श्यामची आई – साने गुरुजी
आई-वडिलांसोबतच ‘श्यामच्या आई’ने केलेल्या संस्कारांमुळे मी तरलो/तरले असे सांगणारे अनेकजण भेटतील. मी देखील त्यातीलच एक. ‘श्यामच्या आई’ने कितीतरी पिढ्या घडवल्या पण फक्त मुलांवर मूल्यसंस्कार केले असं नाही, तर मोठ्यांमध्येही ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’, ‘सावकारी किंवा जोर-जबरदस्ती करून आलेलं धन टिकत नाही’ हे विचार घट्ट रुजवले.आजही कधीतरी एखादं उदाहरण देताना, ‘श्यामच्या आई’त कसं सांगितलंय..’ किंवा ‘श्यामच्या आई’ने सांगितलंय ना,..’ असं म्हणून तुम्ही वाक्याची सुरुवात करत असाल तर हे पुस्तक, या कथा आणि त्यातले संस्कार तुमच्यात खोलवर रुजल्यात असं म्हणायला हरकत नाही. कारण एकदाच वाचलं तरी त्यातल्या कथा विसरता येण्यासारख्या नाहीतच. याचे श्रेय त्यातील कथांसोबत गुरुजींच्या अत्यंत साध्या, सरळ पण काळजाचा ठाव घेणारी हृदयस्पर्शी भाषेला देखील जाते.
पुस्तकाबद्दल अधिक महिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मॅक्झिम गोर्कि – आई
अनुवाद – डॉ. अरुण मांडे
आपल्या मुलाच्या काळजीने स्वतःला लढ्यात झोकून देऊन नव्याने आयुष्याला सामोरं जाणाऱ्या आईची ही कथा. एक केविलवाणी बायको, काळजीग्रस्त आई ते मुलाचे विचार पटल्यामुळे खंबीरपणे त्याला पाठिंबा देत त्याच्या कार्यामध्ये सहभागी होत त्याचा लढा सुरू ठेवत इतर लोकांसाठी आदर्श बनलेल्या आईचा हा प्रवास.
फक्त पुस्तकं वाचली, कामगारांना सत्य सांगणारी पत्रकं वाटली म्हणून मुलाला अटक होईल या काळजीने घाबरलेली आई ते ‘तुला हे जमेल ना!, घाबरणार नाहीस ना!’ असं विचारल्यावर चिडणाऱ्या आणि ‘आई, तुला जेलमध्ये जावं लागतंय’ असं सांगितल्यावर, ‘मला त्याची पर्वा नाही!’ असं ठामपणे सांगणाऱ्या, अनेक लोकांसमोर खंबीरपणे भाषण देणाऱ्या, त्यांना प्रेरणा देणाऱ्या आईचा हा प्रवास कमालीचा भारावणारा, थक्क करणारा आणि प्रचंड प्रेरणादायी आहे.
पुस्तकाबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कहाणी लंडनच्या आजीबाईंची – सरोजिनी वैद्य
या निरक्षर पण कष्टांच्या जोरावर शून्यातुन जग निर्माण करणाऱ्या, स्वबळावर परदेशात अनेक घरं घेणाऱ्या, तिथली एक प्रसिद्ध आणि महत्वाची व्यक्ती होणाऱ्या, परदेशात आपल्या संस्कृतीचं जतन करणाऱ्या, कित्येकांचे संसार बसवणाऱ्या, अनेकांची आई-आज्जी होणाऱ्या, लंडनच्या मऱ्हाटमोळ्या आजीबाईंची ही कहाणी प्रचंड प्रेरणादायी आणि अवाक् करणारी आहे.
आजीबाईंचा कष्टावर फार विश्वास होता. त्या त्यांच्या मुलींना नेहमी सांगायच्या की, ‘कष्टानं कुssणी मरत नसतं! माणसाने खूप कष्ट करून, खूप सोसून, स्वतःला गरिबीतून सोडवलं पाहिजे.’
पुस्तकाबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी वनवासी – सिंधुताई सपकाळ
‘वनवासी हा शब्द दुहेरी अर्थाने लागू पडतो. एक तर वनात वात्सव्य करतो, त्याला वनवासी म्हणतात किंवा ज्याला जगाच्या पाठीवर कुणीही नाही अशी व्यक्ती वनवासी समजली जाते. मला दोन्हीही शब्द लागू पडतात म्हणून मी वनवासी’, असं म्हणणाऱ्या सिंधुताई सपकाळ हजारोंच्या आई झाल्या.
गावकऱ्यांसाठी दिलेल्या पहिल्या लढ्यातील यशामुळे सिंधुताई घराबाहेर पडल्या आणि त्यानंतर रोज नवीन लढा आणि त्यासाठीचा त्यांचा संघर्ष यातून त्यांची वाटचाल चालूच राहिली. माईंचं आत्मचरित्र हे प्रत्येक निराश झालेल्या मनांमध्ये काहीतरी करून दाखवण्याची ऊर्जा जागवतं.
पुस्तकाबद्दल अधिक महिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ही पुस्तकं तुम्ही वाचाच पण तुमच्या आईलाही ती आवर्जून वाचायला द्या. आणि ‘ती’ तुमच्यासाठी सगळ्यात जास्त प्रेरणादायी आहे, हे सांगायला विसरू नका.
_______________________________
अश्विनी सुर्वे
अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!
Leave a Reply