gazal vedana Gazal A K Gazal A K Shaikh Sir Yashwant ho

गझल वेदना – गझल अेके गझल – गझलेची इत्यंभूत माहिती!

“गझलसदृश्य कविता वगैरे काही नसतेच. एकतर गझल असते नाही तर गझल नसतेच! – अे.के. शेख सर.

खरंय! किती सोप्प्या शब्दात गझलेची व्याख्या आणि ओळख करून दिली आहे शेख सरांनी. ‘गझल फक्त ऐकायला आवडतात आणि गझल हा आपला प्रांत नाही’ इथपासून ते ‘मलाही गझल लिहायला जमतेय आणि हा गझलेचा प्रांत कसलाच भारी, बेधुंद करणारा आहे’ असं वाटण्यापर्यंतचा माझा प्रवास फक्त आणि फक्त शेख सरांमुळे झालाय.

डाव मित्राचे होते नेमके

घाव मित्राचेच होते नेमके..

मी मला माहीत होतो कोण तो

आव मित्राचेच होते नेमके..

शेवटी तोट्यात विकले मी मला

भाव मित्राचेच होते नेमके..

मस्तच! अे.के. शेख सरांनी कसलंच सुंदर लिहिलंय हे! त्यांच्या मी वाचलेल्या गझलांमधली ही माझी सगळ्यात आवडती गझल आहे. शेख सरांचं ‘गजल वेदना’ हे पुस्तक अगदी अचानकच माझ्या वाचनात आलं होतं, त्यातली ही ‘डाव’ नावाची गझल.

मी सरांच्या एका गझललेखनाच्या कार्यशाळेत मध्यंतरी सहभागी झाले होते. त्यात सादरीकरणाचा भाग समजवताना स्वतः सरांकडूनच ही ‘डाव’ गझल ऐकण्याचा योग आला आणि उत्तम सादरीकरणाचं उदाहरण प्रत्यक्षात शिकता आलं.

गझल नुसती लिहायला शिकून फायदा नाही. (मुळात ते सुद्धा फार अवघड आहे तसं म्हंटलं तर, पण सरांनी अगदी सोप्पं करून सांगितलं म्हणून सहज समजलं!) गजल सादर करण्याआधी सरांनी या गझलेची जी प्रस्तावना सांगितली होती, त्यामुळे तर ही गझल अजूनच चांगली लक्षात राहिली.

आणि त्या प्रस्तावना सांगण्याच्या पद्धतीमुळे

पाहिले जेव्हा तिच्या नावापुढे

नाव मित्राचेच होते नेमके

हा शेवटचा शेर तर असं काळजात चर्रss करून जातो की, नंतरही बराच वेळ आपण गझलेतल्या नायकाला काय वाटलं असेल, याचा विचार करण्यात हरवून जातो.
कार्यशाळेमध्ये गझललेखनातले बारकावे, गझलमधले विविध प्रकार, मतला, शेर, मक्ता, काफिया, रदीफ, वृत्त व मात्रांमधील फरक, गझल सादरीकरणातील प्रस्तावनेचे महत्व, त्याची पूर्वतयारी, गझलमधील शुध्दलेखनाचे नियम, शब्दांचे वजन याबद्दल सरांनी खूप ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले होते.

मुसलसल गझल म्हणजे एकाच विषयावरची गझल, गैरमुसलसल गझल, मुरद्दफ म्हणजे रदीफ असलेली गझल, गैर मुरद्दफ गझल, सौती काफिया असलेली गझल, त्रिवार काफिया असलेली गझल, छोटी बहर म्हणजे अगदी लहान वृत्तात लिहिलेली गझल, लंबी बहर,… बापरे! असे अजून किती प्रकार आहेत गझलेचे. आणि हे सगळे मला शेख सरांमुळे शिकता आले. म्हणजे मी अजून शिकतच आहे, पण या सर्व प्रकारांची ओळख करून घेता आली आणि माझ्या गझललेखनाच्या प्रवासात काही प्रमाणात का होईना ती वापरता येत आहे, हेही माझ्यासाठी खूप आहे.

सरांची ‘ गरिबाच्या लग्नाला’ ही गाजलेली गझल देखील खूप सुंदर आहे.

गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय? काळी काय?

म्हागाईने पिचलेल्यांना होळी काय? दिवाळी काय?

वाह! किती साधे सोप्पे शब्द पण एकदम अंतर्मुख करतात वाचताना. सूचक वाक्यरचना, काव्यात्मक ठेका आणि मनाचा ठाव घेणारी अकृत्रिमता! त्यांच्या काही गजलांमधील शब्द अतिशय साधे सोप्पे वाटत असले, तरी काहींमधील शब्द आपला शब्दसंग्रह वाढवणारे सुद्धा आहेत.

