samnatar by suhas shirvalkar pustak olakh yashwant ho blog

समांतर – शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा

आर्थिक विवंचना व आयुष्यात घडत असलेल्या विचित्र घटनांमुळे अडचणीत सापडलेला कुमार महाजन त्याच्या मित्राच्या, वाफगांवकरच्या सांगण्यावरून एका प्रसिद्ध स्वामींकडे आपलं भविष्य जाणून घ्यायला जातो. खरंतर कुमार महाजनचा या सगळ्यावर विश्वास नसतोच, परत त्यात अतिशय घाण, अंधाऱ्या, गलिच्छ, टेकू लावलेल्या व कधीही कोसळेल अशा स्थितीतील इमारतीत हे स्वामी रहात असलेले बघून यात कुठे अडकलो असंच वाटत असतं; पण ते स्वामी त्याला त्याच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगतात ज्या त्याने कोणालाच सांगितलेल्या नसतात. कुमार स्वामींसमोर नतमस्तक होतो, आणि त्याला खात्री वाटते की आता हेच स्वामी त्याचं भविष्य सांगू शकतील. स्वामी त्याचा हात तर पाहतात पण त्याचं भविष्य सांगण्यास नकार देतात.

का!??

कारण कुमार महाजनच्या हातावरील रेषा दुसऱ्या एका व्यक्तीच्या हातावरील रेषांसोबत जुळणाऱ्या असतात, जी क्वचितच घडणारी गोष्ट असते. ती दुसरी व्यक्ती असते सुदर्शन चक्रपाणी. हा चक्रपाणी देखील २५-३० वर्षांपूर्वी स्वतःच भविष्य पहायला या स्वामींकडे आलेला असतो. आणि या दोघांच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टींमुळे त्यांचं भविष्य सांगण्याची आज्ञा त्या स्वामींना नसते. साहजिकच, कुमार महाजनची निराशा होते आणि तो हतबल होऊन तिथून निघून जातो. पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्या त्याला सुदर्शन चक्रपाणी या व्यक्तीला शोधण्यास, त्याची भेट घेण्यास प्रवृत्त करतात.

कुमार महाजनला इतकेच समजलेले असते, की त्याचं भविष्य हे सुदर्शन चक्रपाणीचा भूतकाळ आहे. आणि तो भूतकाळ त्याला समजला तर स्वतःच्या भविष्यातील चुका तो टाळू शकेल.

पण कुमारला सुदर्शन चक्रपाणी ही व्यक्ती भेटते का? चक्रपाणी नक्की कोण असतो?, त्याची कुमारला मदत होते की नाही? खरंच भविष्य असं समजतं का? ते आपण ठरवलं म्हणून बदलवता येतं का? या सर्व प्रशांची उत्तरं हे पुस्तक वाचत उलघडण्यातच मजा आहे.

सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ या पुस्तकाचं मलपृष्ठ वाचून पुस्तक वाचायला सुरुवात केली तर खरंतर आपल्याला पुस्तकाचा शेवट काय असेल, याची कल्पना येते… आणि कदाचित यामुळेच मला या कथेचा शेवट इतका आवडला नाही.

पण या कथेत गुंतवणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कथेची मांडणी. शिरवळकरांनी कथा इतकी प्रवाहीपणे लिहिली आहे, की त्यात आपण नकळत गुंतून जातो, आणि एका बैठकीत पुस्तक कधी वाचून झालं हे देखील कळत नाही. कथेतील पात्रं अगदी डोळ्यांसमोर उभी राहतात आणि पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम राहते. शेवट कळलेला असूनही कथा कोठेही मध्येच कंटाळवाणी होत नाही हे कथेचं आणि शिरवळकरांच्या लेखणीचं वैशिष्ट्यचं म्हणायला हवं.

पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत ‘मित्रवर्य श्री. प्रभाकर भडसावळे ह्यांच्याबरोबरील गप्पांच्या रात्रीस‘ असं लिहिलेलंही मला खूप आवडलंय. म्हणजे एखादं पुस्तक असं गप्पांच्या रात्रींना अर्पण करणं ही देखील वेगळीच कल्पना आहे नाही!

कथा उलगडताना कुमारच्या स्वसंवादातून आलेले विचारदेखील फार सुंदर आहेत. आपल्यालाही ते खोलवर विचार करायला भाग पाडतात.

जसं की, कुमार त्याच्या मुलाच्या इच्छांबद्दल बोलतो, ‘पोरांच्या किती साध्या-साध्या इच्छा असतात; पण आपण आपल्या कामांना इतकं महत्व देऊन ठेवलेलं असतं, की त्यादेखील आपण पूर्ण करू शकत नाही! त्यांच्या इच्छांची तीव्रता गरज म्हणून आपल्या लक्षात आल्यानंतरच आपण त्यांची गंभीरपणे दखल घेतो. तोपर्यंत पोरांचा त्यातला आनंद निघून गेलेला असतो!’

किंवा हे स्वभावाबाबतचे वक्तव्य. ‘मनुष्यस्वभावाची ही एक गंमत असते. सांघिकरीत्या त्याला समाजातला कोणतातरी घटक आपल्या दयेवर अवलंबून राहावा, अशी सततची इच्छा असते. तसा जो राहील, त्याची समाजाला दया येते. सहानभूती वाटते. समाज त्याला झटून मदत करतो. पण याच मदतीच्या जोरावर त्यातला कोणी स्वावलंबी होईल, तर समाजाला ते आवडत नाही.’ खरंय ना!

जगाच्या क्रूरपणाबद्दल लिहिलंय, ‘जग असंच असतं. क्रूरपणा करून धोक्याबाहेर राहता येत असेल, तर जग ती संधी कधीच सोडत नाही. राणीच्या बागेत पोरांचा आधार घेऊन मोठी माणसं पिंजऱ्यातल्या सिंहाला डिवचतात, त्याला खडे मारतात, डरकावून दाखवतात… त्यातलाच प्रकार हा!’

‘समांतर’ या नावाचा अर्थ सांगताना मलपृष्ठावर लिहिलंय, की ‘डायरीतलं प्रत्येक पान त्याचा उद्याचा दिवस कसा आहे ते सांगत असतं… पण शेवट मात्र अधांतरीच असतो… होय अधांतरीच… कारण तसंच ‘समांतर’ आयुष्य नशिबात आलेला कोणीतरी भेटल्याशिवाय आधीच्याला मुक्ती नसते. काळ मात्र तसाच पुढे जाणार असतो, सतत कोणालातरी ‘समांतर’ आयुष्य जगायला लावत….’

पुस्तकावरील सीरिज देखील सध्या खूप गाजतेय. सीरिजमध्ये काही अतिरिक्त प्रसंग टाकले आहेत, जे मूळ पुस्तकातल्या कथेत नाहीत आणि त्यात सध्याच्या काळातील चित्रण आहे जे काही प्रमाणात गुंतवून ठेवणारे वाटले. सीरिजचा शेवटही पुस्तकापेक्षा वेगळा असेल किंवा असावा असं वाटतंय.

सीरिजमुळे व शेवट काय असेल या उत्सुकतेने हे पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या वाढतेय. पुस्तकात शेवटी अपेक्षेप्रमाणे काही आश्चर्यकारक घडत नाही म्हणून निराशा होण्याची शक्यता आहे, पण शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा म्हणून हे पुस्तक वाचायला हरकत नाही.

– अश्विनी सुर्वे. 

पुस्तकाची लिंक सोबत देत आहे, नक्की खरेदी करा!

खाली सुहास शिरवळकरांच्या इतर पुस्तकांची लिंक सुद्धा देत आहे.

 

 

 

Comments

4 responses to “समांतर – शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा”

  1. Madhuri More Avatar

    मी वाचलेली नाही पण तुझ्या लिखाणाने वाचायची उत्सुकता वाढली हे नक्की 👍

    1. admin Avatar
      admin

      धन्यवाद !

  2. Parshuram Patharkar Avatar

    छान लिहिता ताई. शुभ आशिर्वाद!

    1. admin Avatar
      admin

      धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *