ती उंच होती. थोडीशी पाठीत वाकली होती. आयुष्यभराच्या काबाडकष्टांमुळं आणि नवऱ्याच्या हातचा मार खाण्यामुळं तिचं शरीर जीर्ण झालं होतं. घरात ती आवाज न करता चालायची, धक्का लागून काही पडू नये म्हणून एका बाजूला अंग चोरून चालायची. तिच्या सुरकुत्या पडलेल्या रुंद आणि अंडाकृती चेहऱ्यावर थोडीशी सूज होती, उजव्या भुवईवर एक खोल व्रण होता आणि तिच्या काळ्याभोर डोळ्यांत वस्तीतल्या इतर बायकांप्रमाणे दुखावल्याची खिन्न छटा होती. ती मार्दव, केविलवाणी आणि शरणागत अशीच दिसायची. तिचं नाव पेलिगिया.
त्यांचं घर रशियातील अनेक कामगार वस्त्यांपैकी एका धुरकट आणि तेलकट वस्तीच्या एका टोकाला थोड्याश्या उतरत्या व दलदलीच्या जागेवर होतं. तिचा नवरा मिखाईल व्लोसाव त्या वस्तीतल्या इतर कामगारांसारखाच कारखान्यात काबाडकष्ट करायचा आणि अतिश्रमाने आलेला थकवा, चीड बाहेर काढण्यासाठी दारू पिऊन तर्र व्हायचा, मारामाऱ्या करायचा, बायकोला चिचुंद्री म्हणत ओरडायचा. त्याच्याकडे बघणाऱ्याला तो सावजावर तुटून पडणारा एखादा निर्दयी हिंस्र पशूच वाटायचा. त्याचं मरणही खूप त्रासदायक होतं. पण त्याच्या मरण्याने ‘पेलिगिया’ मात्र सुटली.
नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा ‘पॉवेल’ने काम करावं आणि सरळ मार्गाने चालत कुटुंब नीट चालवावं एवढीच तिची इच्छा होती. पण वडिलांच्या मृत्यूनंतर पॉवेल दारू प्यायला लागला, बापासारखा वागायला लागला आणि त्याला इलाज नव्हता कारण त्या वस्तीत दारूच्या गुत्त्याशिवाय विरंगुळ्याचं इतर कोणतंही साधन नव्हतंच.
त्या कामगारांचे सगळे दिवस कारखान्याने गिळून घेतले होते, यंत्रांनी माणसांना पिळून काढले होते. रोजचा एक दिवस संपणे म्हणजे कामगारांचे मृत्यूच्या दिशेने पाऊल टाकणे होते. त्या स्थितीत आयुष्य जगणारा माणूस ५० वर्ष जगून मरून जात असे. एखादा नवीन माणूस त्यांच्या वस्तीत येऊन त्यांना या कारखान्यांच्या हुकूमशाहीविरुद्ध बोलायला, बंड करायला सांगे, पण ते कामगार त्या माणसापासूनच दूर जात.
परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्यात कधीही बदल होणार नाही आणि आयुष्य असंच खडतर असणार आहे, याची त्या कामगारांना सवय झालेली. बदल झालाच तर कष्टांचं ओझं आणखीनच वाढेल, अशीच त्यांना भीती वाटायची आणि या सगळ्यावर उपाय म्हणून ते कामगार दारूच्या गुत्त्यात बसत किंवा मित्रांच्या घरी पार्ट्या करत. यात स्त्रियांची अवस्था काय असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण आपल्या मनातील असंतोष बाहेर काढण्यासाठी ते कामगार आपल्या बायकांवर अरेरावी करत.
पण तरीही पॉवेलने तसे वागू नये असेच पेलिगियाला वाटे. एक दिवस पॉवेल तोल सांभाळता येत नाही, अशा स्थितीत घरी आल्यावर ती त्याला बोलली, “तू पिऊ नकोस. तुझा बाप तुझ्या वाटणीची दारू ढोसून गेलाय. त्यानं छळलंयही तेवढंच मला. तू तरी माझ्यावर दया कर.”
त्यानंतर काही दिवस पॉवेल इतर तरुणांसारखाच वागत होता पण त्याला ते आवडत नव्हतं. दारूने त्याला त्रास व्हायचा. हळूहळू त्याने मित्रमंडळीमध्ये जाणं-येणं कमी केलं. त्याने पुस्तकं वाचन वाढवलं होतं. तो जास्तीत जास्त गंभीर, अस्वस्थ दिसायला लागलेला पण त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा ठामपणा आलेला.
पेलिगिया आपल्या मुलाचं निरीक्षण करतच होती. तो हट्टीपणाने आणि निग्रहाने नेहमीचा मार्ग सोडून कुठल्यातरी वेगळ्या वाटेवरून जात आहे, याची तिला जाणीव होत होती आणि त्यामुळे ती अस्वस्थही होत होती.
शेवटी एक दिवस तिने पॉवेलला याबद्दल विचारलंच. त्याने सांगितलं की, ‘मी वाचतोय त्या पुस्तकांवर सरकारनं बंदी घातलीयं कारण कामगारांच्या परिस्थितीचं सत्य यामध्ये मांडलय. ही पुस्तकं गुप्तपणे छापली जातात आणि माझ्याकडे ही कुणाला सापडली तर सत्य जाणून घेतल्याचा आरोपाखाली ते मला तुरुंगात टाकतील.’
मुलांची काळजी करणाऱ्या कोणत्याही इतर आईसारखीच तिलाही मुलाची चिंता वाटली, श्वास कोंडल्यासारखा झाला. पण कोणत्याही परिस्थितीला निमूटपणे शरण जायची सवय असल्यामुळे तिने मुलाला विरोध केला नाही. फक्त मूकपणे अश्रू ढाळत राहिली.
पण जेव्हा पॉवेल तिला बोलला, ‘रडू नकोस. कसलं आयुष्य जगतेयंस तू? काय सुख मिळालं तुला? माझा बाप तुला मारायचा, तुमच्या दारिद्र्याचा राग तो तुझ्यावर काढायचा. त्याला समजत नव्हतं की, कारखाना फक्त त्यांना पिळतोय. कारखाना वाढतोय, पण कारखाना वाढवणारी माणसं मरतायत. आत्तापर्यंत एकतरी आनंदाचा प्रसंग आठवतोय तुला?’ तेव्हा त्या प्रश्नांवर तिच्याकडे सकारत्मक उत्तर नव्हतं. पण पॉवेलचं ते बोलणं ती विस्मयाने ऐकत होती. असे विचार असलेल्या मुलाची तिला काळजी आणि अभिमान दोन्ही वाटत होतं. आईबद्दल, स्त्रियांबद्दल असा विचार.. किंबहुना त्यांचा विचारही कोणी तोपर्यंत केला नव्हता.
तिला काहितरी वेगळीच जाणीव होत होती. पहिल्यांदा तिच्या व्यथित आणि पोळलेल्या हृदयावर कुणीतरी मायेची फुंकर घालत होतं. तिची तारुण्यातली बंडखोरीची, असंतोषाची भावना उचंबळून आली. आयुष्य इतकं खडतर का? त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही का असे प्रश्न तिला पुन्हा पडले.
त्या प्रश्नांसोबतच आपल्या मुलाला पकडून नेतील, अटक करतील याची काळजीही तिला वाटत होती. त्याचा मार्ग तिला नीट कळत नव्हता पण पॉवेल मात्र त्याच्या क्रांतीच्या मार्गावर फार पुढे गेला होता.
१९०७ साली म्हणजे सुमारे शंभर वर्षे आधी रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर लेखक मॅक्झिम गोर्कि यांनी लिहिलेली ‘आई’ ही प्रसिद्ध कादंबरी. याचा मराठी अनुवाद डॉ. अरुण मांडे यांनी केला आहे.
रशियन क्रांती, मालकवर्ग व कामगारांमधील संघर्ष, हुकूमशहा झारच्या विरोधात उठाव करण्यासाठी कम्युनिस्ट तरुणांचे प्रयत्न, त्यांचा होणारा छळ, त्यांच्यावरील सरकारचा दबाव, कारखान्यांसाठी कष्ट करत, खितपत मरणारे कामगार, त्यांच्या मनातली भीती, असंतोष आणि या सगळ्यामध्ये आपल्या मुलाच्या काळजीने स्वतःला लढ्यात झोकून देऊन नव्याने आयुष्याला सामोरं जाणाऱ्या आईची ही कथा.
एक केविलवाणी बायको, काळजीग्रस्त आई ते मुलाचे विचार पटल्यामुळे खंबीरपणे त्याला पाठिंबा देत त्याच्या कार्यामध्ये सहभागी होत त्याचा लढा सुरू ठेवत इतर लोकांसाठी आदर्श बनलेल्या आईचा हा प्रवास.
फक्त पुस्तकं वाचली, कामगारांना सत्य सांगणारी पत्रकं वाटली म्हणून मुलाला अटक होईल या काळजीने घाबरलेली आई ते ‘तुला हे जमेल ना!, घाबरणार नाहीस ना!’ असं विचारल्यावर चिडणाऱ्या आणि ‘आई, तुला जेलमध्ये जावं लागतंय’ असं सांगितल्यावर, ‘मला त्याची पर्वा नाही!’ असं ठामपणे सांगणाऱ्या, अनेक लोकांसमोर खंबीरपणे भाषण देणाऱ्या, त्यांना प्रेरणा देणाऱ्या आईचा हा प्रवास कमालीचा भारावणारा, थक्क करणारा आणि प्रचंड प्रेरणादायी आहे.
सुरुवातीला अटक झालेल्या मुलाला वाचवण्यासाठी म्हणून या क्रांतिकारी लढ्यात सहभागी झालेल्या, वेळोवेळी आपल्या भावना आणि श्रद्धेवर होणारे घाव सोसणारी आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस जोरजोरात ठोसे मारत असतानाही, तोंडातून रक्त येत असतानाही, कामगारांसाठी लढणारी ही आई, ‘कामगारांनो उठा! मनानं एक व्हा! तुमची शक्ती दुसऱ्यांना देऊ नका, जगातल्या साऱ्या वस्तूंचे तुम्ही निर्माते आहात, तुमची शक्ती एकत्र करा, तरच तुम्ही सगळं जग जिंकाल!’ असं ओरडून सांगते तेव्हा खरंच आपल्या मनामध्येही चैतन्याची, काहीतरी करून दाखवण्याची ज्योत उजळवते.
आपल्या कम्फर्ट झोन(चाकोरी) मधून बाहेर पडल्याशिवाय कोणतेही परिवर्तन होत नसते हा खूप महत्वाचा धडा या कादंबरीतून घेण्यासारखा आहे असं मला वाटतं. ‘आई’ ही केवळ एका क्रांतिकारी लढ्याविषयीची कादंबरी नाही. चळवळीमध्ये ओढली गेलेली साधी साधी माणसं अंतर्बाह्य कशी बदलून जातात, हे या कादंबरीत परिणामकारकरित्या दाखवलं आहे. आणि कोणता ना कोणता लढा तर आजही आपण प्रत्येकजण लढत असतोच. या लढ्यात आपण कुठे कमकुवत पडलोच.. तर मॅक्झिम गोर्किची ही ‘आई’ आपल्याला प्रेरणा आणि एक ठाम ध्येय निश्चित देऊ शकेल.
– अश्विनी सुर्वे.
बदल घडवून आणण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक, ‘आई’.
विकत घेण्यासाठी इथे click करा!
मॅक्झिम गॉर्कि यांच्याबद्दल थोडक्यात –
जन्म १६ मार्च १८६८ साली रशियातील नोवगोरोद (आत्ताचे गोर्कि) येथे झाला. त्यांचं बालपण फार खडतर होतं. स्वतःच्या मेहनतीने त्यांनी जमेल तेवढं शिक्षण घेतलं. औपचारिक शिक्षणाच्या अभावामुळे १६ वर्षीय मॅक्झिमला एका युनिव्हर्सिटीत प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर ते रशियात पायी 5 वर्ष फिरले. उपजीविका करण्यासाठी त्यांनी भांडी घासली, सामान विकले, हमाली केली, मासे पकडले, कारकुनी केली. या दरम्यान ते मार्क्सवादाने प्रभावित झाले. त्यांनी वृत्तपत्रात लिहायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांना क्रांतिकारी प्रचार करण्याच्या आरोपाखाली सरकारने अटक केलेली पण पुराव्याअभावी सोडून देण्यात आले.
त्यांच्या कथांमध्ये रशियन जनतेवर होणारी दडपशाही, छळ, दुःख, सामान्य व्यक्ती, गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांमधील संघर्ष यांचे चित्र दिसत असे. गोर्कि स्वाभिमानी, सदाचारी, स्पष्टवक्ते होते. राज्यकर्त्यांनी नेहमी प्रजेच्या हिताचा विचार केला पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यांनी आपल्या रचनांमधून तत्कालीन समाजात क्रांती घडविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.
Leave a Reply