गझलेइतकंच मला शेख सरांच्या नम्र, सकारात्मक आणि सतत प्रसन्न व चिरतरुण व्यक्तीमत्वाबद्दल देखील फार कुतुहुल वाटतं. त्यांचं हे ऋजु व्यक्तिमत्व त्यांच्या गजलांमधूनही दिसतं. म्हणूनच सोडून गेलेल्या सखीला दूषण न देता ते म्हणतात,

तू दिल्या जखमांत, मी हरवून गेलो

अन् तुला विसरायचे विसऱून गेलो

किती सुंदर!! स्वतःचा त्रास सांगतानाही इतकं हळुवारपणे व्यक्त होणं ही वेगळीच कला आहे. सरांच्या कार्यशाळेमुळे मी त्यांच्या संपर्कात आले आणि मराठी गजल छंदांचा त्यांचा अभ्यास, गजलचा प्रसार करण्यासाठीची त्यांची तळमळ व शिकवण्याची पद्धत सगळ्यांमुळे मी भारावून गेले. सरांनी मराठी गझलांची अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचं ‘गजल अेके गजल’ हे पुस्तक तर गजललेखनाचा सक्षम पाया तयार करण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक आहे.

शेख सर, आर्तता, कारुण्य, विरह, वेदना, त्या वेदनेतील तगमग आणि दाहकता जेवढी प्रखरतेने आपल्या शेरातून मांडतात तेवढीच निरामय मैत्री, त्याग, प्रीतीतलं हळवेपण व्यक्त करतात. उदा: ही पुढील गजल बघा, दोन वेळा वाचली तरी पाठ होईल इतकी सुबक शब्दांची बांधणी असलेली..

वळते बघते नुसते हसते आश्चर्यच ना

जाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना..

रागावुन पत्राचे माझ्या करते तुकडे

कपट्यांना हृदयाशी धरते आश्चर्यच ना..

आणि मनात होकार पण वरवर नकार दर्शविणाऱ्या प्रेयसीचं किती सहज सुंदर वर्णन केलंय बघा या पुढील ‘तू मला भेटू नको’ नावाच्या गझलमध्ये..

तू मला भेटू नको नाराज असल्यासारखी

तू अशी वागू नको प्रेमात नसल्यासारखी..

हास तू गे चेहरा फुलतो कसा हसल्यावरी

का परीक्षेला जशी दिसतेस बसल्यासारखी..

मी गझल लेखनाचा, वृत्त, शेर, मात्रा, शब्दांचं वजन इत्यादी गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी शेख सरांची ही पुस्तकं वाचत असल्याने मला प्रत्येक गझलेतून काही ना काही घेण्यासारखं वाटलं, आणि जर तुम्हाला गझल लेखन शिकायचं असेल तर ‘गजल अेके गजल’ हे पुस्तक वाचा असं मी आवर्जून सांगेन.

शेवटी गझलेबद्दल अेके शेख सरांच्या शेरातच सांगायचं तर,

कुठल्या तोंडाने सांगावी गजलवेदना

कसल्या शब्दांनी मांडावी गजलवेदना..

हिंदुस्तानी मन काळीज अन् रक्त आमुचे

परकी तुम्हा का वाटावी गजलवेदना..

माय मराठी भाषा अमुची खास लाडकी

एक विनंती की जाणावी गजलवेदना..

ही पुस्तकं विकत घेण्यासाठी 7208656516 या क्रमांकावर व्हॉटसअप्पद्वारे संपर्क साधू शकता.

©अश्विनी सुर्वे.

YashwantHo.com मार्फत गझलेला खुद्द शेख सरांकडूनच जाणून घेण्याची एक बहुमूल्य संधी  ‘गझल लेखनाच्या Online कार्यशाळेद्वारे’ उपलब्ध करून देण्यात आली होती. या कार्यशाळेबद्दल अधिक माहिती खालील लिंकवर क्लिक करून वाचता येईल.

 YKLM Android App 

 

Comments

3 responses to “गझल वेदना – गझल अेके गझल – गझलेची इत्यंभूत माहिती!”

  1. […] आहे. याच संदर्भात याआधी सरांनी ‘गझल एके गझल’ नावाची वीस पानी पुस्तिका प्रकाशित […]

  2. […] म्हणणाऱ्या माई, बहिणाबाई, सुरेश भट, ए. के. शेख यांच्या कवितांचं, गझलांचं ऋण मान्य […]

  3. […] अशी अक्षरे दिली आहेत. याआधी तुम्ही ‘गझल ए के गझल’ पुस्तकाबद्दल वाचलं असेल तर […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *