Marathi vachan Sanskruti Granthalay in maharashtra

जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने वाचन संस्कृती

अनेकांच्या आयुष्यात पुस्तकांची ओळख ग्रंथालय व ग्रंथपालांच्या सोबतीने होत असते. ‘हे पुस्तक तुझ्यासाठी उत्तम आहे’, ‘या विषयावर माहिती हवी असेल तर हे पुस्तक वाच’, ‘ही पुस्तकं तुम्ही वाचायलाच हवीत’ असं सांगणारे ग्रंथपाल तुमच्या आयुष्यात आले असतील तर तुम्ही भाग्यवानच. पुस्तकं तर गुरु आणि मित्र असतातच पण योग्य गुरूंपर्यंत तुम्हाला पोहचवणारेही गुरूस्थानी असतात. ‘ग्रंथालये ही लोकशाही मूल्य जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे’, असे ग्रंथालय शास्त्रांचे तज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे मत होते.

काळानुरूप ग्रंथालयं बदलत गेली. काही हायटेक झाली तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आणि काहींचे दरवाजे कायमचे बंद देखील झाले. सध्या ग्रंथलयांची स्थिती काय आहे?, वाचकांची मानसिकता कशी असते?, वाचनाची आवड वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? आणि पुस्तकांची काळजी कशी घ्यावी?’ यावर महाराष्ट्रातील विविध शहरांतील काही ग्रंथालयांच्या ग्रंथपालांच्या, सदस्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्याचा हा सारांश.

यामध्ये जसा आशावादी, प्रयत्नवादी सुर दिसतो तसंच टोकाचा निराशेचा सुरही उमटतो. वाचक म्हणून याला आपण किती जबाबदार आहोत, परिस्थिति कायम आशादायी राहण्यासाठी काय योगदान देऊ शकतो, हे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.

 

पुंडलिक पै, डोंबिवली

पै फ्रेंडस लायब्ररी

दुसरी-तिसरी ते सातवी-आठवी पर्यंत मुलं पुस्तकं वाचतातच. त्यानंतर कॉलेजपर्यंत व नंतरची काही वर्ष कमी होतं वाचन. मग चाळीशीनंतर पुन्हा वाचताना दिसतात लोकं. मग ती पुस्तकांच्या दुकानातून विकत घेतात पुस्तकं, ग्रंथलयातून किंवा ऑनलाइन घेतात, पण वाचतात. आणि मुळात वाचनाची प्रेरणा ही घरातल्या मोठ्या लोकांकडून येते. ते वाचत नसतील तर लहान मुलांना वाचनाची गोडी लागणं कठीण आहे जरा. त्यासाठी मुलांना पुस्तकांच्या दुकानात नेणं, वाचनालयात नेणं, पुस्तकांच्या प्रदर्शनाला नेणं, घरी पुस्तकं आणणं अशा गोष्टी करायला हव्यात. मुलंही कितीवेळ मोबाइल, कार्टून बघणार? त्यांनाही कंटाळा येणारच म्हणून दूसरा पर्याय आपण निर्माण करायला हवा. त्यांना चंपक, छोट्या गोष्टींची पुस्तकं द्या. ग्रंथालयातही नवनवीन पुस्तकांची भर घालत राहिली पाहिजे. तरूणांनाही रोल मॉडेल हवेच असतात. सध्याच्या काळात चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तीविकास, अनुवादित, रहस्य कथा वाचनाकडे तरुणांचा कल जास्त दिसून येतो. आणि एकदा हातात पुस्तक पडलं आणि वाचायला सुरुवात केली की आपल्याला कळतंच नाही की आपण वाचक कसं बनलो. आम्ही त्यासाठी पुस्तक प्रदर्शन भरवतो आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळतो. लोकं पुस्तकं वाचतात फक्त ती त्यांच्या नजरेसमोर गेली पाहिजेत.

पुस्तकं जपण्यासाठी ती सतत हलवली पाहिजेत. अधून-मधून सर्व पुस्तकांची व इतर फर्निचरची, कपाटांची साफसफाई करायला हवी. पुस्तकांना वातावरणानुसार हवा किंवा ऊन द्यायला हवं. काही पुस्तकांना वाळवी लागली असेल तर इतर पुस्तकांना बाहेर काढून पावडर लावणे, ऊन देणे हे उपाय करायला हवेत.

 

शैलजा अंबेकर, परभणी

रा. दा. अंबेकर ग्रंथालय- शेलू

मुखपृष्ठ पाहिल्यानंतर, पुस्तक हातात घेऊन चाळल्यानंतर पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढते. म्हणून मुलांच्या, तरुणांच्या हातात पुस्तक येणं गरजेचं आहे. मुलांचं व त्यांच्या पालकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आमच्या ग्रंथालयामध्ये आम्ही ग्रंथ महोत्सव, ग्रंथ प्रदर्शन, व्याख्यानमाला, सानेगुरूजी कथामाला असे अनेक उपक्रम राबवतो. अशावेळी ग्रंथालयातील सर्व पुस्तकं मुलांसमोर ठेवतो आणि त्यांना आवडतील ती वाचायला देतो. वाचलेल्या पुस्तकांवर बोलण्यासाठी प्रवृत्त करतो. प्रेरणादायी व्यक्तींची वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं आयोजित करतो. ज्या विषयांची पुस्तकं एखाद्या वाचकासाठी योग्य आहेत, असं मला वाटतं, त्यांना मी ती वाचायला देते आणि नोट्सही काढायला सांगते. एखाद्या पुस्तकावर कुठे आलेलं परीक्षण, समीक्षा त्यांना वाचायला देतो.

मी स्वतः रोज पुस्तकं वाचते आणि मला वाटतं की, प्रत्येक ग्रंथपालाला पुस्तकांबद्दल माहिती सांगता आली पाहिजे. मी फेसबुकवरदेखील ‘हे वाचलंच पाहिजे’ अशा आशयाचं सदर लिहते.

लोकांनी पुस्तकं वाचावीत, प्रगती करावी म्हणून या छोट्याश्या गावात मी १९९२ साली आमच्या घरगुती वाचनालयाचे सार्वजनिक ग्रंथालयात रूपांतर केले. त्याआधी ग्रंथालयाचा पदविका अभ्यासक्रम केला. हा भाग आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे पण विद्यार्थी अभ्यासू आहेत त्यामुळे आम्ही २० रु., ५०रु. असे शुल्क घेतो. आजघडीला इथे १८ हजारांहून जास्त पुस्तकं आहेत. वेगळी अभ्यासिका आहे. संदर्भ ग्रंथ व स्पर्धा परीक्षेसंबंधी पुस्तकांना जास्त मागणी असते. मुलांच्या मागणीनुसार पुस्तकं वाढवत असतो. आता प्रौढ महिलांना वाचता यावं यासाठी अक्षरओळख वर्ग सुरू केलेत. पुस्तकं नीट सांभाळावीत यासाठी आम्ही मुलांना सूचना देतो आणि सोबतच पानं दुमडू नये म्हणून पुस्तकांत ठेवायची खूण बनवून देतो.

लहानपणापासून माझ्या ग्रंथालयात येत असणारे अनेक विद्यार्थी-वाचक आता उत्तम वक्ते आहेत, मोठ्या पदावर कार्यरत आहेत. ते जेव्हा येऊन सांगतात की, ‘मॅडम या ग्रंथालयामुळे मी घडलो’ तेव्हा असे वाचक निर्माण करण्याची माझी इच्छा अजून प्रबळ होते.

 

श्रीकृष्णन साबणे, रत्नागिरी

जिल्हा ग्रंथालय संघ, ग्रंथस्नेह पुस्तकालय

लहान मुलांच्या संस्कारक्षम वयापासून जर त्यांच्यावर वाचनाचे संस्कार केले तर त्यांना वाचनाची गोडी लागतेच. यासाठी आम्ही एक प्रयोग म्हणून काही जणांचा ग्रुप बनवला आणि रत्नागिरी व लांजा तालुक्यातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांतील प्रेरककथा, बोधकथा, साहसकथा, वीरकथा, विज्ञानकथा मुलांना कथाकथनच्या माध्यमातून सांगितल्या आणि त्या कोणत्या पुस्तकातील आहेत हे सांगितलं. विद्यार्थ्याना हा प्रयोग फार आवडला. त्यांनी त्या पुस्तकांची मागणी केली. जर शाळा व ग्रंथालयांच्या माध्यमातून आधी नियोजन करून, पुस्तकं उपलब्ध करून असे प्रयोग राबविले गेले तर त्यातून वाचक घडतील. मी ग्रंथालय संचालनातच होतो नोकरीला. तेव्हा आम्ही उन्हाळ्याच्या सुटयांमध्ये रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वाचनवर्गाचे आयोजन करायचो. त्यात विविध प्रकारची ४००-५०० पुस्तकं घेऊन विद्यार्थ्यांसमोर जायचो आणि त्यांना सांगायचो की, तुम्हाला हवं ते पुस्तक घ्या आणि वाचा. आणि ५०-५० मुलं काहीही आवाज न करता शांतपणे तीन तास वाचत बसायची.

वाचन हा असा एकच प्रकार आहे, जो मुलांना शांत आणि व्यस्त ठेवू शकतो. वाचनातून व्यक्तिगत विकास होतो. वाचन मनन यातूनच प्रगल्भता येते.

आता जिल्हा परिषदेच्या शाळांमधून आम्ही असे उपक्रम राबवत असतो, कारण हे विद्यार्थीच ग्रंथालयांचे भावी सभासद व आपलं भविष्य आहेत. वाचनाची गोडी लागावी म्हणून दर्डा समूहाने ‘पुस्तकांच्या पेट्या’ माध्यमिक शाळांमध्ये पुरवल्या व त्याचा पाठपुरावा केला आणि जे वाचलं त्याबद्दल मुलांना लिहायला, बोलायला लावलं.  त्यातून मुलांची गुणवत्ता वाढली. असे प्रकल्प व व्याख्यानमाला, निबंध-वकृत्व स्पर्धा आणि पुस्तक प्रदर्शन अशा माध्यमातून तरूणांनाही वाचनाची गोडी लावता येईल.

त्याचसोबत पुस्तकं ही ग्रंथालयाची संपदा आहे त्यामुळे त्यांची काळजी घेणंही गरजेचं आहे. काळानुसार पुस्तकं जुनी होतात त्यासाठी त्यांचं डिजिटलायजेशन करणं गरजेचं आहे. कोकणात हवा दमट आहे, आद्रता असते त्यामुळे प्लॅस्टिकचे कव्हर घातले तर त्यामध्ये बुरशी तयार होते म्हणून पुस्तकांना बाईंडिंग करून किंवा शिवून घ्यावे. त्यावेळी वाचकांना अभिप्राय देता यावा यासाठी काही जास्तीची कोरी पानं शिवून घ्यावीत. उघड्या कपाटांमध्ये ठेवण्यापेक्षा काचेचे दरवाजे असलेल्या कपाटांमध्ये ठेवावीत. महिन्यातून एकदा सर्व पुस्तकं कपाटाबाहेर काढून पुस्तकांची व कपाटांची स्वच्छता करावी. डांबर गोळ्यांचा उग्र वास येतो त्यामुळे कीटकनाशक म्हणून वेखंड ठेवावे. घरच्या पुस्तकांमध्ये जंतूनाशक म्हणून बकुळची फुलं ठेवता येतील.

२३ एप्रिल ही चरित्रकार ‘धनंजय कीर’ यांची जयंती देखील आहे आपल्या महामानवांची महती महाराष्ट्रबाहेरही समजावी यासाठी कीर यांनी इंग्रजीतून महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक प्रेरणादायी व्यक्तींची चरित्र लिहिली जी पुढे मराठीमध्ये भाषांतरित झाली. त्यांच्या स्मरणार्थ हा वेगळा विशेष दिवस म्हणून साजरा करायला हवा. फक्त मॅट्रिक पास असूनही ज्या जिद्दीने त्यांनी चरित्रग्रंथांवर कार्य केलं ते अभिमानास्पद आहे. कीर यांनी लिहिलेली चरित्रे अभ्यासपूर्ण आणि प्रमाण मानली जातात व हे ग्रंथ ‘संदर्भ ग्रंथ’ म्हणून अभ्यासले जातात.

धनंजय कीर यांच्या कार्याची ओळख सर्वाना व्हावी यासाठी मी प्रयत्न करत आहे. दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त मी तीन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करत होतो. आता आर्थिक स्थितीमुळे ते मला जमत नाहीये. पण जिल्हा ग्रंथालय संघाच्या माध्यमातून अशा व्याख्यानमाला आयोजित करता येतील आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळेल अशी माझी खात्री आहे. जे चरित्रनायक आहेत त्यांच्यावर लेखनस्पर्धा व वकृत्वस्पर्धा आयोजित करून ‘धनंजय कीर’ यांच्या नावाने पुरस्कार दिले तर ते फार छान होईल व त्यातून अनेक उत्तम लेखक, वक्ते तयार होतील.

 

आशा कौरान्ने , औरंगाबाद

बलवंत वाचनालय

लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर झालेल्या शोकसभेत टिळकांच्या स्मृति जपण्यासाठी ‘बलवंत वाचनालय’ सुरू करण्याचा संकल्प झाला. १ ऑगस्ट १९२० रोजी सुरू झालेल्या वाचनालयाला आता १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. तेव्हाच्या निजाम सरकारने टिळकांच्या नावाला विरोध केला म्हणून टिळकांसारखे बलवान म्हणून ‘बलवंत’ असे नाव वाचनालयाला देण्यात आले. अत्यंत खडतर परिस्थितीतून या ग्रंथालयाने प्रवास केला. १९२६  ते १९३० दरम्यान प्लेगची साथ असल्यामुळे ग्रंथालयाला वाचक मिळत नव्हते त्यानंतर अनुदान नाही, कादंबऱ्यांकडे जास्त कल असलेले वाचक आणि ६००० पुस्तकांच्या सोबतीने तेव्हा ग्रंथालयाचा प्रवास सुरू झाला होता, तो आता ७२ हजार ७३५ पुस्तकांवर येऊन ठेपला आहे आणि आजही दिवसागणिक वाचनालय अधिकच साहित्यसंपन होण्याकडे वाटचाल करीत आहे. आज बलवंत वाचनालयातील वाचकसंख्या १० हजारांपेक्षाही अधिक असून, त्यापैकी ३ हजार नियमीत वाचक आहेत. आता ग्रंथ ठेवण्यासाठी मोबाईल स्टोरेज सिस्टिम तसेच संगणक, ई-ग्रंथालय सॉफटवेअर घेण्यात आलेलं आहे.

काळानूसार वाचन संस्कृती बदलत जात आहे त्यामुळे बलवंत वाचनालयही हे बदल स्वीकारत वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवत आहे. सुरूवातीच्या काळाप्रमाणे आजही बालकांना वाचन चळवळीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. वाचनालयाचे प्रशस्त सभागृह ग्रंथप्रदर्शनासाठी दिले जाते, तिथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिर, कवि संमेलन, व्याख्यानं, लेखकांच्या मुलाखतींचे आयोजन, चित्रप्रदर्शन, वाचनकट्टा, अभिवाचन यासोबत जेलमधील कैदयांसाठी ग्रंथालय सेवा, शालेय ग्रंथालयाला परस्पर पुरक ग्रंथ सेवा, वृध्दश्रमात पुस्तके देणे असे उपक्रम राबविण्यात येतात.

 

अदिती वाघ, ठाणे

ठाणे नगर वाचन मंदिर, ठाणे

१८५० साली सुरू झालेले ठाणे नगर वाचन मंदिर गेली १७१ वर्ष ज्ञानसंवर्धनाचे आणि ज्ञानप्रसाराचे काम अव्याहतपणे करत आहे. विविध उपक्रम राबवून लोकांना वाचतं ठेवणं, हे महत्वाचं असतं.

