khel marathi katha yashwant ho marathi blog

खेळ

सरका! सरकाss! बाजूला व्हा!
वॉर्डबॉयचा जोरात आवाज आला.
धावतच त्यांनी स्ट्रेचर आत आणलं.
लोकं नाकावर हात ठेवतंच बाजूला झाली.
पोलीस पण होते सोबत.
रुग्णाला कॅज्युअल्टीमध्ये नेलं.
त्याच्या साथीदाराला पेपर काढायला पाठवलं.
लोकं कुजबुजायला लागले.
‘बुडाला होता वाटतं!’
‘शीss बाई! कसला दारूचा भपकारा आला!’
‘अजून वास येतोय!’
इतरांनी माना हलवल्या.
नाकावर पुन्हा रुमाल धरले.
एकाने विचारलं,
‘दारू पिऊन जीव द्यायचा प्रयत्न का हो!’
‘हो, मग काय! तसंच असेल!
फॅडच आलंय आजकाल.
जरा काही मनाविरुद्ध गेलं,
की जातात जीव द्यायला.’
दुसऱ्याने जाणकारासारखं मत नोंदवलं.
‘आम्हाला पण काय कमी त्रास आहे?
पण हा असला काही विचार येत नाही, बुवा!’
तिसऱ्याने दुसऱ्याची री ओढली.
परत सर्वांनी माना हलवल्या.
आपापले कष्ट सांगायला लागले.
कोपऱ्यात सुंदर बसलेला.
खाली जमिनीवर.
गुडघे छातीजवळ घेऊन,
अंगाचं मूटकुळं करून.
डॉक्टरच्या येण्याची वाट बघत.
लोकांचं बोलणं त्याच्या कानावर येत होतं.
पण त्याचं लक्ष सगळं कॅज्युअल्टीकडे.
काय सांगतात डॉक्टर?
चंदन होईल ना बरा?
चंदन.
सुंदरचा जिगरी दोस्त.
एकत्रच होते कामाला.
जवळच राहायचे.
एकमेकांच्या घरी येणं-जाणं.
आज चंदनच्या ‘मुलाचा वाढदिवस.’
मुलाने फुटबॉलचा हट्ट धरलेला.
एकदम भारीतला हवा होता त्याला.
चंदन पैसे साठवत होता.
गेले बरेच महिने.
आज घेणार होता.
घरी जाताना.
पण मध्येच हे असं झालं.
लोकांची कुजबुज वाढत होती.
त्यांच्यातलाच एकजण बोलला,
‘अहो, आत्महत्या वैगरे नसेल काही.
दारुडा वाटतोय साला.
बेजबाबदार असतात अशी माणसं.
घरादाराची चिंता नाही.
कमवायची अक्कल नाही.
काही कामधंधा नाही.
दारू पिऊन कुठंही लोळत पडायचं.
आता पण पिऊन गटारात पडला असेल.
गटाराचा पण वास येतोय.
बघितलं ना!’
आता मात्र सुंदरला राहवेना.
तो ताडकन उठला.
डोळे लाल झालेले.
रागाने श्वास फुलला होता.
वसकन त्या माणसाच्या अंगावर गेला!
‘काय बोललाss?
दारुडा? गटारात पडलेला?
कामधंद्या नाय?
कुनी सांगितलं?
तुमी गेलंता बघायला?
सोताच्या मनानं काय पन सांगायचं?
हो! पिलेला तो दारू.
गटारातच पडलेला.
पन सोताच्या खुशीसाठी न्हाई.
तुमच्यासारख्या लोकांसाठी.
तुमच्यासाठी गटारात जातो तो!
तुमची घाण साफ करायला.
तुमचा मैला काढायला.
आम्ही तुमच्यासाठी कचऱ्यात जातो.
गटारात उतरतो.
मास्क नाई, ग्लव्हज नाईत.
कुठं लागतंय खुपतंय बघत नाई.
सोताच्या जीवाची पर्वा परवडत नाई.
आन तुमच्याकडनं काय मिळतं?
नाकावर रुमाल? किळसवानी नजर?
गटाराच्या निसत्या वासानं मळमळत तुमाला.
आमी तर गटारातच जातो.
आमचं कसं व्हत असंल?
म्हनून प्यावी लागते दारू.
मुर्दाड बनवावं लागतंय सोताला.
मग कदीकदी जातो असा तोल.
गटारातच बुडतो आमच्यातला एखादा.
पर तुमाला काय?
तुमी नुसती घान करा.
आमालाच कचरा म्हनून बघा.
काय वाट्टेल त्ये बोला.
कचरा करनारं, पसरवनारं तुमी,
आनी सफाई करनाऱ्यालाच कचरेवाले म्हनता.
अजून काय बोलणार तुम्हाला?
जाऊदे!’
तो हताशपणे बोलला.
ऐकणाऱ्यांनी माना खाली घातल्या.
तेवढ्यात वॉर्डबॉयने आवाज दिला.
सुंदर पळतच तिकडे गेला.
चंदन शुद्धीवर आलेला.
आता नॉर्मल होता.
वेळेत बाहेर काढलं म्हणून बरं!
पण आराम करावा लागणार होताच.
त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं गेलं.
सुंदरने त्याच्या हातावर थोपटलं.
‘बरं वाटतंय का आता?’
चंदनने मान हलवली.
आपल्या पाकीटाकडे खूण केली.
सुंदरने विचारलं, ‘काय हवंय?’
‘पोराला फुटबॉल घ्यायचाय!
तू घे आन नेऊन दे घरी!
पाकिटातनं पैसे घे.’
चंदनने सांगितलं.
अगदी हळू एकेक शब्द उच्चारत.
त्याला नीट बोलायला जमत नव्हतं.
सुंदरने आपल्या मित्राकडे बघितलं.
काय करावं त्याला सुचेना.
सरकारी हॉस्पिटल होतं.
त्यामुळे काही खर्च नव्हता.
पण आता किती दिवस खाडा होईल,
काय माहित!
पुन्हा पगार कधी मिळणार.
तोपर्यंत चंदनचं घर कसं चालणार?
त्याने मनाशी काहीतरी ठरवलं.
पुन्हा एकवार चंदनच्या हातावर थोपटलं.
‘तुज्या घरी सांगून येतो,
काळजी करतील न्हाईतर.’
चंदनने मान हलवली.
‘आरं माझं पाकीट तर न्हे!’
असं सांगेपर्यंत सुंदर वॉर्डबाहेर पडलेला.
चंदनच्या घरी कळवलं.
घरी चंदनची बायको, थकलेले आई-वडील
लहान बहीण आणि ८ वर्षांचा गोड पोरगा.
सगळे काळजीत.
सुंदरने धीर दिला.
२ दिवसात घरी येईल सांगितलं.
पोराला फार समजलं नाही.
आपला पपा आज घरी येणार नाही.
एवढं कळलं.
नको मागायला हवा होता फुटबॉल वाटलं.
तो आज्जीच्यामागे तिचा पदर धरून लपलेला.
सुंदरने त्याला पुढे बोलावलं.
‘हे बघ, पपाने काय गिफ्ट पाठवलंय!’
पोरगा इकडेतिकडे बघत पुढे आला.
सुंदरने पिशवीतून फुटबॉल काढला.
छोट्याला हवा होता अगदी तस्साच.
तो आ वासून बघतच राहिला.
जाम खुश झाला!
फुटबॉल खेळतानाचा आनंद
आत्ताच त्याच्या डोळ्यात दिसायला लागला.
सुंदरने त्याला जवळ घेतलं.
बोलला,
‘खूप मोठा हो! खूप खेळ! शीक!
तुला आवडेल ते कर.
तुजी वाट आकाशाकडं जाऊ दे!
गटाराकडं नाही!’
– अश्विनी सुर्वे
ता. क. – सर्वांना हॅपी नॅशनल स्पोर्ट्स डे!

Image source – Pixabay.com


  पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून मी पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहे त्याची लिंक येथे देत आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य मी वेळो वेळी तुम्हाला सांगत जाईनच.


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile

Comments

11 responses to “खेळ”

  1. अबोली पवार Avatar
    अबोली पवार

    सत्य परिस्थिती आहे, वाचून डोळ्यात पाणी आलं डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला खूप छान, कथा वाटतच नाही. आपल्या अशा कथा वाचून समाजातील लोकांची मानसिकता बदलण्यास हातभार लागेल.

    1. admin Avatar
      admin

      होय अबोली, धन्यवाद 😇
      आमचा सुद्धा तोच प्रयत्न आहे. जास्तीत जास्त लोकांच्या मनात प्रकाश टाकता यावा यासाठीच हा ब्लॉग आहे.
      आमच्या कामाला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद आशा करतो की तुम्ही हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल.

  2. Shweta Surve Avatar
    Shweta Surve

    Danger..khup bhaari..No words.. we never know what other people are going through. मतपरिवर्तन करणारा, सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारा..घाणेरडी मानसिकता बदलून टाकेल असा लेख आहे. Thank you so much for this. Waiting for your another story🙏

    1. admin Avatar
      admin

      धन्यवाद श्वेता तुमच्या प्रतिक्रियेबद्दल,:)

      आमच्या कामाला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद आशा करतो की तुम्ही हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल

  3. Pratik Avatar
    Pratik

    एकदम मस्तच लिहिलंय यार.. खूप भारी..👌👏

  4. Sunil kamble Avatar

    घान मनच डिओ,स्प्रे वापरतात, पण आज तुम्ही तीच मने स्यानी टा इज करायचा प्रयत्न केला. समाज मन मते व्यक्त करून मोकळे होते,नंतर वास्तव जाणून फक्त हळहळ व्यक्त करते.कथा सुंदर आहे,असेच लक्षवेधी वास्तव वेगवेगळ्या विषयांवर मांडत रहा. पुनश्च अभिनंदन!!!

    1. admin Avatar
      admin

      धन्यवाद सुनीलजी:)
      या प्रोत्साहनपर शेऱ्यासाठी आभारी आहे
      लोभ असावा

  5. Gajanan Parab Avatar

    शब्दनं शब्द काळीज चिरुन जाणारा….
    सत्य परिस्थितीची जाणीव करुन देणारा….
    माणस निर्ढावलेली….
    यांच्या रुमालाला संपवलेल्या माणुसकीची घाण असते….

    1. admin Avatar
      admin

      धन्यवाद गजाननजी
      खूप आभारी आहोत 😀😇

  6. Rajesh Kulkarni Avatar

    टेरिफिक अदभूत नो वर्ड आपल्या घाणेरड्या मासिकतेवर चांगलेच बोट ठेवल

    1. admin Avatar
      admin

      Thank you Rajeshji 😇👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *