णयक्षमता वाढते हे आपण बघतोच. ही ठाम निर्णय घेण्याची क्षमता जशी आपण एखाद्या परिपक्व व्यक्तीच्या अनुभवातून शिकू शकतो तसेच काही पुस्तकांमधूनही समजून घेऊ शकतो.
अशाच काही पुस्तकांची माहिती पुढीलप्रमाणे-
- निर्णय घ्यावा कसा – शिवराज गोर्ले
साहित्याच्या अनेक प्रांतांमध्ये प्रतिभाशाली मुशाफिरी करणाऱ्या शिवराज गोर्ले यांच्या या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि नाव पाहूनच खात्री पटते की हे पुस्तक योग्य निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणार.
लेखक म्हणतात की, माणूस हा एकमेव असा प्राणी आहे, जो स्वहिताचा विचार करू शकतो तसा अविचारही करू शकतो. म्हणजे अनेकदा कळतंय पण वळत नाही अशी अवस्था असते. अनेकदा निर्णय अशा दोन गोष्टींमध्ये घ्यायचा असतो ज्यातील एक महत्वाची असते आणि दुसरी प्रिय! बऱ्याचदा आपण प्रिय गोष्टींची निवड करतो आणि इथूनच समस्यांना सुरूवात होते.
सुखद आणि हितकर या गोष्टींमधला सूक्ष्म फरक सगळ्यांना समजला नाही तरी निसर्गतः प्राप्त झालेल्या विवेकाच्या आधारे सगळ्यांना योग्य निवड करता येऊ शकते आणि हीच गोष्ट खुमासदार शैलीत असंख्य उदाहरणांच्या सोबतीने उलगडली आहे. अचूक निर्णयांमागचं रहस्य खुलं करणारं मराठीतलं पाहिलं वहिलं पुस्तक म्हणजेच – निर्णय घ्यावा कसा?
- आपण सारे अर्जुन – वपु काळे
एक वेगळ्याच प्रकारची पुस्तकं असतात बघा, ज्याचं कुठलंही पान काढून वाचायला सुरुवात करावी आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत, तसंच हे पण, ‘आपण सारे अर्जुन’. यात प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही आहे.
वपु म्हणतात, ‘एखादी व्यक्ती एखादे वेळेस अनपेक्षितपणे वागली तर ती अपरिचित वाटू लागते. याला आई देखील अपवाद नाही. हा अपेक्षाभंगाचा क्षणच खरा प्रकाशाचा क्षण आहे. इतर वेळी तर आपण अंधारातच असतो. अर्जुनासारखे.. गोंधळलेले.. श्वास आपोआप घेतला जातो म्हणून; नाहीतर तो पण घ्यावा की नाही या गोंधळात पडलो असतो आपण..’
आपलं आयुष्य महाभारतापेक्षा वेगळं नाही. आपण सारे अर्जुनच आहोत. अर्जुन विचारी आहे, ह्यात शंकाच नाही; पण कितीही विचारी, विचारी म्हटलं, तरी शेवटी कृतीचा एक क्षण उगवावा लागतो
अर्जुन म्हणजे नक्की कोण? ज्याला सगळं येत असून, समजत असूनही, काही क्षणांमध्ये नक्की काय करावं हे समजत नाही. आपलंही तसंच आहे. असा क्षणोक्षणी होणाऱ्या आपल्यातल्या अर्जुनासाठी आहे हे पुस्तकं… नक्की वाचा. पुस्तक वाचताना पेन्सिल घेऊन बसा. गरज लागेल.
या पुस्तकाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.
- स्मार्ट निर्णय कसे घ्यावे? – मनोज अंबिके
पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखक विचारतात की, ‘निर्णय बरोबर की चूक, हे कशावर अवलंबून असतं?’ १. निर्णयावर २.परिणामांवर ३.परिस्थितीवर ४.की अजून वेगळं काही? प्रत्येकाचं यावर नक्कीच वेगवेगळं मत असेल.
पुस्तकात निर्णय घेण्यापासून त्याचं नियोजन करण्यापासून ते त्या निर्णयांची जबाबदारी कशी घ्यावी याचं परिपूर्ण मार्गदर्शन केलं आहे. मनोज अंबिके हे तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक व लेखक आहेत.
तुम्हाला या पुस्तकातून अनेक तंत्रं, टेक्निक्स, पद्धती, मार्ग आणि सूत्रं कळतील आणि त्या सगळ्यांचा उपयोग निर्णय घेण्याचा प्रक्रियेत होईल. काही सूत्रं आणि तंत्रं निर्णय कसा घ्यावा हे सांगतील आणि काही निर्णय घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी व कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची गरज नाही हे सांगतील.
लेखक म्हणतात, ‘इतिहास त्यांना माफ करतो जे चुकीचे निर्णय घेतात. पण इतिहास त्या लोकांना कधीच माफ करत नाही, ज्यांनी निर्णय घेतलेच नाहीत.’
- डिसिजन्स – कौशल्य ठाम निर्णय घेण्याचं – डॉ. राजेंद्र बर्वे
मनातले लहान-मोठे संभ्रम, गोंधळ आणि अनिश्चितता यामुळे आपण निर्णय घेऊ शकत नाही. या सगळ्याचा मानसिक ताण आपल्या मनावर होत असतो. आयुष्यात निर्णायक क्षण अनेक असतात. काही एकदम चॅलेंजिग तर काही फुटकळ असतात. पण ‘नोकरी की व्यवसाय’, ‘विवाहात तडजोड की घटस्फोट’, ‘जीवनसाथी कोण?’ अशा महत्वाच्या कठीण प्रश्नांची उत्तरं शोधावीच लागतात. अशावेळी लॉजिक, समंजसपणा या गोष्टी माहीत असूनही सोबत करत नाहीत आणि आपण एकटं पडतो.
अशा काही एकट्या क्षणीच या पुस्तकातल्या विविध लघुकथांमधून ‘आरजी’ आपल्यासमोर प्रकट होतात आणि आपल्या प्रश्नांची उकल करतात. आरजी हे एक काल्पनिक पात्रं आहे जे विचारांच्या गुंत्यात हरवलेल्यांना निर्णायक साथ देत परिस्थितीला चेकमेट करण्याची हिंम्मत देतात.
प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे ‘डिसीजन्स’ या नावाने लोकप्रभा साप्ताहिकामध्ये एक सदर लिहीत होते, त्याचं हे पुस्तकरूप आहे. पुस्तकात दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक प्रश्नांवर समर्पक उत्तरं दिली आहेत.
डॉ. राजेंद्र बर्वेंचं ‘नातं दोघांचं’ या वैवाहिक जीवनासाठी मार्गदर्शक असणाऱ्या पुस्तकाबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- योग्य निर्णय कसे घ्यावे – डॉ. विजय अग्रवाल
बेस्ट सेलर ठरलेल्या या पुस्तकात लेखक सांगतात की, आपण जे काही असतो, ते आपण भूतकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे असतो आणि आपण जसे असतो तसेच आपले निर्णय असतात. ज्याप्रमाणे आपल्या शरीरात रक्तप्रवाह चालू राहण्यासाठी आपण श्वास घेतो, त्याप्रमाणेच जीवनात कर्मप्रवाह सुरू राहण्यासाठी आपण निर्णय घेत असतो.
डॉ. विजय अग्रवाल यांनी केंद्रीय सेवेत विविध वरिष्ठ पदांवर विविध ठिकाणी काम केले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांचे खासगी सचिव म्हणून 10 वर्षे त्यांनी काम केले होते. आपल्या अनुभवातून त्यांनी योग्य निर्णय कसे घ्यायचे, याबद्दल मार्गदर्शन केले आहे. अयशस्वी आणि यशस्वी माणसांमध्ये एकच फरक असतो, तो म्हणजे निर्णय घेण्याचा.
लेखक सांगतात, आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात ही निर्णयाने होत असते आणि आपली प्रत्येक क्रिया ही निर्णयाची गुलाम असते. त्यामुळे नो निर्णय म्हणजे नो ऍक्शन आणि अनिर्णय म्हणजे एकाच जागेवर थांबणे.
वेगवेगळ्या केस स्टडीजमधून लेखक, निर्णयाचे महत्व, निर्णायक तत्व, निर्णय घेण्याचा पद्धती, निर्णय चुकीचे का होतात, संकटकालीन निर्णय, काय करावं, काय नको तसेच योग्य निर्णय घेण्याचा आनंद या विषयांवर मुद्देसूद विचार मांडतात.
महत्वाचे निर्णय घेताना उपयोगी पडतील अशा काही गोष्टी-
१. एखाद्या परिस्थितीमध्ये तुमच्या समोर असलेले सर्व पर्याय आणि तुम्हाला नक्की काय हवं आहे हे लिहून काढा. लिहिल्याने गोष्टी अजून स्पष्ट होतात आणि तुमचं अंतर्मन तुम्हाला नवीन कल्पना सुचवतं.
२. निष्कर्ष काढण्याआधी त्या निर्णयाचा तुमच्यावर व इतरांवर काय दूरगामी परिणाम होतील याचा परिपूर्ण विचार करा. परिस्थितीचा सारासार विचार करा.
३. भावनेच्या भरात लगेच निर्णय घेऊ नका. उपलब्ध पर्यायातून आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहचण्यासाठी कोणते पर्याय जास्त उपयोगी पडतील यांचा विचार करा.
४. या पर्यायांच्या चांगल्या-वाईट बाजूंचा विचार करून अंतिम निर्णय घ्या. तुम्ही एकदा घेतलेल्या निर्णयाबाबत प्रामाणिक आणि सकारात्मक रहा.
अशा प्रकारची माहिती तुम्हाला वाचायला आवडेल का, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!
आणि वाचतरहा! यशवंतव्हा!
वरील सर्व पुस्तकं विकत घेण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे –
अश्विनी सुर्वे
अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!
Leave a Reply