डॉ. रंगनाथन यांच्या सूत्रानुसार ‘प्रत्येक वाचकाला त्याचे पुस्तक मिळाले पाहिजे आणि प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक’.

लॉकडाउनमध्येही प्रत्येक वाचकापर्यंत त्याचं पुस्तक पोहोचायला हवं यासाठी आम्ही घरपोच सेवा द्यायला सुरुवात केली आहे, ज्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. ग्रंथालयाच्या माध्यमातून चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती, निबंध स्पर्धा असे उपक्रम राबवत आहोत. मागील लॉकडाउनमध्ये वाचक ग्रंथालयात येऊ शकले नाहीत, म्हणून असे उपक्रम आम्ही ऑनलाइन घेऊन वाचकांपर्यंत पोहोचलो. वाचकांसोबत संवाद साधत राहणंही गरजेचं आहे. संदर्भ पुस्तकं शोधून देणं, वाचकांना पुस्तकं दिसतील अशी मांडणं, मागणीनुसार नवीन पुस्तकांची ग्रंथालयात भर घालणं आणि पुस्तकांची डिजिटल नोंद केल्यामुळे पुस्तकांची यादी वाचकांना मेल करणं या काही गोष्टींमुळे वाचक ग्रंथालयांकडे, वाचनाकडे आकृष्ट होतो हे आम्हाला जाणवते. त्याचसोबत उत्तम स्थितीतील पुस्तकंही वाचकाला आकर्षित करत असतात. वाचनालयातील फर्निचर, भिंतींचे रंग प्रसन्नता देणारे असायला हवेत, पुस्तकांना चांगल्या प्रतीचे कव्हर घालणे, ती योग्य पद्धतीने मांडणे, पुस्तकांची साफसफाई, ग्रंथालयात जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश येणं या गोष्टीही परिणामकारक असतात. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला मानसिक शांतता हवी असते आणि ती वाचनातूनच मिळते. त्यामुळे अजूनही असे वाचक आहेत, ज्यांना वाचनाचं महत्व समजतं आणि वाचनालयाचंही!

 

नंदू गुरव, सांगली

यशवंत चव्हाण सार्वजनिक ग्रंथालय

‘ग्रंथालय हे नुसतं पुस्तक देवघेव केंद्र नसतं, ग्रंथालय म्हणजे नुसती इमारत आणि पुस्तकाची कपाटंही नसतात तर ग्रंथालय वाचन चळवळ बळकट करत समाजाला परिवर्तनाच्या दिशेला नेणारं प्रभावी माध्यम असतं, या जेष्ट विचारवंत प्रा. डॉ. पी. बी. पाटील यांच्या विचारानं आपलं ग्रंथालय चालत आहे. ग्रंथालय वाचकांशी हितगूज करीत असतं, ते जिवंत असतं, या भावनेतनं हे ग्रंथालय चालवलं जातं आहे. जिल्हाभरातील अंगणवाडीच्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून विचारवंतांपर्यंत, शेतकर्‍यांपासून उद्योजकांपर्यंत, नोकरदारांपासून गृहिणींपर्यंत, लेखक, कलाकार ते चित्रकार, शिल्पकारांपर्यंत सारेच ग्रंथालयाचे जागरुक वाचक सभासद आहेत हा त्याचा पुरावा. आमच्या ग्रंथालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्ष, अभ्यासिका, विविध भाषा, संकलन व संवर्धन केंद्र सुरु आहे. वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून दरवर्षी राज्य निबंध स्पर्धा, राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व तसेच राज्य फोटोग्राफी स्पर्धा, खुल्या निसर्गचित्र स्पर्धा, पोस्टकार्ड, हस्ताक्षर स्पर्धा, असे अनेक उपक्रम राबवले जातात. ग्रंथालयात २१ हजाराहून अधिक पुस्तकं, अनेक संदर्भग्रंथ आहेत. मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र विभाग तयार आहेत. इतर अनेक ग्रंथालयांचे कर्मचारी ग्रंथालय कसं असावं ते बघायला आणि मार्गदर्शन घ्यायला भेट देत असतात. ग्रंथालयाच्यावतीनं आता पुस्तक बाजार, प्रत्येक झाडाजवळ पुस्तकं असे उपक्रम राबवणं सुरु आहे.

सध्या कोरोना काळात, कोरोनाची भिती घेऊन माणसानं दडपून जाऊ नये याची काळजी जसे डॉक्टर्स घेत होते तशी काळजी वाचन चळवळीत सक्रीय असलेली माणसं, संस्था, संघटना, ग्रुप्सदेखील घेत होते व घेत आहेत. लॉकडाऊनमध्ये खरी घुसमट झाली ती मुलांची आणि ती कमी करण्यात खरी मदत झाली ती संवाद ग्रुपची. मुलांना सहज पुस्तकं वाचायला मिळावीत यासाठी या ग्रुपने २५० रुपयात २५० पुस्तकं उपलब्ध करुन दिली. घरबसल्या मुलांना पुस्तकं वाचायला मिळाली. एका फोनवर ज्येष्ठ नागरीकांना पुस्तक घरपोस करायची मोहिमही या ग्रुपनं राबवली. आता परत ग्रंथालयं बंद झाली आहेत. परत शाळा-महाविद्यालये बंद झाली आहेत. सारे साहित्यविषयक उपक्रम ठप्प झाले आहेत. पण तरीही वाचणारी, लिहीणारी माणसं मजेत जगत आहेत. कोरोनानं माणसाला बरंच काही शिकवलं. माणसानंही काही चांगल्या सवयी गांभिर्यानं लावून घेतल्या. त्यातलीच एक म्हणजे वाचन आणि लेखन. चांगलं लिहीन आणि चांगलं वाचेन हा माणसातला बदल त्याला  आयुष्यभराची एनर्जी देणारा आहे.

 

शिरीष बापट, अहमदनगर

अभिरुची लायब्ररी

आम्ही ४० वर्ष लायब्ररी चालवली. आमच्या तीन शाखा होत्या. बारा हजाराहून जास्त पुस्तकं होती. पण बेसिक खर्च सुद्धा निघत नाही, अशी परिस्थिती आली आणि मला नाईलाजाने मी आणि माझ्या पत्नीने ४० वर्ष जोपासलेली लायब्ररी बंद करावी लागली. खूप त्रास होतो पण काय करणार? खूप प्रयत्न केले पण परिस्थितीच अशी आलीये. पुस्तकं हातात घेऊन वाचणं आता कमी होतंय. मराठी वाचनालयांवर अशी दुर्दैवी वेळ आलेली आहे. आजकाल इंगजी शाळेतल्या मुलांना मराठीचा गंध नसतो. जे वाचतात ते ९९, १९९ रुपयांत ऑनलाइन खूप सारी पुस्तकं मिळतात तिथे किंवा पीडीएफ वाचतात. अहमदनगर मध्ये फक्त दोनचं मराठी वाचनालय होती. एक जिल्हा परिषदेचं आणि एक आमचं. जिल्हा परिषदेच्या वाचनालयाला सरकारची ग्रँट मिळते जी त्यांनाही अपुरीच असते. किती कमी पगारात लोकं कामं करत आहेत. मला तर काही अर्थ राहिलाय असं वाटतंच नाही. वाचनातून संस्कृती कळते/टिकते असं आपण म्हणतो पण आता मराठी फक्त बोलीभाषा म्हणून राहील इतकं निराशावादी वातावरण आहे असं मला वाटतं. मी स्वतः तर तुटून गेलोय. लायब्ररीची अर्धी पुस्तकं मी तोटा सहन करून विकली. सांगली, सातारा, कोल्हापूर, परभणी इथं अनेकांनी ती घेतली. पण इथं वाचक नाहीत.. काय बोलू..

