कुठूनही तरंगत येतं एक नातं
आपल्यामधल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं…
तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी
आलाय का हो गंध… काही उमलण्याही आधी?
कसलं जबरदस्त लिहिलंय हे! कित्ती साधे सोप्पे शब्द पण ते मांडलेतच इतक्या तीव्रतेने की सरळ आपल्या हृदयाचा ठाव घेतात. खरंच! इतकं सुंदर लिहितो वैभव जोशी दादा. (एकेरी नावाने उल्लेख करतेय, कारण त्याच्या FANS ना तितका जवळचा वाटतो.) म्हणजे त्याच्या कविता वाचताना किंवा ऐकताना वाटतं की, ‘अरे, हे अस्संच सेम वाटतंय मलाही! आपल्याच मनातल्या भावना जाणून त्या सुंदर शब्दांत गुंफल्या आहेत!”
वैभव दादाच्या कविता वाचणं आणि त्यापेक्षाही त्या त्यालाच सादर करताना पाहणं हा एक भन्नाट अनुभव आहे. खूप खोल गर्भित अर्थ लाभलेले शब्द, ओळींमधला पॉज, त्याचा आवाज, एका लयीमधलं सादरीकरण, सगळंच इतकं भारावून टाकणारं आहे ना की तो अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही. एक प्रकारची सिग्नेचर स्टाईल आहे त्याची की नुसते शब्द ऐकले तरी कळतं की, हे वैभव जोशींच्या पद्धतीचं लिखाण आहे.(अर्थात, त्याआधी तुम्ही दादाला ऐकलं किंवा वाचलं असेल तर!)
मागच्या वर्षी रवींद्र नाट्यमंदिरला वैभव जोशी आणि संदीप खरेंचा ‘इर्शाद’ हा कार्यक्रम पाहण्याचा योग जुळून आला. मी तेव्हा पहिल्यांदाच वैभव दादाला ऐकलं, आणि पहिली रिऍक्शन होती, ‘आईशप्पथ! कसलंच भारी लिहिलंय यार!’ मला अजूनही त्यादिवशी त्यांनी सादर केलेल्या कविता, तो फील आणि त्याला मिळालेली रसिकांची दाद जशीच्या तशी लक्षात आहे.
‘हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून
कावरं बावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही…’
कार्यक्रमानंतर वैभव जोशींचं ‘मी… वगैरे’ आणि संदीप खरेंच “मी अन माझा आवाज'(त्याबद्दल नंतर लिहिणंच.) विकत घेतलेलं. पुस्तकं घ्यायला लाईन खूप होती आणि मला प्रती संपतील की काय याची धाकधूक होती. पण मला मिळालेली शेवटची कॉपी होती ती. किती सही वाटलेलं.
‘मी… वगैरे’ हा कवितासंग्रह मला त्यातल्या कवितांमुळे तर आवडला आहेच पण त्यासोबतच या पुस्तकाच्या बांधणीमुळे आणि शब्दांच्या मांडणीमुळे देखील प्रचंड आवडला आहे. हे पुस्तक असं नेहमी दिसेल अशा दर्शनी भागात ठेवावं आणि कधीही एखादं पान उघडावं, समोर आलेली गझल किंवा मुक्तछंदातली किंवा एका लयीत जाणारी कविता वाचावी, त्याचा रसास्वाद घेत त्या कवितेच्या शब्दांसोबत रमताना तुमच्या आठवणी जागवाव्यात आणि क्षणभर बाकी सगळं विसरून जावं असं आहे.
‘छेदून निघाल्या भिन्न दिशेला वाटा
पण विभिन्न पायी रुततो एकच काटा
सल एकच सलतो, कळते दोघांनाही
कळवळा असुनी हळहळायचे नाही’
‘मी… वगैरे’ मध्ये सोशल मीडियावरील प्रतिमेला भुलणाऱ्या, किंवा मूळ कलाकृतीवर बोलायचं सोडून इतर विषयांना फाटे फोडणाऱ्या इंटरनेटवरील प्रवृत्तीबद्दल आणि तात्पुरत्या देशप्रेमाबद्दल मार्मिकपणे लिहिलेलंही खूप आवडलंय.
‘मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं
थँक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं’‘भारत भारत म्हटले
की भारतीय होतो आम्ही
पडद्यावर राष्ट्रगीत दिसते…
उभे राहतो आम्ही’
तुम्ही कोणत्याही वयोगटातील असलात तरी, वैभव जोशींच्या कविता तुम्हाला भिडतातच आणि प्रत्येक वेळी नवा अर्थ सांगून जातात.
‘ऋतूचक्रच होते केवळ
नेमस्त दाटले होते
..
पण काय असे मेघांच्या
डोळ्यांत साठले होते
आभाळ नसावे, बहुधा
काळीज फाटले होते…’
अहाहा! सुंदर! वैभव दादाच्या कविता त्याच्याकडूनच ऐकण्याचा किंवा हे पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो अविस्मरणीय अनुभव आहे, तो तुम्हालाही अनुभवायला मिळावा असं मला खूप मनापासुन वाटतं. त्याच्या इंटरव्ह्यूज मधून नवकवींना शिकण्यासारखेही खूप काही असते.
जमलं तर हा अनुभव नक्की घ्या. खूप भारी वाटेल!
©अश्विनी सुर्वे.
सोबत पुस्तकाची लिंक देत आहे.
नुकताच वैभव जोशी दादाला झी चित्रगौरव २०२० चा आनंदी गोपाळ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यासाठी त्याचे खूप अभिनंदन आणि त्याला अशाच सुंदर रचना स्फुरत रहाव्यात या शुभेच्छा!
Leave a Reply