दहावीच्या निकालानंतर सई आठवते.
दरवर्षी, न चुकता.
माझा रिजल्ट तर मी कधीच विसरले.
तसा कोणाच्या लक्षात राहण्यासारखा नव्हताच.
आम्ही सामान्य, आमचा अभ्यास सामान्य,
आणि रिजल्ट तर त्याहून सामान्य.
असो, रात गई, बात गई..
कशाला जुन्या आठवणी.
पण, ‘सई’ आठवते.
मलाही आणि माझ्या आईलाही.
आईला तर जरा जास्तच कौतुक तिचं…
तशी होतीच ती.
अभ्यासू, हुशार, शांत, समजूतदार..
आई लोकांना अशीच मुलं आवडतात
(स्वतःची नव्हे, दुसऱ्यांची)
आईच्या हातचा रव्याचा केक,
तिचा फेव्हरेट.
डब्यातून पार्सल पोहोचवायची जबाबदारी माझी.
तेवढाच काय त्यादिवशी डब्बा खायची ती.
बाकी सतत अभ्यास
खेळाच्या तासाला, मधल्या सुट्टीत.
शर्यतीत भाग घेतल्यासारखं,
काहीतरी मिळवायचं होतं जणू.
तिला शिक्षक व्हायचं होतं,
राणेबाई आदर्श.
त्या पण खूप जीव लावायच्या तिला
पुस्तकं भेट द्यायच्या,
एक्स्ट्रा वेळ थांबून शिकवायच्या.
ती क्लासला नाही जायची ना!
दहावीचं वर्ष सर्रकन संपलं,
निकालाचा दिवस.
सगळे शाळेत जमलेले
मनात धाकधूक, टेन्शन,
तरीही एकमेकांना चाव्या देणं सुरू,
“तू होणारंच पास, दुसराच येशील बघ”
पहिला नंबर आधीच ठरलेला,
सर्वांनां खात्रीच होती.
‘सई’च पहिली येणार.
शाळेचं नाव रोशन करणार..
झालंही तसंच,
९२.८७ टक्के मिळवून
सई जिल्ह्यात पहिली आलेली,
शाळेचा निकाल १०० टक्के लागलेला
सगळा जल्लोष, आनंद,
‘हुर्रेय’च्या आरोळ्या
अभिनंदनाचा सर्वांवर वर्षाव…
राणेबाईंनी घोषणा केली,
डिस्टिंक्शन मिळालेल्यांचा सत्कार
पुढच्या आठवड्यात बुधवारी
सर्वांनी उपस्थित राहायचं.
पुन्हा टाळ्या
बाईंनी ‘सई’ला पेढा भरवला,
आशीर्वाद दिला,
बुधवारी आई-बाबांना घेऊन ये सांगितलं,
तरंगतच सगळे घरी पोहचले.
माझंही कौतुक सुरुचं होतं,
आईने रव्याचा केक केलेला
“अगं ‘सई’ला पण द्यायचा होता”
आईची इच्छा,
त्यात आम्ही कौतुकाच्या ढगात!
म्हंटलं, ‘येऊ देऊन, किती वेळ लागतोय’
पत्ता माहीत होता,
पण सईच्या घरी पहिल्यांदाच
शोधत शोधत पोहचले
दरवाजा वाजवणार तोच…
गोंधळाचा आवाज आला,
मी थबकले.
“मी आधीच सांगितलेलं,
आता या पोरीला मी नाही पोसणार”
सईची आई?
पण ती तर देवाघरीये
“दहावी पर्यंत थांबले,
बस्स झालं शिक्षण
आता उजवा तुमच्या पोरीला.
एकतर ती नाहीतर मी.”
ह्या नवीन बाईबद्दल कधीच नव्हतं ऐकलं.
“अगं पण, तिचा भार नाही काही,
शिष्यवृत्ती मिळतेय, शिकू दे, ना!”
काकांचा आवाज! भेटलेले मी त्यांना.
मोठे ऑफिसर आहेत म्हणे.
“भार कसा नाही? हवा खाते का?
माझ्या पोराच्या ताटातलं काढून हिला देऊ?
मला नाही जमणार,
आता एक मिनिट पण नको इथे ही कार्टी!”
मला काय करू सुचेना,
सईच्या आज्जीचा आवाज आला
डबा द्यायला एकदा मधल्या सुट्टीत आलेली
फणसासारखी आज्जी,
वरून कडक, मनाने प्रेमळ.
“रमाकांत, बस्स झालं,
पोरीला सांभाळायला दुसरं लग्न केलंस,
तुझ्यासाठी मन मोठं केलं रे,
मला जड न्हाय माझी नात.
पैसा बगून ही घरात आली,
आता माझ्या लक्षीमीसारख्या नातीला हाकलताय,
कुटे फेडाल रं हे सगळं!
पन म्या हाय अजून खंबीर.
म्या शिकविन हिला.”
सईच्या मुसमुसण्याच्या आवाज फक्त..
मला नाही जमलं आत जायला,
केकचा डब्बा घेऊन परत फिरले.
परत काय वाटलं कुणास ठाऊक,
थोडं दूर जाऊन थांबले.
मला वाटलेलंच,
सई आणि आज्जी बाहेर पडल्या,
मी समोर गेले,
तिघींच्या डोळ्यात पाणी,
केकचा डब्बा दिला.
सई आनंदली.
मला कसलं भारी वाटलं!
आज्जी ने हात हातात घेतला,
“पोरी, तुझं लय उपकार हाईत,
तुझ्या आईचबी,
सई पन नाय ईसरणार,
पोरगीनं पयला नंबर काढला,
पर बापाला कौतुक नाय,
असल्या शुभदिनी हाकाललं.
जाऊदे,
तुम्ही मैत्री जपा,
तेवढीच माझ्या नातीला सोबत.
या म्हातारीच्या मनावरचा भार कमी व्हईल.”
आत्ता आज्जी नाही, पण
आज्जीचा शब्द आजपर्यंत नाही मोडला.
फक्त वचन म्हणून नाही,
सईसारख्या मैत्रिणीसाठी.
आत्ता ती शाळा चालवते,
गरीब आदिवासी पोरांसाठी.
दहावीच्या निकालानंतर
मी दरवर्षी केकचा डब्बा नेते,
ती जिथे असेल तिथे.
कधीच खंड नाही पडला.
पण यावर्षी जमणार नाही
दिसत होतंच.
आई एकीकडे, मी एकीकडे
आणि सई एकीकडे..
माझा नेम चुकणार,
सई समजून घेईलच
पण थोडीशी खट्टू होणार..
काय करू, काय करू!
तेव्हा सुप्रिया आठवली,
माझी कॉलेजची मैत्रीण.
ती तर आनंदाने तयार झाली.
मी पोहचवते सई केक,
फिकीर नॉट!
ती पण केकची मास्टर,
तिचा ‘प्रिया’ज चॉकलेट अँड केक’
आमच्या ग्रुपमध्ये एकदम फेमस.
आत्ताच पोहचलीये ऑर्डर,
सईचा मेसेज आलाय,
“कसं जमवतेस दरवर्षी?
थँक् यु!
आईच्या हातासारखीच आहे चव!”
आत्ता कुठे शांत वाटतंय.
माझं समाधान तर डोळ्यांतून झिरपतय,
तिकडे ‘सई’ची पण तीच अवस्था असणार.
कदाचित वरती ‘आज्जी’ची पण.
अश्विनी सुर्वे
अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!
Leave a Reply