vachanchi aavad vadhavnaray 7 goshti

डुप्लीकेट पुस्तकं कशी ओळखायची?

अनेक नामांकित प्रकाशक आणि लेखकांनी आत्ता एकत्र येऊन पायरेटेड पुस्तकांविरोधात कारवाई सुरू केलेली आहे. याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चर्चा घडतच आहेत. यामधून अनेक वाचकांना डुप्लीकेट/ पायरेटेड पुस्तकं कशी ओळखायची हे माहीत नसल्याचं प्रामुख्याने दिसून येतंय. मूळ पुस्तकं आणि पायरेटेड/डुप्लीकेट पुस्तकांमधील फरक दर्शविणाऱ्या या काही महत्वाच्या गोष्टी.

  • कागदाची गुणवत्ता (क्वालिटी)

डुप्लीकेट पुस्तकांचा कागद हलक्या प्रतीचा, बऱ्याचदा खरखरीत आणि थोडा पिवळसर/तपकिरी असतो. अगदी जवळून पाहिल्यावर काही पुस्तकांवर काळे ठिपके दिसून येतात आणि मधली किंवा शेवटची पानं गहाळ असतात. तसेच काही काळाने पानं काळी पडतात.

  • बाईंडिंग

बाईंडिंग म्हणजे शिवण चांगले नसते त्यामुळे पाने पूर्ण नीट उलघडत नाहीत आणि काही काळाने विस्कळीत होतात. मूळ पुस्तकाची शिवण चांगली, योग्य मापात असते.

  • अक्षरं

अक्षरं विरलेली, नीट न उमटलेली असतात. फॉन्ट छोटा असतो. काही पुस्तकांमध्ये ओळी तिरप्या किंवा खाली-वर प्रिंट केलेल्या असतात, शाई पसरलेली असते आणि झेरॉक्स आहे हे सवयीने समजतं. मूळ पुस्तकात रंगीत चित्र असतील तर डुप्लीकेटमध्ये ती ब्लॅंक अँड व्हाईट झेरॉक्स काढल्यासारखी असतात.

  • मुखपृष्ठ

पुस्तकाचे कव्हर म्हणजेच मुखपृष्ठ, तळपृष्ठ स्पष्ट नसते आणि झेरॉक्स केल्यासारखे वाटते. मुखपृष्ठ जाड नसतं. मूळ पुस्तकांवर जी एक प्रकारची चमक असते, ती नसते. त्यावरील ब्लर्ब, लेखकाची माहिती, फोटो, इतर मजकूर फिकट, नीट उमटलेला नसतो.

  • ISBN नंबर

बऱ्याच डुप्लीकेट पुस्तकांवरील isbn नंबर चुकीचा असतो किंवा स्पष्ट छापलेला नसतो. Isbn चा बारकोड देखील चंदेरी नसतो तर सरळ झेरॉक्स काढल्यामुळे काळसर चौकोन दिसतो.

  • पुस्तकाचे वजन

डुप्लीकेट पुस्तकांचे वजन मूळ पुस्तकापेक्षा तुलनेने थोडे कमी असते कारण कागद हलक्या प्रतीचा असतो, कव्हर जाड नसतं आणि कमीत कमी पानांमध्ये जास्त मजकूर बसवलेला असतो.

  • किंमत

मूळ व डुप्लीकेट पुस्तकांमधील सर्वात महत्वाचा फरक म्हणजे त्यांच्या किमतीतील मोठी तफावत. छापील मूळ किंमतीपेक्षा डुप्लीकेट पुस्तकं फार कमी किमतीची असतात. (त्यामुळेच तर ती घेतली जातात आणि लेखकांचं, साहित्यनिर्मितीचं नुकसान होतं.

नोट – पुस्तकं स्वस्तात घ्यायची म्हणून जर तुम्ही पायरेटेड/डुप्लीकेट पुस्तकांचा पर्याय निवडत असाल तर कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त पुस्तकं कशी वाचायची’ हा ब्लॉग तुम्ही वाचलाच पाहिजे.

  • विकण्याचे ठिकाण

डुप्लीकेट पुस्तकं मुख्यतः रस्त्यांवर, स्टेशनबाहेर, फुटपाथवर विकली जातात. दुकानातील किंवा अमेजॉन सारख्या साइट्सवरून घेतलेली पुस्तकं डुप्लीकेट आहेत असं कळल्यास ती परत करून नवीन घेऊ शकता.

इंग्रजी पुस्तकांचा वाचकवर्ग मोठा असल्याने त्यातील बेस्ट सेलर पुस्तकांच्या पायरेटेड कॉपीज निघतात तेव्हा मूळ लेखकांना फार तोटा होत नाही. दुर्दैवाने मराठी साहित्य आणि लेखकांबाबत ही परिस्थिती नाही. अनेक प्रथितयश लेखकांनाही फक्त पुस्तकं लिहून चरितार्थ चालवता येत नाही. पुस्तकांसाठी करावं लागणारं संशोधन, साहित्य सामग्री आदि गोष्टींसाठी वेळ, पैसा दोन्ही लागतो. अशावेळी पुस्तकांच्या डुप्लीकेट किंवा पायरेटेड कॉपीज वाचक घेत असतील तर हा लेखकांच्या मेहनतीचा, बौद्धिक निर्मितीचा आणि लेखणीचा अपमान नाही का?

पायरेटेड पुस्तकांचा, प्रकाशन क्षेत्रातील सर्व घटकांवर, साहित्यनिर्मितीवर आणि भाषेवरही प्रतिकूल परिणाम होतो.

इथे मुद्दा इंग्रजी पायरेटेड पुस्तकं घ्यावीत आणि मराठी नाही, असा नाही. तर मुळात अनेक वाचकांना पायरेटेड पुस्तकं काय हे माहीतच नसतं यासाठी माहिती देणं/जनजागृती करणं आणि पायरसी रोखणं  हा आहे.

हे मुद्दे आवडले असतील तर ही माहिती जास्तीत जास्त वाचकांपर्यंत शेयर करा.

-अश्विनी यशवंत. 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *