चिंब पावसानं रान झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी.
राजा तुझे हात माझ्या हातात गुंफोनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरोनी.
या सुंदर ओळी लिहिणारे जेष्ठ कवी-गीतकार ना. धों. महानोर, यांच्या ‘कवितेतून गाण्याकडे’ पुस्तकात त्यांनी लहानपणापासून लिहायला कशी सुरुवात केली, त्यांच्या लिखाणात येणारे विषय, शब्द त्यांना अगदी नाकळत्या वयात कुठे आणि कसे मिळाले, त्यांनी त्या शब्दांची सांगड कवितेत घालण्यापासून ते व्यावसायिक पातळीवर गीतलेखनाचा प्रवास सुरू करेपर्यंतचे सर्व महत्वाचे किस्से; उतार-चढाव या पुस्तकात नमूद केले आहेत. (आज) २१ मार्च World Poetry Day म्हणून मुद्दाम या दिवसाचं औचित्य साधून या पुस्तकाबद्दल लिहीत आहे.
चित्रपटांच्या किस्यांमध्ये पहिल्याच आठवणीत वाचायला मिळालं की,
‘ना. धों. महानोरांना श्रीमती भारती मंगेशकर यांचं पत्र आलं. ज्यात त्यांना ‘जैत रे जैत’ या गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर चित्रपट करत असल्याचं सांगून त्यासाठी तुम्ही गीतं लिहावीत असं सांगण्यात आलं. बरेचजणं म्हणायचे हे शक्य नाही. माडगूळकर, खेबुडकर, शांताबाई, पी. सावळाराम इत्यादी असताना ते याला कशाला म्हणतील? काहीतरी घोळ आहे.’
महानोरांना पुन्हा डॉ. जब्बार पटेल यांच्याकडून निरोप आला, तरीही ते साशंकच होतो. शेवटी दोन तासांच्या चित्रपटात एक तास गाणी असतील, तीही विविध सांगीतिक लहेजा असलेली सोळा गाणी असं ठरलं! पहिली बैठक १९ मार्च १९७७, गुढीपाडवा या दिवशी ‘प्रभुकुंज’ वर मंगेशकरांच्या घरी ठरली.
नभ उतरू आलं
चिंब थर्थर ओलं
अंग झिम्माड झालं
हिरव्या बहरात
तेव्हा ‘चित्रपटातल्या त्या सीनवर या गाण्यामुळे रसिक तुटून पडतील’, हे आशाताईंनी वर्तवलेलं भविष्य अखेर खरं ठरलं! तो गुढीपाडवा महानोरांच्या नव्या वळणाच्या आयुष्याला बळ देणारा ठरला. मंगेशकर कुटुंबियांसारखी प्रतिभावंत माणसं जोडली गेली. एका नव्या विश्वात त्यांना घेऊन गेली. पण अर्थातच हे सगळं एका रात्रीत नक्कीच झालं नाही. त्यांनी लहानपणापासून लेखणीसोबत केलेल्या प्रवासात कोणत्या वळणावर काय शिकायचं ठरवलं, आयुष्यातल्या छोट्या-छोट्या घटनांचं कसं निरीक्षण केलं, काय सोसलं याची वर्णनं नवीन लेखकाला ऊर्जा देतील. दीपस्तंभ ठरतील. ते म्हणतात,
“(मी) खूप साहित्याचं वाचन केलेलं होतं. अस्सल कवितेचं माहात्म्य मला समजत गेलं. अनेक साहित्यिकांच्या भेटी झाल्या. हे आणि यामुळेच चांगली कविता लिहिता आली असं म्हणता येणार नाही. कवितेकडे अतिशय गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. जे आपण लिहिणार ते शब्द, तिची लय, तिचा आशय आणि मितव्यय यासकट तिचं संपूर्ण पोर्ट्रेट आपल्यासमोर हवं, याची जाणीव होत गेली”
महानोरांच्या मते, आपल्या सोबत अभिजात साहित्याचा, कवितेचा, कलेचा नीटपणे विचार करणारी व त्यावर चर्चा करणारी लेखक मित्रमंडळी हवी. एकमेकांच्या लिखाणातील चांगलं-वाईट काय हे जोखणारी लोकं सोबत हवीत, यामुळे कवी किंवा कोणताही कलाकार योग्यप्रकारे घडतो.
ना. धों. महानोर यांनी ‘रानातल्या कविता (१९६७)’ कवितासंग्रह लिहिल्यानंतर पॉप्युलर प्रकाशनाच्या रामदास भटकळ यांनी कवी ग्रेस, नारायण सुर्वे आणि ना. धों. महानोर अशा काव्य वाचनाचा चांगला कार्यक्रम त्या काळात मुंबईत घडवून आणला. ‘नवे कवी, नवी कविता’ या योजनेचा त्यांना चांगलाच फायदा झाला.
एक ग्रेट कवी कसा घडतो याची ब्लु-प्रिंट म्हणून तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचू (अभ्यासू) शकता. अर्थात काही संदर्भ काळानुसार बदलतील, पण आजही त्यांच्या कवी म्हणून जडणघडणीच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या आहेत.
ना. धों. महानोर महाराष्ट्रातल्या गावोगावी, हैद्राबाद, बडोदा, इंदौर, बेळगाव, बेंगळुरू आणि शिवाय पाच भारताबाहेरील ठिकाणी कविता, गाणी, गीत घेऊन फिरले. गाणी लिहून देण्याच्या उठाठेवीत त्यांना काही वाईट अनुभव देखील आले, ते त्यांनी अगदी दिग्गज मंडळींची नावं घेऊन लिहिले आहेत. आजच्या तारखेत गीतलेखनात करियर करू इच्छिणाऱ्या नवीन मंडळींनी हे किस्से आवर्जून वाचावेत, ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’.
‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’ हे सर्जा चित्रपटातील गाण खूप गाजलं; पण प्रत्यक्षात त्या बदल्यात महानोरांना दिलेला मोबदला खूप कमी होता; ते देखील त्यांनी कागदावर सह्या नीट पडताळणी न करता विश्वासाने दिल्या म्हणून. या आणि अशा अजून काही चुका का झाल्या याकडे देखील महानोर धावता दृष्टिक्षेप टाकतात. बऱ्याच ठिकाणी त्यांचं नाव चुकीचं देऊन, तर कुठे कुठे नुसतं नावच देऊन सिनेमे प्रदर्शित करण्यात आले. त्यांनी काम केलेल्या चित्रपटांच्या प्रीमियरला त्यांना रीतसर आमंत्रणं सुद्धा दिली गेली नाहीत. तरीही हा निसर्गाशी एकरूप झालेला असामान्य कवी नियमित लिहीत राहिला, तेही सोबत शेती, राजकारण, समाजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत! ना. धों. महानोर यांचा हा एकूण ‘कवितेतून गाण्याकडे’ जाण्याचा प्रवास एकदा तरी वाचावा असा आहे.
ना. धों. महानोर यांचे काही आवडलेले विचार खाली देत आहे.
- चांगल्या मराठी नव्या कवितेचा कुठलाही ठसा आपल्यावर नको, आपली स्वत:ची प्रतिमा, स्वत:भोवतीचा निसर्ग, शेतीचा निसर्ग, तिथलं ओरबाडणारं दुःखं, हे लक्षात ठेवून नव्या जाणिवांनी आणि एक एका ओळीसाठी झगडून लिहिले. आपणच आपले समीक्षक असावं. हळू हळू जमत गेलं.
- एका शब्दासाठी, लयीसाठी, आशयाला धक्का न लावता कविता पूर्ण भरावी. प्रसिद्धीची घाई कशाला?
- कवितेचं गाणं कसं होतं, माहीत नाही. कळी उमलून तिचं लोभस फूल व्हावं तितक्या सहजतेने आणि आपसूक ते घडत असावं. माझं प्रेम, माझी जीवनप्रेरणा कविताच आहे, गाणं नाही. मला गाण्यापेक्षा कविता नेहमीच थोर वाटत आलेली आहे. मला गाणं लिहायला सांगितलं तरी मी कविताच लिहीत गेलो. नुस्ती शब्दांची जुळवाजुळव केली नाही. मला अनुभवांनीच खोल आतून व्यापलं. कविता सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या अनुभवांना कवेत घेते. आणि नव्या सूचक शब्दबंधातून अलगद बाहेर येते.
- कविता आणि गीत यात मी कधीच फरक न ठेवता एकसंध लिहिलं. हा भेद कोणी केला मला ठाऊक नाही. चित्रपट गीतांमध्ये व इतर ध्वनिमुद्रिकांमध्येही मुक्त कविता, लयबद्ध कविता, गाणी आहेत. त्यासंबंधी रसिकांमध्ये कुतूहल असतं. त्याची माझी म्हणून निर्मिती प्रक्रिया पद्धती याविषयी आणि त्या अनुषंगानं मी लिहावं असा काही रसिकांचा आग्रह म्हणून मी हे लिहिलं, कवितेतून गाण्याकडे…
©यशवंत दिडवाघ.
पुस्तक विकत घेण्याची लिंक पुढे देत आहे
ना. धों. महानोर यांची इतर पुस्तकं खालील प्रमाणे
कवितासंग्रह – रानातल्या कविता (१९६७), वही (१९७०), पळसखेडची गाणी (१९८२), पावसाळी कविता (१९८२), पक्ष्यांचे लक्ष थवे (१९९०), प्रार्थना दयाघना (१९९०), पानझड (१९९७), गाथा शिवरायाची (१९९८), तिची कहाणी (२०००), जगाला प्रेम अर्पावे (२००५), गंगा वाहू दे निर्मळ (२००७)
खंडकाव्य – अजिंठा (१९८४)
कादंबरी – गांधारी (१९८२)
व्यक्तिचित्रे – ऐसी कळवळ्याची जाती (१९९७)
ना. धों. महानोर यांचा कवितेचं पान या यूट्यूब चॅनल मधील मुलाखतीची लिंक इथे देत आहे
Kavitecha Paan | Episode 37 | N. D. Mahanor | Part – 1
Kavitecha Paan | Episode 37 | N. D. Mahanor | Part – 2
Leave a Reply