‘मालकी हक्काची भावना हीच हिंसा आहे. आपण आपल्यालाच एक तिऱ्हाईत व्यक्ती म्हणून अंतरावरून, उंचावरून पाहू शकलो असतो, स्वतःचा स्वभावही बदलू शकलो असतो तर? खरंच ही शक्ती माणसाला लाभली असती, तर आयुष्यभर दुसऱ्या माणसात बदल घडवून आणण्याच्या खटाटोपात जिवाचं रान करण्याऐवजी त्यानं स्वतःत बदल घडवून आयुष्याचा बगीचा केला असता.’
काय लिहितात वपु! एकेक ओळ वाचताना या माणसाला हे सगळं कसं सुचलं असेल, कळलं असेल याचं आश्चर्य वाटत राहतं आणि ते मात्र स्वतः, स्वतःलाच अजूनही अज्ञात असल्याच सांगतात.
एक वेगळ्याच प्रकारची पुस्तकं असतात बघा, ज्याचं कुठलंही पान काढून वाचायला सुरुवात करावी आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत, तसंच हे पण, ‘आपण सारे अर्जुन’. यात प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही आहे.
‘आपण कुटुंबासाठी, इतरांसाठी किती कष्ट करतोय; पण त्यांना त्यांची किंमत नाहीये’ असं आपल्यातले अनेकजण कितीतरी वेळा म्हणाले असतील किंवा निदान तसा विचार तरी मनात आला असेल. पण यामध्ये आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याच सुखासाठी आहे हे आपण सोयीस्कररित्या विसरतो. म्हणूनच वपु लिहितात, ‘माणूस बिघडला’ ह्याचा थोडक्यात अर्थ तो ‘मी म्हणतो तसा वागत नाही’ हाच आहे.
वपु म्हणतात, ‘आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींना तरी किती ओळखतो? एखादी व्यक्ती एखादे वेळेस अनपेक्षितपणे वागली तर ती अपरिचित वाटू लागते. याला आई देखील अपवाद नाही. हा अपेक्षाभंगाचा क्षणच खरा प्रकाशाचा क्षण आहे. इतर वेळी तर आपण अंधारातच असतो. अर्जुनासारखे.. गोंधळलेले.. श्वास आपोआप घेतला जातो म्हणून; नाहीतर तो पण घ्यावा की नाही या गोंधळात पडलो असतो आपण..’
खरंच, वपु असं लिहितात ना..! मनाला भिडणारं आणि विचार करायला लावणार. या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर, प्रत्येक परिच्छेदात आपल्याला विचारमंथन करायला लावणारे आणि आपल्या अंतर्मनाशी जोडणारे विचार आहेत. आणि हे विचार त्यांनी महाभारतातील संदर्भ देत छोट्या छोट्या गोष्टींमधून मांडले आहेत, ज्या आपल्या आयुष्यातील घडामोडींसोबत चपखल बसतात आणि म्हणूनच अधिकच पटायला लागतात.
‘आपण सारे अर्जुन’ पुस्तकात वपु म्हणतात, ‘आपलं आयुष्य महाभारतापेक्षा वेगळं नाही. आपण सारे अर्जुनच आहोत. अर्जुन विचारी आहे, ह्यात शंकाच नाही; पण कितीही विचारी, विचारी म्हटलं, तरी शेवटी कृतीचा एक क्षण उगवावा लागतो.
हे पुस्तक विचार करायला भाग पाडतं, की, संसार खरंच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवंय? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? जीवन एखाद्या मैफिलीसारखं रंगवता येणार नाही का? आपल्या स्वकीयांसोबत युद्ध कसं करू म्हणणारा अर्जुन, सरळ सरळ ‘राज्यच नको, म्हणून युद्घ नको’ ह्या भूमिकेत का जात नाही?
आता याची उत्तरं हवी असतील, तर हे पुस्तक वाचायलाच हवं. मलादेखील खूप दिवस वाचायचं होतं हे .. लॉकडाऊन मध्ये वाचायला घेतलं आणि पहिला विचार आला, यार, याआधी का नाही वाचलं? असो.
अर्जुन म्हणजे नक्की कोण? ज्याला सगळं येत असून, समजत असूनही, काही क्षणांमध्ये नक्की काय करावं हे समजत नाही. आपलंही तसंच आहे. असा क्षणोक्षणी होणाऱ्या आपल्यातल्या अर्जुनासाठी आहे हे पुस्तकं… नक्की वाचा. पुस्तक वाचताना पेन्सिल घेऊन बसा. गरज लागेल.
महाभारतात, अर्जुनाचं एक मन त्याला युद्ध करायला सांगत होतं, तर दुसरं मन त्याला युद्धापासून परावृत्त करत होतं. तुमच्याही बाबतीत होतं का असं?
तुम्ही जाता का अर्जुनाच्या भूमिकेत कधी?
तुम्ही कसा निर्णय घेता अशावेळी??
खाली कमेंट मध्ये नक्की कळवा!
-अश्विनी सुर्वे.
पुस्तक विकत घेण्यासाठी खाली click करा
Leave a Reply