( भावनिक झाल्याने आणि त्यावेळेस त्यांची कोरोनाची ट्रीटमेंट चालू असल्याने बापट सरांना फार माहिती देता आली नाही. पण सरांनी मांडलेलं चित्र फार जीवघेणं आहे. या विषयावर कोणास अधिक माहिती असल्यास कमेंटमध्ये सांगावी.)

 

विक्रमसिंह बल्लाळ, सातारा

विजय मांडके सार्वजनिक ग्रंथालय, कुसवडे

तांत्रिक व कामाने गुरफटलेल्या या युगात तसं पाहिलं तर वाचन संस्कृती रुजवणे अवघड झाले आहे. तरुण मंडळींनी तर मुळात वाचनाकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळते. जे वाचतात ते बहुधा परीक्षेत गुण मिळावे म्हणून वाचताना दिसतात. मुळात आपण मराठी भाषेचा वापर करतो किती, हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. यासाठी लहान वयातच वाचनाची आवड निर्माण करावी लागेल. मुलांची पाऊले ग्रंथालयाकडे वळवावी लागतील त्याचसोबत मुलांना वाचनाबरोबर लिहायला सुद्धा प्रेरित करायला हवे, त्यानुसार प्रत्येक शाळा अथवा ग्रंथालयांनी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे, ज्यात स्वलिखित लेख, कविता, कथा, निबंध, वाचनस्पर्धा असे काही उपक्रम राबवू शकतो. आमच्या ग्रंथालयातर्फे आम्ही असे उपक्रम घेत ग्रामीण भागात वाचकांची संख्या वाढवण्यासाठी, नवोदित लेखक-कवींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

तसे पुस्तक विकत घेऊन वाचणारे वाचक आजकाल कमी झालेले दिसतात. माझ्या ओळखीतील अनेक लेखक मित्रांनी उमेदीने पुस्तक लिहिलं. परंतु पुस्तकाचा खप न झाल्याने ते निराश झाले आणि पुढे त्यांच्याकडून साहित्य निर्माण होणं थांबलं. मुळात वाचक कमी आहेत आणि त्यातही सोशल मीडियावर वाचणाऱ्यांची संख्या सध्या अधिक आहे. लेखकांनी आता इंटरनेट व तांत्रिक बाबींचा वापर करून आपलं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवायला हवं.

 

निलेश शेळके, पुणे

ग्रंथालय तुमच्या दारी

लोकं वाचत नाहीत असं बोललं जातं पण खरंतर लोकांना वाचायचं असतं. सध्याच्या धावपळीच्या काळात त्यांना ग्रंथालयामध्ये जायला वेळ मिळत नाही आणि ज्यादिवशी मिळतो त्या दिवशी ग्रंथालयं बंद असतात म्हणजे रविवारी किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी. त्यामुळे मी ‘ग्रंथालय तुमच्या दारी’ हा उपक्रम पुणे शहरामध्ये सुरू केला. आम्ही लोकांना ग्रंथालयाची सेवा त्यांच्या वेळेनुसार घरपोच देतो. वाचकांच्या मागणीनुसार पुस्तक उपलब्ध करून देतो आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाचक म्हणून मला अनेकदा अनुभव आलाय की, वाचकांना हवे असलेले पुस्तक ग्रंथालयामध्ये नसेल तर ते उपलब्ध करून द्यायला हवे पण अनेक ग्रंथालये याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिकदृष्ट्या हे सोप्पे नाही, हे मला कळते पण त्यासाठी विविध योजना राबवता येऊ शकतात. अनेक ठिकाणी पुस्तकांची स्थिती नीट नसते, नवीन पुस्तकं उपलब्ध करून दिली जात नाहीत, स्वतः ग्रंथपाल एखादं पुस्तक मिळत नसेल तर ते शोधून देणं, संदर्भपुस्तकं सांगणं असं करत नाहीत मग ते काही वाचकांपुरते मर्यादित राहतात आणि सामान्य वाचकांपर्यंत पोहचतच नाहीत. हे अपवाद असले तरी यामुळे वाचकांच्या वाचनावर परिणाम होतोच. सध्या नव्याने येत असलेली पुस्तकं जी वाचकांना वाचायला आवडतात ती जर ग्रंथालयात नसतील तर कसे नवीन वाचक येणार?

ऑनलाइन वाचनामुळे वाचक पुस्तकांपासून दुरावतात हे देखील मला पटत नाही कारण ऑनलाइन खूप वेळ वाचणं शक्य होत नाही. आणि ऑनलाइन वाचलं तरी पुस्तक हातात घेऊन वाचणारे वाचक कमी होत नाहीत. पीडीएफ वाचणारे किंवा ऑनलाइन वाचन करणारे हे बहुधा ऑफिसमध्ये असताना फ्री टाईम मध्ये टाईमपास म्हणून वाचतात. पण लोकं घरी आरामात बसून पुस्तक हातात घेऊन वाचण्यालाच आजही प्राधान्य देतात, हा आमचा अनुभव आहे.

Image Source 


 पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.


Posted

in

,

by

Comments

6 responses to “जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने वाचन संस्कृती”

  1. Shweta Avatar
    Shweta

    खूप छान प्रयत्न मॅडम👏आणि सगळ्यांचे प्रतिसाद उत्तम. विशेषतः शैललाजींची प्रतिक्रिया प्रेरणादायक वाटली.

  2. Aparna Deshpande Avatar

    खूप छान उपक्रम आणि प्रतिसाद

  3. Shrisiddha Dhawale Avatar

    अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया! पण आजच्या काळात ग्रंथवाचनाकडे वाचकाला वळवणे हे खूपच अवघड आहे!

  4. Prashant Bhagwat Avatar

    खूपच छान

  5. Anant Naniwadekar Avatar

    तुमची ही पोस्ट खूप वेगळी eआहे. तुम्ही काही ग्रंथपालांना बोलतं केलं आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. वाचन संस्कृती वाढण्यासाठी घरातून अन् शाळेतून प्रयत्न व्हायला हवेत.
    घरात पुस्तके असतील तर मुले कुतूहलाने चाळतात अन् त्यातून काहींना वाचनाची आवड लागते. तेव्हा वाढदिवसाला त्यांच्या वयानुसार आपण पुस्तके भेट दिली पाहिजेत. सामुदायिक वाचन हा प्रकार खूप छान आहे. त्यातून मुलांची आवड समजेल. मुलांना मुद्दाम पुस्तकांच्या दुकानात, ग्रंथ प्रदर्शनात नेले पाहिजे. मी बघितलंय, मुले अक्षरशः वेडी होतात. यातून वाचक घडायला लागतो. शाळांनी पण आठवड्यातून एक तास मुलांना ग्रंथालयात फिरायची परवानगी दिली पाहिजे. बंद कपाटातील पुस्तके मुलांना हाताळायला दिली पाहिजेत. पुस्तकांचा सहवास किती सुखद, आश्वासक असतो हे मुलांनी अनुभवलं पाहिजे. हे अर्थात शाळा अन् ग्रंथपाल यांच्यावर अवलंबून आहे. एकूण उद्देश काय तर मुलांना पुस्तकांपर्यंत नेणे. मग मुले पुस्तकांना चिकटतात. तेव्हा वेगवेगळे उपक्रम, प्रदर्शने अन् वातावरण निर्मिती यातून वाचन संस्कृती निश्चित वाढेल.

  6. दुष्यंतकुमार, नवल पब्लिकेशन्स, पुणे Avatar

    वाचन चळवळ अधिक लोकाभिमुख होण्यासाठी जे काही प्रयत्न ग्रंथालयाद्वारे केले जात आहेत त्याची दखल घेणं हीच मुळात कौतुकास्पद आहे. एका चांगल्या विषयावर हा लेख लिहिण्यासाठी जे परिश्रम घेतले त्यासाठी अश्विनी सुर्वे यांचे आभार. महाराष्ट्रातील विविध ग्रंथालये वाचन चळवळ वाढवण्यासाठी जे परिश्रम घेत आहेत, त्याला समाजाने पण हातभार लावावा लागणार आहे.
    आपला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *